Home A blog A नेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक

नेतृत्वाचे प्रकार आणि त्यातील फरक

आणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी) विचारले, ’’ काय, तू हिच्यामध्ये त्याला बनविणार आहेस, जो हिच्यामध्ये अनाचार घडवील आणि रक्तपात करील? (पण) आमच्याकडून तर तुझे स्तवनासह गुणगाण होत आहे, पवित्रगान होत आहे.’’ (तेव्हा अल्लाह) म्हणाला, ’’ मी जाणतो ते तुम्ही जाणत नाही.’’  (सुरे अलबकरा : आयत नं.30)

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की, जनता ज्या लायकीची असते त्याच लायकीचे नेतृत्व तिला मिळत असते. पण अरबीमध्ये ठीक याच्या उलट एक म्हण आहे, जिचा मतीतार्थ असा की, अवाम अपने खलीफा की मजहब पर होती है. अर्थात जनता ही आपल्या नेत्याचे अनुसरण करते. म्हणजेच यथा राजा तथा प्रजा. आता या परस्पर विरोधी म्हणींमध्ये कोणती म्हण खरी आहे हे जरा बाजूला ठेवून जगात सध्या ज्या प्रकारचे नेतृत्व दिसून येत आहे त्या संबंधी चर्चा करू आणि त्यांच्या तुलनेमध्ये वैकल्पिक इस्लामिक नेतृत्वाची संकल्पना काय आहे? हे ही समजून घेऊ. कारण नेतृत्वावरच समाजाचे भले बुरे अवलंबून असते.

जगात ज्या प्रकारची शिक्षण प्रणाली अवलंबिली जाते आणि ज्या प्रकारच्या सांस्कृतिक घडामोडी घडत असतात त्यांचा लोकांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो व त्या संस्कारांना सोबत घेवूनच ते लोक पुढे येत असतात, ज्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असते. एकदा का एखादी व्यक्ती सत्तेवर आली की त्याच्या मागे जाण्याशिवाय जनतेकडे दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नसतो. म्हणून असे म्हटले जाते की, नेता निवडताना खूप काळजीपूर्वक निवडायला हवा. परंतु या सुभाषितवजा सल्ल्याचा फारसा उपयोग होत नाही. प्रत्यक्षात नेता निवडताना जात, धर्म, रंग, हितसंबंध, क्षेत्रवाद, वंशवाद इत्यादी गोष्टींचा परिणाम होत असतो. परिणामी प्रत्येक क्षेत्रात असे लोक शिर्षास्थानी निवडून येतात ज्यांच्यात आक्रमकता, धाडस आणि हिंसक प्रवृत्ती कमी-जास्त प्रमाणात असते. सभ्य, शांत आणि संयमी लोक फार कमी वेळा शिर्षस्थळावर पोहचत असतात. 

नेतृत्वाची व्याख्या

समुहाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुयायी म्हणविल्या जाणाऱ्या लोकांना एकात्मतेने वागण्यास उत्तेजन देणारी व्यक्ती म्हणजे नेता होय. नेत्याने स्थळ, काळ, परिस्थिती पाहून घेतलेल्या निर्णयाचे समाजावर दूरगामी परिणाम होत असतात. म्हणूनच रज्मी यांनी म्हटले आहे की, 

ये जब्र भी देखा है तारीख की नज़रोंने,

लम्हों ने खता की थी सदीयों ने सज़ा पाई. 

  

नेतृत्वाचे गुण 

खरे पाहता नेतृत्व सर्वांना जमत नाही तो एक विशेष गुण आहे. प्रत्येक माणूस जन्मजात स्वार्थी असतो. स्वार्थसिद्धीसाठी प्रयत्नशील असतो. त्याच दिशेने प्रगती करत असतो. परंतु जो माणूस स्वतःबरोबर इतरांच्या प्रगतीचा विचार करतो, स्वतः निरंतर पुढे जात असतांना दुसऱ्यांनाही सोबत घेऊन जातो तो नेता-

हयात लेके चलो कायनात लेके चलो ,

चलो तो चलो सारे ज़माने को साथ लेके चलो

आपल्या प्रगतीबरोबर दुसऱ्यांच्या प्रगतीचा विचार हा स्वार्थी माणूस कधीच करू शकत नाही. हा एक विशेष गुण असतो जो सर्वांमध्ये नसतो. म्हणून नेता हा सामान्य नसतो खरा नेता असामान्यच असतो. प्रगतीच्या वाटेवर चलण्यासाठी दुसऱ्यांना प्रेरित करणे, त्यांच्यातील कमकुवत लोकांना मदतीचा हात देणे, प्रसंगी त्यांच्यासाठी आपल्या हितांचा त्याग करणे असे गुण असणारे फार कमी नेते जन्माला येतात.    परंतु जे जन्माला येतात ते इतिहास घडवितात. बुलंद नेतृत्वासाठी खालील गुण असणे आवश्यक आहे. 1. निःस्वार्थीपणा, 2. दूरदृष्टीपणा 3. ऐकण्याची इच्छा 4. न्यायीपणा 5. उदारता 6. कणखरपणा, 7. प्रेरक वृत्ती. 

नेतृत्व करतांना सारेच लोक एकसारखे नसतात. हे जेव्हा खऱ्या नेत्यांच्या लक्षात येते तेव्हा देखील ते सर्वांना सारखीच वागणूक देत असतात. आपल्या विरोधकांचा सुद्धा सन्मान करत असतात. त्यांचेही आर्थिक नुकसान होणार नाही याकडे लक्ष पुरवितात. 

इस्लामी नेतृत्व

इस्लाममध्ये निरंकुश नेतृत्वाला मान्यता नाही, नव्हे सर्वसत्ताधीश ईश्वराशिवाय दुसरा कोणीही नाही, अशीच श्रद्धा आहे. इस्लाममध्ये निरंकुश फक्त ईश्वर आहे, हे तत्व सर्वमान्य आहे. म्हणून कोणताही नेता निरंकुश असण्याचा विषयच उपस्थित होत नाही. लोकशाहीमध्ये सत्तेचे स्त्रोत जनता आहे इस्लाममध्ये ईश्वर आहे. लोकशाहीमध्ये सत्तेची चौकट राज्यघटनेमध्ये निहित आहे. इस्लाममध्ये सत्तेची चौकट कुरआनमध्ये निहित आहे. इतर नेतृत्व स्वमर्जीने निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. इस्लामी नेतृत्वाला मात्र तसे करता येत नाही. त्याला शरियतच्या परिघामध्ये राहूनच निर्णय घ्यावे लागतात. उदा. जनतेतून मागणी आली आणि लोकप्रतिनिधींनीही दुजोरा दिला की देशात अल्कोहोलची निर्मिती करावी व दारूची दुकाने उघडावीत किंवा व्याजाधारित अर्थव्यवस्था लागू करावी. जनतेतून निवडून आलेल्या नेतृत्वाला तसे करता येते परंतु, इस्लामी नेतृत्वाला तसे करता येत नाही. या ठिकाणी लोकेच्छेवर ईश्वरी इच्छा श्रेष्ठ मानली जाईल व अल्कोहोल निर्मिती आणि व्याजाधारित अर्थव्यवस्था लागू केली जाणार नाही. याचं कारण असं की, लोकांना आपलं भलं बुरं कळत नाही. ते कळत असतं तर त्यांनी दारू आणि व्याजाधारित अर्थव्यवस्थेसारख्या घातक मागण्या केल्याच नसत्या. निर्मिकालाच निर्मितीच्या काय हिताचे आहे आणि काय नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. 

इस्लामी नेतृत्वाचा उगम

’’आणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी) विचारले, ’’ काय, तू हिच्यामध्ये त्याला बनविणार आहेस, जो हिच्यामध्ये अनाचार घडवील आणि रक्तपात करील? (पण) आमच्याकडून तर तुझे स्तवनासह गुणगाण होत आहे, पवित्रगान होत आहे. (तेव्हा अल्लाह) म्हणाला, ’’ मी जाणतो ते तुम्ही जाणत नाही.’’ (सुरे अलबकरा : आयत नं.30).

जेव्हा ईश्वराने पृथ्वीवर मनुष्यवस्ती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने माणसाला आपला खलीफा (नायब/ प्रतिनिधी) बनवून पाठविले. म्हणजे मुळात माणूस हा जन्मतः नायब आहे. तो मालक कधीच होवू शकत नाही. मालक एकच आहे तो म्हणजे ईश्वर. एकदा का ही स्थिती स्पष्ट झाली की पृथ्वीवर स्वतःला निरंकुश राजा म्हणविण्याचा कोणालाच अधिकार राहत नाही. म्हणूनच मक्का-मदिनासारखे पवित्र शहर ज्या देशात आहेत त्या देशाचे नाव किंगडम ऑफ सऊदी अरेबिया असे असल्याने जगातील बहुतेक मुस्लिमांना त्या नावावर आक्षेप आहे. 

वरील आयत हीच इस्लामी नेतृत्वाचा पाया आहे. या आयतीतून स्पष्ट होते की, इस्लामी नेतृत्व स्वयंभू नाही. ती ईश्वराची कृपा आहे. निरंकुश नेतृत्व आणि इस्लामी नेतृत्व यात मुलभूत फरकच हाच आहे की, इस्लामी नेतृत्व ही ईश्वराची कृपा मानली जाते तर निरंकुश नेतृत्व ही जनतेची कृपा मानली जाते. याच कारणामुळे इस्लामी नेतृत्वाने ईश्वराशी एकनिष्ठ असावे जनतेशी नाही. ईश्वराशी एकनिष्ठ राहून शरियतच्या परिघामध्ये घेतलेल्या निर्णयामुळेच जनतेचे सर्वोच्च कल्याण साध्य होते. इतर पद्धतीने घेतलेल्या निर्णयामुळे नाही. 

जगातील जवळ-जवळ सर्वच देशात जनतेतून निवडलेल्या निरंकुश नेतृत्वाने त्या-त्या देशात जनतेचे किती कल्याण केले आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. देशाच्या संसदेवर हल्ला करण्यासाठी आपल्या समर्थकांना प्रेरित करण्यापर्यंत ह्या निरंकुश नेतृत्वाची मजल जाते हे नुकतेच जगाने अनुभवलेले आहे, असे पक्षपाती नेतृत्व फक्त आपले नेतृत्व कसे टिकून राहील व आपल्या समर्थकांचे कसे हित होईल, एवढेच पाहते. यापुढे पाहण्याची त्याची लायकीच नसते. परंतु इस्लामी नेतृत्वाला स्वतःच्या नेतृत्वाची परवा न करता सर्व नागरिकांच्या कल्याणाचा विचार करावा लागतो. 

इस्लामी नेतृत्वाची जबाबदारी

निगाह बुलंद सुखन दिलसोज जां पुरसोज 

यही है रख्ते सफर मेरे कारवां के लिए 

जनतेतून निवडून आलेले नेतृत्व हे जनतेला जबाबदार असते. असे अभिमानाने सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात ते कोणालाच जबाबदार नसते. फार तर पाच वर्षानंतर त्याला बदलता येवू शकते इतकेच. पण त्याने त्याच्या पाच वर्षाच्या शासनकाळात किती धिंगाना घातला? देशाचे किती नुकसान केले? किती चुकीचे निर्णय घेतले? त्यामुळे नागरिकांची किती हानी झाली? या संबंधी त्याला कोणीच प्रश्न विचारू शकत नाही. एवढेच नव्हे तर त्याच्या शासन कालावधीत वृद्ध, विधवा, निराधार, अपंग आणि गरीब यांची जबाबदारी कोणाचीच नसते. केवळ जनकल्याणाच्या योजना घोषित केल्या जातात परंतु प्रत्यक्षात समाजाच्या अंतिम पायरीवर उभ्या असलेल्या वंचित गटाच्या पदरात फारसे काही पडत नाही. असे नसते तर देशात गरीबीच शिल्लक राहिली नसते.

इस्लामी नेतृत्व 

’’आणि म्हणतील! हे आमच्या पालकनकर्त्या! आम्ही आमच्या सरदारांचे व आपल्या ज्येष्ठांचे आज्ञापालन केले आणि त्यांनी आम्हाला सरळ मार्गापासून मार्गभ्रष्ट केले. हे पालनकर्त्या, यांना दुप्पट यातना दे आणि त्यांचा भयंकर धिक्कार कर.’’ (सुरे अलएहजाब आयात नं. 67-68) 

वर नमूद आयातींमध्ये निरंकुश नेतृत्वाचे मृत्यूपरांत जीवनामध्ये काय हाल होणार आहेत याचे काळजाचा थरकाप उडविणारे वर्णन केलेले आहे. थोडक्यात नेतृत्व ही फार मोठी जबाबदारी आहे. जिचा हिशोब या जगात व परलोकात दोन्ही ठिकाणी द्यावा लागतो. म्हणून खरा श्रद्धावान व्यक्ती स्वतःहून कधीच नेतृत्व प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो. मात्र नेतृत्व स्वतः चालून आले तर त्याने ते स्विकारावे, असा धार्मिक दंडक आहे. अशावेळी त्याच्या नेतृत्वाला यशस्वी बनविण्यासाठी ईश्वरीय मदत येते, अशी श्रद्धा आहे व ती खरी आहे. 

इस्लामी नेतृत्वाचा इतिहास

जगातील सर्वोत्कृष्ट नेतृत्व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिले होते. याबाबतीत मायकल एच. हार्ट पासून, ते साने गुरूजीपर्यंत सर्वच बुद्धीजीवींचे एकमत आहे. अपवाद फक्त इस्लाम विषयी वैराची कावीळ ज्यांना झालेली आहे त्यांचा. 

साधारणपणे नेतृत्व बदलते म्हणजे फक्त नेता बदलतो, जनता तशीच राहते. परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. ज्यावेळेस ते अरबस्थानाचे नेेते म्हणून पुढे आले त्यावेळेस अरबस्थानातील त्या काळात प्रस्थापित असलेले रानटी नेतृत्वच बदलले नाही तर नागरिकही बदलले, त्यांचे स्वभावही बदलले, उद्धट स्वभावाचे अरब मेनासारखे मऊ झाले, वाईट प्रवृत्तींसाठी जगभर ख्यात असलेले अरब सभ्य समाजाचे आदर्श उदाहरण झाले.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यानंतर आलेल्या चार पवित्र खलीफा (रजि.) यांनी सुद्धा उत्कृष्ट इस्लामी नेतृत्व कसे असते याचे उदाहरण जगासमोर सादर केले. जे की प्रलयाच्या दिवसापर्यंत जगाला प्रेरणा देत राहील. 

त्यानंतर मात्र इस्लामी इतिहासाने वळण घेतले आणि काही अपवाद वगळता इस्लामी नेतृत्वही इतर नेतृत्वासारखेच झाले. खलीफाच्या जागी बादशाह आले त्यांनी इतर निरंकुश राजाप्रमाणे सत्ता गाजविली. स्वतःच्या साम्राज्यांच्या सीमांचा विस्तार करत असतांना अनेक निरपराध्यांवर अत्याचार केले. भोगविलासाचे नवनवीन किर्तीमान रचले. ते धर्माने जरी मुस्लिम होते तरी त्यांचे नेतृत्व इस्लामी नव्हते, हे सत्य वाचकांच्या तेव्हाच लक्षात येईल जेव्हा खिलाफत आणि बादशाहत यामधील सूक्ष्म फरक वाचकांच्या लक्षात येईल. (यासंबंधी अधिक माहिती ज्यांना हवी त्यांनी खिलाफत और मुलूकियत हे मौलना सय्यद अबुल आला मौदूदी रहे. यांचे पुस्तक वाचावे.) 

आज परिस्थिती इतकी विदारक आहे की, स्वतः मुस्लिमांचा उर्दू आणि अरबी भाषेशी फारसा संबंध उरलेला नाही. म्हणून खिलाफत म्हणजे इस्लामी नेतृत्व आणि मुखालफत म्हणजे विरोध हा सुक्ष्म फरक किमान हा लेख वाचणाऱ्या वाचकांनी तरी लक्षात घ्यावा.

सध्या जगात 56 मुस्लिम राष्ट्रे असून, त्यापैकी शुद्ध इस्लामी म्हटले जाईल  असे एकही राष्ट्र नाही. त्या देशांचे नेतृत्व आणि इतर देशांच्या नेतृत्वात फारसा फरक राहिलेला नाही हे खेदाने नमूद करावे लागते. हे नेतेही तेवढेच भ्रष्ट आणि विलासी आहेत जेवढी की इतर नेते, असे दुर्दैवाने म्हणणे भाग आहे. 

– एम.आय.शेख

संबंधित पोस्ट
May 2024 Shawaal 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 Zul Qa'dah 1
10 2
11 3
12 4
13 5
14 6
15 7
16 8
17 9
18 10
19 11
20 12
21 13
22 14
23 15
24 16
25 17
26 18
27 19
28 20
29 21
30 22
31 23
1 24
2 25

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *