Home A blog A सत्याची साक्ष (भाग-2)

सत्याची साक्ष (भाग-2)

बंधूनों ! सत्याची साक्ष देण्याची ही ती मोठी जबाबदारी आहे जी माझ्या, तुमच्या आणि आपणासर्वांवर येते. अशा सर्व लोकांवर जे आपला संबंध मुस्लिम समाज, पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्याशी जोडून गौरवान्वित होतात.
    आता हे पाहू की ही साक्ष कुठल्या पद्धतीने देता येईल? मित्रानों! कोणतीही साक्ष दोन पद्धतीने देता येते. एक मौखिक, दूसरी कृतीतून. पहिल्या पद्धतीने साक्ष देणे म्हणजे आपण आपल्या वाणी आणि लेखणीने जगासमोर तो संदेश स्पष्टरित्या पोहोचविणे जो की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मार्फतीने आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. समजाविण्याची आणि हृदय परिवर्तन करण्याची जितकी म्हणून साधणे असू शकतात त्या सर्वांचा उपयोग करून हा संदेश जगापर्यंत पोहोचवला गेला पाहिजे. प्रचार, प्रसार आणि प्रकाशन तसेच विज्ञान आणि कलेशी संबंधित सर्व साधने सुद्धा आपण आपल्या हाती घेऊन जगाला त्या व्यवस्थेच्या संदेशाशी अवगत करायला हवे जी व्यवस्था अल्लाहने समस्त मानवजातीसाठी पाठविलेली आहे.
    आपले चिंतन आणि नैतिकता, चारित्र्य आणि संस्कृतीतून, आपल्या कमाईतून, आपल्या व्यवहारातून, आपल्या कायद्यातून, न्यायव्यवस्थेतून, राजकारण आणि शासन चालविण्याच्या पद्धतीतून, तसेच लोकांच्या आपसातल्या व्यवहारांच्या बाबतीत आणि इतर सर्व दृष्टीकोणातून, इस्लामी व्यवस्थेने मानवासाठी जे मार्गदर्शन केलेले आहे त्याला प्रभावशाली पद्धतीने लोकांसमोर सादर केले गेले पाहिजे. त्याच्या व्याख्या मोकळेपणाने, विस्ताराने, मार्मिक तर्क आणि उदाहरणासहीत लोकांसमोर मांडले पाहिजे, हेच मार्गदर्शन सत्य आहे हे लोकांसमोर सिद्ध केले पाहिजे. आणि पृथ्वीवर जे काही या ईश्‍वरीय मार्गदर्शनाच्या विरूद्ध आहे त्यावर योग्य ती टिका आणि टिप्पणी करून जगाला हे दाखवून दिले पाहिजे की त्याच्यात कोणती खराबी आहे? या तोंडी साक्ष देण्याचे आपले कर्तव्य तोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत उम्मते मुस्लिमा सामुहिकरित्या लोकांच्या मार्गदर्शनाची अगदी त्याच प्रमाणे काळजी करेल ज्याप्रमाणे प्रेषित मुहम्मद सल्ल. हे व्यक्तिगतरित्या यासाठी त्यांच्या हयातीत करत होते.
    तोंडी साक्ष देण्याचे हे कर्तव्य पूर्ण करणे यासाठी आवश्यक आहे की, हे काम आपल्या सर्व सामुदायिक प्रयत्न आणि आपल्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी राहील. आपल्याला आपल्या मन आणि बुद्धीमध्ये असलेली सर्व शक्ती पणाला लावून आणि आपल्याकडे उपलब्ध असलेली सर्व संसाधने या कामावर लावून प्रयत्न करावे लागतील. आपण करत असलेल्या प्रत्येक कामाच्या वेळी हाच उद्देश आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे की, आपल्याला सत्याची साक्ष द्यावयाची आहे. आपल्यामधून कुठल्याही परिस्थितीत अशी आवाज उठता कामा नये जी सत्याच्या विरूद्ध साक्ष देणारी असेल.
    राहता राहिला प्रश्‍न प्रत्यक्ष कृतीने साक्ष देण्याचा, तर त्याचा अर्थ असा आहे की, आपण आपले जीवन जगताना त्या तत्वांची अंमलबजावणी करावी ज्यांना आपण सत्य मानतो. जग केवळ आपल्या तोंडी साक्षीने सत्य ऐकूण तेवढे प्रभावित होणार नाही जेवढे कृतीने होईल. त्यांना प्रभावित करायचे असेल तर त्यांना त्यांच्या डोळ्यांनी आपल्या जीवनातील वैशिष्ट्ये आणि बरकती पाहता आल्या पाहिजेत. आपल्या आचरणातून आपण त्यांना त्या गोडव्याची चव चाखवली पाहिजे जो गोडवा इस्लामी श्रद्धा माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर येते. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे की, इस्लामी व्यवस्थेमध्ये जी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत त्याची अंमलबजावणी केल्याने किती चांगली माणसं तयार होतात, किती न्यायप्रिय समाज तयार होतो, किती सुंदर समाज बनतो, किती स्वच्छ संस्कृती जन्माला येते, किती योग्य पद्धतीने ज्ञान, कला आणि साहित्याचा विकास होतो, माणसं किती न्यायप्रिय, सहृदयी तयार होतात आणि किती भांडणमुक्त, पवित्र, आर्थिक सहाय्य करणारे लोक पुढे येतात आणि लोकांच्या व्यक्तीगत जीवनाची प्रत्येक बाजू किती चांगल्या पद्धतीने सुधरतेे? माणसं किती एकमेकांची काळजी करतात आणि एकमेकांच्या सहकार्याने समाज किती श्रीमंत होवून जातो? या सत्याच्या साक्षीचे कर्तव्य अशा पद्धतीनेच अदा करता येईल की, आपल्या व्यक्तीगत आणि सामुहिकतेतूनही इस्लामी व्यवस्था सत्य असल्याची लोकांना खात्री पटावी. आपल्या लोकांचे चारित्र्य इतके उंच असावे की, ते सत्याची साक्षीदार बनून जावेत. आपली निवासस्थाने सत्याच्या साक्षीने सुगंधीत व्हावीत, आपली दुकाने आणि आपले कारखाने सत्याच्या प्रकाशाने दैदिप्यमान व्हावेत. आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्था त्याच्या प्रकाशाने न्हाऊन निघाव्यात. आपले साहित्य व वर्तमानपत्रांनी, पाक्षिकांनी (इस्लाम) सत्य असल्याचे प्रमाणपत्र लोकांसमोर सादर करावेत. आपली सामाजिक ध्येय धोरणे आणि सामुहिक प्रयत्न इस्लाम सत्य असल्याचा खुला पुरावा असावा. थोडक्यात असे की, आपला जेथे आणि ज्या हैसियतीमध्ये ज्या व्यक्ती आणि समाजाशी संबंध येतो त्यांना आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक चारित्र्यामध्ये तो पुरावा मिळून आला पाहिजे ज्याला आपण सत्य म्हणतो. हे सत्य असल्यामुळेच त्यांच्यावर आचरण केल्याने प्रत्यक्षपणे मानवी जीवनामध्ये चांगल्या सुधारणा होतात.
मला या ठिकाणी असेही स्पष्ट करावयाचे आहे की, या प्रकारची साक्ष प्रभावशालीपणे देणे तेव्हाच शक्य होते जेव्हा या नियमांवर असे एक राज्य तयार व्हावे जेथे संपूर्णपणे इस्लामी शरियतवर आचरण केले जात असेल. त्या राज्यामध्ये न्याय, सुधार प्रकल्प, चांगली व्यवस्था आणि प्रबंधन, शांती, जनकल्याण आणि सुधारणेने, आपल्या सरकारी अधिकार्‍यांच्या उत्कृष्ट वर्तणुकीने, आपल्या पवित्र अंतर्गत राजकारणाने, सत्य आणि न्यायाने भरपूर अशा विदेश नितीने, आपल्या सभ्य युद्धाने आणि आपल्या एकनिष्ठतापूर्ण तहाने सगळ्या, जगासमोर आपण या गोष्टीची साक्ष देऊ की तीच व्यवस्था श्रेष्ठ आहे ज्या व्यवस्थेने या राज्याला जन्म दिलेला आहे. तोच धर्म वास्तविकपणे मानवी कल्याण आणि यशस्वीतेची गरज पूर्ण करतो. आणि त्यावर आचरण करण्यामध्येच सर्व मानवतेचे कल्याण निहित आहे. ही कृतीपूर्ण साक्ष जेव्हा कौली शहादती (तोंडी साक्ष) सोबत एकरूप होवून जाईल तेव्हाच आपण खरी साक्ष देण्याची जबाबदारी पूर्णपणे अदा केली असे मानले जाईल व ती जबाबदारी जी की अल्लाहने मुस्लिम समाजावर टाकली आहे.
    ही साक्ष जेव्हा मुस्लिम देतील तेव्हाच इतर लोक (मानव समाज) हा आरोप करू शकणार नाही की, सत्याची साक्ष तर आमच्या पर्यंत पोहोचलीच नाही. तेव्हाच मुस्लिम समाज यासाठी पात्र होवू शकेल की, आखिरत (परलोक)च्या न्यायालयात प्रेषित मुहम्मद सल्ल.च्या नंतर उभे होवून ते साक्ष देवू शकतील की जे काही प्रेषित सल्ल. यांनी आमच्यापर्यंत पोहोचविले होते ते सर्व आम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे. याउपरही जे लोक असत्य मार्गावर राहतील त्यांची जबाबदारी आमच्यावर नाही. त्यासाठी ते स्वतः जबाबदार आहेत.
    प्रिय बंधूनों ! तर ही ती साक्ष आहे जी मुस्लिम असल्याच्या कारणाने आपल्याला आपल्या तोंडाने आणि कृतीने देणे गरजेचे आहे. मात्र प्रश्‍न असा उत्पन्न होतो की, वास्तवमध्ये आपणही सत्याची साक्ष देत आहोत की नाही? चला तर मग याचा आढावा घेऊ.
    अगोदर तोंडी साक्ष देण्यासंबंधी पाहू. या संदर्भात एक महत्वाची बाब ही की  आपल्यामध्ये जरूर एक छोटा गट अशा लोकांचा अस्तित्वा आहे जो काही ठिकाणी व्यक्तीगत तर काही ठिकाणी सामुहिक पद्धतीने मौखिक आणि लिखितरित्या इस्लाम सत्य असल्याची साक्ष देत आहे. मात्र असे लोक आणि संघटना बोटावर मोजता येतील एवढ्याच आहेत. हे लोक अगदी त्याच पद्धतीने सत्याची साक्ष देत आहेत ज्या पद्धतीने साक्ष देणे अपेक्षित आहे. या मुठभर लोकांना आपण जर वेगळे केले तर आपण पहाल इतर मुस्लिम लोक हे मौखिक आणि लिखितरित्या सत्याची तर साक्ष देतच नाहीयेत उलट त्यांची साक्ष इस्लामविरूद्ध जात आहे. आपले जमीनदार भरपूर जमीन बाळगून इस्लामी वारसाहक्काचा कायदा चुकीचा (अस्तगफिरूल्लाह) असल्याची व अज्ञान काळातील चालीरिती खरी असल्याची साक्ष देत आहेत. आपले वकील आणि काजी (न्यायाधिश) या गोष्टीची साक्ष देत आहेत की, (अस्तगफिरूल्लाह) इस्लामचे सर्व कायदे चुकीचे आहेत. एवढेच नव्हे तर इस्लामी कायदा हा मुळातच स्वीकार्ह नाहीये. स्वीकार्ह फक्त तेच कायदे आहेत जे लोकांनी बनविलेले आहेत. आमचे शिक्षक, आमचे प्राध्यापक आणि आमच्या शिक्षण संस्था या गोष्टीची साक्ष देत आहेत की, इस्लामी तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र, इतिहास आणि समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण आणि कायदा आणि नैतिकतेच्या बाबतीत तेच विचार खरे आहेत जे पश्‍चिमी देशांच्या मुलहिदाना तालीम (नास्तीकतेला प्रोत्साहित करणारे शिक्षण) मधून घेतले गेलेले आहेत. आणि या संदर्भात इस्लामचा दृष्टीकोण लक्ष देण्याइतपत सुद्धा लायकीचा नाही. आमचे साहित्यिक आपल्या साहित्यातून या गोष्टीची साक्ष देत आहेत की, त्यांच्याकडेही आपल्या साहित्यातून तोच संदेश देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही जो ब्रिटन, फ्रान्स आणि रशियासारख्या नास्तीक साहित्यिकांकडे आहे. मुस्लिम असल्याच्या नात्याने त्यांच्याकडे कोणताही कायम असा आत्मा नाही. आमचे प्रेस या गोष्टीची साक्ष देत आहेत की, त्यांच्याकडेही वाद-विवाद करण्यासाठी, प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्यासाठी, प्रचार करण्याच्या त्याच पद्धती आहेत ज्या मुस्लिमेत्तरांकडे आहेत. आमचे व्यापारी, उद्योगपती आणि कारखानदार साक्ष देत आहेत की, इस्लामी आर्थिक व्यवहाराची जी चौकट आहे ती व्यवहारिक नाही आणि व्यवसाय त्याच पद्धतीनुसार शक्य आहे, जी पद्धत मुस्लिमेत्तरांनी स्विकारली आहे. आमचे नेते साक्ष देत आहेत की, त्यांच्याकडेही वंशवाद आणि राष्ट्रवाद या व्यतिरिक्त दूसरे कुठलेही नारे नाहीत, त्यांच्या मागण्या त्याच पठडीतल्या आहेत. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्याची पद्धतही तीच आहे, राजकारण आणि संविधानाचे नियमही तेच आहेत जे अन्य धर्मियांकडे आहेत आणि इस्लाम (अस्तगफिरूल्लाह) यासंदर्भात कोणतेच मार्गदर्शन करत नाहीये. आमची जनता साक्ष देत आहे की, तिच्याकडेही मौखिक साक्ष देण्यासाठी इतरांप्रमाणेच भौतिकता आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी आहेत. त्यापेक्षा वेगळा दीन (व्यवस्था) त्यांच्याकडे नाही. अशी दीनी व्यवस्था ज्यावर ते आपल्या वाणीने चर्चा करू शकतील किंवा त्यावर आपला थोडासा वेळ खर्ची घालू शकतील. ही आहे मौखिक साक्ष ची आमची परिस्थिती. ही परिस्थिती फक्त भारतीय मुस्लिमांचीच नाही तर जागतिक मुस्लिमांचीसुद्धा आहे.    (क्रमशः)

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *