Home A स्त्री आणि इस्लाम A ज्ञान-प्रतिष्ठा

ज्ञान-प्रतिष्ठा

इस्लामने धार्मिक ज्ञानाची मोठी महत्ता वर्णिली आहे. ते शिकणे व शिकवण्याची खूप प्रेरणा दिली आहे आणि त्याला हर प्रकारे प्रोत्साहन ही दिले आहे. त्याचा परिणाम असा झाला की, लवकरच धार्मिक ज्ञानाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आणि फार मोठे ज्ञानी व्यक्ती उठून समोर आले. त्यात पुरुषही होते व स्त्रियासुद्धा होत्या. येथे काही विशेष महत्त्वाच्या महिलांचा उल्लेख केला जात आहे.
महिला सहाबी (प्रेषितांचे सोबती) मध्ये माननीय आयेशा (र) यांचे ज्ञानविषयक सर्वोच्च स्थान आहे. काही मोजक्याच पुरुष सहाबींना हे स्थान प्राप्त होते. त्यांच्या ज्ञान-प्रतिष्ठा व दूरदर्शितेचे श्रेष्ठत्व त्या काळातील विद्वानांनी मान्य केले आहे. त्यांचे खास शिष्य व भाचे उर्वा बिन जुबैर म्हणतात,
‘‘मी माननीय आयेशा (र) यांच्या सान्निध्यात राहिलो. मला त्यांच्यापेक्षा जास्त कुरआन आयती उतरण्याची पार्श्वभूमि समजणारा अनिवार्य बाबी (फराईज), सुन्नत (हदीस), काव्य व साहित्य, अरबस्तानचा इतिहास आणि टोळ्यांच्या वंशावळ्या वगैरे आणि खटल्यांचे निकाल, येथपावेतो की वैद्यकीय ज्ञान असणारा कोणताही अन्य पाहिला नाही.’’
ते म्हणतात, मी विचारले, ‘‘मावशी ! आपण वैद्यकीय ज्ञान कसे घेतले ?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘जेव्हा कधी मी अथवा एखादी दुसरी व्यक्ती आजारी पडत असे, तेव्हा त्यावरील उपचार सांगितला जात असे. त्याचप्रमाणे लोक एक दुसऱ्याला उपचार सांगत असत आणि मी ते स्मरणात ठेवीत असे.’’ (सियरु आलामिन्नबलाइ – २ : १२८-१२९)
इमाम जुहरी म्हणतात,
‘‘जर सर्व लोकांचे ज्ञान एकत्र केले गेले आणि मग प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पवित्र पत्नींच्या ज्ञानाची त्यात भर घातली गेली, तरीसुद्धा माननीय आयेशा (र) यांचे ज्ञान अधिक व्यापक ठरेल.’’ (मुस्तदररक, हाकिम – ४ : ११)
अता बिन अबी रिबाह (र) म्हणतात –
‘‘माननीय आयेशा (र) लोकांत सर्वांत मोठ्या धर्म-शास्त्री, सर्वाधिक ज्ञानी आणि सर्वसामान्य लोकांसाठी सर्वांत चांगले मत ठेवणाऱ्या होत्या.’’ (मुस्तरक हाकिम – ४ : १५)
इमाम जहबी म्हणतात –
‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांच्या अनुयायांमध्ये एवढेच नव्हे तर सर्वच स्त्रियांमध्ये त्यांच्याइतके अधिक ज्ञान असणारी स्त्री मला माहीत नाही.’’ (सियरू आलामिन्नुबलाइ – २ : १०१)
ज्या सहाबींनी सर्वांत जास्त प्रेषित मुहम्मद (स) यांच्या हदीस (वचने) चे कथन कले आहे, त्यात माननीय आयेशा (र) यांचीसुद्धा गणना होते. ही हदीस वचने त्यांनी प्रत्यक्षपणे प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडून उध्दृत केली आहेत. काही हदीस वचने माननीय अबू बकर (र), उमर (र), फातिमा (र), साद बिन अबी वक्कास (र), हमजा बिन अमरुलअस्लमी (र), जुजामा बिन्ते वहब (र) यांच्याकडूनसुद्धा ऐकून कथन केली आहेत. त्यांनी कथन केलेल्या हदीसची एकूण संख्या २२१० आहे. यांच्यापैकी १७४ हदीस ‘मुताफक अलैहि’ आहेत. म्हणजे बुखारी व मुस्लिम या हदीसच्या दोन्ही ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. त्याशिवाय ५४ हदीस बुखारीमध्ये व ६९ मुस्लिममध्ये उल्लेखित आहेत. उरलेल्या अनेक हदीस अन्य हदीसच्या ग्रंथांत आहेत. (सियरू आलामिन्नुबलाइ – २ : १०१)
उम्मुलमोमिनीन माननीय उम्मे सलमा (र) यांनीसुद्धा अनेक हदीसी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडून सरळसरळ व काही हदीस माननीय अबू सलमा (र) आणि फातिमा (र) यांच्याकडून परोक्ष रूपाने कथन केल्या आहेत आणि ३५ पेक्षा अधिक सहाबी व ताबईन (सहाबींचे शिष्य) यांनी (ज्यात पुरुष व स्त्रिया दोन्ही सामील आहेत.) त्यांच्याकडून हदीसींचे कथन केले आहे. (तहजीबुत्तहजीब – १२ : ४५६)
त्यांनी कथन केलेल्या हदीसींची संख्या ३७८ आहे. त्यातील १३ कथने बुखारी व मुस्लिम दोन्हींमध्ये आहेत. त्याशिवाय ३ बुखारी आणि १३ मुस्लिमग्रंथातमध्ये आढळतात. (सियरु आलामिन्नबलाइ – २ : १४३)
माननीय उम्मे सलमा (र) यांचे धर्मशास्त्रात विशेष स्थान होते. इमाम जहबी (र) म्हणतात –
‘‘सहाबींमध्ये जे धर्मशास्त्रपंडित होते, त्यांत यांची गणना होत होती.’’ (सियरु आलामिन्नबलाइ – २ : १४३)
उम्मुलमोमिनीन माननीय हफ्सा (र) या माननीय उमर (र) यांच्या सुपुत्री होत्या. त्यांनी प्रेषित मुहम्मद (स) व माननीय उमर (र) यांच्याकडून हदीसचे कथन केले आहे. त्यांच्याकडून हदीसचे कथन करणाऱ्यांपैकी त्यांचे बंधु माननीय अब्दुल्लाह बिन उमर (र) त्यांचे सुपुत्र हमजा, त्यांच्या पत्नी सफया, उम्मे बिशरल अन्सारिया, मुत्तलिब बिन विदाआह, हारिसा बिन वहब वगैरे १२ पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश आहे. (तहजीबुत्तहजीब – १२ : ४११)
माननीय हफ्सा (र) यांनी ६० हदीसींचे कथन केले आहे. त्यांच्यापैकी ४ हदीस बुखारी व मुस्लिम या दोन्ही ग्रंथांत व ६ हदीस केवळ मुस्लिममध्ये उध्दृत आहेत. (सियरु आलामिन्नबलाइ – २ : १६४)
उम्मुलमोमिनीन उम्मे हबीबा (र) या माननीय अबू सुफियान (र) यांच्या कन्या होत. त्यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडून ६५ हदीसींचे कथन केले आहे. त्यांच्यापैकी २ बुखारी व मुस्लिम या दोन्हींत समाविष्ट आहेत. एक मुस्लिममध्ये उध्दृत आहे. त्यांच्याकडून त्यांची कन्या हबीबा (र), त्यांचे बंधु माननीय मुआविया (र), त्यांचे पुतणे अब्दुल्लाह बिन उत्बा, उर्वा बिन जुबैर, सफिया बिन्ते शैबा व जैनब बिन्ते अबू सलमा वगैरेंनी हदीसने कथन केले आहे. (सियरु आलामिन्नबलाइ – २ : १५५, तहजीबुत्तहजीब – १२ : ४१९)
माननीय अस्मा (र) माननीय अबू बकर (र) यांच्या सुकन्या आणि माननीय जुबैर (र) यांच्या धर्मपत्नी होत्या. त्यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडून अनेक हदीसींचे कथन केले आहे. त्यांच्याकडून ज्या सहाबी व सहाबींच्या अनुयायीनीही हदीसी दुसऱ्या लोकांपर्यंत पोचविल्या आहेत. त्यांच्यापैकी काहींची नावे अशी आहेत. त्यांचे चिरंजीव अब्दुल्लाह बिन जुबैर (र) त्यांचे पुत्र अब्दुल्लाह बिन उर्वा, इबाद बिन अब्दुल्लाह, माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र), सफिया बिन्ते शैबा, फातिमा बिन्ते मुंजिर, त्यांनी मुक्त केलेले गुलाम अब्दुल्लाह बिन, कैसान, त्यांचे पूत्र उब्बाद बिन हमजा वगैरे. (सियरु आलामिन्नबलाइ – २ : २०८)
त्यांनी कथन केलेल्या हदीसींची संख्या ५८ आहे. त्यांच्यापैकी १३ बुखारी व मुस्लिम दोन्हींमध्ये आहेत. याव्यतिरिक्त केवळ बुखारीत ५ आणि मुस्लिममध्ये ४ हदीसी आहेत. (सियरु आलामिन्नबलाइ – २ : २१४)
खौला बिन्ते हकीम (र) यांच्यासंबंधी अल्लामा इब्ने अब्दुलबर्र म्हणतात –
‘‘त्या एक सदाचारी आणि विद्वान महिला होत्या.’’ (अल-इस्ती आब – ४ ‘ २९०)
माननीय उमर बिन अब्दुल अजीज (र) त्यांच्याकडून एका हदीसचे कथन करतात –
‘‘खौला बिन्ते हकीम ज्या एक सदाचारी महिला होत्या त्यांनी म्हटले आहे.’’ (तिर्मिजी (अबवाबुल बिर्रिवस्सिला))
यावरून स्पष्ट होते की त्यांचा सदाचार व ज्ञान-प्रतिष्ठा सर्वमान्य होती.
माननीय उस्मान (र) यांनी आपल्या खिलाफतच्या काळात एका महिला सहाबींच्या कथनांच्या आधारे एका प्रश्नावर निर्णय दिला.
जैनब बिन्ते कअब बिन अजिरा म्हणतात की, माननीय अबू सईद खुदरी (र) यांच्या भगिनी फरीआ बिन्ते मालिक (र) यांनी त्यांना सांगितले की, ‘‘माझ्या पतीच्या निधनानंतर मी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे गेले आणि म्हणाले की, मला माझ्या कुटुंबियात इद्दत (म्हणजे पतीच्या निधनानंतर ४ महिने १० दिवस शोक पाळण्याची मुदत. या मुदतीत दुसरा विवाह करणे अवैध आहे.) घालविण्याची परवानगी देण्यात यावी. कारण की पतीचे स्वतःचे घर नव्हते.’’ परंतु प्रेषित मुहम्मद (स) यांनी असे असूनदेखील आदेश दिला की, ‘‘जेथे तुम्हाला आपल्या पतीच्या निधनाची बातमी मिळाली आहे, तेथेच इद्दतचा काळ व्यतीत करा.’’ माननीय उस्मान (र) यांच्या खिलाफत-काळात हाच प्रश्न समोर आला, तेव्हा लोकांनी त्यांच्यासमोर माझ्या या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी मला बोलविले. मी तेथे पोचले तेव्हा ते काही लोकांत बसले होते. त्यांनी माझ्याकडून ती घटना जाणून घेतली. जेव्हा मी घटना सांगितली, तेव्हा त्यांनी ज्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता, तिला कळविले की, तिने इद्दतचा काळ त्याच ठिकाणी पुरा करावा जेथे तिला आपल्या पतीच्या निधनाची बातमी मिळाली आहे. (अबु दाऊद (किताबुत्तलाक), तपशीलासाठी पाहा तबकात इब्ने साद – ८ : ३६७)
कोणत्याही काळातील ज्ञानविषयक व चितनात्मक स्थितीची खरी कल्पना येण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तीबरोबरच अप्रसिद्ध व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणेसुद्धा आवश्यक आहे. यावरूनच त्या काळाचे खरे चित्र समोर येऊ शकते. यासंबंधीच्या एक-दोन घटना खाली दिल्या जात आहेत.
माननीय उम्मे वरकासंबंधी उल्लेख आहे की, त्यांनी पवित्र कुरआन एकत्रित केला होता. अन्य एका कथनात उल्लेख आहे की, त्यांनी पवित्र कुरआनचे शिक्षण घेतले होते.
प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना सांगितले होते की, त्यांनी आपल्या कुटूंबियांचे नमाजमध्ये नेतृत्व (इमामत) करावे. त्यांच्यासाठी एका मुअज्जिन (अजान देणारा बांगी) ची सुद्धा नेमणूक केली होती. (तबकात इब्ने साद – ८ : ४५७, अल इसाबाफी तमईजिस्सहाबा – ४ : ५०५.)
प्रेषित मुहम्मद (स) यांनी एका वृद्ध महिलेला सांगितले की, ‘‘कोणतीही म्हातारी स्वर्गात जाणार नाही.’’ तिने प्रश्न केला, ‘‘का बरे जाणार नाही ?’’ माननीय अनस (र) म्हणतात की, त्या म्हातारीने कुरआनचे शिक्षण घेतले होते (म्हणून) प्रेषित मुहम्मद (स) यांनी तिला सांगितले,
‘‘तुम्ही कुरआनचे पठन करीत नाही का ? अल्लाहने त्यात सांगितले आहे. की, ‘आम्ही त्या स्त्रियांना विशेष उत्थापनावर जन्म दिला आहे आणि त्यांना कुमारिका बनविले आहे.’ अर्थात – या म्हाताऱ्या स्त्रिया तरुण होऊन स्वर्गात जातील.’’ (मिश्कातुल मसाबीह (किताबुल आदाब, रजीनच्या प्रमाणाने))
प्रेषित मुहम्मद (स) यांनी माननीय अली (र) यांना राहता नामक दासी प्रदान केली होती. असे कथन आहे की, माननीय अली (र) यांनी तिला कुरआनचे अल्पसे शिक्षण दिले होते. (असादुल गाबा – ५, अल इसाबा फी तमईजिस्सहाबा – ४ : २९९)
आता आम्ही सहाबींच्या शिष्यांच्या काळातील काही महिलांचा उल्लेख करू, ज्यांचे ज्ञान-प्रतिष्ठेत आपले विशेष स्थान होते.

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *