Home A blog A महेर आणि दहेज

महेर आणि दहेज

लग्नाला उर्दूमध्ये निकाह म्हंटले जाते. यामध्ये सर्वात चांगली गोष्ट मला जी वाटते ती महेर आहे. प्रत्येक निकाहमध्ये वराकडून वधूला निश्चित रक्कम भेट म्हणून दिली जाते. त्याशिवाय निकाहच होत नाही. इस्लामने स्त्रीला महेर घेण्याचा अधिकार दिलेला आहे. महेर किती असावा याबाबत वधू आणि वराकडून जाणकार लोक आपसात चर्चा करून निर्णय घेतात. साधारणपणे महेर रोख रक्कम किंवा सोन्याच्या स्वरूपात असते. मात्र एका मुस्लिम मुलीने यात बदल करून पुस्तक रूपाने महेर मागितल्याची घटना नुकतीच केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यात घडली. येथे राहणारी शहला नेचीयिल या मुलीने आपल्या नियोजित पतीकडून  महेरमध्ये 50 दुर्लभ पुस्तकांची मागणी करून सगळ्यांना चकित केले. शहलाचा होणारा पती अनिस आता मल्लापुरम ते हैद्राबाद दरम्यान फिरून प्रत्येक मोठ्या पुस्तकाच्या  दुकानातून आपल्या नियोजित पत्नीला देण्यासाठी पुस्तकांचा शोध घेतोय. शहलाने हैद्राबाद युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्र या  विषयात एम.ए. केलेले आहे. तिने वर पक्षाला 50 पुस्तकांची यादीच  दिलेली आहे. अनिसनेही निर्णय  घेतला आहे की, काहीही करून तो ही पुस्तके मिळविणारच आणि महेरमध्ये देणारच.   महेर हे काही वधूची किमत नाही. हा तर एक सुंदर उपहार आहे. जो पती आपल्या पत्नीला निकाहच्या दरम्यान दोन साक्षीदारांसमक्ष देतो. महेर पत्नीचा अधिकार आहे तर पतीचे कर्तव्य. एकदा महेर दिल्यानंतर त्या रक्कमेचे स्वामीत्व पत्नीकडे जाते. तिला जसे योग्य वाटेल तसे त्या रकमेचा ती विनियोग करू शकते. पती त्या रक्कमेला परतही मागू शकत नाही आणि तिला कसे खर्च करावे, याचे निर्देशही देऊ शकत नाही. इस्लामने महिलांना जे आर्थिक अधिकार दिलेले आहेत त्यातील एक हा अतिशय सुंदर अधिकार आहे. मात्र  आजकाल मुस्लिम समाजातील नव्या पिढीची मुलं महेर देण्यामध्ये जास्त गंभीर नाहीत. निकाहच्या वेळेस महेरची रक्कम उधारीवर  ठेवण्याकडे त्यांचा जास्त कल आहे. असे करून ते महेर देण्याचे  टाळत आहेत. एवढेच नव्हे तर इस्लाममध्ये निकाह अतिशय साध्या पद्धतीने मस्जिदीमध्ये करण्याचे शरियाच्या  निर्देशांचीही अवहेलना केली जात आहे. मुस्लिमांमध्येही आता हिंदूंप्रमाणे मोठ-मोठी खर्चिक निकाह केले जात आहेत. लाखों रूपये किंमतीच्या वस्तू दहेजच्या नावाखाली दिल्या जात आहेत.  

बेंगलुरूचे खणन व्यावसायिक आणि कर्नाटक सरकारचे पूर्वमंत्री जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या नुकत्याच झालेल्या लग्नात 500 कोटी रूपये खर्च करण्यात आले. नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या लग्नाची चर्चा देशभरात झाली. या लग्नात एक हजार रूपये किमतीची लग्नपत्रिका तयार करण्यात आली होती. जेवणामध्ये 16 प्रकारचे गोड पदार्थ तयार करण्यात आले होते. पाहुण्यांच्या जेवणावर 60 कोटी रूपये खर्च करण्यात आले. नवरीच्या आभुषणांवर 150 कोटी रूपये खर्च करण्यात आले. नवरीच्या एका साडीची किंमत 40 लाख असल्याचे माध्यमांमधून लोकांना समजले. मंडप वगैरेवर 25 कोटी रूपये तर मेकप आर्टिस्टवर 30 लाख रूपये खर्च करण्यात आले.  

 भारतात मोठ्या घराण्यांमध्ये होणाऱ्या लग्नामध्ये अशा अवाजवी खर्चाची एक मोठी परंपराच आहे. अलिकडे हिंदू धर्मीयांमध्ये मध्यमवर्गीयांची लग्नेही खर्चिक होऊ लागलेली आहेत. हिंदू धर्मातील जागरूक लोकांनी या संबंधी सामाजिक चेतना निर्माण करून लग्नातील खर्च  कमी करण्यासाठी प्रयत्न चालविलेले  आहेत. कारण की, खर्चिक लग्नांचा सरळ संबंध कन्याभ्रुण हत्येशी आहे. अनेक स्तरावर प्रयत्न होवूनही हिंदू  समाजामध्ये होणाऱ्या अवास्तव खर्चाला आळा बसू शकलेला नाही.  

 आजकाल मुस्लिमांमध्ये सुद्धा निकाह दरम्यान अवास्तव  करण्याची प्रवृत्ती वाढीस लागत असल्याचे दिसून येत आहे. मुस्लिमांमध्ये गरीबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे भपकेबाज लग्नांचा परिणाम गरीब मुस्लिमांवर होत आहे. त्यामुळे अनेक गरीब मुस्लिमांच्या मुलींची लग्न वेळेवर होत नसल्याचे माझ्या लक्षात आलेले आहे. हुंडा, दहेज, अवास्तव खर्च याला शरियते इस्लामीयाने निषिद्ध ठरवलेले आहे. यासंबंधी उत्तर प्रदेशमध्ये एक चांगली घटना घडलेली आहे. बरेलवी मर्कज दर्गाह आला हजरतशी  संबंधित उलेमांनी एक फतवा जारी करून अशी घोषणा केली आहे की, दहेज मागणाऱ्या लोकांच्या लग्नात ते सामिल होणार नाहीत आणि निकाह लावणार नाहीत.  एकीकडे जनार्दन रेड्डीच्या मुलीच्या लग्नाची नकारात्मक चर्चा देशात सुरू असताना दूसरीकडे औरंगाबादच्या एका व्यापाऱ्याच्या मुलीच्या लग्नाची सकारात्मक चर्चाही देशात होत आहे. अजय मुनोत नावाच्या व्यापाऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नात होणाऱ्या अवास्तव खर्चाला फाटा देवून त्या खर्चात 90 गरीबांना 1 बीएचकेचे पक्के घर बांधून भेट म्हणून दिलेले आहे. ही घरे बांधण्यासाठी दीड कोटी रूपये त्याने खर्च केलेले आहेत. दीड एकर जमीनीत ही कॉलनी बांधण्यात आलेली आहे. मुलीचे लग्न साध्या पद्धतीने करून तो खर्च अजय मुनोतने गरीबांच्या घरासाठी करून एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवलेले  आहे.  मुस्लिम समाजातही महेरची शिफारस शरियतने केलेली आहे तर दहेजची निंदा. समाज कोणताही असो लग्न म्हणजे दोन परिवारांना जवळ आणणारी घटना असते. त्यामुळे लग्न अतिशय साध्या पद्धतीने आणि दोन परिवारांमध्ये आनंद द्विगुणीत अशा पद्धतीने होणे अपेक्षित आहे. 

– मीना नलवार

धर्माबाद

संबंधित पोस्ट
September 2023 Safar 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 11
29 12
30 13
31 14
1 15
2 16
3 17
4 18
5 19
6 20
7 21
8 22
9 23
10 24
11 25
12 26
13 27
14 28
15 29
16 Rabi'al Awwal 1
17 2
18 3
19 4
20 5
21 6
22 7
23 8
24 9
25 10
26 11
27 12
28 13
29 14
30 15
1 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *