पवित्र कुरआनच्या शिकवणी येण्याआधी, अरबस्थानात विविध जाती-जमातींची व्यवस्था होती. प्रत्येकास आपल्या जमातीवर निष्ठा होती. संघटित समाज नव्हता. समाजाचे काही मापदंड विशिष्ट परंपरेवर आधारलेले होते. यासाठी सामाजिक, भौगोलिक सीमा, साधने, अर्थव्यवस्था, भावनात्मक आणि बौद्धिक परिमाण असावे लागते. यातला एकही निकष तत्कालीन अरब समाजाला लागू नव्हता. म्हणून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सुरुवातीला समाजजीवनाच्या सुधारणेचे कार्य हाती घेतले. पवित्र कुरआनच्या मागदर्शक तत्त्वांनुसार शून्यातून नव्या समाजाची उभारणी करायची होती. त्या काळी अरबस्थानात सामूहिक जीवन नगण्य होते. प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक जीवन जगत असे. म्हणून प्रेषितांनी वैयक्तिक जीवनात सुधारण घडवून आणल्या. पारंपरिक रुढी-श्रद्धांना तिलांजली दिली. यासाठी प्रेषितांना त्यांना आध्यात्मिक प्रशिक्षण द्यावे लागले. त्यांना पावन आणि पवित्र काय हे सांगिलते. अनिष्ठ रुढी-परंपरा नष्ट केल्या. प्रेषितांनी ज्या शिकवणी त्यांना देण्यास सुरू केली त्यांचा प्रभाव अनुयायांवर अनन्यसाधारण पडला. ते प्रेषितांकडे येऊन आपला गुन्हा कबूल करायचे आणि त्यांना पावन करण्यास प्रेषितांकडे विनंती करायचे. एका अनुयायीचे उदालरण असे की ते एकदा प्रेषितांचकडे आणि म्हणाले, मी चुकलो. माझ्याकडून व्यभिचार झाला आहे. मला शिक्षा करा. प्रेषितांनी त्यांना तीन वेळा परत पाठवले. त्यांच्या कुटुंबियांना विचारले असता ते म्हणाले की ते व्यवस्थित आहेत. परत चौथ्यांदा जेव्हा ते प्रेषितांकडे आले तेव्हा त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली. एका महिलेचेदेखील असेच उदाहरण आहे. तिच्याकडूनही अशाच स्वरूपाचा गुन्हा घडला होता. त्यांनी प्रेषितांकडे शिक्षा करण्याची विनंती केली. प्रेषित म्हणाले, मूल जन्माला आल्यानंतर या. जन्मलेले मूल कडेवर घेऊन त्या परत आल्या. प्रेषित म्हणाले, हे बाळ जेव्हा अन्न खाऊ लागेल तेव्हा या. त्या परत गेल्या आणि दोन वर्षांनी मुलाच्या हातात भाकरीचा तुकडा देऊन परत आल्या आणि प्रेषितांकडे हट्ट धरला की आता तरी मला शिक्षा करा. आणि मग प्रेषितांनी त्यांना शिक्षा दिली – तीच मृत्युदंडाची! म्हणजे प्रेषितांचे अनुयायांना पवित्र जीवन जगण्याची किती उत्कटता होती हेच या उदाहरणांवरून दिसून येते. मापतोल करताना पुरेपूर मापून द्या. तोलताना प्रामाणिक राहा. जे तुम्हाला माहीत नाही अशा गोष्टीमागे पडू नका. ऐकणे, पाहणे आणि मनात ठेवणे या सर्वांविषयी विचारले जाईल. पृथ्वीवर उद्दामपणे संचार करू नकोस, तुम्ली पर्वतांएवढी उंची गाठू शकत नाही की धरतीला दुभंगू शकणार नाही. (संदर्भ – पवित्र कुरआन, १७)
नातीप्रधान समाजव्यवस्था
पवित्र कुरआनच्या शिकवणीनुसार समाजव्यवस्था न पुरुषप्रधान आहे न स्त्रीप्रधान. इस्लामी समाजव्यवस्था नातीप्रधान आहे. या नात्यांच्या केंद्रस्थानी पहिले स्थान मातेचे आणि दुसरे पित्याचे. अल्लाहने मानवांची निर्मिती एका पुरुष आणि एका स्त्रीपासून केली. आणि मग त्यापासून संतती चालत येऊन एक समाज निर्माण होतो. या समाजाच्या रचनेत केंद्रस्थानी माता-पिता आणि नंतर रक्ताची नाती, जवळचे नातेवाईस, शेजारी असे करत हे वर्तुळ विस्तारले जाऊन समाज गोलाकार होतो. धार्मिक विधी, उपासना हे नंतरचे आहेत. पवित्र कुरआननुसार, “तुम्ही तुमचे तोंड पूर्वेकडे केले की पश्चिमेकडे केले हा सदाचार नाही. सदाचार म्हणजे, जे लोक अल्लाहवर श्रद्धा ठेवतात, त्याच्या प्रेमापोटी आपल्या संपत्तीतून आपल्या नातलगांना, अनाथांना, निराधारांना आणि जे मागतील त्यांना देणे होय. (२:१७०)” दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे की, माता-पित्यांशी औदार्याने वागा, त्यांच्यासमोर ब्र देखील काढू नका. एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे आली आणि म्हणाली, मला परवानगी द्या जिहादमध्ये सहभागी होण्याची. प्रेषितांनी विचारले, तुमचे आईवडील हयात आहेत? त्यांनी उत्तर दिले, होय, हयात आहेत. मग प्रेषितांनी आज्ञा दिली की, जा त्यांची सेवा करा, हाच तुमचा जिहाद आहे. प्रेषितांचे सोबती अबू हुरैरा म्हणतात की एका व्यक्तीने प्रेषितांना विचारले, कोण माझ्या सदवर्तनास अधिक पात्र आहे? प्रेषित म्हणाले, तुझी आई. दुसऱ्यांदा त्यांनी विचारले, मग कोण? प्रेषित म्हणाले, तुझी आई. तिसऱ्यांदाही प्रेषितांनी हेच उत्तर दिले. मग त्या व्यक्तीने विचारल्यानंतर चौथ्यांदा उत्तर मिळाले, तुझे वडील. आणखी एका अनुयायींनी विचारले, सर्वोत्तम इस्लाम कोणता? प्रेषित म्हणाले, गरीब आणि वंचितांवर प्रेम करा. लोकांना अडचणीत टाकू नका. त्यांच्यासाठी सुलभता, सहजता निर्माण करा. हाच सर्वोत्तम इस्लाम आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सकारात्मक मूल्यांवर सामाजिक सहिष्णुता परस्परांसाठी संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी निर्माण केली. पवित्र कुरआनने यासाठी दिलेली शिकवण समाजरचनेचा पायाभूत बिंदू होता. अल्लाहने माणसांना एकमेकांशी नातेसंबंध जोडून ठेवण्याचे त्यांच्याकडून वचन घेतले असल्याने जर माणूस अल्लाहने सांगितलेले नातेसंबंध जोडण्याऐवजी ते तोडून टाकत असेल तर मग समाजात अराजकता आणि अनाचार माजेल. याचा अर्थ असा की सामाजिक नातेसंबंध जोपासणे माणसांच्या इच्छेवर सोडलेले नाही तर प्रत्येक माणसाने हे नातेसंबंध जोपासण्यासाठी अल्लाहला वचन दिलेले आहे. हा माणसाने माणसाशी करार केलेला नाही. त्याने आपल्या विधात्याला वचन दिलेले आहे. तसेच हा दोन गटांमधील करार नव्हे. करार करणारे दोघे परस्परांशी काही अटी-नियमांवर करार करत असतात. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला वचन देतो तेव्हा ज्याला वचन दिले जाते ते वचन त्याचा अधिकार असतो. वचन करणाऱ्यास मोडण्याचा अधिकार नसतो. अल्लाहशी वचनबद्धतेमुळेच समाजाचा प्रत्येक घटक प्रामाणिकपणे वागत असतो. कुणी दुसऱ्यावर अन्याय करत नाही. सर्वजण मिळून समाजामध्ये संतुलन कायम राखतात. हे संतुलन राखण्याची जबाबदारीदेखील पवित्र कुरआनद्वारे अल्लाहने माणसावर सोपवली आहे. “या ब्रह्मांडामध्ये जसे संतुलन कायम आहे, सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह ठराविक हिशोबाने भ्रमण करतात, उत्तुंग आकाश उभारून त्यास समतोल ठेवले.” त्याच प्रकारे माणसांनी संतुलन कायम ठेवावे. व्यवहारात संतुलन असावे. प्रेषितांनी ज्या मूल्यांवर समाज निर्माण केले ते असे (१) कुणाचा द्वेष करू नका, (२) एकमेकांशी शत्रुत्व बाळगू नका, (३) आपसात हेवेदावे करू नका, (४) आपसातील नाती तोडू नका, (५) एकमेकांशी बंधुभावाने वागा, (६) मुस्लिम एकमेकांचे बांधव आहेत. ते कुणावर अत्याचार करत नाहीत. कुणास एकाकी सोडून देत नाहीत. कुणाचा तिरस्कार करत नाहीत.
– सय्यद इफ्तिखार अहमद
0 Comments