‘‘लोकहो! जर तुम्हाला मरणोत्तर जीवनासंबंधी काही शंका असेल तर तुम्हाला माहीत असले पाहिजे की आम्ही (अल्लाह) तुम्हाला मातीपासून निर्मिले आहे. मग वीर्यापासून मग रक्ताच्या गुठळीपासून, मग माणसांच्या आकारयुक्त व आकारहीन तुकड्यांपासून, जेणेकरून तुमच्यावर सत्य स्पष्ट करावे. आम्ही ज्या (वीर्या)ला इच्छितो एका विशिष्ट कालावधीपर्यंत गर्भाशयात थांबवून ठेवतो. मग तुम्हाला एका अर्भकाच्या रूपात काढून आणतो. (मग तुमचे संगोपन करतो) जेणेकरून तुम्ही आपले तारुण्य गाठावे. आणि तुमच्यापैकी कोणी अगोदरच परत बोलविला जातो आणि कोणी निकृष्टतम वयाकडे परतविला जातो, जेणेकरून सर्व काही जाणून घेतल्यानंतर मग काहीही न कळण्याची अवस्था प्राप्त होते. आणि तुम्ही पाहता की जमीन कोरडी पडली आहे. मग ज्या क्षणी आम्ही तिच्यावर पाऊस पाडला तेव्हा ती अकस्मात तरारून गेली. फुलली आणि तिने सर्व प्रकारच्या नयनरम्य वनस्पती उगविण्यास प्रारंभ केला. हे सर्व काही या कारणामुळे आहे की अल्लाहच सत्य आहे आणि तो मृतांना जीवित करतो व तो सर्व गोष्टींवर प्रभुत्व राखतो. आणि हे सर्व (या गोष्टीचे प्रमाण आहे) की पुनरुत्थानाची घटका आल्याशिवाय राहाणार नाही. यामध्ये कोणत्याही शंकेला वाव नाही. आणि अल्लाह अवश्य त्या लोकांना उठविल जे कबरीमध्ये पोहोचलेले आहेत.’’ (दिव्य कुरआन, २२:५-७)
दिव्य कुरआनच्या उपरोक्त आयातींमध्ये अतिशय स्पष्टपणे मानवी जीवनाचा जन्म, मृत्यू, पुनरुत्थानासंबंधी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रत्येक मनुष्य त्या तत्त्वांपासून जन्मतो, जे सर्वच्या सर्व जमिनीतून प्राप्त होतात आणि या संरचनेचा आरंभ वीर्याने होतो. मानवजातीचा आरंभ ह. आदम (अ.) यांच्यापासून केला गेला, जे प्रत्यक्ष मातीपासून बनविले गेले होते. नंतर मानवजातीचा वंश वीर्यापासून चालत राहिला. म्हणजे सर्वप्रथम अल्लाहने मनुष्याला (आदम अ.) प्रत्यक्ष निर्मितीकार्याद्वारे निर्माण केले. यानंतर मनुष्यामध्येच खुद्द (मनुष्याला) निर्माण करण्याचे सामर्थ्य ठेवले जेणेकरून त्याच्या वीर्यापासून त्याच्यासारखीच माणसं निर्माण होत जावीत. धरतीच्या तत्त्वांना एकत्रित करून सृजनशील एका आदेशाने अल्लाहने त्यात अशी चेतना, जीवन व बुद्धीमत्ता निर्माण केली ज्यामुळे मनुष्यासारखी एक अद्भूत निर्मिती अस्तित्वात आली. या व्यवस्थेला व कार्यक्षमतेला पाहून बुद्धी चकीत होते. डार्विनच्या काळापासून वैज्ञानिक याकडे मोठ्या घृणास्पदरित्या अवैज्ञानिक दृष्टिकोन समजून दुर्लक्ष करतात. मनुष्य व सर्व सजीवांच्या निर्मितीपासून जीवनाच्या प्रथम जीवाणूच्या प्रत्यक्ष सृजनापासूनही ही मंडळी नकारात्मक भूमिका घेऊच शकत नाही. या प्रथम सृजनस्थितीला मान्य केले नाही तर मग अत्यंत निरर्थक गोष्टीला मान्य करावे लागेल की जीवनाची सुरूवातसुद्धा एक आघात आहे. फक्त एक कोशिकाधारी प्राण्यात जीवनाची सर्वांत सोपी स्थितीसुद्धा अत्यंत गुंतागुंतीची आणि नाजूक आहे. याला आघात समजणे तर अत्यंत भयानक असा अवैज्ञानिक दृष्टिकोन आहे. जर मनुष्याने मान्य केले की जीवनाचा सर्वप्रथम किटाणू प्रत्यक्ष सृजन प्रक्रियेने अस्तित्वात आला आहे, तेव्हा हे मान्य करणे स्वाभाविक ठरते की प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांचा सर्वप्रथम प्राणी निर्माणकर्त्याच्या (अल्लाहच्या) सृजनकार्यापासूनच निर्माण झालेला आहे. नंतर त्याची वंशवृद्धी वेगवेगळ्या रूपात होऊ लागली. याला मान्य केल्याने त्या अनेक समस्यांची उकल होते जे डार्विनचे समर्थक करूच शकत नाहीत.
‘तुमच्यापैकी कोणी निकृष्टतम वयाकडे परतविला जातो.’ म्हणजे म्हातारपणातील ती व्यवस्था ज्या वेळी मनुष्याला आपल्या शरीराविषयीची सुध (चेतना) नसते. तोच मनुष्य जो दुसऱ्यांना बुद्धीचे धडे शिकवत होता, म्हातारा होऊन अशा दशेला पोहचतो की मुलंसुद्धा त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतात व हसतात.
‘अल्लाह अवश्य त्या लोकांना उठविल जे कबरीमध्ये पोहोचलेले आहेत.’ या आयतीमध्ये मनुष्यजन्माच्या विभिन्न अवस्था- धरतीवर पावसाचा प्रभाव व वनस्पतीच्या उगविण्यास पाच सत्यांना (तत्त्वांना) प्रमाणित करणारे दाखविले आहेत.
(१) अल्लाह एकमात्र सत्य आहे.
(२) अल्लाह मृतांना जिवंत करतो.
(३) अल्लाह प्रत्येक गोष्टीवर सामर्थ्य राखून आहे.
(४) पुनरुत्थान (कयामत) ची घटका येऊन ठेपणारच आहे आणि
(५) अल्लाह त्या सर्वांना जिवंत करेल जे लोक मृत झाले आहेत.
संपूर्ण सृष्टी व्यवस्थेला सोडून मनुष्याने केवळ आपल्याच जन्माचा विचार केला तर कळून येते की मनुष्याच्या अस्तित्वात अल्लाहच्या अनेक निशाण्या व्यावहार्यता कार्यरत आहेत. मनुष्य जे जेवतो त्यात कुठेच मानवी बीज नसते. हे भोजन शरीरात जाऊन मांस, हाडं, केस आदि बनविले जाते. एका विशिष्ट स्थानावर जाऊन त्याचे वीर्यात रूपांतर होते, ज्यात मनुष्याला जन्माला घालण्याची क्षमता असलेले बीजांड असतात. या बीजांडाचे वैशिष्ट्य म्हणजे एका वेळी पुरुषापासून जितके वीर्य बाहेर पडते, त्याच्यात अनेक करोड बीजांड स्त्री अंडाणुशी संयोग होऊन मनुष्य जन्म होण्याची क्षमता ठेवतात. परंतु सृष्टीनिर्माता अल्लाह महान तत्त्वदर्शी शासकाचा हा निर्णय आहे की या अगणित बीजांडातून फक्त एकाच बीडांचाला स्त्री-अंडाणुशी मिलनाची परवानगी देतो आणि गर्भाधारणा होते.
‘‘आणि त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा उत्पन्न केली. निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.’’ (दिव्य कुरआन, ३०:२१)
निर्माणकर्त्या अल्लाहच्या तत्त्वर्शितेची क्षमता ही आहे की त्याने मानवाच्या एका जातीचे रूप बनविले नाही तर त्यास दोन लिंगांमध्ये (स्त्री-पुरुष) निर्माण केले, जे मानवतेत समान आहेत. त्यांच्या निर्मितीचे मूळ एकच आहे, परंतु दोन्ही एकदुसऱ्यांपासून भिन्न शारीरिक बनावट, भिन्न मानसिक व मनोवैज्ञानिक वैशिष्ट्ये तसेच भिन्न भावन व इच्छा देऊन निर्माण केले आहे. ही सर्व वैशिष्ट्ये आणि इच्छा एकमेकांसाठी पूरक आहेत. ‘‘अल्लाह, पृथ्वी व आकाशांच्या राज्याचा मालक आहे. जे काही इच्छितो निर्माण करतो. ज्याला इच्छितो त्याला मुली देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले व मुली दोन्ही देतो. आणि ज्याला इच्छितो त्याला अपत्यहीन बनवितो. तो सर्व काही जाणतो आणि प्रत्येक गोष्टीवर समर्थ आहे.’’ (कुरआन, ४२:४९-५०)
हे अल्लाहच्या बादशाहीचे निर्बाध्य होण्याचे स्पष्ट प्रमाण आहे. एखादा मनुष्य मग तो जगातील मोठ्यात मोठा सत्ताधिकारी वा आध्यात्मिक महागुरू असेल, तो दुसऱ्यांना संतती देणे तर दूरचे स्वत:साठी आपल्या इच्छेनुसार संतान जन्माला घालू शकत नाही. ज्यास अल्लाहने निपुत्रिक बनविले, त्यास एखाद्या औषधामुळे किंवा ताईतगंड्यामुळे संततीवाला बनवू शकत नाही. याविषयी प्रत्येक जण विवश आहे. हे सर्व पाहूनसुद्धा कोणी ईशत्वात सर्वाधिकार होण्याचा गुमान करीत असेल किंवा दुसऱ्यांना ईशत्वाच्या अधिकारात भागीदार बनवित असेल तर ती त्याचीच नादानी आहे, याची शिक्षा तो स्वत: भोगेल.
मानवी जन्माचा उद्देश-
‘‘आम्ही मानवाला एका मिश्र वीर्यापासून निर्माण केले, जेणेकरून त्याची परीक्षा घ्यावी आणि यासाठी त्याला ऐकणारा व पाहाणारा बनविला. आम्ही त्याला मार्ग दाखविला, मग त्याने कृतज्ञ बनावे अथवा द्रोह करणारा.’’ (दिव्य कुरआन, ७६:२-३)
एक मिश्रित वीर्य म्हणजे स्त्री-पुरुष दोघांच्या वीर्याचे मिश्रण होय. माणसाची जगात परीक्षा घेण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली. ती परीक्षा म्हणजे मानव कोणती जीवनपद्धती स्वीकारतो, निर्माणकर्त्याचे आज्ञापालन व सदाचारी की अवज्ञा व दुराचारी जीवनपद्धत?
‘त्याला ऐकणारा व पाहाणारा बनविले’ म्हणजे विचार करणारा बनविले. ‘मग त्याने कृतज्ञ बनावे अथवा द्रोह करणारा’ म्हणजे त्याने ईशपरायण बनावे अथवा ईश्वराला नाकारणारा याचा त्याला पूर्ण अधिकार देण्यात आला. त्यासाठी तो स्वत: जबाबदार राहील. ‘आम्ही त्याला मार्ग दाखविला’ म्हणजे मार्गदर्शनाची एकच पद्धत नव्हे, तर अनेक पद्धती आहेत. उदाहरणार्थ- प्रत्येक मानवाला ज्ञान, बुद्धीक्षमता, स्वभाव, नैतिक चेतना, अंतरात्मा या सर्व गोष्टी मानवाला निर्माणकर्त्याने दिलेल्या आहेत. त्याद्वारे तो बरे-वाईट, सत्य-असत्य, योग्य- अयोग्य याबाबत निर्णय स्वत: घेऊ शकतो. जगात अगणित घटना अशा घडतात ज्या सिद्ध करतात की एक सर्वोच्च सत्ता त्याच्यावर व संपूर्ण सृष्टीवर शासन करीत आहे. याचप्रमाणे मनुष्याच्या स्वभावातदेखील त्या सर्वोच्च शासनाच्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत. ‘‘त्याने मृत्यू आणि जीवन निर्माण केले, जेणेकरून तुम्हा लोकांना आजमावून पाहावे की कोण अधिक
चांगले कृत्य करणारा आहे.’’ (कुरआन, ६७:२)
म्हणजे या जगात मनुष्याच्या मरण्याचा व जगण्याचा क्रम अल्लाहने त्याची परीक्षा घेण्यासाठी सुरू ठेवला आहे आणि कोणाचे कार्य उत्तम आहे हे पाहावे. या एका लहानशा वाक्यात अनेक तत्त्वांकडे इशारा करण्यात आला आहे. मृत्यू व जीवन त्याच्याच (अल्लाहच्या) हातात आहे. दुसरा कोणी जीवन प्रदान करणारा नाही की मृत्यू देणारा नाही. मनुष्यजीवन निरुद्देश नाही, तसेच मृत्यूही निरुद्देश नाही. जीवन त्याच्यासाठी परीक्षेची संधी आहे, मृत्यू म्हणजे परीक्षेची वेळ संपणे आहे. परीक्षेच्या उद्देशाने अल्लाहने प्रत्येक मनुष्यास कर्म करण्याची सवलत दिली जेणेकरून मनुष्याने स्वत:चे भले वा वाईट करावे. ज्याचे जसे कर्म असेल त्यानुसार त्याला पारलौकिक जीवनात मोबदला दिला जाईल. मोबदला नसेल तर मूलत: परीक्षा घेण्याला
काहीच अर्थ उरत नाही.
‘‘मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केले नाही त्यांनी माझी भक्ती करावी.’’ (कुरआन, ५१:५६)
वरील विवेचनावरून एक बोध मिळतो की मानवी जीवन आईवडिलांच्या शारीरिक मिलनातून लाभत असले तरी त्याचा खरा निर्माता अल्लाह आहे. आईवडील मानवाच्या निर्मितीचे साधनमात्र आहेत. अल्लाह आपल्या तत्त्वदर्शितेनुसार सृष्टीच नव्हे तर त्यातील प्रत्येक सजीव व निर्जीवाचा निर्माणकर्ता आहे. एका विशिष्ट उद्देशानेच ही निर्मिती व नाश होत असतो. यासाठी अल्लाहला कुणाची परवानगी, इच्छा वगैरेंची जरुरी नाही. तो स्वयंभू आहे. केवळ मानवच नव्हे तर सृष्टीतील प्रत्येक गोष्ट त्याच्यासमोर विवश, लाचार आहे. तेव्हा माणसाने आपल्या जीवनाचा उद्देश समजून त्यानुसार आचरण करावे. प्रत्येकास प्रभू सद्बुद्धी देवो, हीच ईश्वरापाशी प्रार्थना!
– वकार अहमद अलीम
0 Comments