Home A blog A न्यू इस्लामिक वर्ल्ड ऑर्डरच जगाला तारू शकेल

न्यू इस्लामिक वर्ल्ड ऑर्डरच जगाला तारू शकेल

जेंव्हा बुद्धीमान माणसे या ब्रह्मांडांच्या रचनेवर विचार करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, या ब्रह्मांडाची रचना अतिशय गणिती पद्धतीने तयार केलेली आहे आणि ही गोष्ट चिकित्सक बुद्धीला पटत नाही की ज्या ईश्वराने मानवाला बुद्धी देऊन विचार करण्याची शक्ती दिली त्या मानवाला बुद्धीचा वापर करून चांगला किंवा वाईट मार्ग निवडण्याची शक्ती त्याने दिली नसेल. आज जगात बहुसंख्य लोक स्वतःच्या बुद्धीने वाईट मार्गाचा अवलंब करत असल्यामुळे संपूर्ण मानववंश संकटात सापडलेला आहे. 

कोविड-19 हे एक षडयंत्र असून, त्याद्वारे जागतिक लोकसंख्या कमी करून एक न्यू वर्ल्ड लागू करण्याचा अंतरराष्ट्रीय शक्तींची योजना आहे अशी एक थिअरी मांडली जात आहे, ज्यात मुठभर श्रीमंत देशांचा एकाधिकार असेल व ते आपल्या मनाप्रमाणे जगाची सुत्रे हलवतील. खरे तर यूएसएसआर (युनायटेड सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक)च्या पाडावानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली  भांडवलशाही देशांनी अशा एका न्यू वर्ल्ड ऑर्डरची घोषणा केलेलीच आहे. त्यांनी वर्ल्ड बँक, आयएमएफ सारख्या वित्तीय संस्था उभ्या करून आपल्या शर्तींवर गरीब देशांना कर्ज देऊन त्यांना आपले बटिक बनविलेलेच आहे. याच व्यवस्थेला अधिक सुदृढ करून कोविडनंतरच्या काळात नव्याने लागू करण्याचा त्यांचा मानस असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे जी की पूर्णपणे भांडवलशाही व्यवस्थेवर आधारित आहेत. 

न्यू वर्ल्ड ऑर्डरची सुत्रे अमेरिका, युरोप आणि इजराईलच्या हातात आहेत. ही सर्व राष्ट्रे ज्यू आणि ख्रिश्चन वंशाची आहेत म्हणून मुस्लिमांचा या न्यू वर्ल्ड ऑर्डरला विरोध आहे असे मुळीच नाही. उलटपक्षी ज्यू आणि ख्रिश्चन या लोकसमुहांना मुस्लिम,’’अहले किताब’’ समजतात व त्यांच्या पवित्र ग्रंथांना (तौरात आणि बायबल) ईश्वरीय ग्रंथ मानतात. त्यांच्या प्रेषितांना म्हणजेच सुलैमान अलै. (सॉलोमन) आणि ईसा अलै. (जीजस ख्राईस्ट) यांना ईश्वराचे प्रेषित मानतात. मुस्लिमांचे ज्यू आणि ख्रिश्चन धर्मियांशी मतभेद यासाठी नाहीत की ते वेगळ्या धर्माचे आहेत तर मतभेद आणि विरोध त्यांच्या धर्मद्रोही वर्तणुकीला आहे. 

अनेक वाईट प्रवृत्ती ज्यू आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये खोलपर्यंत रूजलेल्या आहेत, त्यात त्यांना आनंद येत आहे. इस्लाम त्या प्रवृत्तींना संपवू इच्छितो आणि ते लोक त्यांना संपवू देत नाहीत. उदा. फ्री सेक्सचे शिक्षण तौरात किंवा बायबलमध्ये तर दिलेले नाही पण यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. व्याज, जमाखोरी, नफाखोरी, भ्रष्टाचार, समलैंगिकता तसेच  अश्लिलतेचे शिक्षण त्यांच्या धार्मिक ग्रंथांनी दिलेले नाही मात्र त्यांनी त्याला सामाजिक मान्यता दिलेली आहे. मुस्लिमांचा त्यांच्या या प्रवृत्तीला विरोध आहे. या लोक समुहांनी आपल्या धार्मिक ग्रंथांच्या तरतुदींची अवहेलना केली म्हणून तर ईश्वराने अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर कुरआनचे अवतरण करून वर नमूद अपप्रवृत्तीचा नायनाट करण्याची जबाबदारी त्यांच्या व त्यांच्या अनुयायांवर टाकली आहे. प्रेषितांचे वारसदार म्हणून मुस्लिमांना या लोकांच्या खलप्रवृत्तींचा नायनाट करून एक न्यू वर्ल्ड ऑर्डर स्थापन करावा लागेल, ज्या योगे पृथ्वीवर राहणाऱ्या 7 अब्ज लोकांचे हित साधले जाईल. 

इस्लामिक न्यू वर्ल्ड ऑर्डर 

इस्लामिक न्यू वर्ल्ड ऑर्डर हा शब्द वाचून वाचकांना कदाचित आश्चर्य वाटत असेल मात्र ही काही नवीन संकल्पना नाही. प्रेषित सल्ल. यांच्यावर कुरआन अवतरित करून याची घोषणा 1442 वर्षांपूर्वीच करण्यात आलेली आहे.

न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हटल्याबरोबर जगातील गरीब देशांना आर्थिकदृष्ट्या गुलाम करून, त्यांच्या संसाधनांची लूट करून सैन्य शक्तीने जगावर सत्ता गाजविण्याचे  चित्र डोळ्यासमोर येते. मात्र इस्लामिक न्यू ऑर्डरमध्ये या गोष्टींना स्थान नाही. लोकांना त्यांच्या हिताच्या गोष्टी सांगून, तार्किकदृष्या वादविवाद करून, अत्यंत प्रेमाने त्यांचे मन परिवर्तन करून मानवकल्याणासाठी त्यांना प्रेरित करणे हा या न्यू इस्लामिक वर्ल्ड ऑर्डरचा उद्देश आहे. ज्यू आणि ख्रिश्चन धर्माचाही हाच उद्देश होता, ज्याचा त्यांना विसर पडला. आपल्या धार्मिक आस्थेला उध्वस्त करून त्यांनी राक्षसी आकाराची आणि प्रवृत्तीची भौतिक प्रगती साधली आहे. आता हीच प्रगती त्यांना नष्ट करू पाहत आहेत. कोविड-19 मुळे या नष्टचर्येची सुरूवात झालेली आहे हे नष्टचर्य एवढ्यावरच थांबणार नसून कोविड-19 पेक्षाही खतरनाक व्हायरसचा लवकरच जगाला सामना करावा लागेल असे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अ‍ॅन्टोनिओ गुटेरस यांनी याच आठवड्यात भाकित केलेले आहे. कोविड-19च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा चालू असतांनाच गुटेरस यांचे हे भीतिदायक वक्तव्य पुढे आलेले आहे. 

भांडवलशाही व्यवस्थेच्या आधीन देशांनी आपल्या सैतानी कृत्यांनी पृथ्वीला प्रचंड नुकसान पोहोचवलेले आहे. अवाजवी आणि अवाढव्य औद्योगिकरण करून ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन वाढवून पृथ्वीचे हिरवेपन ओरबडून घेतले आहे. अणुऊर्जेचा दुरूपयोग करून महाविनाशक युद्धास्त्रे तयार करून जगाला विनाशाच्या टोकावर आणून ठेवलेले आहे. चुकीच्या जीवन पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करून लोकांच्या आरोग्याशी खेळ केलेला आहे. साधे जीवन सोडून किचकट जीवनाकडे लोकांना बोलावून त्यांचे जीवन तणावग्रस्त केलेले आहे. आपल्या आर्थिक उन्नतीसाठी मानवी लैंगिक प्रवृत्तीचे बाजारीकरण करून लोकांना स्वैराचाकडे प्रवृत्त करून कुटुंब व्यवस्था उध्वस्त केलेली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून आसमानी असो का सुलतानी असो अनेक संकटे पृथ्वीवर एकानंतर एक कोसळत आहेत. या मागचा ईश्वरी मन्सुबा लक्षात घेऊन आपल्या जीवनामध्ये मुलभूत परिवर्तन आणून ईश्वराला अपेक्षित असा आदर्श समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे. आताही सावध झालो नाही तर गुटेरस यांनी केेलेल्या भाकीतासारखे अनेक भाकीते त्यांना करावी लागतील आणि लोकांचा असाच विनाश होत राहील. 

कुरआन प्रणित आदर्श समाज रचनेची मुलभूत तत्वे

आदर्श समाज हा, ’’समाज को बदल डालो’’ अशा घोषणा दिल्याने बनत नाही. त्यासाठी कुरआनने दिलेल्या तत्वांची जाणीवपूर्वक जोपासना करून सातत्याने प्रयत्न करावे लागतात. अशात ती तत्वे कोणती? असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. ती तत्वे खालीलप्रमाणे-

1.आदर्श समाजनिर्मितीचा पाया कुठलाही वंश, राष्ट्र, भाषा, त्वचेचा रंग आणि लिंगावर आधारित ठेऊन जमणार नाही. जगातील सर्व माणसं आपसात भाऊ-बहीण आहेत. या एकाच मुलभूत तत्वावर आदर्श समाजाची पायाभरणी केली जाऊ शकते. म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, 1. ’’लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी  बनविली आणि एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एकमेकांकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.’’ (सुरह अन्नीसा : आयत नं.1)

2. ’’अल्लाहशिवाय कोणाचीच भक्ती करू नका, माता पित्यांशी, नातेवाईकांशी, अनाथ व गोरगरीबांशी चांगले वागा’’ (संदर्भ : सुरे बकरा आयत नं.83). 

3. ’’जे लोक राग गिळून टाकतात व दुसऱ्याचे अपराध माफ करतात असे सदाचारी लोक अल्लाहला अतिशय प्रिय आहेत.’’ (संदर्भ : आलेइमरान आयत नं. 134).

4. ’’जी संपत्ती अल्लाहने तुम्हाला दिलेली आहे त्यापासून मरणोत्तर जीवन बनविण्याची काळजी घ्या आणि जगातीलही आपला वाटा विसरू नका. उपकार करा ज्याप्रमाणे अल्लाहने तुमच्यावर उपकार केलेले आहेत. आणि जमीनीवर उपद्रव माजविण्याचा प्रयत्न करू नका, अल्लाहला उपद्रवी (लोक) आवडत नाहीत.’’ (सुरे अलकसस आयत नं. 77). 

5. ’’अहंकार करू नका’’ (सुरह अल नहल आयत नं.23). 6. ’’लोकांच्या चुका माफ करा, त्यांच्याकडे कानाडोळा करा, काय तुम्हाला आवडत नाही की अल्लाहने तुम्हाला माफ करावे ’’ (सुरे अन्नूर आयत नं.22) .

7.’’लोकांशी नम्रतेने बोला. सर्वात वाईट आवाज गाढवाचा आहे’’ (सुरह लुकमान आयत नं.19) 8. ’’आपसात एकमेकांना टोमणे मारू नका. आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावाने करू नका.’’ (सुरे अलहुजरात आयत नं.11)

9. आई-वडिलांची सेवा करा (बनी ईसराईल आयत क्र. 23) 

10. आई-वडिलांना ब्र सुद्धा म्हणू नका (बनी ईसराईल आयत क्र. 23)

11. आई-वडिलांच्या आज्ञेशिवाय त्यांच्या खोलीत प्रवेश करू नका. (सुरे नूर आयत क्र. 58). 

12. देवाणघेवाणीच्या व्यवहाराचा दस्त तयार करत चला. (सुरे बकरा : 282)

13. कुणाचेही अंधानुकरण करू नका. (बनी इसराईल, आयत नं. 36). 

14. जर कर्जदार अडचणीत असेल तर त्याला मुदतवाढ द्या. (सुरे बकरा 280). 

15. व्याज घेऊ नका. (सुरे बकरा 278). 

16. लाच घेऊ नका. (सुरे मायदा : 42). 

17. वचनभंग करू नका (सुरे अर्रराद : 20). 

18. दुसऱ्यांवर विश्वास ठेवा. (सुरे हुजरात आयत नं.12). 

19. सत्यात- असत्याची भेसळ करू नका. (सुरे बकरा : आयत नं. 42).

20. लोकांमध्ये न्याय प्रस्थापित करा. (सुरे स्वॉद : 26). 

21. सत्यासाठी ताकदीने उभे रहा. (सुरे निसा : 135). 

22. मयताच्या वारसांमध्ये त्याची संपत्ती वाटून टाका. (सुरे निसा आयत नं.8). 

23. महिलांचाही मयताच्या संपत्तीमध्ये वाटा आहे. (सुरे निसा : 7). 

24. अनाथांच्या मालमत्तेवर कब्जा करू नका. (सुरे निसा : आयत नं.2). 

25. अनाथांचे संरक्षण करा (सुरे निसा : 127). 

26. दुसऱ्यांची संपत्ती गरजेशिवाय खर्च करू नका. (सुरे निसा : 6)

27. लोकांची आपसात तडजोड करत चला. ( सुरे हुजरात : 10). 

28. गैरसमज करून घेऊ नका. (सुरे हुजरात 12). 

29. चहाड्या लावू नका (सुरे हुजरात 12). 

30. लोकांचे रहस्य शोधत फिरू नका (सुरे हुजरात : 12)

31. दान करत चला. (सुरे बकरा : आयत नं. 271). 

32. गरीबांना जेवू घाला. (सुरे : मुदस्सीर : 44). 

33. गरजवंतांना शोधून त्यांची मदत करा. (सुरे बकरा : 273). 

34. वायफळ खर्च करू नका. (सुरे फुरकान आयत नं.67)

35. दान केल्यावर उपकार केल्यासारखे वागू नका. (सुरे बकरा : 262).

36. पाहुण्यांचा सन्मान करा. (सुरे अलजारियात : 24, 27)

37. अगोदर स्वतः पुण्य कर्म करा त्यानंतर लोकांना सांगा (सुरे बकरा : 44). 

38. जमिनीवर वाईट गोष्टींचा प्रसार करू नका. (सुरे  अनकबूत : आयत क्र. 36). 

39. लोकांना मस्जिदमध्ये जाण्यापासून रोखू नका. (सुरे बकराः 114)

40. फक्त त्यांच्याशी लढा जे तुमच्याशी लढतील. (सुरे बकरा : 190) 

41. युद्धाच्या दरम्यान शिष्टाचाराचे पालन करा. (सुरे बकरा 190). 

42. युद्ध समयी पाठ दाखवून पळून जावू नका. (सुरे अनफाल आयत नं. 15).

43. धर्माच्या बाबतीत कठोरता नाही. (सुरे बकरा : 256). 

44. सर्व प्रेषितांवर श्रद्धा ठेवा (सुरे निसाः 150). 

45. मासीकपाळदरम्यान पत्नीशी लैंगिक संबंध स्थापन करू नका. (सुरे अलबकरा : 222). 

46. बाळाला दोन वर्षापर्यंत आईचे दूध पाजवा (सुरे बकरा : 233)

47. लैंगिक दुराचारापासून दूर रहा. (बनी ईसराईल : 32). 

48. पात्र लोकांना सत्ताधारी बनवा. (सुरे बकरा : 247). 

49. कोणावरही त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझे लादू नका (सुरे बकरा : 286). 

50. दांभिकतेपासून लांब रहा. (सुरे बकरा : 14-16). 

51. ब्रह्मांडाच्या रचना आणि आश्चर्यांवर सखोल विचार करा. (सुरे आलेइम्रान : 190). 

52. स्त्री-पुरूषांना आपापल्या कृत्यांचा बरोबर मोबदला दिला जाईल. (सुरे आलेइम्रान : 195).

53. काही नातेसंबंधांमध्ये लग्न निषिद्ध आहेत. (सुरे निसा : 23). 

54. पुरूष कुटुंबाचा प्रमुख आहे. (सुरे निसा : 34). 

55. कंजुशी करू नका. (सुरे निसा : 37). 

56 इर्ष्या करू नका. (सुरे निसा : 54). 

57. एकमेकाची हत्या करू नका (सुरे निसा : 29). 

58. चुकीच्या माणसाची वकीली करू नका (सुरे निसा : 135). 

59. गुन्हेगारी आणि अत्याचारीं लोकांची मदत करू नका. (सुरे मायदा : 2). 

60. चांगल्या कामामध्ये एकमेकांची मदत करा. (सुरे मायदा : 2.) 

61. बहुसंख्यांक म्हणजे सत्याची कसोटी नव्हे. (सुरे मायदा : 100). 

62. चांगल्या मार्गावर रहा. (सुरे अनआम : 153). 

63. गुन्हेगारांना शिक्षा देऊन त्याचे उदाहरण लोकांसमोर ठेवा (सुरे मायदा : 38). 

64. गुन्हेगारी आणि अत्याचार संपविण्यासाठी प्रयत्नशील रहा.  (सुरे अनफाल : 39). 

65. मेलेले जनावराचे व वराहाचे मांस तसेच रक्त निषिद्ध आहे. (सुरे मायदा : 3). 

66. दारू आणि इतर अमली पदार्थापासून दूर रहा (सुरे मायदा : 90). 

67. जुगार खेळू नका (सुरे मायदा : 90). 

68. हेराफेरी करू नका. ((सुरे एहजाब : 70). 

69. चहाडी करू नका. (सुरे हमजा : आयत क्र. 1). 

70. खा आणि प्या मात्र वायफळ खर्च करू नका. (सुरे अलआराफ : 31). 

71. नमाजच्या वेळेस चांगले कपडे परिधान करा. (सुरे आराफ : 31). 

72. तुमच्याकडे जे लोक मदत मागतील किंवा संरक्षण मागतील त्यांना ते द्या. (सुरे तौबा :6). 

73. स्वच्छता कायम राखा. (सुरे तौबाः 108). 

74. ईश्वराच्या कृपेपासून निराश होवू नका. (सुरे अलहज्र : 56). 

75. अनावधानाने झालेल्या चुकांना ईश्वर क्षमा करतो. (सुरे निसा : 17). 

76. लोकांना बौद्धिकतेकडे आणि चांगल्या उपदेशाद्वारे ईश्वराकडे बोलवा.  (सुरे नहलः125). 

77. कोणीही कोणाच्या दुष्कृत्यांचे ओझे वाहनार नाही. (सुरे फातीर : 18)

78. दारिद्रयाला घाबरून आपल्या संततीची हत्या करू नका. (सुरे नहेल :31).

79. ज्या गोष्टींचे आपल्याला ज्ञान नाही त्या संबंधी चर्चा करू नका. (सुरे नहेल : 36).

80. कोणाचाही मागोवा काढत फिरू नका. (सुरे हुजरात : 12). 81. परवानगीशिवाय दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करू नका. (सुरे नूर :27)

82. ईश्वर त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे संरक्षण करतो. (सुरे युनूस 103). 83. जमीनीवर नम्रतेने चाला. (सुरे फुरकान : 63).

84. स्वतःच्या वाट्याचे काम स्वतःच करा. (सुरे तौबा : 105). 85. अल्लाहसोबत कोणाला सामील करू नका. (सुरे कहफ : 110 )

86. सत्याची साथ द्या, असत्यापासून लांब रहा. (सुरे तौबा 119). 87. स्त्रीयांनी आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करू नये. (सुरे नूर : 31 )

88. अल्लाह शिर्क व्यतिरिक्त इतर गुन्हे माफ करू शकतो. (सुरे निसा : 48). 

89. अल्लाहच्या कृपेपासून निराश होऊ नका. (सुरे जमर : 53). 

90. वाईट गोष्टींचा नायनाट चांगल्या गोष्टीने करा. (सुरे हामीम सज्दा : 34). 

91. आपसात चर्चा करून मग निर्णय करा. (सुरे शुरा : 38)

92. तुमच्यापैकी तो जास्त प्रतिष्ठित आहे जो जास्त चारित्र्यवान आहे. (सुरे हुजरात :13)

93. इस्लाममध्ये वैराग्याला मान्यता नाही. (सुरे हदीद :27). 

94. अल्लाह ज्ञानी लोकांना महत्त्व देतो. (सुरे अल मुजदला : 11). 

95. मुस्लिमेत्तरांसोबत उदारता आणि शिष्टाचाराने वागा. (सुरे अल मुमतहेना : 8). 

96. स्वतःला लालसेपासून दूर ठेवा. (सुरे निसा : 32)

97. अल्लाहकडे क्षमा मागत चला. तो मोठा क्षमाशील आहे. (सुरे बकरा : 199). 

98. ज्याने भिक्षा मागितली त्याला झिडकारू नका. शक्य असेल तेवढे त्याला द्या. (सुरे अलजही : 10). 

99. मरणोत्तर जीवनामध्ये यशस्वी होणे ईश्वराकडे चारित्र्यवान लोकांसाठी आहे. (सुरे  अज्जुख्रुफ आयत 35). 

100. निर्विवादपणे अल्लाह चारित्र्यवान लोकांना पसंत करतो. (सुरे तौबा : 07).

तसे पाहता कुरआनमधील सर्व निर्देशांची अंमलबजावणी आदर्श समाजरचनेसाठी त्यातील 100 निर्देश मी वाचकांच्या सोयीसाठी या ठिकाणी उधृत केलेले आहेत. या तत्वांशिवाय दुसऱ्या कुठल्याच तत्वांवर आदर्श समाजाची रचना शक्य नाही. बुद्धिजीवी लोकांनी नक्कीच वरील तत्वांचा विचार करावा. हा केवळ एका लेखकाचा कल्पना विलास आहे, असे समजून याकडे दुर्लक्ष करू नये. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, आम्हा सर्वांना आदर्श समाजरचनेसाठी पुढाकार घेण्याची सन्मती दे. आमीन. 

– एम.आय.शेख

संबंधित पोस्ट
June 2024 Zul Qa'dah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 19
28 20
29 21
30 22
31 23
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 30
8 Zul Hijjah 1
9 2
10 3
11 4
12 5
13 6
14 7
15 8
16 9
17 10
18 11
19 12
20 13
21 14
22 15
23 16
24 17
25 18
26 19
27 20
28 21
29 22
30 23

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *