Home A blog A सत्याचा संदेश म्हणजे काय व तो कसा द्यावा?

सत्याचा संदेश म्हणजे काय व तो कसा द्यावा?

जमीन माणसांना राहण्यालायक आहे का नाही हे माणसांच्या वर्तवणुकीवरूनच ठरते. माणसं जर सदाचारी असतील तर जमीन राहण्यालायक बनते आणि ते दुराचारी असतील तर जमीनीवर राहण्यापेक्षा जमीनीच्या पोटात राहणे जास्त योग्य असते. जनसमूहाचे वर्तन त्यांच्या श्रद्धेनुसार ठरत असते. ईश्वराने संपूर्ण मानव समुहांसाठी श्रद्धा म्हणून इस्लामला पसंती दिलेली आहे. म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ’’अल्लाहजवळ धर्म केवळ इस्लामच आहे.’’ (संदर्भ : आले इमरान आयत नं. 19). 

जोपर्यंत मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक व्यवहारिकदृष्ट्या इस्लामचा संदेश इतर समाजापर्यंत परिपूर्णरित्या पोहोचविण्याचा संकल्प करणार नाहीत तोपर्यंत जगात होणारे अत्याचार कमी होणार नाहीत. कारणकी सदाचाराची स्थापना करण्यासाठी दुराचाराची पाळेमुळे खंदून काढल्याशिवाय आदर्श समाजाची निर्मिती शक्य नाही. दुराचारी व्यवस्थेतील वाईट गोष्टी हटविल्याशिवाय सदाचारी व्यवस्थेच्या चांगल्या गोष्टींची पेरणी करणे संभव नाही. या कामासाठी मौखिक उपदेशांपेक्षा व्यवहारिक प्रयत्नांची गरज आहे. पैगंबरी मिशनचा उद्देश नैतिक रूपाने श्रेष्ठ समाजाची निर्मिती करणे हाच होता. 

सत्याचा संदेश म्हणजे काय? 

लाईलाहा ईलल्लाह मुहम्मदुर्र रसुलुल्लाह (सल्ल.) म्हणजे अल्लाहशिवाय कोणी ईश्वर नाही आणि मुहम्मद सल्ल. हे त्याचे प्रेषित आहेत. या दोन वाक्याच्या श्रद्धासुत्राने रानटी प्रवृत्तीच्या अरबी टोळ्यांच्या जीवनामध्ये अभूतपूर्व अशी क्रांती घडवून आणली आणि पाहता-पाहता शंभर वर्षाच्या आत पृथ्वीवरील एक तृतीयांश भूमीवर या श्रद्धा सुत्राने ताबा मिळविला. हेच श्रद्धा सुत्र म्हणजे सत्याचा संदेश होय. 

सत्याचा संदेश का द्यावा?

पृथ्वीवर खऱ्या अर्थाने शांतता व सुव्यवस्थता  राखण्यासाठी हा संदेश द्यावा. या संदेशाशिवाय जगाकडे दूसरा पर्याय नाही.  

सत्याचा संदेश कसा द्यावा?

ईश्वर एक आहे आणि त्याचे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) आहेत. हे सत्य आहे आणि या सत्याचा संदेश जगाला कसा द्यावा? याचे मार्गदर्शन सुद्धा कुरआनमध्येच केले गेलेले आहे. म्हणून म्हटलेले आहे की, ’’हे पैगंबर सल्ल. ! आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे (लोकांना) आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहीत, लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल.’’ (संदर्भ : सुरे नहेल आयत क्र. 125). प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की,’’ तुम्ही जमिनीवर राहणाऱ्या लोकांवर दया करा आकाशात राहणारा ईश्वर तुमच्यावर दया करील.’’ (तिर्मिजी : खंड-2 हदीस क्र. 19).

भारतापुरता विचार केला तर भारताच्या संविधानामध्ये धर्माच्या आचरणाची व त्याच्या प्रचार व प्रसाराचा मुलभूत हक्क सर्व नागरिकांना दिलेला आहे. म्हणूनच भारताचे नागरिक म्हणून मुस्लिमांना इस्लामनुसार जीवन जगण्याची व त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हक्क अनुच्छेद 25 नुसार मिळालेला आहे. मात्र हा हक्क प्रत्यक्षात वापरतांना तारतम्य बाळगण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे कारण या ह्न्नाच्या विरूद्ध अनेक राज्यांनी धर्मांतर विरोधी कायदा केलेला आहे. इस्लामच्या सुरूवातीच्या काळात इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक मुस्लिम व्यक्ती तळमळीने काम करता होता. मात्र अलिकडच्या काळात भौतिक प्रगती आणि उच्च राहणीमानाच्या हव्यासापोटी मुस्लिम समाजामध्ये इतरांपर्यंत इस्लामचा संदेश पोहोचविण्याच्या प्रक्रियेमध्ये संथपणा आलेला आहे. नव्हे अनेक मुस्लिम असे आहेत ज्यांच्या जीवनात इस्लाम नावापुरताच शिल्लक राहिलेला आहे. वास्तविक पाहता आज देशात भ्रष्टाचार, अनाचार, अन्याय, अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की तो नष्ट करण्यासाठी इस्लामची शिकवण संपूर्ण ताकदीने देणे गरजेचे झाले आहे. उदा. कल्पना करा तुम्ही कोविड-19 च्या औषधाचा शोध लावण्यात यशस्वी झालात तर तुमच्यात ते औषध इतर लोकांपर्यंत पोहोचविण्याची जी तळमळ उत्पन्न होईल तीच तळमळ किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त तळमळ इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमच्यात आणि प्रत्येक मुस्लिमाममध्ये असायला हवी. 

सत्याचा संदेश दिला नाही तर?

इस्लामला श्रद्धा म्हणून अंगीकारणे यावरच पृथ्वीवरील शांतता आणि सुव्यवस्था तसेच मानवकल्याण अवलंबून असल्यामुळे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणे, त्यासाठी वेळ आणि संपत्ती खर्च करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे आद्य कर्तव्य आहे. ते कर्तव्य करण्यापासून मुस्लिम समाज कुचराई करत असेल तर त्याचे काय परिणाम होतील, याची भविष्यवाणी सुद्धा कुरआनमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणूनच म्हटलेले आहे की, ’’ तुम्ही जर तोंड फिरवाल तर अल्लाह तुमच्या जागी एका अन्य जनसमुहाला उभा करेल आणि ते तुमच्यासारखे असणार नाहीत.’’ (संदर्भ : सुरे मुहम्मद आयत क्र. 38).

सत्याचा संदेश देण्यासाठी कोण पात्र आहे?

तसे पाहता सत्याचा संदेश देणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती (च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.’’ (सुरे आलेइमरान आयत क्र.110). परंतु काही लोकांवर याची विशेष जबाबदारी येते. म्हणूनच कुरआनच्या याच सुरहमध्ये म्हटलेले आहे की, ’’तुमच्या पैकी एक गट असा जरूर असावा जो सद्वर्तनाचे आवाहन करणारा व चांगुलपणाचा आदेश देणारा तसेच दुराचाराचा प्रतिबंध करणारा असेल. अशाच लोकांना साफल्य लाभेल.’’(सुरे आलेइमरान 104) 

अगदी प्रेषित काळापासून आजपर्यंत इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अखंडपणे सुरू आहे. त्या प्रक्रियेतून आलेल्या अनुभवातून हा संदेश पोहोचविणारा व्यक्ती कसा असावा? या संदर्भाचे काही ठोकताळे ठरविण्यात आलेले आहेत. ते खालीलप्रमाणे –

1. संदेश देणाऱ्या व्यक्ती (दाई) मध्ये इस्लाम हाच एकमेव सत्यधर्म आहे याचा संपूर्ण आत्मविश्वास असावा. 

2. त्याला कुरआनची आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवन चरित्राची इत्यंभूत माहिती असावी. 

3. ज्याला संदेश दिला जात आहे (मदू) त्याच्याकडून इस्लाम आणि मुस्लिमांसंबंधी विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांचे उत्तर संदेश देणाऱ्याकडे तयार असावेत. 

4. संदेश देणाऱ्याचे चारित्र्य इस्लामच्या शिकवणी बरहुकूम असावे. त्याच्या बोलण्यात आणि चारित्र्यात विरोधाभास नसावा. 

5. त्याला इस्लामच्या इतिहासाची इत्यंभूत माहिती असावी. त्याच्या वागण्याबोलण्यात नम्रता असावी. अल्लाहने आपले प्रेषित हारूण आणि मुसा अलैसलाम यांना दुष्ट फिरऔन (फारेह)कडे भेटीसाठी पाठवितांना ताकीद केली होती की,’’त्याच्याबरोबर नरमाईने बोला. कदाचित तो उपदेश स्वीकारेल अथवा भीती बाळगेल’’ (सुरे ताहा आयत क्र. 44).

6. संदेश देतांना वापरली जाणारी भाषा आक्रमक किंवा विकृत नसावी. बोलण्यामधील अवाजवी आक्रमकता हे एक मानसिक रोगाचे लक्षण आहे. चरित्रहीन व्यक्तीच विकृत भाषेचा वापर करत असतात. 

7. संदेश देतांना जर का कोणी पलटून संदेश देणाऱ्याला उद्धट वागणूक दिल्यास किंवा इस्लामबद्दल अपशब्द काढल्यास ते सहन करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. म्हणून कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’कृपावंताचे (अस्सल) दास ते आहेत जे जमिनीवर नम्रपणे चालतात आणि अज्ञानी  (लोक) त्यांच्या तोंडी लागले तर (ते) म्हणतात की, तुम्हाला सलाम.’’ (सुरे फुरकान आयत नं.63).

संदेश देणाऱ्याने एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की, आपले कर्म आणि आपला प्रत्येक शब्द फरिश्ते (ईशदूत) रेकॉर्ड करत आहेत. संदेश देणाऱ्याने वाईट बोलणाऱ्याला वाईट पद्धतीने उत्तर दिल्यास एक गोष्ट स्पष्ट होवून जाते की, त्याच्यामध्ये सहनशिलतेचा अभाव आहे व त्याला प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या संदेश देण्याच्या पद्धतीबद्दल पुरेसे ज्ञान नाही. लक्षात ठेवा मित्रांनों! कोणताही लोकसमुह त्याच्या नैतिक आचरणानेच ओळखला जातो आणि विनम्रतेशिवाय नैतिक आचरण शक्य नाही. 

8. संदेश देणारा चांगला श्रोता असावा. ज्याला संदेश दिला जात आहे त्याचेही म्हणणेही मन लावून ऐकण्याची त्याच्यात पात्रता असावी. 

9. संदेश देणाऱ्या व्यक्तीला तो संदेश ज्याला देत आहे त्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेची जाण असायला हवी. समोरची व्यक्ती जरी अपरिचित असेल तरी त्याच्या देहबोलीवरून त्याला चटकन ओळखता यावे की, संदेश ऐकणाऱ्याची मनःस्थिती कशी आहे? जर तो लक्षपूर्वक ऐकत असेल तर त्याला उत्तमोत्तम भाषेत, तार्किक दृष्टीने आणि मृदू वाणीने संदेश द्यावा. जर तो इकडे-तिकडे पहात असेल, उडवा-उडवीची उत्तरे देत असेल, तो एकाग्रचित्त नसेल, त्याला कुठेतरी जाण्याची घाई असेल तर संदेश देणाऱ्याने तात्काळ त्याला मोकळीक द्यावी. 

10. संदेश देणाऱ्याने संदेश ऐकणाऱ्यावर कधीच आपले श्रेष्ठत्व गाजवू नये. त्याला कमी लेखू नये उलट त्याला सन्मानजनक वागणूक द्यावी, त्याच्या हितासाठी आपल्याकडे बरेच काही देण्यासारखे आहे अशा भावनेने संभाषण करावे. बेजोड तर्क देवून कधीही पुढील व्यक्तीस निरूत्तर करू नये, यामुळे तो चिडून इस्लामच्या विरूद्ध जाईल. 

11. इस्लामचा संदेश पुन्हा-पुन्हा द्यावा. कारण माणूस चांगला उपदेश फारसा लक्षात ठेवत नाही. कोणत्या घटिकेला संदेश त्याच्या मनावर परिणाम करून जाईल, हे सांगता येत नाही म्हणून कंटाळा न करता वेगवेगळ्या दृष्टीकोनातून एकाच व्यक्तीला पुन्हा-पुन्हा संदेश द्यावा. 

12. एखादी व्यक्ती मोठ्या दुःखात असेल, निराश असेल, त्याने जवळचे लोक गमावलेले असतील, तो तणावग्रस्त असेल, अत्याचार सहन करत असेल किंवा वैफल्यग्रस्त असेल अशा व्यक्तीस धीर देऊन अल्लाहची कृपा किती विशाल आहे व तो नक्कीच त्याला दुःखातून काढेल, हे सत्य त्याच्या मनावर बिंबवावे. प्रत्येक दुःखानंतर सुख येतेेच ही ईश्वरी लीला आहे. हे त्याला पटेल अशा पद्धतीने सांगितले तर अशी व्यक्ती पटकन संदेश ग्रहण करते. 13. संदेश देणाऱ्याने बोलताना उच्च कोटीचे तर्क आणि मृदू भाषेचा वापर करावा व आपण समोरच्या व्यक्तीचे हितैशी आहोत याची त्याला खात्री पटवून द्यावी. 14. होता होईल तेवढे कुरआनच्या आयातीचे हवाले द्यावेत, संदेश जशाचा तसा द्यावा, त्यात मनाने काही घुसडू नये. कारण बऱ्याच वेळेस ऐकणारे हे सांगणाऱ्या पेक्षा जास्त समजदार असतात. 15. संदेश देणाऱ्याने आपल्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची मनोभावाने सेवा करावी. त्याच्या सुख-दुःखामध्ये सामील व्हावे. अडी-अडचणीमध्ये मदत करावी. त्याने लोकांसाठी नेहमी उपलब्ध असावे. अशा व्यक्तीचा संदेश लोक इतरांच्या तुलनेने लवकर स्वीकार करतात. 

संदेश देण्याच्या पद्धती

संदेश प्रत्येक भेट घेऊन बोलून देणे ही एक प्रभावशाली पद्धत आहे. शिवाय, लेखन, भाषण, डिबेटच्या माध्यमातूनही संदेश देता येतो. आजकाल समाज माध्यमाच्या मार्फतही उत्तमोत्तम पोस्ट करून संदेश देता येणे सहज शक्य आहे. संदेश एकट्याने देण्यापेक्षा सामुहिक प्रयत्नातून संदेश दिल्या गेल्यास तो जास्त प्रभावशाली ठरतो. अनेकवेळा संदेश देण्याच्या प्रक्रियेतून गैरसमज निर्माण होवून संदेश देणाऱ्याचे नुकसान होवू शकते, असे नुकसान सहन करण्याची सहनशक्ती त्याच्यामध्ये असावी. 

संदेश स्वीकारण्यामागील अडचणी

1. इस्लामचा संदेश स्वीकारणे म्हणजे आपल्या अनैतिक इच्छा-आकाक्षांचा बळी देणे होय. म्हणून इच्छेचे गुलाम लोक इस्लामचा संदेश सहजासहजी स्वीकारत नाहीत. 

2. इस्लामचा संदेश स्वीकारला तर आर्थिक नुकसानाची भीती ही मक्काकालीन कुरैशपासून ते आजच्या  आधुनिक काळातील लोकांच्या मनामध्ये एकसारखीच आहे. इस्लामचा संदेश स्वीकारताच व्याजापासून मिळणाऱ्या सहज लाभाला मुकावे लागते. दारूचा व्यवसाय बंद करावा लागतो, फॅशन, सिनेउद्योगावर पाणी सोडावे लागते. अनैतिक मार्गाने सत्तेतून मिळणाऱ्या लाभाचा त्याग करावा लागतो. खोटे बोलता येत नाही, धोका देता येत नाही, प्रत्येक बाबतीत हलाल आणि हराम (वैध आणि अवैध)ची अट पाळावी लागते. वाड-वडिलांकडून चालत आलेल्या चुकीच्या परंपरांचा त्याग करावा लागतो. चंगळवादी जीवनशैली सोडावी लागते. याप्रकारची एक ना अनेक बंधने येतात म्हणून सहसा लोक इस्लामचा संदेश खरा आहे हे पटल्यावर सुद्धा ते स्वीकारत नाहीत. 

अशा लोकांच्या बाबतीत मौलाना अबुल आला मौदूदी यांनी म्हटलेले आहे की, ‘‘ज्या व्यक्तीला खऱ्या आणि खोट्यामधील फरक व्यवस्थित पद्धतीने स्पष्ट करून दाखविला जातो तरी तो ते मान्य करत नाहीत. मग त्याच्या समोर काही लोक खऱ्या मार्गावर चालून सुद्धा दाखवून देतात की, अज्ञान काळात ते ज्या वाम मार्गाला लागलेले होते त्याचा त्याग करून, इस्लामचा मार्ग स्विकारल्याने त्यांचे जीवन किती सुखद झाले. तरी सुद्धा वाम मार्गी माणूस त्यापासून काही धडा घेत नाही. तर याचा अर्थ असा आहे की, आता तो फक्त आपल्या वाम मार्गाची शिक्षा भोगल्यावरच स्विकार करेल की हां, हा मार्ग चुकीचा होता. जो व्यक्ती डॉक्टरच्या अभ्यासपूर्ण सल्ल्यांना स्वीकारत नाही आणि आपल्यासारख्या अन्य आजारी माणसांना डॉक्टरांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी करून रोगमुक्त झालेले पाहूनही धडा घेत नाही, तर मग असा व्यक्ती जेव्हा आजाराने खिळून मृत्यू पंथाला लागेल तेव्हाच स्वीकार करेल की, तो ज्या पद्धतीने जीवन जगत होता ती पद्धत त्याच्यासाठी खरोखरच जीवघेणी होती.’’(संदर्भ : तफहीमूल कुरआन खंड 2 पान क्र.35)

इस्लामचा संदेश न दिल्यामुळे भारतीय मुस्लिमांनी भरपूर हानी सहन केलेली आहे. जातीय दंगलीपासून मॉबलिंचिंग पर्यंत, बॉम्बस्फोटाच्या घटनेत खोटे आरोपी बनविण्यापासून डिटेन्शन सेंटरमध्ये टाकण्याची जी भाषा केली जात आहे त्यामागे मुस्लिमेत्तर बांधवांचा इस्लाम संबंधीचा चुकीचा समज / गैरसमज तसेच इस्लाम संबंधीची अवास्तव भीती कारणीभूत आहे. मुस्लिमांनी इस्लामचा संदेश त्यांच्या पर्यंत आपल्या वाणी आणि आचरणातून पोहोचविणे तर सोडाच नेमका त्याविरूद्ध संदेश त्यांच्यापर्यंत जाईल, याची व्यवस्था त्यांनी आपल्या आचरणातून केली. एवढे असले तरी – दिल नाउम्मीद नही नाकाम ही तो है, लंबी गम की शाम सही शाम ही तो है. चांगल्या कार्यासाठी इस्लामचा संदेश देण्याएवढे चांगले कार्य दूसरे कोणतेच नाही व चांगले कार्य करण्यामध्ये उशीर जरी झाला तरी हरकत नाही. आता तरी भारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पूर्ण आत्मविश्वासाने देशबांधवांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. बाकी सर्व ईश्वराच्या हाती आहे. म्हणून शेवटी दुआ करतो की, ’’ऐ अल्लाह! आम्हाला इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचविण्याचे कल्याणकारी आणि महान कर्तव्य बजावण्याची समज, शक्ती आणि धैर्य प्रदान कर. आमीन.’’ 

– एम.आय.शेख

संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *