जगात जितके धर्म आहेत. त्यातील प्रत्येक धर्माचे नामकरण एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या नावावरून केले गेले आहे. अथवा ज्या जातीत व ज्या राष्ट्रात त्या धर्माचा जन्म झाला त्याच्यावरून केले गेले आहे. उदाहरणार्थ धर्माचे नाव, येशू ख्रिस्तांशी निगडीत असलेल्या कारणाने ‘ख्रिश्चन’ धर्म असे केले गेले आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक महात्मा बुद्ध होते, म्हणून त्यांच्या नावावरून त्या धर्माचे नाव ‘बौद्ध’ धर्म असे ठेवले गेले. झरतुष्ट्र धर्माचे नाव, त्याचे संस्थापक ‘झरतुष्ट्र’ यांच्या नावावरून ठेवले गेले आहे. यहुदी (ज्यू) धर्म हा ‘यहुदा’ नामक एका विशिष्ट वंशात जन्मला म्हणून त्या धर्माचे नाव यहुदी धर्म असे ठेवले गेले. अशीच अवस्था अन्य धर्माच्या नावासंबंधी आहे. परंतु ‘इस्लाम’ चे वैशिष्ट्य असे आहे की, त्याचे नामकरण कोणत्याही व्यक्तीशी अथवा जाती अगर वंशाशी संबंधित नाही उलट त्याचे नामकरण एक विशिष्ट गुण प्रकट करते. या गुणाचा अविष्कार ‘इस्लाम’ शब्दाच्या अर्थामध्ये आढळतो. हे नामकरण स्वतःच असे स्पष्ट दर्शविते, की ते कोणाही व्यक्तीच्या बुद्धीची निपज नाही. तसेच कोणाही एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नाही. त्याचा संपर्क कोणाही व्यक्तीशी, देशाशी भूभागाशी अथवा जातीशी नाही. जनमानसात ‘इस्लाम’ चा गुणधर्म निर्माण करणे हाच त्याचा उद्देश आहे. प्रत्येक काळात व प्रत्येक जातीत व वंशात ज्या सज्जन व सद्वर्तनी लोकांमध्ये हा गुण आढळून आला ते सर्व मुस्लिम होते. मुस्लिम आहेत व पुढेही ते मुस्लिम असतील.
‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थ
अरबी भाषेत ‘इस्लाम’ शब्दाचा अर्थ संपूर्ण आत्मसमर्पण व संपूर्ण शरणागती तसेच आज्ञापालन असा आहे. (‘इस्लाम’ शब्दाचा दुसरा अर्थ, शांती, कुशलता, संरक्षण, शरण इ. मनुष्याला वास्तविक शांती त्याचवेळेस प्राप्त होते, जेव्हा तो स्वतःला अल्लाहपुढे अर्पण करून त्याच्याच आदेशानुसार जीवन व्यतीत करतो. अशाच जीवनाने मनशांती प्राप्त होते आणि समाजात खरी शांती नांदू लागते.) अल्लाहच्या आज्ञांचे पालन व त्यानुसार आचरण हाच इस्लाम आहे व म्हणूनच या धर्माचे नाव ‘इस्लाम’ असे ठेवले गेले आहे.
0 Comments