तिचे नाव डॉली होते. दिसायला खूप सुंदर होती. आज पूर्ण एक महिना झाला तिच्या मृत्यूला. ती नेहमी घरीच रहायची म्हणून सुरक्षित होती. पण मृत्यूला कोण टाळू शकतो. एका दिवशी ती बाहेर गेली. तिच्या मागे कुत्रे लागले. धावत घरी येण्याचा प्रयत्न केला. घरचे दार वाऱ्याने बंद झाले होते ते तिला उघडता आले नाही आणि कुत्र्याने तिला फाडले. तरी तीन दिवस ती जगली. तिची दोन पिल्ले आहेत. ती माझ्या आजीच्या घराची मांजर होती. जवळपास 10 वर्षे आजीच्या घरात होती. पर्शियन नव्हती पण पर्शियन मांजरी इतकीच सुंदर होती. घरच्यांना खूप वाईट वाटले. अत्यंत व्यथित अंतःकरणाने तिचा दफनविधी करण्यात आला.
ही खरी घटना मी तुम्हाला का सांगते? आपल्या समाजामध्ये सुद्धा मुलींचे हाल डॉलीपेक्षा वेगळे नाहीत. निर्भया, आसिफा, डॉ. प्रियंका रेड्डी, जैनब ही काही नावे आपल्याला माहित असली तरी खरी संख्या ईश्वरालाच माहित. मला राग येत होता कुत्र्यांचा. पण या घटना पाहता माणूस म्हणविणारे हे लोक कुत्र्यापेक्षाही वाईट आहेत याची मला खात्री पटली. कुत्रे निदान सामुहिक बलात्कार करून, रॉड घालून, जाळून तर टाकत नाहीत ना.
आपण वराहांना किती घाण समजतो. त्यांना घरात शिरू देत नाहीत. कारण ते घाण खातात. पण वराहांचाच एक मानवरूपी प्रकार उदयास आलेला आहे. या मानवरूपी वराहांंना पाहून खरे खुरे वराहही लाजतील. जरी हे वराह वराहासारखे दिसत नसले तरी घाण खाणारे म्हणजेच हुंडा खाणारे हे वराहच आहेत. या वराहांना मात्र आपण घरात शिरू देतो. त्यांचा पाहूणचारही करतो. समाजात वावरणाऱ्या यांच्या पिलावळीकडे आता आपल्याला लक्ष दिले पाहिजे. खरे खुरे वराह तर चांगले काम करतात. रस्त्याच्या कडेला माणसाने केलेली घाण खाउन परिसराला स्वच्छ करतात. पण हुंडा खाणारे हे मानवरूपी वराह मुलीकडच्यांची चांगली मेजवाणी खावून समाजात घाण पसरवितात. हुंड्याचा इस्लाम धिक्कार करतो. म्हणजेच इस्लाममध्ये दारू, व्याज, अनैतिक गोष्टी जश्या अवैध (हराम) आहेत तसाच हुंडाही अवैध आहे. सावधान ! अशा वराहांना ओळखा आणि त्यांना आपल्या घरात शिरूच देवू नका.
मी बीएएमएस डॉक्टर आहे. माझ्या लग्नासाठी म्हणून खूप बायोडाटा, फोटोज यायचे. एमबीबीएस, एम.डी. डॉक्टरची स्थळ पण चालून आली. पण माझे वडील अत्यंत पारखी होते. ते आधीच मध्यस्थांना विचारायचे की वरपक्षाची काही मागणी वगैरे आहे का? लोक सांगायचे 20 लाख द्या. 2006 ची घटना आहे एका एम.डी. डॉक्टरचे स्थळ चालून आले. त्यांची मागणी 20 लाख नगदी आणि सेटल करून द्या, अशी होती. माझे वडील असल्या स्थळांना परस्पर नकार देवून बाहेरच्या बाहेर बोळवण करीत असत. एकालाही त्यांना घरात येउ दिले नाही. त्यांना एक श्रद्धावान जावाई हवा होता आणि मलाही तसाच जोडीदार हवा होता.
मला हिफ्ज करण्याची खूप इच्छा होती. पण आम्ही राहत असलेल्या ठिकाणी जवळपास तशी सोय नव्हती. म्हणून माझी ती इच्छा अपूर्ण राहिली. बाबांच्या म्हणण्यावरून मी डॉक्टर झाले. एमबीबीएसलाही निवड झाली होती पण खूप लांब चंद्रपूरला. सुरक्षा कारणावरून बाबांनी पाठविण्यास नकार दिला. मी बाबांना सांगितले की, माझ्यासाठी हाफिजे कुरआनचे स्थळ बघा. माझी स्वप्नपूर्ती होईल. पण माझ्या मावशीने मला समजावून सांगितले. डॉक्टर अब्दुल खय्युम यांचे स्थळ आल्यावर सर्वांचेच त्यांच्याबद्दल एकमत झाले. मीही होकार दिला. आज मी ईश्वराचे आभार मानते की मला चांगले पती व सासर लाभलं.
इस्लामचा एक कडक नियम आहे की, वयात येताच मुला-मुलींचे योग्य स्थळ पाहून लग्न करून टाकावे. विनाकारण विलंब करू नये. वेळेवर लग्न न झाल्याने अनेक तरूण पिसाळलेले आहेत. म्हणूनच एकानंतर एक बलात्काराच्या घटना देशामध्ये घडत आहेत. कितीही बोला, कितीही लिहा, कितीही मोर्चे काढा, कँडल मार्च काढून पहा, न्यायाची भीक मागून पहा, ह्या घटना काही कमी होत नाहीत. उलट वाढतच चालल्यात, असे का? ’’हा कभी न खत्म होणारा सिलसिला तर नाही ना?’’ असं काही नाही. हे संपवायचं आपल्याच हाती आहे. यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे इस्लामी शिकवणीचा अंगीकार करणे होय.
1. इस्लाम महिलेला घरात राहण्यास सांगतो. तिच्यावर कमावण्याची जबाबदारी टाकत नाही. पुरूषांना आदेश देतो की, परस्त्रीकडे रोखून पाहू नका.
2. महिलेला घराबाहेर पडायचं असेल तर तिला एक अंगरक्षक (महेरम) अर्थात बाप, भाऊ, पती किंवा पुत्र यांच्यापैकी कोणा एकाला सोबत घेऊन जाण्याचा निर्देश देतो. सुबहानल्लाह! किती ही महिलांची सुरक्षेची काळजी! आता या सुरक्षेच्या उपायांमध्ये कोणाला गुलामगिरीचा वास येत असेल तर त्याच्या बुद्धीची जेवढी कीव करावी तेवढी कमीच. खोलात जावून विचार केला तर बलात्काराच्या बहुतेक घटनांमध्ये मुलींना एकटीच बघून त्यांच्यावर बलात्कार केल्याचे दिसून येते.
3. ईश्वराची भीती नसणे हे सुद्धा महिलांवरील अत्याचाराचे प्रमुख कारण आहे. ज्या व्यक्तीला ईश्वराची भीती वाटत नाही तो कोणालाच भीत नाही. तो गुन्हे करत जातो आणि माणुसकीचा निच्चांक गाठतो.
वाढत्या आत्महत्येमागची कारणं
अहमदाबादच्या आयेशाची दुःखद आत्महत्या सर्वाना रडवून गेली. वाईट परिस्थितीत समाधान काढायचे शिकविण्याऐवजी आजकालची चित्रपट आत्महत्येला प्रोत्साहित करतात आणि दुसरं म्हणजे असहनशिलता. आपण आपल्या पाल्यांना विपरित परिस्थितीतही जगण्याची कला शिकविली पाहिजे. आयेशाने हसत-हसत मोठी चूक केली हे मान्य. पण हे तिलाही माहित होते की, हे चूक आहे म्हणून. म्हणून तर ती शेवटी म्हणते की, ’’ माहित नाही मला जन्नत मिळेल की नाही’’ याचाच अर्थ तिला या गोष्टीची चांगली कल्पना होती. मुळात आत्महत्येचा विचारही मनात येणार नाही इतकी सकारात्मक ऊर्जा इस्लामी इबादतीमधून मुस्लिमांना मिळते. म्हणून आपण इस्लामी शिकवण आणि इबादतींवर आपले लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे.
आपण आपल्या पाल्यांच्या चांगल्या शिक्षणाची काळजी करतो. चांगली पदवी आणि चांगल्या भविष्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो. मुलंही मेहनत करतात. कष्टाने कमाविलेले लाखो रूपये शिक्षणावर खर्च केले जातात. मात्र हेच करत असतांना नैतिक शिक्षणाकडे मात्र पूर्णपणे डोळेझाक केली जाते. आयेशा उच्चशिक्षित होती. पीएचडीची तयारी करत होती. यावरूनच तिचे शिक्षण एककल्ली झाले होते. याचा अंदाज येतो. आईने समजाविले, वडिलांनी समजाविले, अल्लाहच्या शपथा दिल्या. पण तिने कोणाचेच ऐकले नाही. यावरून तिचे इस्लामिक नैतिक शिक्षण हे कच्चे होते, हे स्पष्ट होते. तिच्या डोक्यात सैतान घुसला होता. सैतान हा संपूर्ण मानवजातीचा शत्रू आहे. सैतानच आत्महत्या करण्याला प्रवृत्त करत असतो. ज्यांचे धार्मिक शिक्षण पूर्ण झालेले असते, असे आलीम आणि आलेमा ह्या कधीच आत्महत्या करत नाहीत. निदान मी तरी ऐकलेले किंवा वाचलेले नाही. हे जीवन फुलांची सेज नसून काटेरी मार्ग आहे. एक कसोटी आहे. प्रत्येकाच्या नशीबी काही ना काही दुःख आहे. म्हणून वाईट प्रवृत्तींना समोर जायचे आणि काटेरी रस्त्यातून मार्ग काढायचा. निश्चितच दुःखानंतर सुख मिळतच असते आणि एखाद्याच्या वाट्याला जरी जास्त दुःख आले तरी धैर्याने नैतिकता सांभाळत मार्गक्रमण केल्यास मोबदल्यात स्वर्ग तर नक्कीच मिळणार.
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी महिला एकत्र येवून विविध प्रकारे महिलांच्या समस्येवर बोलतात. उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. पण माझ्या मते महिला दिवस पुरूषांनी साजरा करायला हवा. पुरूषांनी महिलांच्या अधिकारावर फक्त बोलून चालणार नाही तर ते प्रत्यक्षात त्यांना देण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा घडवून आणावी. मी वाट पाहते त्या खऱ्या महिला दिनाची.
इस्लाममध्ये महिलांना दिलेले अधिकार जर त्यांना खरोखर मिळाले तर महिला दिवस साजरा करण्याची गरजच राहणार नाही. कोण्या आयेशाला आत्महत्या करण्याची गरज वाटणार नाही. निर्भया, आसीफा, जैनब, डॉ. प्रियंका रेड्डीच नव्हे तर इतर सर्व महिला सुरक्षित राहतील.
आपणास माहित आहे का की, असे सोनेरी दिवस येणे फक्त स्वप्न नाही तर प्रत्यक्षात अरबस्थानामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्या प्रिय सहाबा रजि. यांच्या काळात असे सोनेरी दिवस महिलांना उपभोगण्यास मिळालेले होते. त्यांच्या काळात एकटी स्त्री अंगभर सोन्याचे दागिने घालून कोठेही जाउ शकत होती. आणि तिला रानटी जनावरांशिवाय कोणाचीची भीती वाटत नव्हती.
महिला दिनानिमित्त मी सर्व पुरूषांना आवाहन करते की, त्यांनी महिलांशी भांडू नये, त्यांचा आदर करावा. त्यांना त्यांचे अधिकार द्यावेत. महिलांनाही आवाहन आहे की विनाकारण पुरूषांशी भांडू नये. त्यांचे हक्क त्यांना द्यावेत. मुलांनी आई-वडिलांशी तसेच आपसात भांडू नये. आपण सगळे मिळून सैतानाशी भांडू या, तरच आपल्याला चांगले दिवस येतील. चांगले आचार विचार रूजविले तर हुंडाबळी, बलात्कार आणि आत्महत्यासारख्या घटना होणार नाहीत आणि आपला देश खऱ्या अर्थाने प्रगती करेल. इन-शा-अल्लाह.
– डॉ. सीमीन शहापूरे
8788327935
0 Comments