Home A blog A हजच्या मार्गाने श्रद्धेचे नवीणीकरण होते

हजच्या मार्गाने श्रद्धेचे नवीणीकरण होते

इस्लामचे पाच स्तंभ आहेत. इमान (श्रद्धा), नमाज, रोजा, जकात आणि हज. इमान म्हणजे अल्लाह एक असल्याचा व त्याचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. असल्याचा अंतःकरणातून  स्वीकार करणे. यालाच अरबी भाषेमध्ये तौहिदसुद्धा म्हणतात.म्हणतात. शिवाय, यालाच इस्लामचा अव्वल कलमा म्हणजे पहिले वचन म्हणतात. यावरच इस्लामची पूर्ण इमारत उभी  आहे.
जेव्हा माणूस पूर्ण विश्वासाने अल्लाह एक असल्याचा व त्याचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. असल्याचा स्वीकार करतो तेंव्हा पुढील चार गोष्टी म्हणजे नमाज, रोजा, जकात आणि हज   
त्याच्यासाठी अनिवार्य होवून जातात.
नमाजला अरबी भाषेमध्ये सलात म्हणतात. नमाजला प्रार्थना सुद्धा म्हटले जाते. नमाजची आत्मा ही प्रार्थना (दुआ) हीच आहे. नमाज दिवसातून पाच वेळेस अनिवार्य करण्यात आलेली आहे. यात शंका नाही की नमाज एकप्रकारची नदी आहे जी माणसाच्या आत्म्याला दिवसातून पाच वेळेस धुवून स्वच्छ करते.
नमाजचा आदेश मुस्लिमांसाठी मिळणे हे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे. कोणत्याही अडचणीच्या वेळेस नमाज हीच मुस्लिमांना साथ देत असते. अल्लाहशी जवळीक साधण्याची  नमाजपेक्षा दूसरी सार्थक इबादत नाही.
रोजा या शब्दाला अरबीमध्ये सौम असा पर्यायी शब्द आहे. ज्याचा शब्दकोषीय अर्थ स्वतः होऊन थांबणे असा होतो. रोजा सुद्धा अल्लाहसाठी अत्यंत प्रिय अशी इबादत आहे. म्हणून  म्हटले जाते की, कोणत्याही सद्‌वर्तनाचा बदला इशदूत माणसापर्यंत पोहोचवतात. मात्र रोजा असे एक सद्वर्तन आहे ज्याचा मोबदला अल्लाह स्वतः साधकास देतो. म्हणून रोजा हा शुद्ध  अल्लाहसाठीच आरक्षित असल्याची भावना संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये आहे. या रोजांच्या माध्यमातून चांगल्या चारित्र्याची निर्मिती अल्लाहला अपेक्षित आहे आणि प्रामणिकपणे रोजा  ठेवल्याने चांगल्या चारित्र्याची निर्मिती होतेच हा सार्वत्रिक अनुभव आहे.
यानंतर जकात ही एक आर्थिक इबादत आहे. श्रीमंतांवर कर लावून त्यापेक्षा गरीबांचे कल्याण साधण्याचे जकात एक सर्वमान्य साधन आहे. सोने जसे तापविल्याने शुद्ध होते तसेच संपत्ती ही जकात दिल्याने शुद्ध होते, अशी मुस्लिम समाजाची मान्यता आहे. जकातमुळे संपत्ती विषयक आकर्षण कमी होते.
व्याजाधारित जीवन व्यवस्थेमध्ये संपत्तीचे आकर्षण मरेपर्यंत संपत नाही. नियमितपणे जकात अदा करणाऱ्या व्यक्तीच्या मनात संपत्तीविषयी अनैसर्गिक आकर्षण निर्माणच होवू  शकत नाही. यात शंका नाही.
वरील इबादतींप्रमाणेच हज सुद्धा एक पवित्र इबादत आहे. हज जीवनातून एकवेळेस पुरेशी आर्थिक तरतूद आणि आरोग्य असणाऱ्या प्रत्येक मुस्लिम स्त्री पुरूषावर अनिवार्य करण्यात आलेले आहे. ही अल्लाहच्या उपासनेची प्राचीन पद्धती आहे. हजचा शब्दकोषीय अर्थ इरादा किंवा निर्णय असा होतो. याचा अर्थ अल्लाहच्या घराच्या दर्शनासाठी आपण रहात असलेल्या पृथ्वीच्या कोपऱ्यापासून मक्कापर्यंत प्रवास करून जाण्याचा इरादा करणे असा आहे. मक्का येथे सध्या अस्तित्वात असलेल्या काबागृहाची रचना हजरत इब्राहीम अलै. यांच्या काळात  झालेली आहे. त्यांनी आपले पुत्र इस्माईल अलै. सलाम यांच्या मदतीने हे बांधकाम पूर्ण केलेले आहे. त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालण्याला तवाफ असे म्हणतात. हज करण्याची एक  विशिष्ट अशी विधी असते. दरवर्षीच्या ईदुल अजहाच्या काळात हज यात्री मक्कामध्ये गोळा होतात. काबागृह हे पृथ्वीतलावरील अल्लाहचे पहिले घर आहे. यापूर्वी पृथ्वीवर कुठेच  अल्लाहचे घर नव्हते. कित्येक पैगंबरांनी मक्कामध्ये येवून या काबागृहामधे इबादत केलेली आहे. असे जरी असले तरी हजरत इब्राहीम अलै. यांच्यापूर्वीही काबागृह अस्तित्वात होते.  पण कालौघात जीर्ण होवून पडल्यामुळे इब्राहीम (अलै.) यांनी जुन्याच काबागृहाच्या पायावर नवीन काबागृहाची निर्मिती केली. सुरे हज मधे या बांधकामाचा तपशील आलेला आहे.  हजच्या संदर्भात एक रोचक तथ्य असे आहे की, सतत तीन दिवस स्वप्नात पैगंबर हजरत इब्राहीम (अलै.) यांनी आपला एकुलता एक पुत्र हजरत इस्माईल (अलै.) याची कुर्बानी देत असल्याचे दृश्य पाहिले. पैगंबरांचे स्वप्न हे स्वप्न नसून ईश्वराचा इशारा असतो. म्हणून इब्राहीम अलै. यांनी इस्माईल अलै. यांना आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले. तेव्हा त्या आज्ञाधारक  पुत्राने आपल्या पैगंबर पित्याला आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची विनंती करत आपण कुर्बान होण्यास तयार असल्याचे नि:संशय सांगितले. जेव्हा इब्राहीम अलै. यांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या डोळयावर पट्टी बांधून आपल्या प्रिय पुत्राच्या मानेवर सुरी चालविली. तेव्हा क्षणाधार्थ इशदूत तेथे आले आणि त्यांनी त्यांच्या तावडीतून इस्माइल अलै.  सलाम यांना बाजूला करून त्या ठिकाणी दुंबा (मेंढा) ठेवून दिला व सुरी मेंढ्याच्या मानेवर फिरविली गेली. जेव्हा कुर्बानी पुर्ण झाली तेव्हा इब्राहीम अलै. यांनी डोळयाची पट्टी काढली  तेव्हा समोरचे दृश्य पाहून ते आश्चर्य चकित जाले तेंव्हा आकाशवाणी झाली की ’’हे इब्राहीम तुम्ही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही. आम्ही अशा  पुण्यवान माणसांची कदर करतो.’’ इब्राहीम अलै. यांची ही कुर्बानी अल्लाहला इतकी प्रिय आहे की, प्रलयाच्या दिवसापर्यंत प्रत्येक सधन मुस्लिम स्त्री पुरूषाला दरवर्षी जनावराची कुर्बानी  देवून इब्राहीम अलै.सलाम यांच्या त्यागाची आठवण राहण्यासाठी अल्लाहने इमानधारकांना आदेशित केलेले आहे.
याच घटनेची आठवण ठेवण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम बांधव ’’लबैक अल्लाहुम्मा लब्बैक’’ (हजर आहे मी हजर आहे) म्हणत मक्काकडे दरवर्षी ईदुल अजहाच्या काळात  येतात.
प्रेषित सल्ल. यांनी एकदा फर्माविले की, ’अल्लाहने हजचा स्विकार केला तर हाजीला जन्नतची प्राप्ती होती.’ त्यांनी मुलं, महिला, वृद्ध आणि कमकुवत लोकांच्या हजला जिहादसुद्धा  म्हटलेले आहे. काही लोक खर्चाला भिवून हज करण्यासाठी टाळाटाळ करतात. यावर प्रेषितांनी अस्से म्हंटलेले आहे की ’’हज एक अशी इबादत आहे ज्यामुळे गुन्हे आणि दारिद्रय असे दूर होते जसे भट्टीमध्ये लोखंड किंवा सोने-चांदी तप्त झाल्यानंतर त्यांच्यातील भेसळ दूर होते.’’ जेव्हा हाजी हज करण्यासाठी मक्का येथे पोहोचतात तेव्हा त्यांची मानसिकता पार  बदलून जाते. काबागृहाचे दर्शन होताच त्याला आपल्या घरा-दाराचा, मुला- बाळांचा, आप्त नातेवाईकांचा, आपल्या व्यवसायाचा सर्वांचाच विसर पडतो. त्याचे व्यक्तीत्व काबागृहाच्या  दर्शनाने भारून जाते.
हजला जाणारे हाजी तेथे पोहोचण्यापूर्वीच आपल्या अंगावरील मौल्यवान चीज, वस्तू, भारी कपडे काढून दोन पांढऱ्या चादरी शरिरावर गुंडाळून अगदी याचकासारखे काबागृहासमोर उभे राहतात आणि इबादतीमध्ये तल्लीन होऊन जातात. कोणकोणत्या देशाचा आहे, कोणत्या पदाचा आहे, कोणत्या दर्जाचा आहे, काळा आहे का गोरा आहे, अरब आहे का अजम आहे याचे भान कोणालाच राहत नाही. सगळे एकाच स्तरावर, एकाच दिशेने मार्गक्रमण करत असतात. हजच्या काळात कुठल्याही प्रकारची चैन करता येत नाही. डोक्याचे केस काढून टाकलेले  असतात. महिलांना कुठल्याही प्रकारचा श्रृंगार करता येत नाही. पतीपत्नी जरी असतील तरी या काळामध्ये त्यांना शरिरसंबंध स्थापन करता येत नाहीत. एकंदरित अतिशय केविलवाण्या  स्थितीत काबागृहासमोर हाजी स्वतःला अल्लाहच्या समोर याचकासारखा सादर करतो जणू काही तो अल्लाहसमोर आपली असहाय्यता व्यक्त करत असतो. हजमध्ये प्रत्यक्ष हजर होवून  हाजी अल्लाहचे मोठेपण, त्याची स्तुती करत विशेष इबादत करतो, विशेष नमाज अदा करत असतो. जणूकाही तो आपल्या इमाना (श्रद्धे) चे नविणीकरण करत असतो. या काळामध्ये  कुठलेही वाईट विचार हाजींच्या मनाला स्पर्शसुद्धा करीत नाहीत. काबागृहाचे पवित्र वातावरण कठोरात कठोर मन असलेल्या लोकांनासुद्धा इतके प्रभावित करते की, अशी माणसे सुद्धा  ढसाढसा रडत असतात.हजच्या आवश्यक विधी पूर्ण करून जेव्हा हाजी परतीच्या प्रवासाला लागतो तेव्हा तो असा शुद्ध होवून जातो जणूकाही त्याने आईच्या उदरातून नुकताच जन्म  घेतलेला आहे. 
हजमध्ये जगभरातील विभिन्न भाषा बोलणारे लोक एकत्रित आलेले असतात. हज एवढे सामाजिक समतेचे दूसरे उदाहरण जगात मिळू शकत नाही. साधारणतः 30 लाख लोक अगदी  शिस्तबद्धपणे दरवर्षी हजच्या इबादतीसाठी मक्का आणि मदिना शहरामध्ये येत आणि जात असतात. एवढ्या मोठ्या जनसमुहामध्ये कुठलेच वाईट कृत्य घडत नाही. ही सुद्धा आश्चर्यजनक गोष्ट म्हणावी लागेल. तरूण स्त्रीला एकटीला हज करता येत नाही. तिला सोबत महेरम (रक्ताचा पुरूष नातेवाईक) सोबत ठेवावा लागतो. हज अनिवार्य झाल्याबरोबर तो  जितक्या लवकर अदा करणे शक्य होईल तिथक्या लवकर अदा करण्यात यावा. विनाकारण उशीर केल्यास ते कृत्य अल्लाहला नाराज करणारे ठरते. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करते  की, अल्लाहने प्रत्येक मुस्लिमाला हज करण्याचे सौभाग्य द्यावे. आमिन 
फेरोज़ा तस्बीह
मिरजोळी, चिपळूण,
रत्नागिरी
9764210789
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *