Home A blog A लज्जा : महिला-वस्त्र; समाजमाध्यमे

लज्जा : महिला-वस्त्र; समाजमाध्यमे

जेव्हा-जेव्हा लाज शरमेच्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा-तेव्हा लोकांच्या मनामध्ये फक्त महिलांचाच विचार येतो. मात्र इस्लाममध्ये लज्जेच्या बाबतीत  स्त्री-पुरूष असा भेद केलेला नाही. दोघांनाही समान आदेश देण्यात आलेला आहे. उलट पहिला आदेश पुरूषांसाठी अवतरित झालेला आहे. त्यांना सभ्य वस्त्र परिधान करण्याचा, आपल्या नजरा परस्त्रीवर पडणार नाहीत याची काळजी घेण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आजही अरबस्थानामधील पुरूष जे कपडे परिधान करतात त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहिले असता ते बुरख्यासारखेच असतात. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, स्त्री-पुरूषांमध्ये कपड्यांवरून कुठलाही भेदभाव केला गेलेला नाही. हे जरी खरे असले की महिलांना लाज, लज्जेची देणगी ही निसर्गदत्त मिळालेली आहे. त्यामुळे त्या अधिक लज्जावान व शिलवंत असतात. परंतु अलिकडच्या काळात मनोरंजन उद्योगाच्या नावाखाली जे काही दाखवले जात आहे त्यातून प्रेरणा घेऊन मोठ्या संख्येने महिला असा पोशाख आणि वर्तन करू लागलेल्या आहेत की, ज्यामुळे पुरूष त्यांच्याकडे आकर्षित होतील. काही महिलांनी तर लाज-लज्जेचा इतका त्याग केलेला आहे की त्यांच्याकडे पाहून सैतानलाही लज्जा येईल. या सर्व खुल्या वातावरणाचा परिणाम दिवसेंदिवस वाढणार्‍या महिलांवरील अत्याचार विशेषत: बलात्काराच्या घटनांच्या स्वरूपात पुढे येत आहेत. पुरूषांवरील चांगले संस्कार हे दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे ते सुद्धा पशुतुल्य वागत आहेत.
    समाज माध्यमावर आजकाल अनेक पुरूष महिलांच्या बाबतीत अशा पद्धतीने आपले विचार व्यक्त करतात जणू त्यांच्या कुटुंबामध्ये एकही महिला नाही. अनेक पुरूष असे आहेत जे महिलांना अश्‍लिल विनोद, फोटो, क्लिप्स पाठवून देतात. यासंबंधी अनेकांवर गुन्हे सुद्धा दाखल आहेत. अनेक महिला आपल्या स्वाभाविक लज्जाशील स्वभावामुळे या संदर्भात तक्रार करत नाहीत. मात्र त्यांच्या मनाला झालेल्या जखमा इतक्या खोल असतात की त्यांच्या तोंडातून अशा पुरूषांसाठी शापवाणी सुद्धा निघते.
    याच प्रमाणे अलिकडच्या काळात काही स्त्रियांनी सुद्धा आपली स्वाभाविक लज्जा सोडलेली आहे. अश्‍लिलतेमध्ये त्यांनी सैतानालासुद्धा मात दिलेली आहे. कधी-कधी तर अश्‍लिलतेमध्ये लिप्त असलेल्या या महिलांकडे पाहून असे वाटते की, सैतानसुद्धा त्यांच्याकडे पाहून आश्‍चर्यचकित होऊन स्वत:शीच मनात म्हणत असेल की, ”मी तर यांना एवढी नीचता शिकविलेली नव्हती या तर माझ्या विचारांच्याही पलिकडे गेलेल्या आहेत.”
    बलात्कारांच्या ज्या घृणास्पद आणि भयानक घटना अलिकडे घडत आहेत त्या संदर्भातल्या बातम्या वाचून महिलांच्या मनाचा थरकाप उडतो. अनेक महिलांना कदाचित माझे हे विचार प्रतिगामी वाटतील. परंतु महिलांचे तोकडे आणि तंग कपडे हे सुद्धा पुरूषांच्या भावना चाळविण्यासाठी एक कारण आहेत, हे अनेकवेळा घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांधून सिद्ध झालेले आहे. अशा कपड्यातील महिलांना पाहून इतर महिलांनाच लाज वाटावी, अशी एकंदरित परिस्थिती आहे. आश्‍चर्य म्हणजे पुरूष हे अंगभर कपडे घालून समाजात वावरत असतांना त्यांच्यासोबत वावरणार्‍या महिला मात्र तोकड्या कपड्यात असतात, यापेक्षा मोठे आश्‍चर्य ते कोणते? अशा महिलांचे म्हणणे असे आहे की, माय बॉडी माय चॉईस. मी माझ्या इच्छेप्रमाणे कपडे घालेन. कुणालाही मी कपडे कसे घालावेत, हे सांगण्याचा अधिकार नाही. पुरूषांनी स्वत:वर नियंत्रण ठेवावं. त्यांनी याबाबतीत आम्हाला काही शिकवू नये. असे ज्यांचे विचार आहेत त्या भगिनींना मी एक प्रश्‍न विचारू इच्छिते की तुम्ही जे तोकडे आणि तंग कपडे घालता त्या पाठीमागे तुमचा उद्देश्य काय असतो? निश्‍चितपणे मनुष्यप्राणी कोणतेही काम उद्देशाशिवाय करत नाही. मग हे तोकडे कपडे घालण्यामागे तुमचा कोणता उद्देश आहे?
    दूसरा महत्त्वाचा प्रश्‍न असा की, आज समाज माध्यमांवर उदा. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर संकेत स्थळांवर महिला सुंदर पोज घेऊन आपले फोटो टाकत असतात. त्या फोटोखाली जे हजारो कॉमेंट्स येतात त्यात मोठ्या प्रमाणात परपुरूष असतात आणि ते ’ब्युटीफुल’, ’हॉट’ आणि यापेक्षा जास्त येथे नमूद न करण्यासारखे कॉमेंटस् करतात. त्या वाचून असे फोटो टाकणार्‍या महिला आनंदीत होतात की नाही? अनेक महिला तर त्या कॉमेंटस्वर धन्यवादच्या प्रतीकॉमेंटस् सुद्धा टाकतात. हे कशाचे द्योतक आहे? अशा महिलांना स्वत:च्या इब्रतीची थोडी तरी काळजी वाटत असावी काय? आपल्या तोकड्या कपड्यावरील फोटोंवर परपुरूषांनी केलेल्या आक्षेपार्ह कॉमेंट वाचून ज्या महिलांना आनंद होतो त्यांच्या बुद्धीची जेवढी कीव करावी तेवढी कमी. आणि अशा कॉमेंटस् करणार्‍या पुरूषांच्या बुद्धीचीही कीव करावी तेवढी कमी. असे वाटते की त्यांच्या घरच्या महिलाच नसाव्यात. ज्यांच्या घरी महिला आहेत त्यांच्यावर परपुरूषांनी अशा कॉमेंट केल्या तर त्यांना वाईट कसे वाटत नाही. याचेच नवल वाटते. या गोष्टी कायदा करून थांबविता येण्यासारख्या नाहीत. यांना थांबविण्यासाठी स्वयंशिस्तीशिवाय दूसरा उपाय नाही असे माझे स्पष्ट मत आहे. दुर्दैवाने असे फोटो आणि असे कॉमेंटस् टाकणार्‍या आणि त्यावर आक्षेपार्ह कॉमेंटस् करण्यामध्ये कमी प्रमाणात का असेना अनेक मुस्लिम स्त्री पुरूषांचाही सहभाग आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ” प्रत्येक धर्माचे एक वैशिष्टये असते आणि इस्लामचे वैशिष्ट्ये लज्जा आहे” (संदर्भ : सनन इब्ने माजा हदीस क्र. 4181) ही हदीस फक्त महिलांसाठी नाही तर ती महिला आणि पुरूष दोघांसाठी आहे. स्वत: प्रेषित मुहम्मद सल्ल. हे अत्यंत लज्जाशील पुरूष होते. ही हदीस अतिशय लोकप्रिय अशी हदीस आहे. शिवाय, कुरआनमध्ये स्त्री- पुरूषांना समाजामध्ये कसे वावरावे या संबंधीची जी आचारसंहिता दिलेली आहे ती सर्व विदित आहे. असे असतांना आपले अर्धनग्न फोटो समाजमाध्यमांवर टाकणार्‍या मुस्लिम महिला आणि त्यावर कॉमेंट करणारे मुस्लिम पुरूष हे इस्लामचे नव्हे तर सैतानाचे प्रतिनिधीत्व करतात, असे माझे ठाम मत आहे. त्यांची धार्मिक शिक्षा एकतर झाली नसावी किंवा ती व्यवस्थित झाली नसावी किंवा त्यांच्या मानसिकतेवर सैतानाने ताबा मिळविलेला असावा. याशिवाय, अशा गोष्टी घडनेच शक्य नाही. इस्लाम फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर सर्व मानवजातीसाठी सभ्यतेचा धडा देतो. स्त्री पुरूषांनी समाजामध्ये वावरताना एकमेकांचा सम्मान करावा, फक्त एवढे सांगून इस्लाम थांबत नाही तर तो कसा करावा? याचे सविस्तर मार्गदर्शनही कुरआनमधून करतो.
    प्रत्येक श्रद्धावान मुस्लिम व्यक्तीचा हा विश्‍वास आहे की, ”अल्लाह सर्व काही पाहत आहे” निर्विवादपणे ही आचारसंहिता आणि अल्लाह विषयीची ही भावना की तो सर्वकाही पाहत आहे, माणसाला वाममार्गाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पुरेशी आहे. हेच खरे मुस्लिम असण्याचे चिन्ह आहे. ज्या मुस्लिमांचे ईमान (श्रद्धा) जेवढे मुस्तहेकम (मजबूत) तेवढे ते वाममार्गापासून दूर राहू शकतात. मग ते स्त्री असो का पुरूष. आज मुस्लिमांमध्ये लज्जा आणि सभ्यता निर्माण करण्यासाठी कुठला वेगळा कायदा करण्याची किंवा वेगळे सामाजिक आंदोलन सुरू करण्याची आवश्यकता नाही. या सर्व गोष्टी कुरआन आणि हदीसमध्ये 1441 वर्षापूर्वी नमूद केलेल्या आहेत. गरज फक्त त्यांना समजून आचरणामध्ये आणण्याची आहे. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करते की, सर्व मुस्लिमांनाच नव्हे तर सर्वांनाच अल्लाहने दिलेली ही स्त्री-पुरूष वर्तणुकीची आचारसंहिता समजण्याची व त्यानुसार सभ्य आचरण करण्याची समज आणि शक्ती देवो आमीन.

– फेरोजा तस्बीह

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *