Home A blog A खिलाफत व्यवस्था

खिलाफत व्यवस्था

– एम.आय.शेख
याद करता है जमाना उन इन्सानों को,
रोक देते हैं जो बढते हुए तुफानों को. 
 
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पूर्वी अरब देशांमध्ये जी समाजव्यवस्था अस्तित्वात होती त्याचे वर्णन प्रसिद्ध इतिहासकार मा.म.देशमुख यांनी खालील शब्दात केलेले आहे. मते आर्यांसारखे होते. आर्यांमध्ये जशी कूळाची व्यवस्था होती, तशीच अरबांमध्ये कबिल्यांची व्यवस्था होती. प्रत्येक कबिल्याची एक कूलदैवता होती. मक्का प्रमुख तीर्थक्षेत्र होते. त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या काबाग्रहामध्ये 360 बूत (मूर्त्या) होत्या. त्यांची नियमितपणेे पूजा- अर्चा केली जात होती. मंत्र-तंत्र, जादू-टोण्याचा बाजार फोफावलेला होता. मक्का या शहराची नागरी व्यवस्था बनी हाशम नावाच्या एका कुलीन कुळाकडे होती. या कुळाला अरबांमध्ये अतिशय मानाचे स्थान होते. याच कुळामध्ये त्या महान व्यक्तीचा जन्म झाला. ज्याने पुढे चालून अरबांची सगळी व्यवस्थाच बदलून टाकली आणि इस्लामी लोकतंत्राची स्थापना केली.फ (संदर्भ : मध्ययुगीन भारताचा इतिहास पान क्र. 11).
    ते श्रेष्ठ पुरूष प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. होत. त्यांचा जन्म एप्रिल 570 मध्ये झाला. जन्माच्या काही दिवस अगोदरच वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे संगोपन आजोबा अब्दुल मुत्तलिब यांनी केले. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना प्रेषित्व मिळाले. त्यानंतर ते 23 वर्षे जगले. याच 23 वर्षाच्या अल्पशा काळात त्यांनी जगाचा नकाशा बदलून टाकला. अरब समाजातील सर्व कुरीतींचा नाश केला. अंधश्रद्धा समाप्त केली. गुलामीची पद्धत बंद केली. सर्व माणसं एकाच आई (हजरत हव्वा/ईव्ह अलै.) व एकाच पित्यापासून (हजरत आदम/अॅडम अलै.) जन्माला आलेली आहेत. त्या नात्याने जगातील  सर्व लोक एकमेकांचे भाऊ-बहिण आहेत. म्हणून माणसा-माणसात फरक करता येत नाहीत, सर्व समान आहेत. प्रेषित सल्ल. यांनी समतेचे हे तत्व जगाला दिले आणि याच तत्वावर मदिन्यामध्ये पहिल्या लोकशाहीची स्थापना केली.
    मदिनामध्ये इस्लामी लोकशाहीची स्थापना
    प्रेषित्व मिळाल्यानंतर मदिनामध्ये 10 वर्षे काम केल्यानंतर प्रेषित (सल्ल.) यांच्या असे लक्षात आले की, त्यांच्या विचारांचा स्विकार करणारे लोक मक्कापेक्षा मदिन्यामध्ये जास्त आहेत. तेव्हा त्यांनी मदिन्याला हिजरत (स्थलांतर) केली व तेथे अन्य समाज घटकांना सोबत घेऊन लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली. मदिन्यामध्ये तेव्हा ख्रिश्चन आणि यहूदी अल्पसंख्यांक होते. त्यांच्या बरोबर एक कॉमन मिनीमम प्रोग्राम (किमान सामाईक कार्यक्रम) ठरवून प्रेषितांनी त्यांच्याबरोबर एक करार केला. त्याला इतिहासामध्ये प्रसिद्ध ’मदिना करार’ म्हणतात. यात बहुसंख्य मुस्लिमांच्या सोबत अल्पसंख्यांक ख्रिश्चन आणि यहूदी सुख-समाधानाने राहत होते. त्यांच्या अधिकारांच्या रक्षणाची जबाबदारी स्वत: प्रेषित सल्ल. यांनी घेतली होती. या अल्पसंख्यांकाना जिम्मी (शासनाच्या जिम्मेदारित असलेला समूह) म्हंटले जाते असे. अल्पसंख्यांक असल्यामुळे हे लोक स्वत:ची रक्षा स्वत: करण्यास असमर्थ होते. म्हणून ही सरकारची जबाबदारी होती की सरकारने स्वत: त्यांची रक्षा करावी. प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अल्पसा कर घेऊन सरकारवर टाकली होती. त्या कराला झिजीया कर म्हणत होते. ज्याचे वर्णन अनेक इतिहासकारांनी जाणून बुजून विकृत स्वरूपात केलेले आहे. मूळात हे सुरक्षेच्या मोबदल्यात दिले जाणारे शुल्क होते. या कराराप्रमाणे अंतर्गत आणि बाहेरील आक्रमणापासून ख्रिश्चन आणि ज्यू लोकांची रक्षा करण्याची जबाबदारी सरकारची होती. झिजीया कराच्या मोबदल्यात अल्पसंख्यांकांना लष्करामध्ये भरती होण्यास भाग पाडता येत नव्हते. शिवाय, त्यांना सदका, फित्रा, जकात सारखे मुस्लिमांवर अनिवार्य केलेले कर देण्यासही भाग पाडता येत नव्हते.
    प्रेषित सल्ल. नंतर ज्या चार व्यक्तींनी मदिना सरकारची सत्ता चालविली त्यांना इस्लामचे चार पवित्र खलीफा असे म्हणतात. खलीफा म्हणजे नायब (डेप्युटी). मूळात इस्लामची संकल्पना ही आहे की, जमीन अल्लाहची व खल्क (जनता) ही अल्लाहची आणि हुकूमसुद्धा अल्लाहचाच. खलीफा फक्त अल्लाहच्या हुकूमाची अंमलबजावणी करणारी व्यक्ती असते. त्यांचा दर्जा ट्रस्टी (विश्वस्था) सारखा असतो. पहिले खलीफा ह.अबुबकर सिद्दीक रजि., द्वितीय खलीफा हजरत उमर रजि., तृतीय खलीफा हजरत उस्मान रजि. व चौथे खलीफा हजरत अली रजि. होते. यानंतर मात्र इस्लाममध्ये मुलूकीयत (राजेशाही) चा उदय झाला. हजरत अमीर मुआविया रजि. हे स्वत:ला जरी खलीफा म्हणवून घेत होते, तरी त्यांच्या कामकाजाची पद्धत आणि राहणीमान राजेशाही होते. त्यांच्या नंतरसुद्धा त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून, अनेकांनी राज्य केले व स्वत:ला खलीफा म्हणवून घेतले. त्यांना उमई वंशाचे खलीफा म्हंटले जात होते. त्यानंतर बगदादमध्ये अब्बासी वंशाच्या राजांनी खिलाफत स्थापन केली. या खिलाफतीची शेवटची कडी तुर्कस्थानात 1924 साली खालसा करण्यात आली. त्या खिलाफतीला उस्मानी (ऑटोमन) खिलाफत म्हंटले जात होते.
तुर्की खिलाफतीचा संक्षिप्त इतिहास
    तुर्की खिलाफतीची स्थापना 1299 मध्ये सुलतान बिन तुर्गलने केली होती. 1924 मध्ये जेव्हा या खिलाफतीचा अंत झाला तेव्हा अब्दुल हमीद (द्वितीय) खलीफा होते. मुस्तफा कमाल पाशा आणि अन्वर नावाच्या व्यक्तींनी मिळून या खिलाफतीचा अंत केला. तुर्कस्तानची तीन टक्के भूमी युरोपात असून, बाकी आशियाखंडात आहे. यामुळे युरोपीयन संस्कृतीचा या देशाच्या समाजमनावर पूर्वीपासूनच प्रभाव होता. मुस्तफा कमालपाशाला युरोपीयन संस्कृतीचे आकर्षण होते. त्याला खिलाफत ही प्रतिगामी व्यवस्था वाटत होती. म्हणून त्याने शेकडो उलेमांची निघृण हत्या करून तुर्कस्थानमध्ये युरोपीयन लोकशाहीची स्थापना करून स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले. राष्ट्रपती झाल्याबरोबर सर्वात अगोदर त्याने युरोपीयन पद्धतीचे संविधान तयार केले आणि आपल्या साथीदारांकडून ते मंजूर करून घेतले. या संविधानात इस्लामी परंपरांवर प्रतिबंध लावण्यात आला. कमालपाशाच्या या कृत्यामुळे सगळ्या युरोपीयन समाजाला हर्षवायू झाला. त्यांनी कमालपाशाची भरपूर मदत केली. कमालपाशाने युरोपच्या साह्याने एक मजबूत लष्कर उभे केले आणि संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी लष्करावर टाकली. एरव्ही ही जबाबदारी कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडे असते. येणेप्रमाणे तुर्कस्तान एक आधुनिक देश बनला. 90 टक्के मुस्लिम जनता असलेल्या या देशात हळूहळू युरोपीयन संस्कृतीचा प्रादुर्भाव इतका वाढला की दारूवरील प्रतिबंध उठले. जुगाराचे क्लब सुरू झाले. नव्याने सिनेमागृहांची निर्मिती झाली. वेश्याव्यवसायाला मान्यता देण्यात आली. व्याजाधारित बँकांना लायसेन्स दिले गेले. त्यामुळे सगळ्या युरोपीयन बँकांनी तुर्कस्थानामध्ये आपल्या शाखा उघडल्या. पुरूषांवर कोर्ट, पँट, टाय घालण्याचे तर महिलांना स्कर्ट घालण्याचे फर्मान निघाले. दाढीवर प्रतिबंध लावण्यात आले. ते एवढे कडक होते की, मस्जिदीमध्ये इमाम दाढीचा विग लावून इमामत करत होते व नमाज संपल्याबरोबर विग खुंटीला टांगून मस्जिदीच्या बाहेर पडत होते. युरोपीयन सभ्यतेचे दुष्परिणाम लवकरच लोकांच्या लक्षात आले. लोक बँकांच्या अजगरी आकाराच्या व्याजाच्या विळख्यात अडकून पडले व अल्पावधीतच सगळा देश कर्जबाजारी झाला. अनेक लोक व्यसनाधिन झाले. देशाचा गुन्हेगारी निर्देशांक वाढला. लोक एकमेकांना फसवू लागले. अश्लिलता आणि व्याभिचार वाढला, सेना आणि सरकारमध्ये भ्रष्टाचार फोफावला, म्हणजेच युरोपीयन लोकशाहीमध्ये जे कांही दुर्गून होते त्या सर्वांची लागण तुर्कस्तानात झाली.
    काही मुठभर सद्प्रवृत्तीच्या मुस्लिमांना हे आवडले नाही. त्यांनी रेस्टोरेशन ऑफ इस्लामीक प्रिन्सीपल्स अर्थात इस्लामी सभ्यतेच्या पुनरूज्जीवन करण्याचे काम हाती घेतले. त्यात त्यांना प्रचंड विरोध झाला. मात्र वाईट प्रवृत्तीला कंटाळलेल्या लोकांच्यामध्ये हे आंदोलन आतल्याआत रूजत गेले. या लोकांनी एकत्र येवून फ्रिडम अॅन्ड जस्टीस पार्टीची स्थापना केली. हा पक्ष सत्तेतही आला. मात्र लष्काराने या पक्षाच्या सरकारी धोरणांना विरोध केला. सरकारचे धोरण इस्लामी तत्वांच्या अनुकूल होते. जनतेनी लष्कराच्या नाराजीची परवानगी न करता इस्लामी तत्वांची पाठराखण सुरू ठेवली. पुरूषांनी दाढी ठेवायला तर महिलांनी हिजाब वापरायला सुरूवात केली. सार्वजनिक ठिकाणी हिजाबवर लादण्यात आलेले प्रतिबंध महिलांनी झुगारून दिले. ज्या विद्यापीठांमध्ये दाढी आणि हिजाबला प्रतिबंधित करण्यात आला होता तेथील विद्यार्थ्यांनी विद्यापीठांचा बहिष्कार केला. विद्यापीठे ओस पडू लागली. तेंव्हा नाईलाजाने विद्यापीठ प्रशासनाला दाढी आणि हिजाबला परवानगी द्यावी लागली. दरम्यान फ्रिडम अॅन्ड जस्टीस पार्टीमध्ये एक नवीन नेतृत्व उदयास आले. रज्जब तय्यब उर्दगान यांनी पक्षाचा विश्वास जिंकला तसेच एकापाठोपाठ तीन निवडणुका जिंकल्या. मात्र 2012 आणि 2016 मध्ये लष्करी उठाव करून त्यांचे शासन उलथवून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण जनेतेनी तो हाणून पाडला आणि उर्दगान यांची प्रशासनावरील पकड अधिक मजबूत झाली. उर्दगान यांनी देशात दारूबंदी लागू केली. कमालपाशाने 1924 साली ज्या चक्राची सुरूवात केली होती, ते चक्र आजमितीला पूर्णपणे फिरवून टाकण्याची किमया उर्दगान यांनी करून दाखविली.
    मात्र उर्दगान यांची सत्ता म्हणजे शुद्ध खिलाफत नव्हे. शुद्ध खिलाफतीची व्यवस्था जगात कुठेच अस्तित्वात नाही. केवळ खिलाफतीचा परिचय आणि थोडक्यात त्याचा इतिहास सांगून या दुर्लक्षित विषयाकडे वाचकांचे लक्ष वेधावे एवढाच उद्देश ठेवून हा लेख मी वाचकांच्या सेवेत सादर केला आहे.
संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *