-अर्शिया शकील खान, नालासोपारा
प्राचीन काळापासून आजपर्यंत स्त्रियांचे स्थान, मर्यादा, हक्क मानसन्मान या बाबतीत नियमित चर्चा घडत आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रीला पापाची जजनी, नरकाचे घर आणि सर्व मानवी संकटांचे उगमस्थान मानले जाते. ग्रीसमध्ये तर बऱ्याच काळापर्यंत या विषयावर चर्चा होती की स्त्रियांच्या शरीरात आत्मा आहे की नाही. अरबस्थानात मुलगी जन्माला आली की तिला जिवंत गाडले जायचे. भारतामध्ये मृत पतीच्या चितेवर सतीच्या नावावर तिला जाळण्यात यायचे. प्रत्येक राष्ट्रात व प्रदेशात स्त्रियांची फार वाईट अवस्था होती.
अल्लाहने आपले अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यामार्फत स्त्रियांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारापासून मुक्त केले. अल्लाहने स्त्री व पुरुष यांना एका जीवापासून निर्माण केले गेले. दोघांना समान स्थान दिले. व्यावहारिक व सामाजिक घटनांमध्ये स्त्रियांच्या हक्कांना स्थान दिले जेणेकरून स्त्रियांचे शोषण होऊ नये. मालमत्तेत वारसाहक्क प्रदान करून आर्थिक सुरक्षा प्रदान केली.
‘‘स्त्रियांना त्याचप्रमाणे हक्काधिकार आहेत जसे पुरुषांचे हक्क त्यांच्यावर आहेत.’’ (सूरह अल बकरा – २२८)
अल्लाहने कुरआनमधील या आयतीद्वारे स्त्रियांच्या पूर्ण हक्कांची पूर्तता केली. तिला शिक्षण, प्रशिक्षणाचा अधिकार दिला. आपल्या पसंतीने लग्न करणे, पती व पत्नीमध्ये तणाव निर्माण होत असेल तर आणि एकत्र राहणे शक्य नसेल तर विभक्त होऊन दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली. विधवा स्त्रियांच्या दुसऱ्या विवाहाला अनुमती दिली गेली.
महान कवी अल्लामा इक्बाल म्हणतात की, ‘‘कदाचित जर मी मुस्लिम नसतो आणि हे मान्य केले नसते की कुरआन हा ईशग्रंथ आहे, तर मग माझे मत असे असते की हा ग्रंथ कोणा बुद्धिवान स्त्रीकडून लिहिला गेला असावा. कारण कुरआनात स्त्रियांना इतके अधिकार दिले गेले आहेत की जे जगातील कुठल्याही धर्मात आढळत नाहीत.’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणींना प्रोत्साहन देताना ई. उरम्हगंम म्हणतो, ‘‘इस्लामच्या आधी स्त्रियांना खरा अभिमान व दर्जा प्राप्त नव्हता. चो मुहम्मद (स.) याच्या शिकवणींनंतर त्यांना मिळाला.’’
तसेच डी. बलॉडनने आपले पुस्तक ‘सुन्नत नबवी व जदीद सायन्स’मध्ये नमूद केले की ‘‘इस्लामने स्त्रियांना जे हक्क प्रदान केले ते इतिहासात कुठेही आढळत नाहीत.’’
सध्या ‘तलाक’चा मुद्दा खूप चर्चिला जात आहे. तलाक स्त्रियांवर अत्याचार आहे. वगैरे!
‘तलाक’ म्हणजे विवाहबंधनातून मुक्त होणे. तलाक हे विवाहबंधनातून मुक्त होण्याचे पहिले पाऊल नव्हे तर अंतिम पाऊल आहे. हा हक्क पती व पत्नी दोघांना देण्यात आला आहे. स्त्रीने घेतलेल्या तलाकला ‘खुलअ’ म्हणतात. वैवाहिक जीवनात पती-पत्नींमध्ये स्वाभाविक भिन्नता, दुराचार, संकुचितपणा, एकत्र कुटुंब व्यवस्था अशा बऱ्याच कारणांमुळे विवाद झाले आणि मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे एकत्र राहणे अवघड होऊन बसले. इस्लामने तलाकची परवानगी दिली. थोडक्यात जखम असह्य झाली तर तो अवयव कापून टाकणे क्रमप्राप्त ठरते. इस्लाम ताबडतोब कारवाई करण्याचा आदेश देत नाही. कोणत्या वाईट प्रथेला नीट करण्याचे उपाय सुचवितो. नंतर नाइलाज झाला तरच ही अंतिम कारवाई किंवा शिक्षेचा आदेश देतो.
उदा. तलाकचा अगोदर वाद मिटविण्यासाठी असा उपाय सुचविण्यात आला आहे की पत्नीची समजूत घालावी. जर प्रतिसाद मिळाला नाही तर पती व पत्नीच्या नातेवाईकांकडून एक एक सदस्य नियुक्त करून मतभेदांची चौकशी करण्यात यावी आणि उपाय सुचविण्यास सांगावे. अर्थात अल्लाहने आपल्या कायद्यानुसार मानसाच्या चांगल्या जीवनाचा प्रारंभ केला आहे. आपल्याला त्याची जाणीव ठेवली पाहिजे. इस्लामी शिकवणींवर विचारमंथन केल्याने नक्कीच इस्लाम हा स्त्रियांचा रक्षक असल्याची आपली खात्री पटेल.
0 Comments