Home A blog A निकाहाचे विकृतीकरण सर्वात मोठी समस्या

निकाहाचे विकृतीकरण सर्वात मोठी समस्या


बेटी के लिए वक्त-ए-बधाई है

माँ के लिए वक्त-ए-जुदाई है

रस्मे तआम जबसे निकाह में आयी है

इस रस्म ने बडी तबाही मचाई है

ये जो बिर्याणी आपने दबाके खाई है

दुल्हन के वालीद की उम्रभर की कमाई है. 

लॉकडाऊन संपताच इतर समाजा बरोबर मुस्लिम समाजाचेही लग्नसोहळे सुरू झालेले आहेत. ऐपतीपेक्षा जास्त केला जाणारा खर्च माणसाला कंगाल बनवितो. तसाच खर्च विकृत निकाह व्यवस्थेत होत असल्याने मुस्लिम समाजाचा प्रवास कंगालीकडे सुरू आहे. ज्या समाजाच्या वस्त्यांमध्ये दर्जेदार शाळा कमी आणि दर्जेदार शादीखाने जास्त असतील त्यांच्या भविष्याविषयी काय बोलावे? हा लाख मोलाचा सवाल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चिकन, मटन, बिर्याणी, गोड पदार्थांची रेलचेल सध्या निकाहच्या सोहळ्यामध्ये प्रचूर मात्रेत दिसत आहेत. निकाह सोहळ्यामध्ये डीजे आणि व्हिडीओ ग्राफीला जेवढा तीव्र विरोध धर्मगुरूंकडून केला जातो तेवढा निकाहच्या वेळेस दिल्या जाणाऱ्या महागड्या जेवणावळ्यांचा केला जात नाही. काहीतरी तांत्रिक कारण देऊन या ’दावतीं’ना योग्य ठरवून प्रचंड अनुत्पादक खर्च केला जात आहे. त्यामुळे समाजात मुलांच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नाला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. लॉकडाऊन नंतर निकाह सोहळ्यांचा थाट बघून श्रद्धावान मुस्लिमांचे हृदय पिळवटून निघत आहेत म्हणूनच या आठवड्यात इस्लामी निकाह बद्दल चर्चा करण्याचा मानस आहे.

इस्लाममध्ये निकाहची संकल्पना

रोज-रोज दावतें आती हैं पर जाने का नई

गए भी तो निकाह की बिर्याणी खाने का नई

 प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी 1443 वर्षापूर्वीच सावधान केलेले आहे की, ’’औरतों से उनकी खूबसूरती की वजह से शादी न करो, हो सकता है के उनकी खूबसूरती उनको तबाही के रास्ते पर डाल दे. माल दौलत (उर्वरित पान 7 वर)

की वजह से भी उनसे शादी न करो, हो सकता है के उनका माल उनको गुनाह और सरकशी (अवज्ञाकारी) में डाल दे. बल्के तुम दीन की बुनियाद पर उनसे शादी करो. एक नकटी या कानकटी हुई काली मगर दीनदार औरत उनके मुकाबले में ज्यादा अच्छी है.’’ (इब्ने माजा).

आजकाल सौंदर्य आणि संपत्ती याकडेच लक्ष देऊन मुलींची निवड करण्यात येते. मात्र लग्न झाल्यावर ती फेसबुकवरच तासन्तास असते, सतत व्हॉटस्अ‍ॅप करत असते, सारखी मोबाईल फोनला चिटकून राहते, अशा तक्रारी सुरू राहतात. म्हणजे अगोदर, ’सुरत’ पाहून लग्न केले जाते आणि लग्नानंतर तिच्या ’सीरत’ म्हणजे चारित्र्याची चौकशी सुरू होते. वर नमूद हदीसचे पालन न केल्यामुळे पहा अनेक जोडप्यांचे लग्न नरकासमान झालेले आहेत. 

विवाह सोपा करा

ताख़ीर का मौक़ा ना तज़बज़ुब का अमल है

ये वक्ते अमल, वक्ते अमल, वक्ते अमल है

विज्ञानाची जसजशी प्रगती होत जाते तसा-तसा धर्माचा प्रभाव कमी होत जातो. या आणि याचसम अनेक कारणांमुळे भारतीय मुस्लिम समाजावर सुद्धा अलिकडे लग्न करण्यासाठी अनेक विघ्न पार करण्याची पाळी आलेली दिसत आहे. भारतीय मुस्लिम समाज हा धर्मांतरीत मुस्लिम असल्याने व सातत्याने बहुसंख्य हिंदू बांधवांसोबत राहत असल्याने त्यांच्या चालीरितींचा नाही म्हटलं तरी नकळत मुस्लिम जनमानसावर परिणाम होत असतो. हा परिणाम इतका सुक्ष्म असतो की तो लवकर जाणवत नाही. निकाहाच्या बाबतीतही वर्षानुवर्षे होत असलेले सूक्ष्म बदल आता इतके ठळक झालेले आहेत की, त्यांनी एका विक्राळ समस्येचे स्वरूप धारण केलेले आहे. ’जोडे की रकम’ च्या नावाखालील अनेकजण हुंडा आणि हजरत फातेमा रजि. यांच्या नावाखाली, ’दहेज-ए-फातमी’ च्या नावाने दहेजमध्ये फ्लॅट, उंची फर्निचर पासून ते कार वगैरे देण्याचे प्रकार, तसेच सम्राट अकबरच्या नावाखाली हलदी, मेहंदी, जुलवा इत्यादी रीतिरिवाज हे मुस्लिमांच्या निकाहमध्ये एव्हाना प्रस्थापित झालेल्या चालीरीति आहेत आणि यामुळेच ’निकाह को आसान करो’ या प्रेषित सल्ल. यांच्या फर्मानाला उघडपणे हरताळ फासण्याचे काम मोठ्या प्रमाणात मुस्लिमांकडून होत आहे.

         मुस्लिमांचे निकाह ही आता सोहळे बनत चाललेले आहेत. एकदा प्रेषित सल्लम. यांचे एक जवळचे सहकारी ह. अब्दुर रहमान बिन औफ रजि. यांच्या सदऱ्यावर अत्तराचा डाग पाहून प्रेषित सल्ल. यांनी त्याबद्दल चौकशी केली असता ते लाजून म्हणाले, ’’या रसुलल्लाह (सल्ल.) कल मेरा निकाह हुआ है’’ याचा अर्थ पहा! … प्रेषित सल्ल. गावात हजर आहेत मात्र त्यांच्या एका विश्वासू साथीदाराला (रजि.) त्यांना स्वतःच्या निकाह समारंभात बोलावण्याची आवश्यकता वाटली नाही. मुस्लिमांचा निकाह इतका सोपा असतो. इस्लाममध्ये लग्न संस्कार आहे ना सोहळा ती फक्त एक इबादत आहे. प्रेषित सल्ल. यांची सुन्नत (अनुकरण) आहे. एक सामाजिक करार आहे, यापेक्षा जास्त महत्व त्याला नाही. इतर धर्मांमध्ये अध्यात्मिकतेची उंच पातळी गाठण्यासाठी संसाराचा त्याग करावा लागतो. साधू बनावे लागते, नन् किंवा फादर बनावे लागते. मात्र संसारी जीवन जगून सुद्धा अध्यात्मिकतेची अत्युच्च पातळी गाठता येते, जगाला याचे प्रात्यक्षिक मुहम्मद सल्ल. यांनी दाखवून दिले. 

     भारतीय मुस्लिमांमध्ये अगोदरच गरीबांची संख्या जास्त आहे. निकाह महाग झाल्यामुळे लाखो मुली लग्नाची वाट पाहत आहेत, माझ्या दृष्टीने आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली मुस्लिम मुलांच्या अटकेनंतरची हीच सर्वात मोठी सामाजिक समस्या आहे. मोठ्या लग्नांमध्ये साहजीकच बडेजावपणा असतो. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याची तीव्र इच्छा असते. त्यासाठी उंची वस्त्रे आणि दाग दागिने घालून मिरविण्याची स्त्री-पुरूषांना नैसर्गिकरित्या इच्छा निर्माण होते. त्यातून स्त्री-पुरूषांना एकत्रित वावरण्याची संधी मिळते. त्यातून अनेक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. मस्जिदीमध्ये सहज होऊ शकणाऱ्या साध्या शरई निकाहचे सोहळ्यात रूपांतरण करून आपण वरील सर्व वाईट गोष्टींची जोखीम स्विकारलेली आहे.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ’बरकतवाला निकाह वो है जिसमें खर्च कम हो.’ आपण नेमके याच्या उलट करीत आहोत व तसे करून आपल्याला काही चुकीचे केले आहे असेही वाटत नाही, ही शरमेची बाब आहे.  ज्या ठिकाणी प्रेषित सल्ल. यांच्या आदेशाचे उघड उल्लंघन होते त्या ठिकाणी बिर्याणी खाणे तर लांबच राहिले अशा सोहळ्यामध्ये हजर राहणे सुद्धा अवज्ञा आहे. प्रेषित सल्ल. यांनी कधीच कोणाच्या निकाहमध्ये जेवण केलेले नाही मग आम्ही कसे करू शकतो? याचे उत्तर कोणाला देता येत असेल तर त्यांनी द्यावे. 

अल-मारूफ वल-मशरूत

         एकदा का एखाद्या समाजामध्ये एखादी वाईट परंपरा रूजली की तिला संपविणे सोपे नसते. सुभाषितवजा सल्ला दिल्याने ती संपत नाही. अरबी भाषेमध्ये याचे एका ओळीत नित्तांत सुंदर असे वर्णन केलेले आहे ते म्हणजे, ’अल -मारूफ वल-मशरूत’ म्हणजे एखादी रीत एखाद्या समाजामध्ये ’मारूफ’ म्हणजे लोकप्रिय झाली की लवकरच तिचे रूपांतरण ’अल मशरूत’ म्हणजे अनिवार्य रीतीमध्ये होऊन जाते. आपल्या समाजात सुद्धा हेच झालेले आहे. अनेक कुरितींची सुरूवात मारूफ पद्धतीने झाली होती आता तिचे रूपांतर मशरूतमध्ये झालेले आहे.

निकाह सोपा करा 

       इस्लाममध्ये निकाह इच्छुक मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांकडून निकाहचा प्रस्ताव म्हणजेच ’इजाब’, निकाह इच्छुक मुलगी आणि तिच्या नातेवाईकांकडून त्या प्रस्तावाचा स्वीकार म्हणजे (कुबूल), दोन साक्षीदार, एक वकील, एक काझी, माफक महेर काही छूआरे (खजूर) एवढे झाले के निकाह होऊन जातो. एवढी साधी ही प्रक्रिया आहे. मात्र आजच्या मुस्लिम समाजातील निकाह अनेक रितीरिवाजांनी नटलेले म्हणूनच क्लिष्ट झालेले आहेत. अनेक चुकीच्या गोष्टी मारूफ झालेल्या आहेत. 

इस्लामपूर्व काळामध्ये या सर्व कुरीती तत्कालीन अरबी समाजामध्ये प्रचलित होत्या. त्या सर्व प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांनी आपल्या बुटाच्या टाचेखाली रगडून नष्ट केल्या. परंतु कालौघात त्या पुनर्जिवीत होवून आजमितीला नव्याने समाजाला आव्हान देत आहेत. लाखो रूपये हुंड्यात, लाखोंचा खर्च जेवणात, लाखो रूपये मंगल कार्यालयात, लाखो रूपयांची उंची वस्त्रे आणि दागदागिन्यात खर्च केले जात आहेत. 

      काही ठिकाणी लोक लाजेखातर या सर्व गोष्टी तोंडाने मागत नाहीत मात्र मुशास्ता (मध्यस्थ) च्या माध्यमातून त्या न मागता मिळतील अशाच ठिकाणची स्थळे शोधली जात आहेत. अलिकडे गरीब व मध्यमवर्गीय लोकांच्या अपेक्षांना सुद्धा धुमारे फुटलेले आहेत. त्यामुळे निकाहमध्ये अनाठायी खर्च अनिवार्य झालेला आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की –  

         एखाद्याला पहिली मुलगी झाली तर तो कशीबशी आपली समजूत घालून घेतो. योगायोगाने दूसरीही झाली तर त्याचे काळीज धस्स करते. तीसरी झाली तर त्याच्या पोटात भितीचा गोळा उठतो आणि चौथीही झाली तर मात्र तो हसणे विसरून जातो. खाली मान घालून पाठीचा कना मोडेपर्यंत काम करतो, कारण चारही मुलींच्या निकाहासाठी भविष्यात लागणारी प्रचंड रक्कम त्याच्या ऐपतीबाहेरची असते. काहीही करून ती गोळा करणे हेच त्याच्या आयुष्याचे एकमेव ध्येय बनते. त्याची तरतूद करण्यासाठी तो स्वतः व कुटुंबावरील आवश्यक खर्चाला सुद्धा कात्री लावतो. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पौष्टीक अन्न, मनोरंजन, पर्यटन इत्यादी गोष्टींचा तर विचारच करत नाही. आपल्या मुलींचे निकाह योग्य ठिकाणी लावण्यासाठी योग्य त्या खर्चाची तरतूद करण्यातच त्याचे आयुष्य संपून जाते. एक पोलीस अधिकारी या नात्याने मला आलेल्या अनुभवातून मी हे विदारक सत्य वाचकांसमोर ठामपणे मांडू शकतो की, मुस्लिम समाजातील दोन पेक्षा जास्त मुली असणारा प्रत्येक बाप आपल्या मुलींचे निकाह व्यवस्थीत व्हावेत, यासाठीच जगत आहे. याचा पुरावा हा आहे की, मुस्लिमेत्तर वस्त्यांकडे एक दृष्टीक्षेप टाकला तरी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्या वस्त्यांमध्ये मोठमोठी महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस, मुला-मुलींचे आलीशान हॉस्टेल यांची संख्या वाढत आहे तर मुस्लिम वस्त्यांमध्ये आलीशान शादीखान्यांची संख्या वाढत आहे. कोणत्याही शहरातले हेच चित्र आहे.

 एक अनाहुत संकट  

         ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे सचिव मौलाना महेफूज उमरैन रहेमानी यांनी उर्दूमध्ये एक लेख लिहून समाजाचे लक्ष एका वेगळ्याच समस्येकडे वेधलेले आहे. मौलाना म्हणतात 2016-17 या एका वर्षामध्ये एकट्या पुण्यामध्ये 44 मुस्लिम मुलींनी इतर धर्मीय मुलांशी नोंदणी पद्धतीने विवाह केलेले आहेत. एकट्या पुण्याची ही आकडेवारी आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राची किंबहुना देशाची काय परिस्थिती असेल, याचा आपण सहज अंदाज बांधू शकतो. निःसंशयपणे दिवसेंदिवस महाग होणारे निकाह हे सुद्धा या पलायनामागचे एक प्रबळ कारण असल्याच्या मौलानांच्या मताचा प्रतिवाद करणे शक्य नाही. 

केवळ निकाह प्रसंगी देण्यात येणारे भारी जेवण जरी बंद केले तरी निकाह समारंभामध्ये होणारा अर्ध्यापेक्षा अधिक वायफळ खर्च वाचू शकतो, असे माझे वैयक्तिक मत आहे आणि हे करणे सहज शक्य आहे. ज्या प्रेषित सल्ल. यांचे गोडवे गाताना आपली जीभ थकत नाही त्याच प्रेषित सल्ल. यांच्या 11 निकाह पैकी एकाही निकाह प्रसंगी उपस्थितांना जेवण देण्यात आलेले नव्हते, हे एकच कारण लाखोंचे महागडे जेवण देण्याच्या पद्धतीला रोखण्यासाठी पुरेसे आहे. 

        एका मध्यमवर्गीय मुस्लिम व्यक्तीच्या मुलीच्या निकाहला होणाऱ्या शेकडो लोकांच्या गर्दीमधील मोठी संख्या त्या व्यक्तीसाठी, त्या सोहळ्यासाठी नव्हे तर निकाहनंतर मिळणाऱ्या बिर्याणीसाठी गोळा झालेली असते हे वास्तव आहे. निकाहमध्ये मुस्लिमांनी जेवणाची ही पद्धत बंद पाडली तर 5-50 पेक्षा जास्त लोक मोठ्या लग्नाला सुद्धा येणार नाहीत, याची मला खात्री वाटते. असे झाले तर निकाह मस्जिदीमध्ये सहज करता येतील व मुलीच्या बापाचे शादीखान्याच्या भाड्याचे लाखभर रूपये व जेवणाचे चार-दोन लाख रूपये सहज वाचतील. 

         आज ऐपत नसतांनासुद्धा प्लॉट किंवा घरदार, शेती विकून प्रसंगी व्याजी कर्ज काढून अनेक लोक या खर्चिक निकाहचा खर्च भागवित आहेत. त्यांच्या या हलाकीच्या परिस्थितीवर दया दाखवून आपण एका वेळेसच्या बिर्याणीचा त्याग करू शकत नसू तर मात्र समाजाच्या सांस्कृतिक ऱ्हासाचे चित्र ’याची देही याची डोळा’ आपल्या सर्वांनाच पहावे लागेल, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.  

काही लोकांचा माझ्या या म्हणण्याला विरोध असू शकतो. अनेकजण ही पळवाट शोधू शकतात की जर मुलींच्या वडिलांची परिस्थिती चांगली असेल व ते स्वेच्छेने जेवण देत असतील तर जेवण्यात काय हरकत आहे? हे म्हणणे जरी वरकरनी बरोबर वाटत असले तरी अशा प्रकारातून ऐपत नसलेल्यांवर सुद्धा सामाजिक दबाव आपोआप येतो व त्यातून ते लोक जेवण देण्यास बाध्य होवून जातात. कारण की ऐपत ही एक नित्तांत खाजगी बाब असते. वरकनी कोणाकडे पाहून त्याच्या ऐपतीचा अंदाज करता येत नाही. वरून ऐपतदार दिसणारे अनेक लोक आतून पोकळ असतात. लोकलाजेखातर ऐपत नसतांनाही वायफळ खर्च करत असतात. मी अशा काही लोकांना ओळखतो की, जे सकृतदर्शनी ऐपतदार दिसत होते व ज्यांनी आपल्या खोट्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलींचे शानदार निकाह करून दिले आणि नंतर कळाले की, घरदार विकून मुंबई, पुणे, हैद्राबादला जावून मजूरी करत आहेत. ज्या समाजातील श्रीमंत लोक आपल्या समाजातील गरीब लोकांवर दया दाखवत नाहीत तो समाज फार काळ एकसंघ राहू शकत नाही. लग्न हा कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. तो सहज सुंदर आणि टिकाऊ असेल तर समाज सुद्धा सहज सुंदर आणि टिकाऊ होतो. तो जर क्लिष्ट, कुरूप असेल आणि टिकाऊ नसेल तर तो समाज दुभंगल्याशिवाय राहू शकत नाही.

        मुस्लिम मॅरेज सिस्टम इज द मोस्ट मॅथेमॅटिकल सिस्टम इन द वर्ल्ड असे शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर येथे बोलताना एकदा म्हटले होते. त्यांचे म्हणणे खरेच आहे. फक्त आपण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षांना निकाहमध्ये घुसडून निकाहचे गणितच बिघडवून टाकलेले आहे. ते पूर्ववत शुद्ध स्वरूपात आणल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी निकाहला सोपे करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही.

           लक्षात ठेवा मित्रानों ! महागड्या निकाहचे खालील सामाजिक दुष्परिणाम नक्कीच होतील. एक – वर्गकलह वाढेल. दोन- कन्या भ्रुणहत्या सुरू होतील. (कोण जाणो सुरूही झाल्या असतील). हे दुष्परिणाम टाळायचे असल्यास ’निकाह को आसान बनाओ’ हे सुत्र आज या क्षणापासूनच आपण सर्वांनी मिळून स्वतःवर लागू करावे लागेल. प्रेषित सल्ल. यांच्या याच वचनाची बूज राखावी लागेल. मला विश्वास आहे आपण सर्व निकाहला सोपे करण्यासाठी आपापल्या ठिकाणी प्रयत्नशील रहाल. 

शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की,  ’’ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना तुझ्या आणि तुझ्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीप्रमाणे अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने निकाह करण्याची समज दे.’’ (आमीन.) 

– एम. आय. शेख

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *