Home A blog A जकात : गरीबी उन्मूलनाचा अद्वितीय मार्ग

जकात : गरीबी उन्मूलनाचा अद्वितीय मार्ग

– अबरार मोहसीन 
शहराध्यक्ष जेआयएच लातूर. 
9890946103
 
मागच्या रमजानमध्ये असे कितीतरी लोक होते जे आपल्यासोबत रमजानच्या पवित्र गतिविधींमध्ये हिरहिरीने भाग घेत होते, पण आज ते नाहीत. पुढच्या रमजानमध्ये होणाऱ्या गतिविधींमध्ये भाग घेण्यासाठी आपल्यापैकी किती लोक जीवंत राहतील याचा अंदाज कोणीच करू शकत नाहीत. म्हणून ज्यांना रमजान मिळालेला आहे, ते नशीबवान आहेत. रमजानमधील सर्व गतिविधींमध्ये मुस्लिमांनी अतिशय आनंदाने सहभाग घ्यायला हवा. त्याच गतिविधींपैकी एक महत्त्वाची गतिविधी म्हणजे जकातचे संकलन आणि वितरण होय.
    इस्लामच्या पाच प्रमुख स्तंभापैकी जकात एक स्तंभ आहे. यात अल्लाहने प्रेषितांना जकात वसूल करून लोकांमध्ये वितरित करण्याचा आदेश दिलेला आहे. याचे दोन फायदे कुरआनमध्ये सांगितलेले आहेत. एक तर जकात देणाऱ्याची संपत्ती पाक (पवित्र) होते व त्या संपत्तीमध्ये वाढ होते. तर दूसरा फायदा असा की, गरीबांची मदत होते. जकात दिल्याने संपत्तीमध्ये वाढ होते. हे सकृतदर्शनी खरे वाटत नसले तरी प्रत्यक्षात वाढ होते, हा प्रत्येक जकात देणाऱ्या व्यक्तीचा अनुभव आहे.
    जकात ही एक सामुहिक इबादत आहे. इस्लामी शासन असलेल्या देशात जकात संकलित करणे व वितरित करणे यासाठी एक मंत्री व त्याचा खास विभाग असतो. ज्या ठिकाणी इस्लामी शासन नाही अशा ठिकाणी प्रत्येक गावामध्ये सगळ्यांची जकात एकत्रित जमा करून मग त्याचे न्याय वितरण करण्याची व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी स्थानिक मुस्लिमांवर आहे. जमाअते इस्लामी हिंद या दृष्टीने आपल्या स्थापनेपासून हे काम करत आहे. आजकाल वैयक्तिक जकात अदा करण्याची सवय लोकांना लागलेली आहे. ती चुकीची आहे. जरी या पद्धतीने जकात अदा होवून जाते तरी पण अशामुळे जकात घेणाऱ्या व्यक्तिचा आत्मसन्मान दुखावतो. तसेच जकात देणाऱ्यांमध्ये अहंमभाव निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून जकात कधीही एकत्रित जमा करून अदा करावी, हेच उचित.
    तुम्ही एका वर्षात एक कोटी कमाविले आणि खर्च करून टाकले. तर कुठलीही जकात तुम्हाला द्येय नाही. जकात त्याच बचतीवर द्येय आहे, जी ती वर्षभर तुमच्या ताब्यात होती. साधारणपणे रमजान ते रमजान एका वर्षाचा काळ जकात अदा करण्यासाठी सर्वमान्य समजला जातो, असे अनेक लोक आहेत जे जकातची रक्कम काढण्यात दिरंगाई करतात व रमजानच्या शेवटच्या आठवड्यात अदा करतात. त्यामुळे घाई होते आणि वितरण व्यवस्थित होऊ शकत नाही. या घाई गडबडीमध्ये अनेक मुस्तहिक (पात्र) व्यक्ती जकात प्राप्त करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असते. म्हणून रमजानच्या पहिल्याच आठवड्यात जकात काढून ती संकलित केली गेली पाहिजे. जेणेकरून तिच्या वितरणामध्ये बराच कालावधी मिळू शकतो.
    जकात प्रत्येक ’साहेबे माल’ म्हणजे अशी व्यक्ती जिच्याकडे साडे सात तोळे सोने किंवा साडे बावन तोळे चांदी किंवा त्यापैकी एका समकक्ष मुल्याची संपत्ती पदरी असेल, आणि त्यावर एक वर्ष संपलेला असेल, मग तो स्त्री असेल किंवा पुरूष दोघांनाही अडीच टक्के जकात अदा करणे बंधनकारक आहे. सुरे तौबा आयत नं. 34 आणि 35 मध्ये अल्लाहने चेतावनी दिलेली आहे की, जे सोने आणि चांदी जमा करतील आणि त्यावर जकात अदा करणार नाहीत त्यांना मरणोपरांत त्याच धातूला तापवून डाग देण्यात येईल व त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल की, हाच माल तुम्ही जमा केला होता व यावर जकात अदा केली नव्हती. तर आता याच मालाचा स्वाद चाखा. जकात संपत्तीद्वारे केली जाणारी अनिवार्य अशी सुंदर इबादत आहे.
    निसाब प्रमाणे संपत्तीचे मुल्य नसेल तर जकात अनिवार्य नाही. तसेच संपत्तीचा मालक आहे परंतु, ती ताब्यात नसेल व येण्याची शक्यता पक्की नसेल तरी जकात देणे आवश्यक नाही. जकात देणारी व्यक्ती कर्जमुक्त हवी. कर्ज डोक्यावर ठेऊन जकात देता येत नाही. समजा एखाद्या व्यक्तीकडे नगदी, दागिने व विक्री करावयाच्या दृष्टीने ठेवलेला प्लॉट या सगळ्यांची बचत अंदाजे 5 लाख होते. मात्र त्याच्या डोक्यावर दोन लाख कर्ज आहे. तर अगोदर ती कर्जाची रक्कम वजा केली जाईल व तीन लाखावर त्याला जकात अदा करावी लागेल. समाजाचे साधारणत: तीन भाग असतात. एक श्रीमंत, दूसरा मध्यमवर्गीय आणि तिसरा गरीब. पहिल्या भागातील व्यक्तींना जकात देणे भाग आहे. दूसऱ्या भागातील व्यक्तींना जकात देणे जरी भाग नसेल तरी त्यांना घेता पण येत नाही. कारण त्यांची सांपत्तीक स्थिती हलाकीची नसते, अशा लोकांना ’सफेद पोश’ असे म्हणतात. तिसरा गट दरिद्री लोकांचा आहे. ज्यांना जकात देण्याची गरज नाही उलट त्यांना जकात घेण्याचा अधिकार आहे. एखादा व्यक्ती मेली असेल आणि ती साहेबे निसाब असेल आणि त्याच्या संपत्तीवर एक वर्ष पूर्ण झालेला असेल तर अगोदर त्या संपत्तीची जकात वेगळी काढली जाईल आणि उरलेल्या संपत्तीमधून शरियतप्रमाणे वाटा वारसांमध्ये वाटला जाईल.
    शेअर, इपीएफ, पीपीएफ व इतर प्रकाराची संपत्ती आणि व्यापाऱ्यांनाही त्यांच्या ताब्यात असलेल्या मालाची जकात अदा करावी लागते. तसेच शेती मालावरही जकात द्यावी लागते, त्याला उश्र म्हणतात. या सर्वांचे वेगवेगळे नियम आहेत. ज्यांना तपशील हवा असेल त्यांनी जकात संबंधी आयातींचा अभ्यास करावा. एवढे मात्र नक्की की, एकेका रूपयाचा हिशेब करून जकात अदा करणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास मृत्यूपरांत त्याचे परिणाम भोगण्यास संपत्ती धारक मुस्लिमांनी तयार रहावे. जकात फक्त मुस्लिम व्यक्तिंवर लागू होते.
जकात कोणाला देते येते?
     सुरे तौबाच्या आयत नं. 60 मध्ये 8 व्यक्ती किंवा व्यक्तीसमुह असे नमूद केलेले आहेत ज्यांना जकात दिली जावू शकते. 1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वत:च्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई)म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी – यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. माना सोडविण्यासाठी – साधारणत: याच्यात गुलाम व निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्‍वरीय मार्गासाठी म्हणजे इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी सुद्धा जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना मदत करण्यासाठी . वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.
    जकात जवळच्या नातेवाईकांना अर्थात आई-वडिल, आजी-आजोबा, भाऊ-बहिण, पती-पत्नी अशांना देता येत नाही. तसेच हाश्मी म्हणजे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या वंशातील व्यक्तींना ही देता येत नाही. हाश्मी वंशाचे लोक एकमेकांनाही जकात देऊ शकत नाहीत.
    इस्लामी अर्थव्यवस्थेचा मूळ उद्देश चलन हे प्रवाही राहील हा आहे. त्यासाठी जकातीचा फार्म्युला अवलंबिल्यास चलन हे मोठ्या प्रमाणात श्रीमंतांकडून गरिबांकडे नियमितपणे वळते केले जाते. त्यामुळे समाजातील आर्थिक विषमता कमी होते व सामाजिक सौहार्द प्रस्थापित होतो, अन्यथा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये श्रीमंतांच्या बाबतीत गरीबांच्या मनामध्ये कायम एक अढी पडलेली असते. त्यामुळे गरीब हे नेहमी श्रीमंताचा दुस्वास करत असतात. त्यातून संधी मिळेल तेव्हा गरीब लोक श्रीमंतांच्या विरूद्ध हिंसक उठावही करतात. एकूणच सामाजिक सौहार्दतेला बाधा पोहोचते. भारतीय परीपेक्षामध्ये प्रत्येक शहरामध्ये सामुहिकरित्या जकातचे संकलन करून वितरण केल्यास समाजाचे अनेक आर्थिक प्रश्न यशस्वीपणे सुटू शकतात.

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *