Home A blog A कोरोनामुळे रमजानवर होताहेत बदलाचे सुतोवाच!

कोरोनामुळे रमजानवर होताहेत बदलाचे सुतोवाच!

पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात होत आहे. जगभरातील तब्बल १८० कोटी मुस्लिम बांधवांना इतिहासात प्रथमच एक अनोखा रमजान साजरा करण्याचे खडतर आव्हान असणार आहे.
एक मात्र खरे की बहुतांशी सर्व मुस्लिम राष्ट्रे तसेच युरोपमधील ब्रिटन, तुर्कस्थान असो की सौदी अरेबिया, इराण, इजिप्त तसेच मलेशिया, इंडोनेशिया ह्यांनी एकमताने कोरोनामुळे होणाऱ्या धार्मिक रूढी, परंपरांमध्ये बदल स्वीकार केला असून लागलीच कार्यवाहीदेखील अमलात आणली आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल.
रमजान म्हणजे खरे तर शांतीचा संदेश देणारा महिना. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने जे जगभर थैमान घातले आहे त्यामुळे सर्व जगात लॉकडाउन आहे. जगातील मक्का, मदीनासह ब्रिटन, टर्की, मलेशिया, इंडोनेशिया राष्ट्रातील सर्व मस्जिदी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
रोजच्या नमाजबरोबर पवित्र रमजान महिन्यातील तरावीहची विशिष्ट नमाज कुठे अदा करावी? याबाबत भारतातील मुस्लिम विशेषता खेड्यापाड्यांतील अशिक्षित मुस्लिम बांधव मात्र संभ्रमात आहेत. यापूर्वी योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे कर्नाटकातील मुस्लिम बांधवांना लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या लाठीमाराला सामोरे जावे लागले, तेही मस्जिदीमध्ये. याहून आमच्या समाजाचे दुर्भाग्य ते काय असू शकते? आम्हीदेखील या घटनेला जबाबदार आहोत. अशा घटना केवळ पाहून चालणार नाही. या रमजान महिन्यात अशी एकही घटना घडणार नाही यासाठी मात्र सर्वांनी सतर्क राहाण्याची आणि एकमेकांना आधार व मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील सर्व मुस्लिमांनी तरावीह नमाज घरातच अदा करावी, असे स्पष्ट संकेत “FIQH RULING SPERTAINING TO PERFORMING THE TARAWIH PRAYER IN OUR HOMES” या प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल शेख सुलेमान अर् रूहाली जे इस्लामिक विद्यापीठ, मदीनाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि काबा मस्जिद, मदीनाचे इमाम म्हणून कार्यरत आहेत.
काय म्हटले आहे या अहवाल मध्ये?
१- गत वर्षी ज्यांनी मस्जिदीमध्ये तरावीह नमाज अदा केली होती आणि यावर्षी कोरोनामुळे मस्जिदीमध्ये जाणे शक्य नाही, असे असले तरी या वर्षी घरात नमाज अदा केल्यास तेवढेच पुण्य अल्लाह त्यांच्या पदरी देणार आहे.
२- गत वर्षी ज्यांनी मस्जिदीमध्ये काही कारणास्तव तरावीह नमाज अदा केली नव्हती आणि या वर्षी मस्जिदीमध्ये तरावीह नमाजसाठी निश्चय केला असेल परंतु कोरोनामुळे मस्जिदीमध्ये जाणे शक्य नाही, असे असले तरी या वर्षी घरात नमाज अदा केल्यास तेवढेच पुण्य अल्लाह त्यांच्या पदरी देणार आहे.
३- घरात अदा केलेली तरावीह नमाजलादेखील सुन्नह म्हणून गृहीत धरले जाईल.
४- एकाच कुटुंबातील व्यक्तींनी घरामध्ये सोशल डिस्टन्सिंगनुसार सामूहिक नमाज अदा करावी.
५-एकट्यानेदेखील तरावीह नमाजला मान्यता आहे, परंतु घरातील सर्वांनी त्यात सामील होताना सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास त्यास अधिक प्राधान्य असेल.
या काळात बुद्धिजीवी मुस्लिमवर्ग, वैचारिक संघटना, सेवाभावी संस्थांनी प्रामुख्याने पुढे येऊन सामान्य मुस्लिम बांधवांचे प्रबोधन करण्याची अत्यंत गरज आहे.
या रमजानच्या काळात मुस्लिमांना खालील जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. ज्या महाराष्ट्र शासनाने बंधनकारक ठरविल्या असून तसे आदेश दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहेत.
१- कोणत्याही परिस्थित मस्जिदीमध्ये नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी हजर राहू नये.
२- घरच्या /इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये.
३- मोकळ्या मैदानावर /ईदगाह येथे एकत्र जमून नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये.
४- घरातच नमाज, तरावीह आणि इफ्तार कार्यक्रम पार पाडावेत.
खरे तर कोरोनाचे आव्हान आम्ही सकारात्मक स्वीकारले तर अनेक बाबी उलघडू लागतात. या रमजानचा विचार केल्यास ‘वर्क फ्रॉम होम’प्रमाणे ‘नमाज फ्रॉम होम’ हे सर्व जण स्वीकारत आहेत. त्याचबरोबर कुरआनचे पठण यापूर्वी वेळ नसलेल्यांना लॉकडाऊनमधील फावला वेळ सत्कारणी लावता येणार आहे. हा रमजान म्हणजे न भूतो न भविष्यती असाच असणार आहे. प्रत्येकाच्या जीवनातील हा पहिलाच अकल्पित असा प्रसंग अनुभवावा लागणार आहे. रोजा स्वत: उपाशीपोटी राहून इतरांची भावना ओळखण्याबरोबर निराधार, गरीब मजूर यांच्या पोटासाठी धावून जाणे शिकवत आहे. या कोरोनाने आमचे रियल हिरो हे चित्रपटातील कलाकार, खेळांमधील आंतरराष्ट्रीय नावाजलेले खेळाडू नसून आजमितीला आमच्या जीविताचे रक्षण करणारे हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स असो की पोलीस कर्मचारी किंवा शेतात राबणारे शेतकरी हेच आमचे देवदूत असणार आहेत हे सिद्ध होते.
कोरोनामुळे रमजान दैनदिनीमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. जगभरातील बहुतांशी मस्जिदींतील समित्यांनी गरजूंच्या सेवेसाठी  वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. या काळात अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी, इफ्तारच्या माध्यमातून अन्न पदार्थांचे पॅकेट त्यांच्या घरी पोहोचवण्याची योजना आखली आहे. भारतामध्येदेखील जमाअत-ए-इस्लामी हिंद ही सामाजिक संघटना दरवर्षी गरीब, निराधार व गरजूंपर्यंत रमजानच्या काळात अन्नपदार्थ व जीवनावश्यक वस्तू पोहोचवत असतेच. आता मात्र प्रत्येक गावागावांमधील मस्जिदींच्या समित्या असतील, मुस्लिम समाजातील प्रत्येक व्यक्तीने, सेवाभावी संस्थांनी रस्त्यावरील गरीब, मजूर, निराधार यांच्यापर्यंत अन्नदान आपआपल्या परीने नियोजनबद्धरीत्या पोहोचवले पाहिजे. त्याचबरोबर अहोरात्र सेवेसाठी झटणारे डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी यांनाही लाभ देण्याचा प्रयत्न केला तर उत्तमच…!
या कामी कॉर्पोरेट व्यवस्थापनासारखे तंत्र अवलंबणे महत्त्वाचे ठरेल. कालानुरूप सर्वांना बदलावे लागणार आहे. उदा. मस्जिदीच्या परिघात किती मुस्लिम कुटुंब राहातात त्यांची यादी कुटुंबप्रमुख, कुटुंबातील एकूण लोकांची संख्या, शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय यासह समाज सुधारणेसाठी ते कुटुंब काय योगदान देऊ शकते? याचा आढावा घेतला पाहिजे. या सूचीवरुन नेमके गरजू शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य होईल. केवळ पैसाच नव्हे तर एखाद्या मुस्लिम मानसोपचारतजज्ञाचा समुपदेशांनासाठीदेखील मोठा उपयोग होईल. एखाद्या तरुणाचा त्याच्या क्षमतेचा उपयोग दुसऱ्याच्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी होऊ शकेल.
कोरोनामुळे अनेक बुद्धिजीवी वर्गातील घटक एकत्र येऊ लागले आहेत. सर्वप्रथम मुस्लिम पत्रकारांना एकत्र येऊन सध्याचा काळात मुस्लिमांवर लागणारे दोषारोप कसे दूर करता येतील यासाठी पुढाकार घेऊन काम करावे लागणार आहे. मुस्लिम समाजात हळू हळू बदल घडू लागले आहेत, ही जमेची बाजू असली तरी सर्व बुद्धिजीवी घटकांनी मोठ्या प्रमाणात पुढे येणे काळाची गरज ठरणार आहे. पत्रकारांसोबत डॉक्टर्स, प्राध्यापक, इंजीनियर्स, शासकीय सेवेतील अधिकारी यांचे स्वतंत्र ग्रूप तयार होऊन प्राथमिक स्वरुपात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर महाराष्ट्र असे सुरू करावेत. तीन महिन्यांतून या सर्व ग्रुपनी एकत्र जमा होऊन विचारांची देवाणघेवाण अर्थात ‘थिंक-टँक’ बनवावेत. समाजातील उपेक्षित जे घटक आहेत ज्यांना पैशाची, कर्जाची गरज भासते, तसेच शिक्षणासाठी गुणवत्ता असूनदेखील प्रवेशाला मुकावे लागते, अशांसाठीही इस्लामिक बँक प्रणाली महत्त्वपूर्ण ठरू शकते. या कामी बँकिंग क्षेत्रातील दिग्गज आणि निवृत्त शिक्षित मुस्लिमांचा मोठा हातभार लाभू शकतो. गावागावांतील सर्वांनीच एकजुटीने समाज सुधारणेसाठी (टीमवर्कने) काम करणे अपेक्षित आहे. या कामी धर्मगुरू, उलेमा, जमाअतचे सहकार्यदेखील मोठी दिशा देऊ शकते.
रमजानच्या निमित्ताने दरवर्षी नित्यनियमाप्रमाणे इफ्तार पार्टी, त्यासाठी लाजवाब पदार्थ हे सर्वत्र पाहावयास मिळतात. परदेशीच काय पण भारतामध्ये शहरांमधून सर्रास स्टॉल लावले जातात. मुस्लिमच नव्हे तर इतर धर्मीयदेखील या खाद्य पदार्थांचा मोठ्या आनंदाने आस्वाद घेत असतात. या वर्षी मात्र या सर्व बाबींना मुकावे लागणार आहे.
परंतु कोरोनाच्या भीतीमुळे मुस्लिम राष्ट्रांमधून तसेच मलेशिया, इंडोनेशिया, ब्रिटन, फ्रान्समध्ये रमजान इफ्तार स्टॉल्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. उद्देश सोशल डिस्टन्सिंग हाच होय. यामुळे मात्र केटरिंग व्यवसाय धोक्यात आला असून वर्षभरातील ३० ते ४५ टक्के रमजानमध्ये होणारा व्यवसाय लयास गेला आहे.
या रमजानमध्ये खरे गरजू शोधून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता आले पाहिजे. प्रत्येक मुस्लिम कुटुंबाने किमान एका व्यक्तीसाठी दोन वेळचे पोटभर जेवण देण्याचे सत्कर्म जरी घडवून आणले तरी हजचे पुण्य पदरी पडल्याचे भाग्य मिळू शकेल.
नमाजपूर्वी अजान देण्याच्या माध्यमातून मस्जिदीत प्रार्थनेकरिता येण्याचे आवाहन करण्यात येते. आता मात्र या कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी अजानमधून ‘घरातच नमाज अदा करा’ किंवा ‘जिथे असाल तिथेच नमाज अदा करा’ असे बदलाचे सुतोवाच संपूर्ण जगभरातून विशेषता मुस्लिम राष्ट्रांत स्वीकारण्यात आले आहे. ही खरोखरच इस्लामध्ये धार्मिक विधींबाबत विशिष्ट प्रसंगी सवलतीची पोचपावती म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
मुस्लिमांना मानवसेवा करण्याची इतिहासातील ही अनोखी संधी कोरोना अर्थात रमजानच्या निमित्ताने चालून आली आहे, तिचा सकारात्मकदृष्ट्या स्वीकार हा करावाच लागेल!

– अस्लम जमादार

संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *