Home A blog A दहेज : भीक मागण्याचा सभ्य मार्ग

दहेज : भीक मागण्याचा सभ्य मार्ग

आपल्या समस्या दुसरा कोणीतरी येवून सोडवेल हा विचारच मूर्खपणाचा आहे. हुंडा आणि दहेज भारतीय मुस्लिम समाजामध्ये खोलपर्यंत रूजलेली समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आता कोणी पैगंबर येणार नाहीत. म्हणून ही प्रथा आपल्यालाच दूर करावी लागेल. कुठलेही मोठे काम योजनेशिवाय पूर्ण होत नाही. ऐन वेळेसची जमवाजमव निरूपयोगी असते. दहेज प्रथेचे उन्मूलन करण्यासाठी जेवढे प्रयत्न होतात तेवढे ती प्रबळ होते, आतापर्यंतचा असा अनुभव आहे. जोपर्यंत आपण एक उम्मत म्हणून या समस्येचे गांभीर्य ओळखणार नाही, त्यापासून होणारे नुकसान तपासून पाहणार नाही तोपर्यंत ही समस्या दूर होणार नाही.
दहेज देण्याची कारणे
मुस्लिमांमधील अनेक विचारवंत दहेज प्रथेला योग्य ठरविण्यासाठी, ’दहेज-ए-फातमी’चे उदाहरण देतात. म्हणजे प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल.च्या लाडक्या मुली ह.फातेमा रजि.चा निकाह जेव्हा हजरत अली रजि. बरोबर झाला तेव्हा बिदाईच्या वेळी काही गृहउपयोगी वस्तू देण्यात आल्या होत्या. हे ऐतिहासिक सत्य आहे. मात्र या वस्तू देण्यामागची वस्तूस्थिती समजून न घेताच या घटनेचा सोयीस्कर अर्थ लावून टी.व्ही. फ्रिजपासून उंची फर्निचर पर्यंत लाखो रूपयांच्या वस्तूंची देवाण-घेवाण मुस्लिम समाजात होते. हा शुद्ध ढोंगीपणा आहे. या दहेज-ए-फातमी ची वस्तूस्थिती खालीलप्रमाणे नमूद आहे.
हे सत्य आहे की, खजूरच्या सालीपासून तयार केलेले एक अंथरून, चामड्याचा एक मिश्कीजा (पाणी भरण्याचे साधन) आणि काही मातीची भांडी ह.फातिमा रजि. यांना बिदाईच्या वेळी देण्यात आल्या होत्या. याचे कारण असे की, ह.अली रजि. हे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे चुलतभाऊ होते व लहानपणापासून त्यांच्याच छत्रछायेखाली वाढलेले होते. त्यांचे स्वतंत्र असे घर नव्हते. जेव्हा हा विवाह  निश्‍चित झाला तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी महेर आणि गृहउपयोगी वस्तू घेण्यासाठी हजरत अलीच्या मालकीची असलेली एकमेव वस्तू ’जर्रा’ (घोड्यावर बसण्यासाठी वापरण्यात येणारे आसन) विकून त्यातून आलेल्या रकमेतून महेर आणि गृहउपयोगी वस्तू घेण्याचे निर्देश ह.अली रजि. यांना दिले. त्याप्रमाणे ह.अली रजि. यांनी आपल्या मालकीची जर्रा विकली. ती ह. उस्मान रजि. यांनी खरेदी केली व त्या मोबदरल्यात जी रक्कम मिळाली त्यातून महेर अदा करण्यात आली व उपरोक्त नमूद वस्तू खरेदी करण्यात आल्या. वरील वस्तू खरेदी करण्यामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मालकीचे एक दिरहमही खर्च करण्यात आलेले नव्हते. ही सत्य घटना आहे. एवढ्याश्या घटनेचे भांडवल करून कोट्यावधी मुस्लिमांनी आतापावेतो अब्जावधी रूपयांच्या दहेजची देवाण-घेवाण केलेली आहे.
दहेज-ए-फातमीचे कारण पुढे करणारे विचारवंत हे विसरून जातात की, ज्या मदिना शहरामध्ये ह.फातिमा रजि. आणि ह.अली रजि. यांचा निकाह झाला. त्याच मदिना शहरामध्ये प्रेषित सल्ल. यांच्या दोन मुलींचे निकाह (ह.रूकैय्या रजि. आणि ह.उम्मे कुलसूम रजि.) एकीच्या मृत्यूनंतर एक ह.उस्मान रजि. यांच्याबरोबर झाले. तेव्हा कुठल्याही गृहउपयोगी वस्तू देण्यात आलेल्या नव्हत्या. म्हणून दहेज-ए-फातमीच्या नावाखाली हा जो दहेज देण्याघेण्याचा खेळ मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी सुरू केलेला आहे व त्यामुळे निकाह महाग झालेला आहे. गरीबांना परवडेनासा झालेला आहे. तो ताबडतोब बंद करण्याची गरज आहे.
एक मजेशीर गोष्ट आपल्याला सांगतो, माणसाचे शरीर असो का विचार, यावर बर्‍याच गोष्टींचा प्रभाव नकळतपणे पडत असतो. हा प्रभाव (बदल) इतका सूक्ष्म असतो की, दैनंदिन जीवनात तो लक्षात येत नाही. उदा. समजा आपला एखादा बालमित्र अचानक दहा वर्षानंतर भेटला तर आपल्याकडे पाहताच तो म्हणतो, ” अरे! कम्प्लिट चेंज झालास” त्याला गेल्या दहा वर्षात आपल्यात झालेले बदल चटकन लक्षात येतात पण आपल्या  लक्षात येत नाहीत. लग्नाच्या बाबतीतही काही बदल आपण आपल्या देशातील बहुसंख्य हिंदू बांधवांच्या लग्न पद्धतीतून स्वीकारलेले आहेत. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या जवळच्या बहुसंख्य बांधवांच्या लग्नसोहळ्यास उपस्थित राहत असतो व नकळत त्या सोहळ्यातील बर्‍याच गोष्टींने प्रभावित होत असतो. उदा. लग्नपत्रिका छापणे, फेटे बांधणे, शॉल देऊन उपस्थितांचा सत्कार करणे, आलेल्या लोकांना जेवन देणे, रोषणाई करणे, बँड/ डी.जे.वाजविणे, वरात काढणे इत्यादी. मुळात सोहळ्यासाठी ह्या गोष्टी आवश्यकच असतात. परंतु, इस्लाममध्ये निकाह हा मुदलात सोहळाच नाही. तो एक सामाजिक करार आहे. ज्याच्याबद्दल दस्तुरखुद्द प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनीच सांगितलेले आहे की, ”तो निकाह सर्वात चांगला ज्यात साधेपणा आहे”.
बहुसंख्य हिंदू बांधवांचे लग्न मनुस्मृती खंड 3 मधील नियम 20 ते 34 अनुसार प्रजापती पद्धतीने होत असतात. त्यात मुलीचे वडील ’कन्यादान’ करीत असतात. कल्पना करा ज्या मुलीला जन्मापासून लग्नापर्यंत लाडात वाढविले तीचे दान करताना कोणता पिता तिला साध्या पद्धतीने सासरी पाठवेल? म्हणून बहुसंख्य बांधवांमध्ये लग्नाचा सोहळा आयोजित केला जातो. त्यात पिता आपल्या ऐपतीप्रमाणे हुंडा, संसारोपयोगी वस्तू बिदायीच्या वेळेस मुलीला देत असतो.
यानंतर त्या मुलीचा माहेरशी संबंध औपचारिक असतो. तिचे सर्व जग बदलून जाते. पतिच्या नावाचे कुंकू कपाळी तर पतीच्या हातचे मंगळसूत्र गळ्यात बांधले जाते. लग्नानंतर तिच्या नावाच्या पुढे वडिलांच्या नावाऐवजी पतीचे नाव लावले जाते. एवढेच नव्हे तर लग्नानंतर आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये तिचा वारसा हक्क समाप्त होतो. (महिलांना वारसा हक्क हिंदू कोडबिल 1956 प्रमाणे मिळवून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.)
या उलट इस्लाममध्ये लग्नाचा करार मस्जिदीमध्ये अतिशय साध्या पद्धतीने करण्याचे प्रेषित सल्ल. यांचे निर्देश आहेत. लग्नानंतर मुलीचे नाव बदलले जात नाही. मरेपर्यंत तिच्या नावाच्या पुढे तिच्या वडिलाचेच नाव असते. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले जात नाही. (ज्या विवाहित मुस्लिम महिला लच्छा/गलसर घालतात ती मंगळसूत्राचीच नक्कल असते.) आई आणि वडिल दोघांच्याही संपत्तीत तिचा वारसा हक्क अबाधित असतो. म्हणून अनेक मुस्लिम लोक मुलीच्या निकाहमध्ये भरपूर खर्च करून तिला वारसाहक्कापासून वंचित करण्याचा डाव खेळतात. हा एकप्रकारे शरियतचा अपमान आहे.
एकदा असे झाले की, नव्याने इस्लाममध्ये प्रवेश केलेल्या व जहालती (अडानीपणा)चे काही संस्कार शिल्लक असलेल्या बदू (ग्रामीण) लोकांमध्ये कोणाचा कबिला श्रेष्ठ? यावर चर्चा सुरू झाली. प्रत्येकजण आपलाच कबिला श्रेष्ठ असल्याचा दावा करीत होता. प्रकरण हमरीतुमरीवर पोहोचताना पाहून एका वृद्ध बदुने सर्वांना शांत राहण्याची विनंती करून आवाहन केले की, आपण सर्वजण प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचेकडे जावून त्यांनाच विचारू की आपल्यापैकी कोणाचा कबिला श्रेष्ठ? ते आपल्या सगळ्यांनाच ओळखतात. ते जे निर्णय देतील ते आपण मान्य करू. यावर सर्वांचे एकमत झाले आणि सर्वजण प्रेषित सल्ल. यांच्या समोर हजर झाले. वृद्ध बदुने म्हटले की, ”हे प्रेषित! आपल्यावर आमचे आई-वडिल कुर्बान, आम्हाला एका प्रश्‍नाचे उत्तर हवे आहे की, आमच्यापैकी कोणाचा कबिला श्रेष्ठ आहे?” प्रेषित सल्ल. यांनी स्मित करून उत्तर दिले की, ”तुमच्यापैकी ज्यांच्या कबिल्यामध्ये निकाह जितका सोपा व व्याभिचार जितका अशक्य आहे तो कबिला तेवढा श्रेष्ठ.” यावरून सुद्धा निकाह सोपा करण्याच्या आवश्यकतेवरच भर दिलेला आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
दहेजचे दुष्परिणाम
दहेजमुळे लग्न महाग होतात व गरीबांच्या मुलींचे लग्न होणे अवघड होवून जाते. खर्च वाढल्यामुळे त्याची जमवाजमव करताना वेळ जातो व उपवर मुला-मुलींचे वेळेवर लग्न होत नसल्यामुळे त्यांचा व्याभिचाराकडे वळण्याचा धोका असतो. व्याजाने रकम उचलून ऐपत नसताना खर्चीक लग्ने करून अनेक परिवार देशोधडीला लागलेले आहेत. लग्न महाग झाल्याने मुलींचे वडील भ्रष्ट मार्गाने कमाई करण्यासाठी बाध्य होतात. आज अशी परिस्थिती आहे की, मुस्लिम समाजातील प्रत्येक बाप आपल्या मुलींचे व प्रत्येक भाऊ आपल्या बहिणींचे थाटा-माटात लग्न करण्यासाठीच जणू कमावितो आहे. कुठल्याही मुस्लिम बहूल भागामध्ये ’भव्य शादीखाने’ आपले लक्ष वेधून घेतात. याउलट हिंदू बहूल भागामध्ये, ”भव्य खाजगी शिक्षण संस्था लक्ष वेधून घेतात.” लग्न महाग झाल्याने, मुलींचे लग्न होत नसल्याने अनेक ठिकाणी मुलांची लग्नेही खोळंबून ठेवली जातात. लग्न महाग झाल्यामुळे मुलगी जन्मली की काळीज धस्स करते. म्हणून अलिकडे मुस्लिमामध्ये सुद्धा कन्याभ्रूण हत्येची प्रवृत्ती वाढीस लागल्याची चाहूल लागलेली आहे. हा सगळा अनर्थ निकाह महाग केल्यामुळे होत आहे.
अलिकडे काही उलेमा आणि धार्मिक जमातींद्वारा मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या गेल्यामुळे सरळ हुंडा/ दहेज  मागण्याचे प्रकार कमी झालेले आहेत. मात्र जेथे, ”न मागताच” या गोष्टी मिळू शकतील. अशाच घराण्यामधील मुलींसाठी निकाहचे प्रस्ताव पाठविण्याची पद्धत रूढ झालेली आहे. याचा सरळ फटका गरीब आणि मध्यवर्गीय विशेष करून ज्यांना ज्यास्त मुली आहेत, अशा लोकांना बसत आहे. मुली पाहून नकार कळविण्यापेक्षा जेथे काही मिळण्याची शक्यता नाही तिथे जाणेच टाळले जात असल्याने अनेक परिवारांमध्ये 35 ते 40 वर्षाच्या व्हर्जीन (कुमारी) मुलींची संख्या समाजात भयावह पद्धतीने वाढत आहे. बर्‍याच ठिकाणी इज्तेमामध्ये साध्या पद्धतीने लग्न करून बिदाईच्या वेळी पुन्हा भव्य सोहळा आयोजित करून लाखोंचा खर्च केला जात आहे. काही ठिकाणी तर निकाह साधेपणाने मस्जिदीमध्ये पण बाकीचा सोहळा फंक्शन हॉलमध्ये यथोचित स्वरूपात पार पाडल्या जात आहे.
अल मारूफ अल मशरूत
अरबीमध्ये एक म्हण आहे, ’अल मारूफ अल मशरूत’ अर्थात जी गोष्ट आज समाजात प्रचलित होते काही काळानंतर ती अनिवार्य बणून जाते. हुंडा, दहेज, निकाहचे जेवण देणे ह्या गोष्टी अशाच मारूफ (प्रचलित) मधून मशरूत (अनिवार्य) प्रथा बनलेल्या आहेत. यामुळेच निकाह महाग झालेला आहे.
तोंडाने मागायचे नाही पण मनात आशा ठेवायची, अशी दुटप्पी भूमिका बरेचजण घेताना दिसतात.” हमें तो कुछ नहीं चाहिए आप अपनी खुशीसे जो देना है सो दें.” किंवा ” हमारे पास तो अल्लाह का दिया सबकुछ है, जो भी देना है आप अपनी बेटी को दीजिए” सारख्या सभ्य शब्दात आजकाल भीक मागितली जात असून, ’एक दूसरे को तोहफे देने में आखिर हर्ज ही क्या है’, असे म्हणून या भीकेचे समर्थन केले जात आहे. हे इस्लामच्या आत्म्याच्या विरूद्ध आहे.
मौलाना मौदूदी रहे. म्हणतात, ”एक मुसलमान की हैसियत से आप देखें तो, अखलाक की पस्ती के साथ हम सीरे से किसी इस्लामी जिंदगीका तसव्वुरही नहीं कर सकते. मुसलमान को तो मुसलमान बनायाही इसलिए गया है के, उसकी जात से दुनिया में भलाई कायम हो और बुराई मिटे. भलाई को मिटाना और बुराई को फैलाना और उसके साथ मुसलमान भी होना ये दर हकीकत एक खुला हुआ तनाखुज (विरोधाभास) है. एक शख्स मुसलमान हो और फिर भी उसके शरसे दूसरे बंदगाने खुदा महेफूज न हो, एक शख्स मुसलमान हो और फिर भी उसपर किसी मामले में ऐतेमाद न किया जात सके, एक शख्स मुसलमान हो और फिर भी वो नेकी से भागे और बदी की तरफ लपके, हराम खाये और हराम तरीके से अपनी ख्वाहिशें पूरी करे, तो आखिर उसके मुसलमान होने का फायदा क्या है? किसी मुआशरे (समाज) की इससे बढकर कोई जिल्लत नहीं हो सकती के वो इन्साफ से खाली और जुल्म से लबरेज होता चला जाए. उसमें रोज बरोज भलाईयाँ दबती और बुराई फरोग पाती चली जाएं और उसके अंदर दियानत, अमानत और शराफत के लिए फलने फुलने के मौके कमसे कमतर होते चले जाएं. ये खुदा के गजब को दावत देनेवाली हालत है. अगर किसी मुस्लिम मुआशरे की ये हालत हो जाए तो उसके मानी ये हैं के वो इस्लाम के रूह से खाली हो चुका है. सिर्फ इस्लाम का नाम ही उसमें बाकी रहे गया है और ये नाम भी अब सिर्फ इसलिए रहे गया है के दुनिया को इस दीन-ए-हक से दूर भगाता रहे.’ (संदर्भ ः तामीरे अख्लाक क्यूं और कैसे पेज क्र. 3-4).
मुस्लिम युवकांची जबाबदारी
वो फरेब खुर्दा शाहीं जो पला हो किरगीसों में
उसे क्या खबर के क्या है रहवेरस्मे शाहबाजी
मुस्लिम तरूणांना माझे आवाहन आहे की, ” ऐ शाहीनों! अपने अल्लाह पर भरोसा रख्खो, अपनी मनगट की ताकत पर भरोसा रख्खो, दुल्हन आयेगी तो उसके कदमों से बरकत भी आयेगी, हे भीक मागायचे प्रकार सोडून द्या. हा तुमच्या पुरूषार्थाचा अपमान आहे. मित्रांनों! परिश्रमाला पर्याय नाही. देअर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. मन लावून मेहनत करा, सजद्यामध्ये जावून मदद मागा, नैतिक मार्गाने पैसे कमाविण्याचा प्रयत्न करा, इस्लामी नितीमत्तेचे प्रदर्शन करा, विश्‍वास ठेवा आज समाजामध्ये भरोसा ठेवण्यालायक लोकांची संख्या फार कमी झालेली आहे. तुम्ही ही जागा भरू शकता. अनैतिकतेमध्ये ग्रासलेल्या या भांडवलशाही लोकशाही व्यवस्थेमध्ये नितीमान व प्रामाणिक व्यावसाय करणार्‍यांना भरपूर मागणी आहे. ती मागणी तुम्ही पूर्ण करू शकता. लक्षात ठेवा! प्रामाणिक नागरिकांची देशाला आपुर्ती करण्यापेक्षा मोठी देशसेवा दूसरी नाही आणि प्रामाणिक नागरिक बनविण्याचा हमखास यशस्वी मार्ग शरियत आहे. आज शपथ घ्या की मी हुंडा मागणार नाही, दहेज घेणार नाही, साधेपणाने मस्जिदीमध्ये निकाह करणार, फुकटाचे निकाहचे जेवण करणार नाही, साध्यापद्धतीने निकाह करून पुरूषार्थ सिद्ध करण्याची संधी कदापि सोडू नका, मग पहा पत्नीकडून व सासरवाडीकडून तुम्हाला नायकासारखा सन्मान मिळेल.
अलिकडे अशी लग्ने होत आहेत. ही संतोषजनक बाब आहे. जमाअते इस्लामी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांच्या मुलीचे नुकतेच लग्न अगदी साध्या पद्धतीने मस्जिदे महेबूबिया लातूर येथे झाले. तसेच जमातचे सदस्य अशफाक अहेमद यांच्या मुलीचेही लग्न मस्जिदे मुहम्मदिया लातूर येथे अगदी साधेपणे झाले. मात्र अशा प्रकारचे निकाह करण्याची एक व्यापक चळवळ सुर व्हायला हवी. इतकी की इतर समाजांनी आपले अनुकरण करण्यास प्रवृत्त व्हावे. अल्लाह आपल्या सर्वांना निकाह सोप्या पद्धतीने करण्याची तौफिक अता करो. (आमीन.)

– एम आय. शेख
www.naiummid.com
           

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *