Home A blog A प्रकाशमय जीवन

प्रकाशमय जीवन

प्रकाशाचे महत्त्व काय? हे अंधार झाल्यावर कळते. अंधार पडायला लागला की जीवनाची गती कमी होऊन जवळपास थांबते. लाईट गेल्यावर पेटवलेली एक काडीसुद्धा किती उपयोगाची हे आपल्याला माहित आहे. प्रकाश नसेल तर कित्येकदा गंभीर प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अंधारात तर पानांची नुस्ती सळसळ ऐकूनच भीती वाटते. ग्रामीण भागात रस्त्यांची समस्या गंभीर स्वरूपाची असते. पावसाळ्यात मोठमोठे खड्डे आणि चिखल पसरलेला असतो. अशा रस्त्यावरून दिवसाही चालणे तसे कठीणच असते मात्र अंधाऱ्या रात्री पाण्यातून, चिखलातून वाट कशी काढावी ते सूचत नाही.  पुढेही जाता येत नाही अन् मागेही वळता येत नाही. काय करावं ते कळत नाही.

  मनात प्रकाशाचा अभाव असल्यावर पत्नीच्या फक्त वाईट सवयी दिसतात आणि मन प्रकाशमय असेल तर पत्नीने न बोलताही तिच्या डोळयातल्या भावना, संवेदना पतीला दिसू लागतात. मग तो वैतागुन, भडकून तक्रार करत नाही की, ” मी जसं सांगतो तसं तू करत नाही आणि काय करावं ते स्पष्ट बोलतही नाही. खूप टेन्शन देतेस तु “. दुसरीकडे बायकोला आपल्या अधिकारांची मर्यादा दिसत नाही. मग तिची कुरकुर सुरू होते. ” घरात माझं काही चालतं का? मी बोलते तसं करता का कधी तुम्ही? आणि स्पष्ट बोलून काय करू? तुमचा पारा चढतो अन घर डोक्यावर घेतात. आई-वडील तक्रार करत असतात की ” काय झालं या पिढीला ते कळतच नाही हो! आजकालची पोरं ऐकतच नाही. आमच्या काळात बघा कसं होतं.” असं बोलताना आई-वडिलांना हे दिसत नाही की, कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, पण मुलांना नैतिक शिक्षण देण्यात, त्यांच्यावर संस्कार करण्यात आपण किती मागे पडलो.

मग अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं? जेणेकरून अंधारं दूर होतील. आणि माणसांचा जीवन प्रवास सुखद आणि आनंददायी बनेल?

कुरआनातील अध्याय नंबर 14 ज्याचे नाव सूरह इब्राहीम आहे त्यातील पहिल्या आयतीचा अर्थ आहे, 

अलीफ लाम रा. (हे पैगंबर) हा एक ग्रंथ आहे, जो आम्ही तुमच्यावर अवतरित केला आहे. (कशासाठी?) अशासाठी की तुम्ही तुमच्या पालनकर्त्याच्या हुकुमाने लोकांना अंधःकारातून बाहेर काढून प्रकाशात आणावे. त्याच्या मार्गावर जो प्रभावशालीही आहे,गुण वैशिष्ट्यांनीही युक्त आहे.

हा आहे तो महान उद्देश ज्याकरिता पवित्र कुरआन अवतरित केले गेले. म्हणजे लोकांना काल्पनिक श्रद्धा आणि दुराचाराच्या दाट अंधकारातून बाहेर काढावे आणि खरी श्रध्दा व विश्वासाच्या आणि सदाचाराच्या तेजस्वी प्रकाशात आणावे.

या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो. खरी श्रध्दा आणि विश्वास कुणावर ठेवलं पाहिजे? उत्तर अगदी सोपं आहे. माणसाने कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्विकारू नये. आपल्या विवेकबुद्धीने तपासूनच श्रद्धा ठेवावी, पण कुणावर?

प्रत्येक अशा प्रसंगाची आठवण करा जेंव्हा आपण मोठ्या संकटात, अडचणीत सापडतो. किंवा आपला जीव धोक्यात येतो, किंवा आपल्या जवळची एखादी व्यक्ती जेंव्हा अंतिम घटका मोजत असते आणि भले भले डॉक्टरही जिथे हात टेकतात. जेंव्हा सगळे पीर, अवलीया, देवी-देवतांना हाका मारूनही काही उपयोग होत नाही. तेंव्हा आपोआप कुणाला मदतीसाठी हाक मारतो? “हे ईश्वरा!, Oh God!, या अल्लाह! आपण आपल्या सर्वशक्तिमान ईश्वराला स्मरण करून याचना करू लागतो. अशा वेळी फक्त आस्तिकच नाही तर नास्तिकही भयभीत होऊन नम्र बनतो. 

जीवन सुरळीत चालू असेपर्यंत माणसाला आपले ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्याचा फाजील गर्व वाटत असतो पण एकूण संपत्ती, सामर्थ्य, सर्व साधनं, माध्यमं निकामी ठरल्यावर स्वाभाविकपणे त्याच्या तोंडातून निघते की ” हे ईश्वरा ! हे अल्लाह! दया कर. तूच रक्षणकर्ता आहे. तूच संकटमोचक आहे. दुःखहर्ताही तूच आणि सुखकर्ताही तूच आहे. त्यावेळी महत्त्वपूर्ण बाब ही असते की अशा प्रत्येक प्रसंगी माणूस त्या सर्वांना विसरतो, ज्यांना ईशकृपेमध्ये सहभागी समजून आत्तापर्यंत ज्यांची भक्ती केली. आणि ज्यांच्या समोर नतमस्तक होत राहिला. 

अशा प्रसंगी प्रार्थना करताना माणसाच्या ध्यानीमनी फक्त ईश्वर असतो. एकमेव ईश्वर जो साऱ्या जगांचा पालनकर्ता, स्वामी आहे. अशा वेळी माणूस कोणत्याही पीर- अवलीयाकडे मदतीची याचना करत नाही. कोणत्याही देवीदेवताची, संताची त्याला आठवण येत नाही, किंवा ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील कोणत्याही शक्तीकडे, वस्तूकडे माणूस धाव घेत नाही. माणसाच्या ध्यानीमनी फक्त ईश्वर असतो. एकमेव ईश्वर, अल्लाह जो साऱ्या जगांचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, स्वामी, शासक आहे. पण ईश्वर जेंव्हा त्याला संकटातून मुक्त करतो तेव्हा माणूस मागील सर्वकाही विसरून परत आपल्या शक्ती-सामर्थ्यांचा गर्व करू लागतो. पुन्हा त्याला उन्माद चढतो. ईश्वराच्या मर्जीविरुद्ध, आदेशांविरूध्द द्रोह करू लागतो. ईश्र्वराचे उपकार विसरून जेंव्हा माणूस कृतघ्न बनतो तेंव्हा त्याच्या मनात पुन्हा अहंकार भरण्यास सुरुवात होते आणि लोभ, द्वेष, ईर्ष्या, निराशा यासारखे रोग त्याच्या मनाचा ताबा घेतात.

मनाची अवस्था ही खुल्या मैदानात पडलेल्या लहानशा तिनक्यासारखी असते. ज्याला वारा इकडून तिकडे हेलकावे देत असतो. एका अवस्थेत राहूच देत नाही. म्हणूनच आपल्या आसपास किंवा जगामध्ये जे काही घडतं, त्याचा प्रभाव मनावर पडत असतो. मग अशा स्थितीत आपण काय करावं? जेणेकरून आपले मन निरोगी राहील. याचे उत्तर कुरआनच्या आयतीमध्ये मिळते. अध्याय नंबर 64 सूरह अत-तगाबूनच्या 11व्या आयतीत सांगितले गेले आहे. 

” जो कोणी अल्लाहवर श्रद्धा ठेवतो, अल्लाह त्याच्या मनाला मार्गदर्शन करतो ” (64/11)

म्हणजे त्याच्या मनाला भटकंतीसाठी सोडत नाही. आणि सूरह नंबर 65 अत-तलाकच्या तिसऱ्या आयतीत सांगितले गेले आहे.

“जो कोणी अल्लाहवर विश्वास ठेवेल अल्लाह त्याच्यासाठी पुरेसा आहे ” (65/3)

एकमेव ईश्वरावर विश्वास ठेवणारा हेच मानतो की जे संकट येऊन कोसळले आहे त्याचे निवारण त्या एकमेव ईश्वरा खेरीज अन्य कोणीही करू शकत नाही म्हणून तो संकटासमोर, कठीण परिस्थिती समोर एखाद्या मजबूत पाषाणासारखा उभा राहतो. एकेश्वरवादीच्या मनात फक्त अल्लाहचे भय असते, म्हणूनच त्याच्या मनातील सर्व प्रकारचे भय निघून जातात.  तो हा विचार करतो की नफा-नुकसान सर्वकाही अल्लाहने निर्धारित केलेले आहे मग लबाडी का करावी? म्हणून तो कुणाला धोका देत नाही. आणि कुणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवत नाही. एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणारा माणूस भाग्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, पण हातावर हात धरून बसत नाही. तर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. मग कितीही अपयश आले तरीही तो हाच विचार करतो की जे काही घडलं ते अल्लाहने निर्धारित केलेल्या भाग्यानुसारच घडलं. अल्लाहचा प्रत्येक निर्णय उद्देशपूर्ण असतो. या अपयशातही जरूर माझ्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी भलाईचा पैलू असेल. मी आणखीन प्रयत्न करेन पण खचून जाणार नाही आणि निराशही होणार नाही. एकेश्वरवादीचा हाच विश्वास आणि एकमेव ईश्वर, अल्लाहवर असलेली त्याची श्रद्धा त्याला मानसिक समाधान देते. मग मोठमोठ्या संकटातून, दुःखातून, आघातातून, कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग त्याला दिसू लागतात. म्हणूनच तर खरा एकेश्वरवादी कधीही आत्महत्येचा करत नाही.

बंधू आणि भगिनींनो, कुरआन हा ग्रंथ जसे एका व्यक्तीला अंधकारातून बाहेर काढतो आणि प्रकाशात आणत़ो, तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कुरआन प्रकाशमय मार्ग दाखवतो. कौटुंबिक वाद का निर्माण होतात? पती म्हणतो ” घरात माझी सत्ता चालेल! ” तर पत्नी म्हणते ” मी म्हणेन ती पूर्व दिशा ! ” पती पत्नीचे हक्क काय? दोघांचे अधिकार किती? आणि मुख्य म्हणजे दोघांची कर्तव्ये कोणकोणती? हे जाणून न घेता प्रत्येक जण हक्कांच्या नावावर लढतोय पण कर्तव्यांचं काय? अल्लाह जो नवरा-बायको दोघांचा निर्माणकर्ता आहे, जो दोघांचा शुभचिंतक आहे, जो दोघांवर प्रेम करतो. त्याचे मार्गदर्शन घेऊन सुखानं संसार करण्याची गरज वाटत नाही का? 

अल्लाहने आपल्या लाडक्या मेसेंजरला ‘उज्ज्वल दिवा’ का म्हटले आहे?. कारण मूहम्मद (स) साहेबांच्या चरित्रात अंधारामध्ये भटकणाऱ्या जगाला लख्ख दिसणारी प्रकाशवाट मिळाली. ज्ञानाचा प्रकाश उजळल्याने मनातील अंधार दूर करणे सोपे झाले. ज्ञानाचा प्रकाश उजळला. पैगंबर साहेबांनी जगासमोर विश्व रहस्यांचा आणि नैसर्गिक घटनांचा स्पष्ट सिद्धांत मांडला. ईश्वरावर श्रध्दा आणि विश्वासाचे स्वरूप कसे असावे हे पटवून दिले. मनुष्य आणि ही सृष्टी यांच्यातील संबंध काय? आणि ती कोणती ‘मुल्ये’ आहेत? ज्यांच्या आधारे ही सृष्टी टिकलेली आहे हे स्पष्ट केले. या सृष्टीत माणसाचे स्थान काय? त्याच्या जगण्याचा उद्देश काय? हे निदर्शनास आणले. माणसांच्या खऱ्या गरजा कोणत्या?  आणि त्या कशा प्राप्त कराव्यात? ह्या बाबतीत मार्ग निश्चित केले. कठीण आणि अत्यंत गुंतागुंतीच्या समस्यांना आणि जीवनात येणाऱ्या चढ उतारांना कसं सामोरं जावं हे शिकवले. आणि तेही अगदी स्पष्ट भाषेत आणि स्वाभाविक शैलीत, अशा प्रकारे की माणसाच्या मनात खोलवर जाऊन रुजतात.

आदरणीय अंतिम प्रेषित साहेबांची शिकवण कयामत येईपर्यंत म्हणजे न्यायाच्या दिवसापर्यंत जगातील प्रत्येक मानवासाठी, प्रत्येक देशासाठी आणि प्रत्येक काळासाठी एक उज्ज्वल दिव्याप्रमाणे आहे. त्यांच्यामुळेच अंधारात भटकणाऱ्या जगाला सुविधापुर्ण आणि सुरक्षित मार्ग मिळाला. ज्याचा सुखद अनुभव आजही त्या मार्गाने जाणाऱ्यांना होतो. पण त्यांनी दिलेल्या शिकवणीकडे जर दुर्लक्ष केले तर निश्चितच मानवतेला अंधारातच भटकावे लागेल. हा स्पष्ट संदेश सर्वप्रथम आम्ही आमच्या मुस्लिम बांधवांना देतो. स्वतःला मूहम्मद (स) साहेबांचे अनुयायी म्हणून घेणाऱ्या प्रत्येक मुस्लिम बांधवाला आम्ही नेहमीच अपील करतो की त्याने कुरआन व हदीसनूसार आपले जीवन व्यतीत करावे. आणि स्वतः दिव्यासारखे बनून जगात पसरलेल्या अंधकारांना मिटवण्यासाठी, दृढनिश्चयाने प्रामाणिक प्रयत्न करावे.

अंधारातून प्रकाशाकडे यायचं असेल, तर सैतानी मार्ग, ईशद्रोहाचे मार्ग सोडावे लागतात. ईश्वराने प्रत्येकाला नेमून दिलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीतच राहावं लागतं. शिरजोरी करता येत नाही. अधिकारांचा गैरवापर न करता सदुपयोग कसा होईल हे बघावं लागतं. दंडेलशाही, इच्छाभक्ति सोडून मनमानीला आळा घालावा लागतो. हे मान्य नसेल तर भटकण्याशिवाय पर्याय नाही.रस्त्यावरून गाडी चालवताना कोणता मार्ग योग्य? आणि कोणता धोकादायक यासंबंधी स्पष्ट इशारा देणारे बोर्ड समोर असूनही जर माणूस बेफिकीरीने जात असेल तर पुढे अडचणीच्या वाटा तर येणारच. लुटमारही होऊ शकते आणि अपघातही होतात. 

मरणोत्तर जीवनात कयामतच्या दिवशी जेंव्हा संपूर्ण मानवजातीला अल्लाहच्या न्यायालयात हजर केले जाईल. जिथे प्रत्येक माणसाला आपल्या कर्मांचा जाब द्यायचा आहे. त्यावेळी मृत्यू येईपर्यंत जो अनेकेश्वरवादीच राहीला, त्याला माफी नाही. त्याच्याशिवाय अल्लाह आपल्या कृपादृष्टीने ज्या ज्या माणसांच्या एकंदरीत कामगिरीवर प्रसन्न होऊन, त्यांच्या अपराधांना दुर्लक्ष करून क्षमा करेल आणि स्वर्गात दाखला देईल, ते आहेत यशस्वी लोकं. अल्लाहचा प्रकोप आणि नरकाग्निपासून जे सूटतील ते आहेत खरी सफलता प्राप्त करणारे. सर्व प्रेषितांनी वास्तविक मुक्ती यालाच म्हटले आहे.

पहिलं काम आहे श्रद्धा :- संपूर्ण सृष्टीचा निर्माणकर्ता, मालक, पालक असलेल्या अल्लाहवर त्या एकमेव ईश्वरावर श्रद्धा ठेवावी. त्याच्या अस्तित्वात आणि गुणांमध्ये कुणालाही भागीदार ठरवू नये. अनेक ईश्वरांची कल्पना करून त्यांची भक्ती करणाऱ्याला माफ केले जाणार नाही. हे खुद्द ईश्वराने कुरआनमध्ये म्हटले आहे.

 दुसरे आहे सत्कर्म :- दुराचार सोडून सदाचाराचा मार्ग धरावा. प्रत्येकाला त्याचे हक्क द्यावे आणि आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडावीत.

तिसरे :- आपण स्वतःसाठी जो श्रद्धा आणि सदाचाराचा मार्ग निवडला त्याची शिकवण, उपदेश एकमेकाला करत राहणे. एकमेकांच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे. वाईट गोष्टींना किमान मनात तरी वाईटच समजावे, आणि ते मिटवण्याकरता प्रयत्न करत राहावे. जास्त मागे न जाता फक्त या शंभर वर्षांचा इतिहास बघा. स्वार्थापोटी लाखो निरपराध माणसं युद्ध ,दंगली आणि इतर भेदभावाच्या नावावर मारली गेली. ‘मुलगी नको’ असे म्हणत गर्भावस्थेत कित्येक जीव घेतले गेले. याविरोधात किती लोकांनी आवाज उठवला? जाणीवपूर्वक किती प्रयत्न केले?  कित्येक महिला आणि निरागस मुला-मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला.पण लोकं आपापल्या दूनीयेत मग्न. जणु काही शेजारच्या घराला लागलेली आग माझ्या घरापर्यंत पोहोचणार नाही. 

आणि चौथे :- हे की, ही वाटचाल करताना आपल्यावर कितीही संकटे आली, कसल्याही अडचणी निर्माण झाल्या,  कितीही कष्टांना तोंड द्यावे लागले आणि कोणताही त्याग करावा लागला तरी त्यासाठी लागणारी सहनशीलता, धैर्य, आणि संयम आपल्या अंगी बाळगणे.

आपण प्रार्थना करू या की हे अल्लाह! तू प्रसन्न होईल अशा मार्गावर चालण्याची आम्हाला शक्ती दे. आमीन

– अब्दुल कय्यूम शेख अहमद

9730254636  औरंगाबाद.

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *