पुरुष आणि स्त्री
पुरुष आणि स्त्री एकमेकांची वस्त्रे आहेत. (पवित्र कुरआन) वत्र् जसे माणसाचे थंडी, उष्णता आणि इतर त्रासांपासून रक्षण करते त्याचप्रमाणे पुरुष आणि महिलेचेही आहे. दोघे एकमेकांच्या सुरक्षेचीी काळजी घेतात. वस्त्र परिधान केल्याने जसे माणसाला सौंदर्य प्राप्त होते, तसेच सौंदर्य स्त्री-पुरुष यांच्या संबंधामुळे दोघांना प्राप्त होते. वस्त्र धारण करण्याने जसे शरीरावरील अवगुण झाकले जातात त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकतात. स्त्री आणि पुरुष या दोघांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. जे जे अधिकार स्त्रीला प्राप्त आहेत तेच अधिकार पुरुषालाही प्राप्त आहेत. पवित्र कुरआनने आई-वडील आणि इतर नातलगांमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांना वाटा दिलेला आहे. स्त्री स्वत:चा व्यापार किंवा कोणताही दुसरा व्यवसाय करू शकते. या व्यवसायातल्या कमाईवर स्त्रीचा पूर्ण अधिकार असेल. जर तिच्याकडे मालमत्ता, शेत-जमीन, घरदार असेल तर कुणालाही न विचारता, कुणाचीही संमती न घेता ती विकू शकते. स्त्रीच्या चालचरित्रावर आरोप लावल्यास भयंकर पाप म्हटले गेले आहे. पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की, “जे लोक पावित्र्यसंपन्न महिलेवर आरोप लावतात आणि त्यासाठी ४ लोकांची साक्ष आणू शकत नाहीत अशा लोकांना ८० फटके मारून शिक्षा द्या आणि पुढे कोणत्याही प्रकरणात त्यांची साक्ष कबूल करू नका. (कुरआन, सूरह नूर-५)” आपल्या शेवटच्या हजप्रसंगी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जे प्रवचन दिले होते त्यामध्ये असे म्हटले आहे की, “लोकहो, तुमच्यावर तुमच्या पत्नीचे हक्काधिकार आहेत, तसेच त्यांच्यावर तुमचे अधिकार आहेत. तुमच्या पत्नींनी इतर पुरुषांना तुमच्या बिछान्यावर बसू देता कामा नये. ज्यांना तुम्ही पसंत करीत नाही त्यांनी तुमच्या घरी विना परवानगी येऊ नये. आपल्या पत्नीशी सौहार्दाने वागा, अल्लाहचे नाव घेऊन तुम्ही तिचा स्वीकार केला आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करा, कैद्यांप्रमाणे घरी बंदिस्त करून ठेवू नका. पत्नीसंबंधी कुरआनात म्हटले आहे की त्या सदाचारी आहेत अल्लाहच्या आज्ञा पाळतात. पतीच्या गैरहजेरीत त्याच्या हक्काधिकारांचे संरक्षण करतात.”
– सय्यद इफ्तिखार अहमद
0 Comments