माणसाकडे अमाप संपत्ती एकवटली तर मग त्यापासून अपराधी वृत्ती जन्माला येते. एक तर लुबाडून सार्वजनिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवणे, गडगंज संपत्ती गोळा करणे याला कोणतीही मर्यादा नसते. पवित्र कुरआनात म्हटले आहे की, अशा प्रवृत्तीचे लोक एकमेकांच्या पुढे जाण्यात कोणत्याही नैतिक नियमांचे पालन करत नसतात आणि धनसंपत्ती बाळगण्यात ते एकमेकांशी वैरभाव करतात. असे लोक स्वतःला आणि इतरांनादेखील कबरीपर्यंत पोहोचविल्याशिवाय राहात नाहीत. मोजक्या लोकांकडे संपत्तीची सर्व साधने एकवटल्यास साहजिकच वंचितांचा त्यांच्याविरूद्ध द्वेषभाव निर्माण होतो. आधुनिक विचारवंतांच्या दृष्टीनेदेखील समाजामध्ये काही उणिवा असतात. वंशवाद, पिळवणूक, नैसर्गिक साधनांची असमान वाटणी यामुळे समाजात आंतरिक कलह निर्माण होतो. पण या विचारवंतांकडे या उणिवांवर मात करण्याची विचारधारा नसते. म्हणून अशा संपन्नवर्गाविरूद्ध समाजामध्ये वैरभाव निर्माण होतो. पुढे जाऊन सामाजिक बंड होतात. जगात जिकडेतिकडे अनाचार माजलेले आपण पाहात आहोत ते याच कारणामुळे, पण सत्ताधारीवर्ग यावर युद्धाचे, आतंकवादाचे आवरण चढवितात. पवित्र कुरआनच्या शिकवणी फक्त गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या सुधारासाठीच नाहीत. अल्लाहने प्रेषित पाठवून साऱ्या मानवजातीला गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याची ताकीद दिली. पवित्र कुरआनात म्हटले आहे की अल्लाहने जर माणसाला विपुल साधने दिली असती तर त्यांनी धरतीवर बंड माजवले असते. ज्यांना अल्लाहने विपुल प्रमाणात दिले आहे त्यांनी त्या साधनसंपत्तीचा लोककल्याणासाठी वापर करावा. हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. नुसते दानधर्म नाही. कारण त्यांनी हे स्वतः कमवलेले नसून तो अल्लाहचा वारसा आहे. म्हणून साऱ्या मानवांचा त्यावर हक्काधिकार आहे. (पवित्र कुरआन – ४२, ३०, ५०)
0 Comments