परमेश्वराची आज्ञा पाळण्यासाठी ईश्वरी ज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. परमेश्वराने माणसांमधूनच काही माणसांना (प्रेषितांना) ’वह्य’ (बोध) देऊन पाठवले व ज्ञान दुसऱ्या मनुष्यात पसरवण्याची आज्ञा केली. खऱ्या प्रेषितांना ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवणे व त्याने जे सांगितले ते मानणेही आवश्यक आहे.
प्रेषितांची वास्तविकता
परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला काही न काही गुण दिलेले आहेत. काही व्यक्तीत जन्मतःच नेतृत्वक्षमता असते काहींचे गणितात हात चांगले असते काही नवनवीन आविष्कार करत असतात.
या जगात यशस्वी होण्यासाठी फक्त इंजिनियर, डॉ्नटर, वैज्ञानिक, व्यापारी इ.चीच गरज आहे असे नाही. अश्या व्यक्तींची पण गरज आहे की जो परमेश्वराचा मार्ग दाखवेल जेणेकरून मनुष्य नेहमी राहणारे यश संपादित करू शकेल. अश्या व्यक्तीत परमेश्वराला ओळखण्याची क्षमता खूप होती. परमेश्वराने या व्यक्तींना ईश्वरी ज्ञान दिले व त्याचा प्रसार मानवांत करण्यास सांगितले. हे व्यक्ती म्हणजेच परमेश्वराचे प्रेषित / पैगंबर.
प्रेषितांची ओळख
ज्याप्रमारे महान व्यक्ती काही न काही विशेष गुण घेऊन जन्माला येतात त्याप्रमाणेच प्रेषित ही काही विशेष गुणासह जन्माला येतात.
एखादा व्यक्ती जन्मतःच कवी असतो. एखाद्या व्यक्तीत भाषण कला असते. एक व्यक्ती जन्मतःच नेतृत्व करणारा असतो. त्यांना आपण लगेच ओळखू शकतो. याचप्रमाणे प्रेषितांचेही असते. प्रेषित जे बोलतात त्याचा विचार सामान्य व्यक्ती कधी करूच शकत नाही. त्यांची नजर सूक्ष्म असते. तो जे काही बोलतो त्याला आपले मन मानते. जगाच्या अनुभवावरून व विश्वावर दृष्टीक्षेप टाकल्यास प्रेषितांचे बोलणे आपल्याला पटते.
प्रेषितांचे व्यक्तीमत्व व चारित्र्य पवित्र असते. तो खरा बोलणारा सभ्य असतो. तो कधी चुकीची गोष्ट बोलत नाही. तो वाईट काम करत नाही. नेहमी चांगले कर्म करण्याची शिक्षा इतरांना देतो. तो दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी स्वतः नुकसान करवून घेतो. प्रेषितांमध्ये कुठल्याही प्रकारचे दुर्गूण नसतात. ते सर्वगुणसंपन्न असतात. या गोष्टी बघून ओळखले पाहिजे की हा व्यक्ती परमेश्वराचा खरा प्रेषित आहे.
प्रेषितांप्रती आज्ञाधारकपणा
जेव्हा आपल्याला माहित होते की, हा व्यक्ती परमेश्वराचा खरा प्रेषित आहे तेव्हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणे. त्यांची आज्ञापाळणे व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे आवश्यक असते.
एखादा व्यक्ती प्रेषितांना मानतो पण त्यांची आज्ञा पाळत नाही तर तो मूर्ख आहे. प्रेषित जो बोलतो आहे ते परमेश्वराचे बोल असतात व परमेश्वराचे बोल नेहमी सत्यच असतात हे जाणून देखील तो व्यक्ती प्रेषितांनी सांगितलेल्या गोष्टींच्या विरूद्ध काम करतो.
आपल्याला परमेश्वराचे ज्ञान मिळवायचे असल्यास आपल्याला ते प्रेषितांकडून मिळवावे लागेल व त्यासाठी आपला खरा प्रेषित कोण हे ओळखावे लागेल. चुकीच्या माणसाला आपण प्रेषित मानले तर तो आपल्याला चुकीचा मार्ग दाखवेल. खरा प्रेषित कोण हे ओळखल्यानंतर त्याची आज्ञा पाळावी.
प्रेषितांवर विश्वास ठेवण्याची गरज…
जेव्हा आपल्याला माहित होते की खरा मार्ग तोच जो प्रेषितांनी सांगितलेला आहे तेव्हा प्रेषितांवर विश्वास ठेवणे व त्यांची आज्ञा पाळणे आवश्यक आहे. एखादा व्यक्ती प्रेषितांना प्रेषित मानतो पण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही त्यांची आज्ञा पाळत नाही असा व्यक्ती काफिर तर आहेच पण मूर्खही आहे. कारण त्याला सत्य काय हे माहित असूनही तो त्याचा स्विकार करत नाही. काही लोक म्हणतात आम्हाला प्रेषितांची आज्ञा पाळायची गरज नाही. आम्ही आमचा मार्ग स्वतः शोधू. गणितात जसे दोन बिंदूंना जोडणारी एकच रेषा असते तसेच माणसाला व परमेश्वराला जोडणारा मार्गही एकच आहे तो म्हणजे ’सिराते मुस्तकीम’(सत्य मार्ग). प्रेषितांनी सांगितलेला मार्ग हाच ’सिराते-मुस्तकीम’ आहे. इतर सर्व मार्ग चुकीचे आहेत.
पण जो व्यक्ती प्रेषितांवर विश्वास ठेवत नाही त्याला परमेश्वरापर्यंत पोहचण्याचा मार्गच सापडणार नाही. प्रेषित हे परमेश्वराने पाठवलेले असतात त्यांच्यावर विश्वास ठेवणे व त्यांची आज्ञा पाळावी लागते. जे प्रेषितांवर विश्वास ठेवत नाहीत ते बंडखोर असतात. जो व्यक्ती परमेश्वराला मानतो पण त्याने पाठवलेल्या प्रेषिताला नाही तर तो काफिर आहे.
प्रेषितांचा इतिहास…
आपल्याला माहितच असेल की अल्लाहने सर्वात प्रथम एक मानव तयार केला व त्या मानवापासूनच त्याचा जोडीदार जन्माला घातला व त्या दोघांपासून मानवजातीचा जन्म झाला. मोठमोठे वैज्ञानिक ही मानतात की माणवाचे वंशज हे एकच आहेत.
इस्लाममध्ये या मानवाला ’आदम’ (अलैहि.) म्हणतात. या शब्दातूनच हिंदीतील ’आदमी’ शब्द निघतो. अल्लाहने सर्वप्रथम आदम (अलैहि.) ला बनवले व त्यांना आज्ञा केली की त्यांनी आपल्या संततीला इस्लामचे शिक्षण द्यावे. परमेश्वर एक आहे व त्याचीच पूजा करावी. त्याच्यासमोरच नतमस्तक व्हावे, त्याच्याशीच मदत मागावी आणि चांगले जीवन जगावे, हे ज्ञान संततीला द्यावे व यापासून भरकटाल तर त्याची शिक्षा मिळेल, याचीही कल्पना द्यावी.
हजरत आदम (अलैहि स.) यांची जी संतान चांगली निघाली त्यांनी आपल्या पित्याची शिकवण लक्षात ठेवली पण जी वाईट संतान होती त्याने सत्याचा मार्ग सोडला व काहींनी सूर्य, चंद्र, हवा, आग इत्यादींची पूजा चालू केली. यामुळे मूर्तीपूजा वाढीस लागली. आदम (अलैहि.)चे वंशज संपूर्ण जगात पसरले व त्यांचे वेगवेगळे वंश बनले. हे आता परमेश्वराला व त्याच्या नियमांना विसरले. त्यांनी सद्सद्विवेक बुद्धीचा त्याग केला.
आता अल्लाहने प्रत्येक वंशात आपले प्रेषित पाठवल्यास सुरूवात केली. या प्रेषितांनी आदम अलै. ने दिलेल्या शिक्षणाची आठवण या वंशांना करून दिली. त्यांना मूर्तीपूजेपासून रोखले. चुकीच्या रीवाजांपासून रोखले. परमेश्वराच्या मर्जीनुसार जीवन जगण्याचा मार्ग सांगितला. जगाच्या प्रत्येक भागात भारत, चीन, ईरान, ईराक, युरोप प्रत्येक ठिकाणी परमेश्वराने आपले प्रेषित पाठवले व तेथील लोकांना ईश्वरी ज्ञान दिले. त्या सर्व प्रेषितांचा धर्म इस्लामच होता. मानवजातीचा सुरूवातीला तेवढा विकास झालेला नव्हता त्यामुळे त्यांना ईश्वरी ज्ञानही साध्या प्रकारचे दिले गेले. पण सर्व प्रेषितांचा संदेश एक ईश्वराची पूजा करणे समाजात चांगली माणसे वाढवणे व वाईट प्रवृत्ती नष्ट करणे हा होता.
प्रेषितांसोबत मानवाने वेगळाच हिशोब ठेवला. सुरूवातीला त्यांना त्रास दिला. त्यांची शिक्षा मानण्यास निकार दिले. काहींचा बहिष्कार केला. काहींचे खून केले. -(उर्वरित आतील पान 7 वर)
काही प्रेषितांना जीवनभर कष्ट करून हाताच्या बोटावर मोजण्या इतके अनुयायी भेटले तरीपण परमेश्वराचे पाठवलेले हे व्यक्ती आपले काम करत राहिले. काही प्रेषितांचा प्रभाव एवढा होता की एक संपूर्ण राज्य त्यांचे अनुसरन करू लागले. आता प्रेषितांच्या जाण्यानंतर काहींनी त्यांच्या शिक्षणात बदल केला. त्यांच्या ईश्वरी ग्रंथात स्वतःकडून काही लिहिले. काहींनी प्रेषितांची पूजा सुरू केली. कोणी प्रेषितांनाच ईश्वर मानायला लागले. काही प्रेषितांना ईश्वराचा मुलगा मानायला लागले. अशा परिस्थितीत नंतरच्या लोकांना प्रेषितांची खरी शिकवण मिळणे अवघड होते.
प्रत्येक प्रेषितांनी आपापल्या लोकांत चांगूलपणा सतप्रवृत्ती चांगले आचरण या गोष्टी शिकविल्या व वेगवेगळ्या वंशांना तयार केले की जगात एक धर्म पसरवला जाऊ शकेल जो संपूर्ण मानवजातीसाठी आहे.
जे काही प्रेषित आले होते ते एका विशिष्ट देशाकरिता वंशाकरिता आले होते. त्यांची शिकवण त्या भूभागापूर्तीच मर्यादित होती. वेगवेगळ्या राष्ट्रांत देवाणघेवाण नव्हती. अशा परिस्थितीत सर्व मानवजातीसाठी शिकवण या सर्व राष्ट्रांत पसरवणे अवघड होते. तसेच या राष्ट्रातील लोकांत अज्ञान वाढले होते. त्यांच्या व्यक्तीमत्वात बिघाड झाले होते. त्यामुळे परमेश्वराने हळूहळू सर्व राष्ट्रांत आपले प्रेषित पाठवून त्यांना सरळ मार्गावर आणले. आता मानवजातीचा विकास झालेला आहे.
वेगवेगळ्या राष्ट्रातील लोकांचे एकमेकांशी संबंध येऊ लागले. व्यापाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांत संचार वाढला. लोकांत काही प्रमाणात साक्षरता वाढली. याच काळात मोठमोठे राजे, बादशाह झाले त्यांनी त्यांनी आपले साम्राज्य बनवले. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांचा एकमेकांशी संबंध येऊ लागला. आजपासून अडची हजार वर्ष पूर्वी अशी परिस्थिती होती की संपूर्ण मानवजातीसाठी एकच धर्माची गरज वाढू लागली होती. बौद्ध धर्म एक संपूर्ण धर्म नव्हता, त्याच्यात आचरणाचे नियम होते. हा धर्म भारतातून निघून चीन, जापान व मंगोलियापर्यंत प्रसार पावला. या धर्माचे धर्मगुरू वेगवेगळ्या देशांत जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचे. याच्या काही शतकानंतर ख्रिश्चन धर्म उदयास आला. हजरत ईसा (अलैहि.) इस्लामचे शिक्षण घेऊन आले होते. परंतु, लोकांनी त्यांच्यानंतर ख्रिश्चन हा अपूर्ण धर्म बनवला. व ख्रिश्चन लोकांनी हा धर्म अफ्रिका, युरोप व दूरदूरच्या प्रदेशांत हा धर्म प्रसारला. यावरून असे लक्षात येते की जग स्वतःला यावेळी एक सर्वांसाठी असलेल्या धर्माची मागणी करत होता. यासाठी त्यांनी अपूर्ण धर्मांचाही स्विकार केला व त्याचा प्रसार केला. क्रमशः…
– अबु सकलैन रफिक अहमद पटेल,
लातूर
9860551773
0 Comments