Home A blog A नातेवाईकांशी सदाचाराने वागा

नातेवाईकांशी सदाचाराने वागा

इस्लामने ’नातेवाईकांशी सदाचाराने वागा’ अशी सूचना केली आहे. पवित्र कुरआनमध्ये ’’नातेवाईकांचे हक्क अदा करा’’ असा आदेश दिला आहे. याचाच अर्थ घरातील स्त्रीवर ही  जबाबदारी अप्रत्यक्षपणे सोपविली आहे. नातेवाईकांशी सद्व्यवहार, सहानुभूती, शुभचिंतनाचा व्यवहार, प्रेम, माया, सुख, दुःखात सहभाग या सर्व गोष्टींचा अंतर्भाव अपेक्षित आहे. परिवाराबरोबर नातेवाईकदेखील जोडले जाणे आवश्यक आहे. हा जोड इतका घट्ट असावा की जर एका नातेवाईकाच्या पायात काटा रूतला तर त्याची कळ दुसऱ्या नातेवाईकाला जाणवावी  आणि तिसऱ्या आप्तेष्ठाच्या डोळ्यांतून अश्रु वहावेत. पवित्र कुरआनमध्ये निवेदन आहे, ’’ ते जोडतात त्या संबंधाना (नात्यांना) ज्यांना जोडण्याचा अल्लाहने आदेश दिला आहे. आणि  आपल्या पालनहार अल्लाहचे भय बाळगा’’ (दिव्य कुरआन).
अल्लाहने प्रत्येकाला नाते जोडण्याचा आदेश दिला आहे. नाते जोडणे हे सद्वर्तन समजले आहे. हे सद्वर्तन प्रत्येक स्त्री-पुरूषाने करावे, पण निर्माण झालेले, जोडलेले नाते तुटणार नाही  किंवा त्यात फारकत निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण नाते तोडणे हे इस्लाम अमान्य करतो. नातेसंबंध संपविणे म्हणजे पाप करणे होय आणि यासाठी अल्लाहची भीती  बाळगली जाते. या नातेसंबंधामध्ये रक्ताची नाती आणि मानलेली नाती या दोघांचाही समावेश होतो.
’’ जी पत्नी आपल्या नवऱ्याबद्दल कृतज्ञ नसेल तिला अल्लाहचा आशीर्वाद लाभणार नाहीत.’’
’’उत्तम स्त्री दात्याचे (देणाऱ्याचे) नेहमीचे आभार मानते. कोणत्याही कठीण प्रसंगात धीर दाखविणारी, सांभाळ करणारी, आज्ञाचे पालन करणारी असते.’’
ज्या महिलेला उत्तम स्त्रीत्व प्राप्त करावयाचे आहे तिने नेहमी आपणास मदत करणाराचे, घरात आणून देणाराचे, आपला उदरनिर्वाह चालवणाराचे (पतीचे) आभार मानले पाहिजेत. तसेच त्याच्या ऋणात राहायला पाहिजे. जी स्त्री दात्याचे आभार मानते, त्याच्या ऋणात राहते ती कितीही भयावह प्रसंग आला तरी डगमगत नाही. तिचा निश्चय डळमळीत नसतो. ती  आपल्या निर्णयावर कठीण प्रसंगीही ठाम राहते. ती प्रतिकूल परिस्थितीत इतरांचा सांभाळ करते व आज्ञांचेही पालन करते.
बहुतेक धर्मामध्ये आईची थोरवी गायली आहे. कोणताही धर्म आईशी अवमानकारक वागण्यास प्रवृत्त करीत नाही. सर्वच धर्मात आई अत्यंत आदरणीय, व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे धर्मशास्त्राच्या तत्त्वज्ञानात आईची अवहेलना किंवा कुचंबना अपेक्षित केलेली नाही. तसेच इस्लाम तत्त्वज्ञाने किंवा धर्माने आईचा (स्त्री) सन्मान केलेला आहे. ’’आईच्या पायात  (चरणात) स्वर्ग आहे.’’ ही शिकवण इस्लामचीच आहे. ’’आईची सेवा हे पुण्यकर्म आहे. इस्लामने आपल्या आईविषयी कृतज्ञ राहण्यास सांगितले आहे. आपल्या आईवडिलांचे हक्क  ओळखण्याची ताकीद केली आहे. कारण आईने मरणयातना सहन करून आपल्याला जन्मास घातले आहे. तसेच तिने आपल्यासाठी अन्न त्यागले आहे. (बाळ दूध पित असताना आई  खारट, तिखट, आंबट, खात नाही, कारण त्याचा परिणाम दुधावर होतो व त्यामुळे बाळाला त्रास होईल यासाठी ती अन्न त्यागते.) बाळ आजारी असल्यास आई रात्ररात्र जागते. बाळाच्या  जन्मानंतर सर्वात पहिला गुरू आई होते. आई ज्ञानपीठ आणि न्यायपीठ या दोन्ही व्यवस्था बाळासाठी स्वतः होते. लहान मुलाच्या मेंदूवर संस्कार करते. जगातील सर्वात आदरणीय  सर्वसमावेशक व्यक्ती म्हणजे आई होय. अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ थोडोर रिक त्यांच्या पुस्तकात म्हणतात, (द इमोशनल जिस्पराईट्स) ’प्रत्येक स्त्रीला तिच्या मातृत्वाचा अभिमान  वाटतो.’ तसेच त्यांनी असेही म्हटले आहे, ’स्त्री पुरूषाला अनेक सरस (उत्कृष्ठ) बाबींबद्दल मोठेपणा देते.’
ईश्वराने स्त्रीला बहाल केलेली देणगी म्हणजे तिचे मातृत्व. मातृत्वाच्या देणगीनेच स्त्रीचे प्रतिष्ठा पराकोटीला पाहोचली. कारण मानवाची निर्मिती स्त्री आणि पुरूष यांच्यातून झाली  असली तरी स्त्री जन्मदात्री आहे. ती पुढच्या पिढीपर्यंत वंशसातत्याचे काम करते व तिला कायम वाटते की आपण आदर्श माता व्हावे. ’आई’ ही प्रचंड मौल्यवान देणगी आहे.  म्हणूनच  अनेक कवी, साहित्यिक, विचारवंत, व्याख्याते आईचे महत्त्व अनेक शब्दांत सांगतात. जसे ’आईविना माणूस भिकारी’, आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं’, आई असते जन्माची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही’ ’प्रेमसिंधू आई, वात्सल्यसिंधू आई, बोलवू आता कोणत्या उपायी’, अशा अनेक प्रसिद्ध रचना आपणांस ऐकावयास  मिळतात. आज संपूर्ण भारतभर गावागावात आईची थोरवी गाणारी आणि सांगणारी माणसे भेटतात. यावरून आपल्या लक्षात येते की कितीही गडगंज श्रीमंत व्यक्ती असली आणि  तिच्याकडे असंख्य भौतिक सुविधा असल्या आणि त्या व्यक्तीस आई नसली तर तो आईसाठी भिकारी आहे. आई म्हणजे आयुष्यभर पुरणारा एक असा मोठा ठेवा आहे तो पुरतही नाही  आणि संपतही नाही. जगात कोणत्याही व्यक्तीची आई नसेल तो सर्वांत जास्त पोरका आहे. ज्याला आई नाही त्याला काही नाही. तसेच एखाद्याला आई नसली तरी त्याला आई नाही  असेही म्हणवत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांना एका इसमाने विचारले, ’’ मी कोणाची अधिक सेवा करावी.’’ त्यावर पैगंबर म्हणाले, ’’तुमच्या आईची.’’ पुन्हा तो म्हणाला, ’’त्यानंतर  दूसरे कोण?’’ पैगंबर म्हणाले, ’’तुमच्या आईची.’’ तो माणूस पुन्हा म्हणाला,’’ आणखी कोण?’’ पैगंबर म्हणाले, ’’ तुमची आई.’’ त्या माणसाने चौथ्यांदा विचारले, ’’यानंतर कोण?’’  पैगंबरानी सांगितले, ’’तुमचे वडील.’’
वरील विवरणावरून आपणास सहज लक्षात येते की इस्लामने प्रथम दर्जा आईला म्हणजेच स्त्रीला दिला आहे, कारण स्त्री आदरणीय आहे. तिचा आदर जेव्हा तीन वेळा होईल तेव्हा  वडिलांचा आदर एक वेळा केला आहे. म्हणजेच पुरूष (वडील) तर आदरणीय आहेच पण त्यापेक्षा आई (स्त्री) तीनपट अधिक आदरणीय आहे. याचा अर्थ स्पष्ट करताना खालील वाक्याचे  पुनर्लेखन करतो, ’’आईच्या पायाखाली स्वर्ग आहे.’’ मानव ज्या स्वर्गाच्या अपेक्षेसाठी जीवनभर सद्वर्तन करतो, स्वर्गप्राप्तीसाठी अनेक पुण्यमार्ग अवलंबितो, इस्लामने सांगितले की  आपणास सृष्टी दाखवणारी आपल्या मृत्यूपश्चात स्वर्ग-प्राप्तीची संधी देणारी वात्सल्यसिंधू आहे. त्यामुळे आईचे उपकार स्वतःच्या शरीराची कातडी काढून जरी त्याचे बूट करून आईला  घातले तरी ते कमीच आहे. आई हे असे न्यायालय आहे जिच्यापुढे मुलाचे हजारो अपराध माफ होतात. क्षमा मिळते.
मुलाची तब्बेत (शारीरिक स्वास्थ्य) कितीही उत्तम असले तरी आईच्या नजरेत आपले बाळ हे तब्बेतीने कमकुवत आहे, असे वाटते. कारण तिची माया विलक्षण आहे. मराठीमध्ये एक  म्हण आहे, ’’शेजारणीने भरवला भात आणि आईने फिरवला हात दोन्ही सारखेच.’’ आई एक आदरातिथ्य आहे आणि तिच्या चरणाच्या खालीच स्वर्ग आहे. म्हणजे आपण स्वर्गाच्या  अपेक्षेणे वनवन भटकतो आणि खरा आईच्या पायाखालचा स्वर्ग आपणास दिसत नाही. तिची आपल्या मुलावर अलौकिक माया असते, या मायेला जगात तोड नाही.
पवित्र कुरआनमधील आईचा सन्मानच केला गेला आहे. म्हणून आज मातृप्रेम व सन्मान यासाठी स्त्री पात्रच आहे. ज्ञानी, सुसंस्कृत व्यक्ती कधीच स्वतःच्या आईचा मोठेपणा नाकारू शकत नाही. आई ही संपूर्ण जगाची निर्माती आहे. ती बाळाला जन्म देते आणि रिकामी होते असे नाही. तर ती आपल्या बाळाचे लालनपालन, संगोपन करते. उदरात अर्भक  असल्यापासून ते तिच्या अंतापर्यंत आपल्या बाळावर कसल्याही फळाची अपेक्षा न ठेवता प्रेम करते. बाळाच्या नुसत्या रडण्याच्या आवाजाने आईचा पान्हा फुटतो. इस्लामने स्पष्ट  ताकीद केली आहे, ’’आपल्या आई-वडिलांचे अधिकार जाणा.’’
अर्थात आपल्या सुखात, ऐश्वर्यात, समृद्धीत त्यांचा अधिकार आहे, तो म्हणजे केवळ त्यांना सुखात सांभाळण्याचा. त्यांना सांभाळावे, त्यांची परवड होऊ नये याची काळजी घ्यावी.  आपल्या आईवडिलांशी चांगले वर्तन ठेवावे. कारण आईने आपल्या रक्ताचे दूध करून बाळाला पाजलेले असते आणि त्या दुधाचे कर्ज कोणीही आणि कधीही फेडू शकत नाही आणि तसा  हिशोबही करू नये. फक्त त्यांच्याशी सद्वर्तन करावे. आई जेव्हा आपल्या बाळाला छातीशी कवळाटून दूध पाजते तेव्हा ती व ते बाळ यांच्यात अतूट नाते निर्माण होते. म्हणून जितके  महत्त्व बाळाला जन्म देण्याला आहे, त्यापेक्षा नक्कीच अधिक महत्व स्तनपाला आहे.
आज समाजामध्ये स्तनपान करण्यास मातेला वेळ मिळत नाही. (नोकरी, व्यवसाय करणाऱ्या माता) तसेच काही स्त्रिया स्तनपान करण्यास अप्रत्यक्ष विरोध दर्शवतात. त्यांच्यासाठी  किंवा अशा स्त्रिया या गरोदर आहेत व बाळाला जन्म दिल्यानंतर स्तनपान नाकारण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी सांगणे आहे की, आईचे दूध हा बाळाचा अधिकार आहे, तो स्वतः  आईदेखील त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. इस्लामने बाळाला जन्म देणारी जन्मदात्री जितकी महत्त्वाची तितकीच बाळाला स्तनपान करणारी दूध आई आहे, असे सांगितले  आहे. याचे हिंदू धर्मातील एक उदाहरण आहे ते खालीलप्रमाणे.
छत्रपती शिवरायांच्या पत्नीने (सईबाई) 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर एका मुलास जन्म दिला (संभाजीराजे) पण त्या या बाळंतपणात आजारी पडल्या व त्यांना बाळंतपणाचा रोग जडला व त्यात त्यांचे दूध आटले (दूध आले नाही). तेव्हा जिजाऊ माँसाहेबांनी पुरंदरजवळच्या कापूरहोळच्या गाडे-पाटील यांच्या घरातील बाळंतीण (जिची मुलगी दगावली होती)  ’’धाराऊ गाडेपाटील’’ हिला गडावर बोलावून घेऊन तान्ह्या संभाजीच्या दुधाची सोय केली. पुढे बाळंतपणाच्या आजारातच 5 सप्टेंबर 1659 रोजी सईचे निधन झाले.
संभाजीच्या जीवनात जेवढे महत्त्वाचे स्थान सईबाईंना होते तेवढेच ’’दुधआई’’ धाराऊ यांना होते. सईबाईंच्या पश्चातसुद्धा धाराऊ अगदी शेवटपर्यंत संभाजीची दूधआई असल्याने त्यांच्या  मृत्यूपर्यंत गडावरच राहिल्या आणि संभाजीला दूध पाजल्याच्या त्यांच्या आयुष्यभर त्यांना मोबदला दिला. स्त्रीला काही कर्तव्ये सांगितली त्यात आपल्या बाळास स्तनपान करणे हे  देखील आहे. पण आज धावत्या युगात स्त्रिया (माता) सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कला, व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना त्यांना वेळ मिळत नाही म्हणून त्यांच्यासमोर स्तनपानाची आज समस्या निर्माण झाली आहे. काही स्त्रिया अशा आहेत की ज्या बाळाला स्तनपानास स्पष्ट नकार देतात. कारण त्याने त्यांचे सौंदर्य कमी होईल याची  त्यांना भीती वाटते. स्तनपान न करणे म्हणजे आपल्या बाळाचा हक्क काढून घेणे व एक पाप करणे आहे, याची जाणीव स्त्रियां (माता) मध्ये निर्माण करावी लागेल. आज जगभरात  बाळांसाठी स्तनपानाची जागृतीची मोहिम चालू असलेली पहावयास मिळते व त्यासाठी अब्जावधी रूपयांचा खर्च केला जात आहे. पवित्र कुरआनमध्ये इस्लामच्या अवतरणाच्या वेळीच  स्तनपानाविषयी जागृती केलेली दिसून येते. याचाच अर्थ स्त्री आणि तिच्यापासून जन्मास आलेले अर्भक या दोघांच्या अधिकारांच्या बाबतीत इस्लामी तत्वज्ञान संतर्क होते, सतर्क आहे.
(सदरचा लेख : इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री यामधील आहे. प्रकाशक : इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई.)
संबंधित पोस्ट
September 2023 Safar 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
28 11
29 12
30 13
31 14
1 15
2 16
3 17
4 18
5 19
6 20
7 21
8 22
9 23
10 24
11 25
12 26
13 27
14 28
15 29
16 Rabi'al Awwal 1
17 2
18 3
19 4
20 5
21 6
22 7
23 8
24 9
25 10
26 11
27 12
28 13
29 14
30 15
1 16

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *