आज भी हो गर बराहीम सा इमां पैदा
आग कर सकती है अंदा़ज-ए-गुलिस्ताँ पैदा
करा ऑगस्टच्या मध्यरात्री पुण्यातील 12 नामांकित, पंचतारांकित हॉटेल्समध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापे मारून तब्बल सात हजार तरूण-तरूणींना बेधूंद अवस्थेत अटक केली. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. हा छापा ना पहिला आहे ना शेवटचा. ही सात हजार तरूण मंडळी फक्त 12 हॉटेल्समधील आहेत. याशिवाय इतर हॉटेल्स, धाबे आणि पब मधील तरूण-तरूणी, शिवाय संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना संपूर्ण देशात अशा पद्धतीच्या जीवन जगणार्यांची संख्या किती असेल याचा अंदाज सुद्धा करता येणार नाही.
मुंबई पुण्यामध्ये उशीरा रात्रीपर्यंत रेव्ह पार्ट्यांची संस्कृती घट्ट रूजलेली आहे. उशीरा रात्रीपर्यंत जागणे, ड्रग्स घेणे, डान्स करणे, सकाळी उशीरा उठणे हे या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. जीवनाला उध्वस्त करणार्या या संस्कृतीचा बहुतेक लोकांनी जीवन पद्धती म्हणून स्विकार केलेला आहे. हे असेच आहे जसे विषाला अमृत समजणे.
अशा पद्धतीचे जीवन जगणार्या लोकांपैकी अनेक लोक असेही आहेत की, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सूर्य उगवतांना पाहिलेला नाही. स्वार्थ, फसवणूक, भ्रष्टाचार, व्याज, अश्लीलता, अनैतिकता या व्यवस्थेचे गुण विशेष आहेत. स्पष्ट आहे अशी जीवन पद्धती ज्या लोकांनी अंगिकारली आहे त्यांचे जीवन तणावपूर्ण राहणार आणि जीवनाचा अंत वेदनादायक होणार. अशा जीवन व्यवस्थेमध्ये फक्त तारूण्य आणि सौंदर्याला महत्व असते. लहान मुलं आणि वृद्धांना अशा व्यवस्थेमध्ये स्थान नसते. समाजामध्ये वाढणार्या वृद्धाश्रमांची संख्या या गोष्टीचा पुरावा आहे. इस्लाम पूर्व काळात सुद्धा बहुतांशी लोकांनी अशीच भ्रष्ट व अनैतिक जीवन पद्धती अवलंबिलेली होती.
जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पृथ्वीतलावरील लोक जरी बदलत असले, जुने जाउन नवीन येत असले, तरी त्यांची मूळ प्रवृत्ती बदलत नाही. आंधळ्या माणसाचा हात धरून त्याला रस्ता पार करण्यासाठी मदत करणे हे आज पासून 10 हजार वर्षापूर्वी सद्वर्तन होते, आजही सद्वर्तन आहे आणि अंतिम निवाड्याच्या दिवसाच्या सूर्योदर्यापर्यंत सद्वर्तन राहील. भ्रष्ट आचरण आजपासून 10 हजार वर्षापूर्वी वाईट कृत्य होते, आजही वाईट कृत्य आहे आणि अंतिम निवाड्याच्या सूर्योदयापर्यंत ही वाईट कृत्यच राहणार. काही गोष्टी कालातीत असतात. काळाबरोबर त्या बदलत नसतात. माणसांची प्रवृत्ती त्याचपैकी एक आहे. ती कधीच बदलत नाही. म्हणून या प्रवृत्तीचे नियमन करणारे नियम ही बदलत नाहीत. याच कारणाने म्हटले जाते की, इस्लामी जीवन यापन पद्धती ईश्वरीय आहे म्हणून त्रुटीशुन्य आहे. म्हणूनच अपरिवर्तनीय आहे.
माणसांनी पृथ्वीवर सुख समाधाने रहावे या मिशनसाठी अल्लाहने पृथ्वीवर अनेक प्रेषित पाठविले. ज्यांनी माणसांच्या भ्रष्ट आचरण व अनैतिक प्रवृत्तीवर अंकुश ठेऊन आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच मिशनचा एक भाग म्हणून साडेचार हजार वर्षापूर्वी मक्का शहरामध्ये हजरत इब्राहीम अलै. यांचा जन्म झाला. त्या काळातील विकृत झालेल्या समाजापासून दूर मक्केच्या वाळवंटात , अल्लाहच्या आदेशाने त्यांनी आपली पत्नी हाजरा व लहान बाळ हजरत इस्माईल अलै. यांना सोडून दिले व येथूनच एका नव्या आदर्श समाज रचनेची पायाभरणी झाली. तेथूनच पुढे हजरत इब्राहीम अलै. यांचा वंश वाढला. कालौघात त्याचे दोन कबिले झाले. एकाला बनी इसराईल तर दूसर्याला बनी इस्माईल असे म्हणतात.
अल्लाह को प्यारी है कुर्बानी
कुठल्याही समाजात मुबलक प्रमाणात असे लोक नेहमीच असतात की जे आपल्या पोषणासाठी समाजातील श्रीमंत लोकांकडे आशेने पाहत असतात. मात्र व्याजाधारित जीवन पद्धतीमध्ये श्रीमंत लोकांची गरीब लोकांसाठी त्याग करण्याची प्रवृत्तीच नष्ट होते. व्याजामुळे माणसं जितकी स्वार्थी बनतात तितकी दुसर्या कशानेच बनत नाहीत. म्हणून अशा समाजात गरीब वर्ग श्रीमंत वर्गाचा मनोमन दुःस्वास करत असतो. संधी मिळताच या दुःस्वासाची अभिव्यक्ती हिंसक घटनांमधून होते. मागच्याच आठवड्यात 9 ऑगस्ट रोजी बंदच्या दरम्यान वाळूजच्या एमआयडीसीमध्ये 60 पेक्षा जास्त बंद कारखान्यांमध्ये सामान्य जनतेकडून जी विध्वंसक तोडफोड झाली ते याच दुःस्वासाचे प्रत्यक्ष रूप होते. श्रीमंत आणि गरीबांमध्ये विषमतेचे मूळ कारण व्याजाधारित समाज व्यवस्था आहे. इस्लामच्या मूळ उद्देशापैकी आर्थिक समता हे एक प्रमुख उद्देश आहे. ही आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रामुख्याने दरवर्षी येणार्या दोन सणांमध्ये मुस्लिमांना त्याग करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. रमजान नंतर येणार्या ईद-उल-फित्रच्या वेळी प्रत्येक साहेबे माल (श्रीमंत) व्यक्तीस गरीबांच्या कल्याणासाठी आपल्या बचतीवर 2.5 टक्के आर्थिक त्याग करावा लागतो. तर ईदुल अजहा च्या वेळी जनावराची कुर्बानी देऊन त्याचे मांस गरीबांना मोफत वाटावे लागते. मात्र ईदुल अजहाचा अर्थ गरीबांना मोफत मांस वाटणे एवढ्यापर्यंतच मर्यादित नाही. मुळात जनावराची कुर्बानी ही रूढ अर्थाने जनावराचा बळी नव्हे तर अल्लाहकडून मागणी आल्यास आपण प्रसंगी स्वतःच्या जीवाची कुर्बानी करण्यास तयार आहोत. या भावनेची ती प्रतिकात्मक अभिव्यक्ती असते. यासाठी इब्राहीम अलै. यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाची म्हणजे इस्माईल अलै. यांची कुर्बानी देण्याचा जो खरा प्रयत्न केला त्याची आठवण म्हणून दरवर्षी ईद-उल- अजहाच्या पर्वामध्ये प्रत्येक साहेबे माल मुस्लिम व्यक्ती जनावराची कुर्बानी करावी लागते.
येणेप्रमाणे ईद-उल-फित्रला आर्थिक त्याग तर ईद-उल-अजहाला कुठलाही त्याग करण्यास आपण सदैव तयार आहोत याचे प्रात्यक्षिक देऊन मुस्लिमांचे दरवर्षी दोन वेळा प्रशिक्षण केले जाते व त्यांना सातत्याने त्याग करण्यासाठी प्रेरित केले जाते. ह्याच प्रशिक्षणाच्या बरकतीमुळे आज देशातील मुस्लिम समाज सर्वाधिक दारिद्र रेषेखाली असतांनासुद्धा समाजातील श्रीमंत वर्गाकडून केल्या जाणार्या आर्थिक त्यागावर जगतो आहे. सरकारची भरीव मदत मिळत नसताना, उलट सापत्न वागणूक मिळत असतानासुद्धा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल हा समाज उचलत नाही, यातच सारे आले.
सरळ आणि पवित्र जीवनपद्धतीची सातव्या शतकात म्हणजे प्रेषितांच्या काळात जेवढी गरज होती तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गरज आज आहे. जागतिक स्तरावर मानव समाजाची ही गरज भागविण्याचे सामर्थ्य फक्त इस्लामी जीवनव्यवस्थेमध्येच आहे.
जीवनाला जोपर्यंत इस्लामी व्यवस्थेच्या आधीन आपण आणणार नाही तोपर्यंत तणावरहित जीवन जगता येणार नाही. याची कल्पना किमान मुस्लिमांना तरी यावयास हवी. परंतु, माध्यमांच्या सततच्या अपप्रचारामुळे इस्लामी जीवनव्यवस्थे विषयी एवढी नकारात्मक मानसिकता निर्माण झालेली आहे की, मुस्लिमेत्तरांचे तर सोडा अनेक मुस्लिमांचाच या जीवन पद्धतीवर विश्वास राहिलेला नाही. अशा ’रौशन खयाल’ (पुरोगामी) मुस्लिमांनी जाणून बुजून इस्लामला फक्त काही ’इबादतींपुरता’ मर्यादित करून बाकी जीवनामध्ये व्याजाधारित भांडवलशाही जीवन पद्धतीचा स्विकार केलेला आहे. हे जेवढे मोठे दुर्देव आहे तेवढेच मोठे आव्हान सुद्धा आहे. स्वतःला इस्लामी म्हणवून घेणार्या संस्था, संघटनांना हे आवाहन स्वीकारावे लागेल व एक स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त नैतिक जीवन जगून आदर्श जीवनाचे प्रात्यक्षिक देशबांधवांसमोर मांडावे लागेल.
समाज हा फार हुशार असतो. कोणता डॉक्टर हुशार आहे? कोणता वकील तज्ज्ञ आहे? कोणत्या हॉटेलमध्ये चांगले जेवण मिळते? हे समाजाला माहित असते. तर कोणती जीवन पद्धती त्यांच्यासाठी हिताची आहे? हे त्यांना समजू शकणार नाही, असे गृहित धरणे म्हणजे स्वतःची फसवणूक करवून घेणे आहे. इंग्रजीमध्ये म्हण आहे, ’अॅडव्हर्सिटी इज द बेस्ट युनिव्हर्सिटी’. याच म्हणीला सार्थ ठरवत भयानक विपरित परिस्थितीमध्ये सुद्धा मक्कामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्या सहाबा रजि. यांनी ज्या प्रकारे आपल्या वाणी आणि वर्तनाने इस्लामचा जो नमुना पेश केला. ठीक तोच नमूना आजच्या विपरित परिस्थितीतही मुस्लिमांना आपल्या वाणी आणि वर्तनाने देशबांवांसमोर पेश करावा लागेल.
सारांश समाजहितासाठी सातत्याने त्याग करत राहणे हाच उद्देश्य ईद-उल- अजहाचा आहे. बस्स. अल्लाह आपल्या सर्वांना समाजातील गरीब घटकांच्या कल्याणासाठी सातत्याने त्याग करण्याची सद्बुद्धी देओ. आमीन.
– एम.आर.शेख
0 Comments