Home A blog A महिलेचे समाजामधील नक्की स्थान कसे असावे?

महिलेचे समाजामधील नक्की स्थान कसे असावे?

कल्पना करा की ’अ’ नावाच्या एका मुलीने वयाच्या तीस वर्षापर्यंत शिक्षण घेतले. विद्यापीठातून अनेक पदव्या मिळविल्या. 31 व्या वर्षी मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्चपदावर तिची निवड झाली. खूप संपत्ती कमाविली. खूप प्रसिद्धी मिळाली. कंपनीच्याच एका सहकार्‍यावर प्रेम केले. 4 वर्षापर्यंत त्याच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहिली. काही कारणांमुळे त्यांचे बिनसले आणि ब्रेकअप झाल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली. आई-वडिलांनी आग्रह केल्यामुळे त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर 38 व्या वर्षी लग्न केले. 40 वर्षी आई झाली. तिला एक गोंडस मुलगी झाली. पण कंपनीमध्ये नियमित प्रमोशन होत असल्यामुळे कामाच्या जबाबदार्‍या वाढल्या. म्हणून पुन्हा-पुन्हा आई होण्याचा नैसर्गिक अधिकारी तिने स्वैच्छेने नाकारला. आयुष्यभर सातत्याने काम करत असल्यामुळे मुलीला फारसा वेळ देता आला नाही मात्र तिला पंचतारांकित शाळा आणि महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण तिने दिले. पण मुलगी पुढे चालून तिचे ऐकेणासी झाली. दरम्यान ज्याच्याशी लग्न झाले त्याला तिच्या लिव्ह इनची गोेष्ट कळाली. म्हणून त्याने तिला सोडून दिले. मग ती परत एकटी झाली. कंपनीमध्ये काम करत असतांना कधी-कधी सोशल ड्रिंकिंग करावी लागत असे. एकटी झाल्यामुळे नियमित दारू पिऊ लागली. घर, गाडी, पैसा, कार सर्वकाही मिळाले. पण मुलगी आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर पळून गेली. तब्बल 30 वर्षे तिला एकटे रहावे लागले. नातवंड नसल्यामुळे तिने कुत्रा आणि मांजर पाळले आणि शेवटी मेली. 

याउलट तिच्याच सोबतच्या ’ब’ नावाच्या एका मुलीचे 20 वर्षे संपताच पदवी पूर्ण होताच आई-वडिलांनी चांगले स्थळ पाहून लग्न लावून दिले. ती सासरी गेली. तिला तीन मुलं आणि एक मुलगी झाली. तिने मन लावून संसार केला. मुलांवर चांगले संस्कार केले. त्यांना भरपूर वेळ दिला. त्यांना व्यवस्थित शिक्षण दिले. त्यांचा रोजचा गृहपाठ व्यवस्थित करवून घेतला. सामान्य शाळा, महाविद्यालयात शिकूनही तिची सर्व मुलं उच्चविद्याविभूषित झाली. मुलगी सुंदर व संस्कारी असल्यामुळे चांगले स्थळ चालून आले. जावई आयएएस मिळाला. फुकटात लग्न झाले. तिन्ही मुलं लायक निघाली. एक भारतीय सेनेत अधिकारी, दूसरा खाजगी कंपनीत सीईओ तर तीसरा शिक्षक झाला. तिच्या उतारवयात तिला आणि तिच्या पतीला आपल्या जवळ ठेवण्यासाठी मुलांमध्ये स्पर्धा सुरू झाली. उतारवयात नातवंडांचे भरपूर प्रेम मिळाले आणि काही वर्षानंतर ती सुद्धा वारली.

आपले डोळे बंद करा ! एक खोल श्‍वास घ्या आणि आपल्या हृदयावर हात ठेवून प्रामाणिकपणे सांगा कोणाचे आयुष्य यशस्वी झाले? ’अ’ चे का ’ब’ चे? या ठिकाणी ’अ’ ने जी जीवनशैली स्वैच्छेने स्वीकार केली ती पाश्‍चीमात्यांची जीवनशैली आहे. जिचा आज बहुतेक महिलांनी अंगीकार केलेला आहे. ’ब’ ची जीवनशैली इस्लामी तसेच प्राचीन भारतीय जीवनशैली आहे. ज्याचा त्याग आजच्या मुली करत आहेत. 

आजकाल ’भाग बिन्नी भाग’ नावाची एक तद्न फालतू वेबसेरीज नेटफ्लिक्स या ओटीटी (ओव्हर-द-टॉप मीडिया सर्व्हिस) प्लेटफॉर्मवर आली असल्याचे व त्यात ’अ’ ने अंगीकारलेल्या जीवनशैलीचे महिमामंडन केल्याचे त्या वेबसिरीजच्या समिक्षण अहवालावरून समजले. नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी प्लेटफॉर्मसनीं आता सिनेथिएटर्सची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला असून, सर्व प्रकारचे कौटुंबिक बंधन झुगारणे म्हणजेच मुक्त जीवन जगणे असा साधा हिशोब हे लोक तरूण मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यात यशस्वीसुद्धा होत आहेत. 

ह्या सर्व वेबसिरीज आणि इतर दृकश्राव्य माध्यमातून लोकांना नैतिक बंधन मुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्यामागे फार मोठे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. हॉलीवुड, टॉलीवुड, बॉलीवुड, फॅशन उद्योग, संगीत दारू, उद्योग इत्यादीमध्ये जगभर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक या लोकांनी करून ठेवलेली आहे आणि हे उद्योग कायम नफेत रहावेत म्हणून हे लोक सर्व माध्यमातून मुक्त जीवनशैलीचे महिमामंडन करत असतात. अवघं जग यांनी कवेत घेतलेले आहे. यांच्यासमोर इस्लामी जीवनशैली वगळता कोणत्याच जीवनशैलीचे आव्हान नाही. म्हणून शक्य त्या मार्गाने इस्लामची बदनामी करून तरूणांना त्याच्या शीतल, सरळ, स्वच्छ आणि नैतिक जीवनापासून दूर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न हे लोक करत असतात. कधी दाढी, कधी टोपी, कधी तीन तलाक, कधी बुरखा, कधी खोटा आतंकवाद वगैरे निवडक विषय घेऊन माध्यमातून चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणतात. कधी आपण पाहिले का की व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचे कल्याणकारी परिणाम ? इस्लामच्या नैतिक शिक्षा काय आहेत? जकातमुळे गरीबी कशी दूर होऊ शकते? परद्यामुळे महिलांचे संरक्षण कसे होते? इत्यादी विषयावर कोणी चर्चा घडवून आणल्याचे? कधीच नाही. याचं कारणच हे आहे की, हे लोक चांगल्या प्रकारे जाणून आहेत की, या विषयांवर चर्चा घडवून आणणे म्हणजे आपल्या अनैतिक उद्योगांचा स्वतःच्या हाताने गळा दाबणे होय? इस्लामला चुकीच्या पद्धतीने पोट्रेट करून जगासमोर मांडल्यामुळे सामान्य माणसं विशेषतः तरूण वर्ग फसतो आणि इस्लामपासून लांब जातो. पण अलिकडे ज्या समाजमाध्यमाच्या मार्फतीने हे लोक इस्लामची बदनामी करत आहेत त्याच माध्यमातून इस्लामचा खरेपणा लोकांच्या लक्षात येतो आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. 

या ओटीटी प्लेटफॉर्मवरून महिला व मुलींना स्वातंत्र्य आणि प्रगतीच्या नावाखाली अनैतिक जीवनाकडे आकर्षित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर इस्लाम हा   महिला आणि मुलींना कशा जीवनशैलीकडे बोलावितो हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे. तर चला पाहूया थोडक्यात इस्लामच्या नजरेतून स्त्रीकडे. 

इस्लामच्या नजरेतून स्त्री

इस्लामच्या दृष्टीकोणातून पुरूषांच्या जीवनाचे चार भाग आहेत. मुलगा, भाऊ, पती आणि बाप, तसेच महिलांच्या जीवनाचे चार भाग आहेत. मुलगी, बहिण, पत्नी आणि आई. इस्लामने महिलांना अर्थाजनाच्या जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त करून मानववंशाला जन्म देण्याची आणि त्यांच्या संवर्धनाची पुरूषांपेक्षाही महत्त्वाची जबाबदारी सुपूर्त केलेली आहे. अर्थार्जनांची संपूर्ण जबाबदारी पुरूषांची आहे. भौतिक कामं करून अर्थाजन करण्याची महिलांना जरी मुभा असली तरी ती त्यांची जबाबदारी नाही. महिलांच्या आयुष्यातील चारही टप्प्यात पुरूषांनी त्यांच्याशी कसे वागावे याची आचारसंहिताच शरीयतने ठरवून दिलेली आहे. कोणताही श्रद्धावान मुस्लिम पुरूष त्याबाहेर जाण्याचे धाडस करूच शकत नाही.

  महिलांचे सर्वात आदराचे पद हे गृहिणी पद होय. यापेक्षा महत्त्वाचे पद जगात दुसरे नाही. महिलांना स्वतःचा अभिमान बाळगण्यासाठी एवढे कारण पुरे आहे की, प्रत्येक पुरूष जन्मताच त्यांच्या कृपेवर विसंबून असतो. गृहिणी या पदाचे महत्त्व कमी करून दाखविणे हा ओटीटी प्लेटफॉर्म तसेच प्रत्येक दृकश्राव्य माध्यमांचा प्रमुख हेतू आहे. गृहिणी म्हणून जे काम महिला करतात ते कसे तुच्छ आहे व घराबाहेरची कामे किती सन्मानजनक आहेत हे त्यांच्याच नव्हे तर पुरूषांच्याही मनावर बिंबविले जाते आणि मुर्खासारखे समाजातील अनेक अज्ञानी लोक गृहिणींना कमी दर्जाच्या तर कामकाजी महिलांना श्रेष्ठदर्जाच्या (महिला) समजण्याची चूक करतो. हा गैरसमज इतका व्यापक आणि खोल रूजलेला आहे की, स्वतः गृहिणी असणार्‍या महिला हे श्रेष्ठ काम करत असूनसुद्धा स्वतःला कामकाजी महिलांच्या तुलनेत कमी लेखू लागतात. 

स्त्री-पुरूष दोघे समानतेचा अर्थ

1. इस्लाममध्ये पुरूषापेक्षा स्त्रीला तिप्पट अधिक महत्त्व दिलेले आहे. स्त्री-पुरूष समानतेचा अर्थ असा बिल्कुल नाही की दोघे सारखेच आहेत. दोघांची शारिरिक रचनाच नव्हे तर मानसिक रचनासुद्धा वेगवेगळी आहे. म्हणून जबाबदार्‍यासुद्धा वेगवेगळ्या आहेत. उदा. एका स्त्रीला दोन मुले आहेत. एक आठ वर्षाचा आणि दूसरा एक वर्षाचा. तिला दोन्ही मुलं समान आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की ते दोघे सारखे आहेत. ती स्त्री मोठ्या मुलाला जेवण तर लहान मुलाला दूध देणे म्हणजे दोघांमध्ये भेदभाव करते असे नाही. 

2. स्त्रीयांना दर महिन्याला मासिक पाळी येते. त्यांना गर्भधारणा होते आणि या काळात त्यांना एका लांब कालावधीपर्यंत आराम करण्याची गरज असते. कामकाजी महिलांना ते शक्य होत नाही. मॅटर्निटी लिव्ह मिळते पण ती पुरेशी नसते. त्यामुळे काम करणार्‍या महिला ह्या पुन्हा-पुन्हा आई होण्याच्या अधिकाराचा स्वेच्छेने त्याग करतात. 

3. काम करणार्‍या महिलांना कार्यालयीन काम करावे लागते. तसेच सोबतच्या सहकार्‍यांच्या आणि वरिष्ठांच्या लैंगिक प्रस्तावांचा सामना करावा लागतो. परत आल्यानंतर घरचे कामही करावे लागते. येणेप्रमाणे त्यांना तिहेरी ओझे घेऊन जीवन जगावे लागते. प्रसिद्ध अमेरिकन लेखक लिसा बेलकीन यांच्या 2003 साली आलेल्या पुस्तकामध्ये ज्याचे नाव ’ए लाईफ वर्क कन्फ्युजन ऑफ अ‍ॅन अनबॅलन्स्ड मॉम’ मध्ये लेखिकेने लिहिलेले आहे की, ”काम करणार्‍या महिलांचे जीवन द्विधेमध्येच संपून जाते. त्या पूर्णपणे बाहेरील कामही करू शकत नाहीत आणि घरच्या जबाबदार्‍याही पूर्णपणे पार पाडू शकत नाहीत. एवढेच नव्हे तर स्वतःचेही जीवन ते मुक्तपणे जगू शकत नाहीत. 

4. कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुरूष असल्यामुळे व त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवावा लागत असल्यामुळे जीवनामध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते आणि नकोती नाती निर्माण होतात आणि मोठ्या प्रमाणात होतात. ज्याचा अंत साधारणपणे गुन्हेगारीमध्ये होतो. 

5. जर स्त्रीही थकून भागून घरी येत असेल आणि पुरूषही थकून भागून घरी येत असेल तर कोण कोणाला सांभाळणार? कुरआनमध्ये म्हंटलेले आहे की, ”आणि त्याच्या संकेतचिन्हापैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली, निश्‍चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात”(सुरे ः अर्रूम आयत नं. 21)

6. आई-वडिल दोघेही काम करणारे असतील तर मुलांच्या संगोपनावर त्याचा नक्कीच विपरित परिणाम होतो. मुलांच्या सांभाळासाठी जरी मेड ठेवली तरी तिला आईची सर येत नाही, हे कोणालाही मान्य करावे लागेल. 

7. दोघेही काम करणारे असतील तर घरात असणार्‍या वृद्धांच्या गरजांकडे कोणीच लक्ष देऊ शकत नाही. हेच कारण आहे की, वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

हे सत्य आहे की, प्रत्येक काळामध्ये समाजामध्ये काही स्त्रिया अशा असतात ज्यांचा कामकाज केल्याशिवाय त्यांचा उदरनिर्वाह होत नाही. अशा महिलांना सुरक्षित वातावरणात काम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यांना शोभेल, साजेल आणि झेपेल अशा क्षेत्रांना चिन्हीत करून त्यामध्ये त्यांना 100 टक्के आरक्षण देउन, सन्मानाने जगण्याचा हक्क देता येतो. परंतु अनुभव असा आहे की, प्रत्येक क्षेत्रात महिलांना सामावून घेउन एक प्रकारे त्यांच्यावर अत्याचाराच केला जातो.  

इस्लाम अगदी याविरूद्ध तत्वज्ञान सादर करतो. तो स्त्रीला घरात केंद्रीय भूमिका देवून तिच्या अवतीभोवती घरातील प्रत्येक सदस्याला फिरविण्याची व्यवस्था करतो. त्यामुळे घरातील स्त्री ही प्रमुख भूमिकेत येते व घरातील इतर सदस्य तिच्या परिघाभोवती फिरत असतात. अर्थाजन घरचा पुरूष व गृहव्यवस्थापन घरची स्त्री या दोहोंचा जोड एवढा गच्च बसतो की त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट नागरिक निपजतात व समाजाला उत्कृष्ट कुटुंब व्यवस्था मिळते. परिणामी, समाज सृजनशील होतो व देशाची सर्वांगीण प्रगती होती. 

लक्षात ठेवा मित्रानों ! जगात कधीच, कुठेच दुराचार्‍यांची नेतृत्वाखाली सदाचारी समाजव्यवस्था अस्तित्वात आलेली नाही. आदर्श समाजव्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी आदर्श स्त्री-पुरूष लागतात व आदर्श स्त्री-पुरूष आदर्श कुटुंबातून येतात व आदर्श कुटुंब उत्तम लग्नव्यवस्थेद्वारे निर्माण होते. या व्यतिरिक्त जेवढ्या व्यवस्था आहेत त्या सर्वांमध्ये शेवटी नुकसान महिलेचे होते. कुटुंब व्यवस्थेला फॅशन उद्योगाच्या नफ्याखातर बदलण्याचे षडयंत्र वेळीच ओळखले नाही तर उध्वस्त कुटुंब व्यवस्था, मनोरोगी वृद्ध, लिंगपिसाट पुरूष, बलात्कारी तरूण, लज्जाविरहित स्त्रिया आणि मुल्यहीन समाजाची निर्मिती झाल्याशिवाय राहत नाही. जी सर्वांसाठीच हानिकारक असते. 

बुद्धिवादी लोकांनी तरी किमान इस्लामने समाजामधील महिलेचे स्थान जे ठरवलेले आहे ते किती उत्कृष्ट आहे, याचा पूर्वग्रह बाजूला ठेऊन एकदा जरूर अभ्यास करावा. जय हिंद !

– एम.आय.शेख

संबंधित पोस्ट
May 2024 Shawaal 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 Zul Qa'dah 1
10 2
11 3
12 4
13 5
14 6
15 7
16 8
17 9
18 10
19 11
20 12
21 13
22 14
23 15
24 16
25 17
26 18
27 19
28 20
29 21
30 22
31 23
1 24
2 25

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *