Home A blog A इस्लाम : धर्म नव्हे जीवनद्धती

इस्लाम : धर्म नव्हे जीवनद्धती

 

Islam

बहुतेक मुस्लिमांना इस्लाम एक धर्म (मजहब) म्हणून मान्य आहे मात्र एक जीवनव्यवस्था  (दीन) असल्याची त्यांना जाणीव नाही, अशी परिस्थिती आहे. याला  कारणीभूत पश्चिमी विचारसरणी आहे, ज्यात जीवनव्यवस्थेला धर्मापासून दूर ठेवलेले आहे. वास्तविक पाहता धर्माला राजनीतिमध्ये मान्यता दिल्याशिवाय न्यायाची स्थापनाच होऊ शकत नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये ख्रिश्चन समुदायाने धर्मसत्तेला चर्चमध्ये कोंडून प्रत्यक्ष जीवनामध्ये भांडवलशाही व्यवस्थेचा  स्वीकार केलेला आहे. त्यांच्यासाठी धर्म फक्त संडे प्रेयर पर्यंत संकुचित झालेला आहे. पाश्चिमात्य पद्धतीने शिक्षण घेतलेल्या मुस्लिमांनासुद्धा वाटते की इस्लाम फक्त मस्जिदीपुरता मर्यादित राहावा बाकी जीवनामध्ये त्यांना भांडवलशाही व्यवस्थेप्रमाणे जगण्याची मुभा मिळावी. म्हणूनच इस्लामच्या नावाने स्थापन झालेल्या पाकिस्तानमध्ये 68 वर्षानंतरसुद्धा इस्लामी व्यवस्था आलेली नाही. त्यांची शासन व्यवस्था, न्यायव्यवस्था  ब्रिटीश कायद्याप्रमाणे चालू आहे. घरेलू तंट्यामध्ये थोडा-फार  शरियतचा उपयोग केला जातो. बाकी  सारे खटले ब्रिटीश दिवाणी आणि  फौजदारी कायद्याप्रमाणे चालतात. जी  गत पाकिस्तानची तीच बांग्लादेशची. त्या देशातील सर्व कारभार ब्रिटीश पद्धतीने चालतो.

एवढेच नव्हे तर मध्यपुर्वे तील सर्व मुस्लिम देश, त्यात सऊदी अरबसारख्या कट्टर मुस्लिम देशाची  व्यवस्था फक्त इस्लामच्या नागरी आणि फौजदारी कायद्याप्रमाणे चालत नाही. तेथे आज 21 व्या शतकातही किंग्डम (राजेशाही) अस्तित्वात आहे. इस्लामी लोकशाही नाही. जगात अस्तित्वात असलेल्या 56 मुस्लिम देशांपैकी एकाही देशात इस्लामी जीवनव्यवस्था अस्तित्वात नाही. सकृतदर्शनी मुसलमान इस्लामचे गुणगान करताना थकत नाहीत. इस्लामसंबंधी मोठमोठी पुस्तके लिहिलेली आहेत. प्रभावि भाषणे केली जातात. मस्जिदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रार्थना केली जाते. रमजानचे रोजे ठेवले जातात. कोट्यवधींची जकात काढली जाते. लाखोंच्या       इस्लाम :

संख्येत मुस्लिम हजला जातात. या सर्व धार्मिक गतिविधींमध्ये मुसलमान हिरहिरीने भाग घेतात, मात्र जीवनव्यवस्था म्हणून इस्लामबद्दल चर्चा सुरू झाली की त्यांना ते रुचत नाही, असे का? आज याच विषयावर आपण चर्चा करू. 

मुळात बाराव्या शतकापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिम समाज एक सत्ताधारी समाज म्हणून जगाला परिचित होता. त्या काळात अस्तित्वात असलेले आधुनिक ज्ञान आणि विज्ञान मुस्लिमांकडेच होते. म्हणूनच ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये लढल्या गेलेल्या अनेक क्रुसेड वॉरमध्ये मुस्लिमांनी ख्रिश्चनांचा पराभव केला. या सततच्या पराभवानंतर मात्र परिस्थिती बदलली. ख्रिश्चन समाजाने युद्ध बंद करून आपले लक्ष औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती, विज्ञान आणि तंत्रज्ञान याकडे केंद्रीत केले. याउलट मुस्लिमांनी विजयश्रीच्या उन्मादामध्ये शेरोशायरी, भवननिर्मिती, कला, संगीत इत्यादी क्षेत्रांमध्ये आपले लक्ष केंद्रित केले. धर्मसत्तेच्या प्रतिनिधींनी म्हणजेच उलेमांनी आपल्यासाठी मदरसे हे कार्यक्षेत्र म्हणून निवडले. येणेप्रमाणे मुस्लिम समाज दोन भागांत विभागला गेला. एक सत्ताधारी लोक, कला, संगीत इत्यादीमध्ये रममान झाले, दुसरे उलेमा हजरात मदरशांमध्ये व्यस्त झाले. 

औद्योगिक क्रांतीनंतर ख्रिश्चन समाज पूर्ण ताकदीनिशी पुन्हा मैदानात आला. यावेळेस त्यांनी मुस्लिम जगतावर दुहेरी हल्ला केला. एक आधुनिक हत्यारांनी व दुसरा आधुनिक विचारांनी. ख्रिश्चनांनी मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील साहित्य आणि सिनेमाच्या माध्यमातून जगातील सर्वच लोकांना अश्लीलतेच्या मार्गावर खेचून आणले. त्यात मुस्लिमही खेचले गेले. राजकारणापासून धर्म वेगळे करण्याचा सिद्धान्त मांडला. सर्वांप्रमाणे मुस्लिमांनाही तो आवडला. मुस्लिमांची जी मुख्य शक्ती होती ती त्यांच्या विचारधारेत होती. विचारधारेमुळे ते चारित्र्यवान होते म्हणून बलवान होते. मनोरंजनाच्या नावाखाली पसरलेल्या अश्लीलतेमुळे इतर समाजांप्रमाणे मुसलमानही प्रभावित झाले. त्यांची अख्लाकी (नैतिक) शक्ती कमकुवत झाली. त्यातच बंदुकीचा शोध लागल्याने बंदूक ही तलवारीपेक्षा प्रभावशाली झाली. बंदूक आणि अश्लीलता या दोन शस्त्रांद्वारे ख्रिश्चनांनी मुस्लिमांवर हल्ले केले. या दुहेरी आक्रमणांसमोर मुसलमानांचा टिकाव लागला नाही. शेकडो वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या पतनामुळे मुसलमानांच्या चारित्र्याची पाळेमुळे कमकुवत झाली. त्यांच्यामधील तकवा (चांगले चारित्र्य) कमी झाला. हेच कारण आहे की, इस्लामचा मनापासून स्वीकार करूनही, इस्लामी व्यवस्थेला त्यांचा विरोध असतो. इस्लामी जीवनव्यवस्थेला आपल्यामध्ये लागू करण्यासाठी जो सततचा त्याग करावा लागतो तो त्याग करण्याची तयारी आजच्या मुस्लिमांमध्ये नाही. इस्लामविषयी त्यांचे प्रेम कमी होत नाही परंतु त्याग करण्याची तयारीही नाही. अशा द्विधा अवस्थेमध्ये जागतिक मुसलमान जगत आहे. केवळ भाषणबाजीपुरता इस्लाम त्यांच्यामध्ये उरलेला आहे. भावनिक भाषण देण्यामध्ये मुस्लिमांना तोड नाही. लाखों लोकांना आपल्या भाषणामधून ते खिळवून ठेऊ शकतात. मात्र शुद्ध इस्लामी जीवन जगण्यासाठी जो निश्चय लागतो, तो त्यांच्यात राहिलेला नाही. मुसलमान अशा जीवनव्यवस्थेचे गुलाम बनलेले आहेत, जी इस्लामी आणि गैरइस्लामी मूल्यांमध्ये तडजोड करून निर्माण झालेली आहे. सद्यःपरिस्थितीत बहुतेक मुस्लिमांची स्थिती त्या जंगली घोड्यासारखी झालेली आहे जो जन्मापासून स्वतंत्र राहण्याच्या सवयीचा आहे.  

माणसांच्या गतिविधींना प्रेरणा त्या सिद्धान्तामधून मिळत असते ज्या सिद्धान्तावर ते विश्वास ठेवतात. अन्य समुदाय आधुनिक सुखसुविधा मिळविणे आणि जीवनमान उंचावणे या उद्देशासाठी जगत आहेत. याला उर्दूमध्ये जिंदगी बराए जिंदगी असे म्हणतात. म्हणून अशा समुदायाच्या जीवनामध्ये ऐशोआराम, मनोरंजन, नशा आदी गोष्टी स्वीकार्ह असतात. किंबहुना या गोष्टींना त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असते. जगातील सर्व सुखसुविधा त्यांना हव्या असतात. त्या मिळविण्यासाठी ते गरिबांचे शोषणसुद्धा करीत असतात. हे शोषण करण्यासाठी त्यांनी एक अर्थव्यवस्था तयार केलेली आहे, जी व्याजावर आधारित आहे.  यात गरीब अधिक गरीब होत जातात व श्रीमंत अधिक श्रीमंत. 

या उलट मुस्लिम समाजाला कुरआनने एक उद्देश दिलेला आहे तो म्हणजे समस्त मानवजातीचे कल्याण. या उद्देशासाठी जगणे आणि याच उद्देशासाठी मरणे हे त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. यालाच उर्दूमध्ये जिंदगी बराए बंदगी असे म्हणतात. मानव कल्याणासारखा श्रेष्ठ उद्देश साध्य करण्यासाठी उच्च नीतीमूल्यांची, उच्च चारित्र्याची गरज असते. त्यात मनोरंजन, अश्लिलता, नशेला स्थान नसते. हा उद्देश साध्य करण्यासाठी व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा सिद्धान्त इस्लाम सादर करतो. पश्चिमेकडून आलेला भोगवादी विचार व मध्यपूर्वेतून आलेला मानवतेच्या कल्याणाचा विचार या दोघांमध्ये गेल्या चौदाशे वर्षांपासून संघर्ष चालू आहे. पश्चिमेचा विचार स्वार्थी आहे. मी माझे कुटुंब इतपर्यंत संकुचित आहे. याउलट मध्यपूर्वेतून आलेला इस्लामी विचार सर्वसमावेशक आहे. स्वार्थाच्या वर उठून इतरांच्या कल्याणासाठी झटण्याचे त्याचे मनसुबे आहेत.

इस्लामी जीवन ज्याचा उद्देश मानवकल्याणासारखा उच्च विचार असल्यामुळे त्यात दर्जाहीन गोष्टींना स्थान नाही. मुसलमान याच ठिकाणी कच खात आहेत. त्यांना इतर समाजाप्रमाणे जीवनाच्या सर्वच चवी चाखायच्या आहेत, सोबत इस्लामही त्यांना हवाय. या परस्परविरोधी वैचारिक संघर्षातून फार कमी लोक आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये शुद्ध इस्लाम अस्तित्वात आहे. बाकी  सर्वांची वाटचाल इस्लाम आणि गैरइस्लाम यांच्या तडजोडीतून सुरू आहे. बहुतेक मुसलमान मानवकल्याणाच्या आपल्या मूलभूत उद्देशापासून भटकलेले आहेत. म्हणून महत्त्वहीन झालेले आहेत. त्यांच्यामध्ये दिवसेंदिवस सर्वशक्तिमान अल्लाहच्या इतायती (आज्ञापालन) ची शक्ती क्षीण होत आहे. त्यामुळे त्यांच्यात रूहानियत (आत्मीक शक्ती) कमी होत आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचा पराभव होत आहे. मग ज्या ठिकाणी ते अल्पसंख्येत आहेत त्या ठिकाणीही आणि ज्या ठिकाणी ते बहुसंख्येत आहेत त्या ठिकाणीही. 

सर्वसाधारण मुस्लिमांच्या नजरेमध्ये आज त्याच मुस्लिमांना सन्मान आहे, ज्यांनी भौतिक क्षेत्रात असाधारण यश प्राप्त केलेले आहे. उदाहरणार्थ सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, ए.आर.रहमान इत्यादी. हे लोक आज मुस्लिम युवकांचे आयकॉन बनलेले आहेत. कारण या लोकांनी इतर लोकांच्या तुलनेत सिनेक्षेत्रात असाधारण असे यश प्राप्त केलेले आहे. मुस्लिम युवक याकडे लक्षच द्यायला तयार नाहीत की या लोकांनी इस्लामी तत्त्वांचा बळी देऊन हे यश प्राप्त केलेले आहे. इस्लामच्या मूळ उद्देशापासून घेतलेली फारकत हीच मुस्लिम समाजाच्या अधोगतीचे मूळ कारण आहे. 

आज इफलास ने खायी है जरो सीम से मात 

लेकिन इसमें तेरे जलवों का कोई दोष नहीं

ये तगय्युर इसी माहोल का परवर्दा है

अपनी बेरंग तबाही का जिसे होश नहीं!

कुठलाही आनंद माणसाच्या विचारांच्या दर्जावर 

आधारित असतो आणि विचारांचा सर्वोच्च दर्जा इस्लाम आहे. जो या रहस्यापर्यंत पोहचेल तो जिंकेल. इबादती (उपासना) जर सोडल्या तर आज मुस्लिमांच्या जीवनामध्ये असली कुठलीही गोष्ट नाही जी शुद्ध इस्लामच्या पायावर उभी असेल. अर्थव्यवस्था नाही, राजनीतिक व्यवस्था नाही की सामाजिक व्यवस्था नाही. वास्तविक पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यात लढाई नाहीच. लढाई आहे ती इस्लाम आणि भांडवलशाही जीवनव्यवस्थेमध्ये. एकीकडे ख्रिश्चन विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असा गतिशील समाज आहे, तर दूसरीकडे मुस्लिम या गोष्टींपासून दूर आणि जड वादात जखडलेला समाज झालेला आहे. त्यामुळे या दोघांमधील लढाई एकतर्फी होत आहे. म्हणूनच अफगानिस्तान, इराक, सीरियासारखे मुस्लिम देश एकापाठोपाठ उद्ध्वस्त होत आहेत. या पराजयाला घाबरून कोट्यवधी मुसलमान पाश्चिमात्य सभ्यतेकडे ओढले जात आहेत. त्यांच्याच विचारांना, त्यांच्याच शिक्षण पद्धतीला अंगीकारत आहेत. त्यांच्याचसारखे खात आहेत, त्यांच्याचसारखे पीत आहेत, त्यांच्याचसारखे राहत आहेत, त्यांचाचसारखा वेष करत आहेत, त्यांच्याचसारखे गात आहेत, त्यांच्याचसारखे नाचत आहेत. थोडक्यात पश्चिमेकडून जे-जे येईल ते-ते आधुनिक आणि तारक असा समज मुस्लिमांनी  करून घेतलेला आहे. आपल्या अपयशाला ते इस्लामचे अपयश समजत आहेत. वास्तविक पाहता इस्लामची शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, न्याय व्यवस्था, कायदा व्यवस्था, सामाजिक व्यवस्था हीच मानवाच्या हिताची व्यवस्था आहे. यावर त्यांचा विश्वास असावयास हवा होता आणि त्या विश्वासातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून त्यांनी जगाला दाखवून द्यायला पाहिजे होते की, मानवतेच्या कल्याणाचा अंतिम मार्ग हा इस्लामी सिद्धान्तातूनच जातो. भांडवलशाही सिद्धान्तातून नव्हे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर पराजय मुस्लिमांचा होत आहे. परंतु जागतिक माध्यमांनी हा पराजय इस्लामचा आहे, असा देखावा तयार केला आहे. यामुळे ज्यांचा इस्लामी सिद्धान्तांवर विश्वास आहे, त्यांचासुद्धा आत्मविश्वासही कमी होत आहे. यावर एकच उपाय आहे, इज्तेहाद. म्हणजे कुरआन आणि हदीसच्या चौकटीत सध्याच्या जागतिक परिस्थितीचे विश्लेषण करून त्यावर उपाय शोधणे. इस्लामने कधीच आधुनिक शिक्षेचा विरोध केलेला नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करण्यास कधीही आडकाठी केलेली नाही. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ज्ञान हस्तगत करण्यासाठी गरज पडल्यास चीनपर्यंत जा, असा आदेश देऊन ठेवलेला आहे. स्पष्ट आहे त्या काळात चीनमध्ये इस्लामचे ज्ञान नव्हतेच. म्हणून या ठिकाणी विज्ञान आणि इतर ज्ञान अभिप्रेत आहे. प्रेषितांची दूरदृष्टीचा साक्षात्कार आज आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. तो असा की, चीन आज तंत्रज्ञानामध्ये जगामध्ये सगळ्यात पुढे आहे असे म्हटलें तरी वावगे ठरणार नाही. मुळात इस्लामच्या कोंदनात आधुनिक तंत्रज्ञानाचा हिरा बसविला तर मुस्लिम निर्विवादपणे जगात सर्वसक्षम लोकसमुह म्हणून पुढे येईल. यात माझ्यातरी मनात शंका नाही. हीच गोष्ट सर सय्यद अहमद यांनी वेळीच ओळखलेली होती. म्हणूनच त्यांनी अलिगढमध्ये आधुनिक शिक्षण संस्था सुरू केली होती. जी पुढे अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून नावारूपाला आली. त्यांची इच्छा होती की मुस्लिम युवकांच्या एका हातात कुरआन तर दुसऱ्या हातात विज्ञानाचे पुस्तक असावे.

ख्रिश्चन समाज जरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज जगात क्रमांक एक वर असेल. तरी मात्र त्यांच्या जीवनातून नीतीमूल्यांचा ऱ्हास झालेला आहे. तो समाज मानवतेला उपकारक होणे तर दूरच पृथ्वीला नष्ट करण्याइतपत धोकादायक झालेला आहे. एका मागून एक देश उद्ध्वस्त करत निघालेला आहे. खनिज तेलासाठी त्याने मध्यपूर्वेच्या अनेक देशांना आपल्या पाशवी पंजामध्ये जखडून ठेवलेले आहे. नैतिकतेने रिता समाज मानवतेसाठी धोकादायक असतो. पाश्चिमात्य देशांचे आजकाल तसेच झालेले आहे. सीरिया, म्यानमार, पॅलेस्टीनमध्ये जे काही सुरू आहे, त्याचे कोणत्याही दृष्टिकोनातून समर्थन करता येणार नाही. लाखो निरपराध नागरिक मारले गेलेले आहेत. लाखो विस्थापित झालेले आहेत. तरी परंतु, संयुक्त राष्ट्र गप्प आहे, मीडिया शांत आहे. मुस्लिमांना कमाल (उत्कृष्टता) करण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. फक्त शुद्ध इस्लामी आचरणाने ते कमाल करून दाखवू शकतात. इस्लामी आचरण आणि आधुनिक शिक्षण यांच्या संयोगातून निर्माण झालेला आधुनिक मुस्लिम समाज हाच जगाला भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडविण्यास सक्षम समाज असेल, यात शंका नाही. मुस्लिम देशांकडे पैशाची कमी नाही. फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. भारतातही मुस्लिमांकडे पैशाची कमी नाही. देशभरात साजरी होणाऱ्या ईदुल अजहाच्या पहिल्या दिवसाच्या कुरबानीचे कातडे जरी विकले तरी दरवर्षी देशात एक नवीन खाजगी विद्यापीठ सुरू करता येईल एवढा सक्षम हा समाज आहे. जकात व्यवस्थेचे पुनर्गठन, औकाफच्या संपत्तीचे व्यवस्थापन इस्लामी तत्त्वानुसार केले गेले तरी कुठलेही साहाय्य न घेता, भारतीय मुस्लिम समाज एक आधुनिक मुस्लिम समाज म्हणून नावारूपाला येऊ शकतो. मुस्लिम जगतात सध्या जे नेतृत्व अस्तित्वात आहे, ते अपयशी ठरलेले आहे. दीन आणि दुनियाची व्यापक समज असणारे नेतृत्व मोठ्या प्रमाणात उदयास येण्याची आवश्यकता आहे. शेवटी सर्वशक्तिमान अल्लाहकडे दुआ करतो की, जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर या सर्व आव्हानांना सामोरे जाईल असे नेतृत्व उदयास येवो आणि आपल्या सर्वांनाही या सर्व परिस्थितीचे आकलन होवो व त्यावर उपाय करण्याची सद्बुद्धी व हिेंमत मिळो.(आमीन).

– एम.आय.शेख

9764000737

संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *