Home A blog A इस्लाम ज्ञात आणि अज्ञात

इस्लाम ज्ञात आणि अज्ञात

इस्लामवरील पुस्तकाची चर्चा अलीकडे मराठी भाषकांमध्ये होताना दिसत आहे. मराठी भाषकांसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिलेले कदाचित हे पहिलेच पुस्तक असावे. यापूर्वी मराठीमध्ये  इस्लामवरील अनेक अनुवादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. पण स्वतंत्र असे पुस्तक स्वरूपात इस्लामवर लेखन झालेले आढळत नाही, त्यामुळे अब्दुल कादर मुकादम यांचे हे  पुस्तक महत्त्वाचे ठरते. मुकादम कोकणी मुस्लिम असल्यामुळे साहजिकच पुस्तकाची भाषा ओघवती व रसाळ अशी आहे. शिवाय त्यांचे इस्लामवरील ४० वर्षांचे चिंतन सार स्वरूपात  या पुस्तकात आलेले आहे. या पुस्तकातून त्यांनी इस्लामी न्यायशास्त्र, इस्लामची पाश्र्वभूमी, मुहंमद (स) पैगंबर यांचा जन्म, हिजरत, त्या काळची आदर्श राजकीय व्यवस्थेची  प्रस्थापना; असे विविध विषय मराठी भाषकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. या व्यतिरिक्त इस्लाममधील नेहमी चर्चेत असणाऱ्या घटकांचा उहापोहदेखील त्यांनी या पुस्तकात केलेला  आहे. तसेच शरीयत, बुरखा पद्धती, तलाक, महिलांचे स्थान, कुटुंब नियोजन, इस्लामिक बँकिंग, युद्ध परंपरा आणि जिहाद आदी घटकांचा समावेश यात आहे.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच इस्लामपूर्वकाळ म्हणजे ‘जाहिलियाँ’ (अज्ञानयुग) मधील लोकसंस्कृती व समाजजीवनाचे सविस्तर विवेचन आलेले आहे. अरब वाळवंटी प्रदेशात अन्नासाठी  वणवण भटकणे तिथल्या सामाजिक जीवनाचे स्वरूप होते. निसर्गाने लादलेल्या या भटक्या जीवनशैलीमुळे ‘तंबूत राहणारे लोक’ हीच त्यांची ‘ओळख’ व ‘अस्मिता’ होती. इस्लामपूर्व   काळात अरबस्थानातील जनजातीसमूह मूर्तिपूजक होते. मक्केत सर्व टोळ्यांची महत्त्वाची मंदिरे होती. या मंदिरात दानाच्या स्वरूपात मिळणारी संपत्ती मोठी असे. मंदिराचे व्यवस्थापन  व पर्यायाने मंदिराच्या संपत्तीचा विनियोग करण्याचे अधिकार मक्केतील श्रीमंत व्यापाऱ्यांच्या हातात होते. याचा अर्थ असा की मक्केतील सामाजिक राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेवर   या व्यापाऱ्यांचा प्रभाव होता. दुसरीकडे व्यापाराबरोबर त्यांची कामे करणारा कष्टकऱ्यांचा एक वर्गही तिथे उदयास आलेला होता. हा वर्ग अन्न-वस्त्र-निवारा या प्राथमिक गरजा कशा भागवायच्या अशा विवंचनेत होता. कष्टकरी, शेतमजूर आणि शोषितवर्ग अशी मक्केतील तत्कालीन समाजव्यवस्था होती. श्रीमंत व्यापाऱ्यांकडून कष्टकरीवर्गाचे शोषण होत असे. अन्याय, जुलूम अंगभूत असलेल्या या समाजाचे नियंत्रण करणारी कोणतीही शासनव्यवस्था अस्तित्वात नव्हती.
इसवी सन ६१० मध्ये रमजानच्या एका पवित्र रात्री मक्केजवळच्या हिरा नावाच्या गुहेत मुहंमद (स) पैगंबरांना ईश्वरी साक्षात्कार झाला. हा क्षण इस्लामच्या जन्माचा व कुरआनच्या  प्रकटीकरणाचा होता. इस्लामसारख्या नव्या धर्माचा उदय ही जगभरातील क्रांतिकारी घटना होती. इस्लामने नैतिकता व मानवी मूल्यांचे आरोपण जगात प्रथमच केले होते. समता,  स्वातंत्र्य आणि बंधुता ही तत्त्वेदेखील इस्लामने प्रथमच आणली होती.
इस्लामची दोन वैशिष्ट्ये होती. मूर्तिपूजेवर आधारित असलेल्या पारंपरिक धर्माचा अंत करून त्याजागी एकेश्वरी निराकार अल्लाहची आराधना करण्याची दीक्षा देणे, दुसरे म्हणजे, अनेक  टोळ्यांमध्ये विखुरलेल्या आणि प्रत्येक टोळीची स्वतंत्र अस्मिता व स्वातंत्र्य नष्ट करून समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित नवसमाजाची उभारणी करणे. या प्रक्रियेमुळे  साहजिकच मक्केतील श्रीमंत गर्भश्रीमंत व्यापाऱ्यांच्या परंपरागत आर्थिक हितसंबंधांना आव्हान उभे राहिले. बदलाला व परिवर्तनाला त्यांचा कठोर विरोध होता.
हा विरोध दिवसागणिक आक्रमक व हिंसक होत गेला. परिणामी त्या दहा-बारा वर्षांच्या कालखंडात या दोन पक्षांत ४ युद्धे झाली. त्यातील पहिल्या बदरच्या युद्धात पैगंबरांना माघार  घ्यावी लागली. पण नंतरची तीन युद्ध मात्र त्यांनी जिंकली. शेवटचे युद्धात मक्केतील श्रीमंत व्यापारी बिनशर्त शरण आले होते. सर्वांनी स्वखुशीने इस्लामचा स्वीकार केला.
अशा रीतीने पैगंबरांनी मक्केत आणि पर्यायाने अरबस्थानात सामाजिक क्रांतीबरोबरच स्थानिकांना एकेश्वरत्वाची दीक्षा देऊन आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. विविध टोळ्यांत विखुरलेल्या विविध जनजातीत समता व न्याय या मूल्यांवर आधारित एकसंघ समाज निर्माण केला. त्याचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी आदर्श अचारसंहिता (शरीयत)  निर्माण  केली. तसेच श्रीमंत आणि गरीब या वर्गातील विभागलेल्या अरबी समाजात बंधुत्वावर आधारित एकसंघ समाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न पैगंबरांनी केला. फक्त नवा समाज  निर्माण करून भागणार नव्हते. तर आदर्शवत राजकीय व्यवस्थेच्या प्रस्थापनेचे अभूतपूर्व कार्य प्रेषितांनी केले. इस्लामपूर्व कालत अरबी समाजात कसलेच कायदेकानू किंवा नीती  नियमन अस्तित्वात नव्हते. त्यामुळे अरब समाज समाजात दांभिकता व अनैतिकता फोफावली होती. यावर नियंत्रण मिळवण्याचे काम प्रेषितांनी केले. इस्लामचा प्रसार वाढत होता.  इराक, इराण, इजिप्त, जॉर्डन, सीरिया येमेन यांसारख्या प्रदेशात इस्लामचा प्रसार झाला. या प्रादेशिक व्याप्तीमुळे अल्लाह, पैगंबर व कुरआनवर श्रद्धा, नमाज, रोजा, दानधर्म आणि  हजयात्रा या इस्लामच्या पाच मूलभूत तत्त्वांचा निष्ठापूर्वक स्वीकार करताना, या नवमुस्लिमांच्या प्रादेशिक अस्मिता, प्रथा, परंपरा आणि व्यावहारिक गरजा यांचा प्रभाव नव्या  व्यवस्थेवर पडत गेला. विशेष म्हणजे आफ्रिकन देशांमध्ये इस्लामचा प्रसार-प्रचार स्थानिक अस्मिता व व्यावहारिक गरजा लक्षात घेऊन होत गेला. अगदी हीच अवस्था भारतातही दिसून  आली. चातुर्वण्र्य व्यवस्थेने ग्रासलेल्या पीडित शोषित समाजाने जगण्याचा आदर्श व्यवहार म्हणून इस्लामकडे पाहिले व धर्मांतरीत झाले. यासंदर्भात या पुस्तकात विवेचन आले आहे.  अनेकांनी आपल्या पूर्वाश्रमीचा धर्माचा त्याग केला व इस्लाममध्ये दाखल झाले. अशा विविध धर्म समुदाय इस्लाममध्ये आले. पण त्यांनी आपल्या रूढी, प्रथा, परंपरा, अस्मिता,  प्रादेशिक व्यवहार मात्र तसाच ठेवला. तसेच धर्म बदलल्याने व्यवसाय बदलला नाही. रोजीरोटीच्या आहे तोच व्यवसाय त्यांनी स्वीकारला. अशा पद्धतीने भारतात प्रादेशिक इस्लामचा  उदय झाला. या संबधीची विस्तृत चर्चा मुकादम यांनी पुस्तकात केलेली आहे.
संबंधित पुस्तकातील इस्लामचा अर्थ विचार या प्रकरणात इस्लामच्या उदयानंतर आदर्श राजकीय व्यवस्थेच्या प्रस्थापनेशी संबंधित सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच  इस्लामिक बँकिंगची तर्कसंगत मांडणीदेखील या प्रकरणातली वाचनीय असा भाग आहे. वाचकांनी हे प्रकरण प्रामुख्याने वाचायला हवे. संबंधित पुस्तकात मुकादम यांनी इस्लामच्या  चार  नीतीसूत्रांची सविस्तर चर्चा केलेली आहे. इतकेच नव्हे तर त्याचे तर्कसंगत निष्कर्षही त्यांनी आपल्या लेखनातून काढले आहेत. न्यायशास्त्राच्या विकासात मानवी बुद्धीला असलेले स्थान  त्यांनी आपल्या अभ्यासातून अधोरेखित केले आहे. इस्लामविषयीची भारतीय मिथकांची चर्चादेखील सदरील पुस्तकात मुकादम यांनी केलेली आहे. लेखकाने नुसते इस्लामचे गौरवीकरण  केले नाही तर इस्लामची तर्कसंगत मांडणी व तत्त्वज्ञानाची सविस्तर चर्चा केली आहे. मराठीमध्ये इस्लामी तत्त्वज्ञानाची चर्चा फारशी कोणी केलेली आढळत नाही. पण सदरील  लेखकाने संबंधित पुस्तकात समता, स्वातंत्र्य, बंधुता व मानवी मूल्यांवर आधारित नवसमाजनिर्मितीच्या पायाभरणीची चर्चा करताना निसर्गाचे मानवाशी असलेले नाते, नैसर्गिक  साधनसंपत्तीचा विनियोग, धनसंचय, न्यायशास्त्र इत्यादी संदर्भात इस्लामिक तत्त्वज्ञानाची चर्चा लेखकाने केलेली आहे. तसेच पाश्चात्त्य विचारवंतांनी इस्लामची मंडणी करताना केलेल्या  चुकादेखील लेखकाने दाखवून दिलेल्या आहेत. शिवाय अनेक पाश्चात्य विचारवंतांनी इस्लामबद्दल मत व्यक्त केलेली मते व इस्लामच्या गौरवाची परंपरा उल्लेखित केलेली आहे. इस्लामबद्दल एकांगी मते पेरणाऱ्या कथित लेखकरावांची कारस्थानेदेखील मुकादम यांनी उघडकीस आणली आहेत. मराठीतल्या लेखकांनी इस्लामचा अन्वयार्थ लावताना अनेक ठिकाणी  थापा मारलेल्या आहेत, असेही लेखकाने अनेक पुरावे देऊन स्पष्ट केलेले आहे. इस्लामच्या अभ्यासाची विपुल साधने असतानादेखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करून इस्लामचे एकांगी व  आन्यायी चित्रण मराठी लेखकांनी केलेले आहे, या संदर्भात लेखकाने केवळ त्यांच्या लेखनाची चिरफाडच केली नाही तर संबंधित विचार तर्कसंगतीने स्पष्ट करून व उकल करून  विश्लेषण केलेले आहे. युद्ध आणि जिहाद संदर्भात अनेक लेखकांनी धर्मवादी व पूर्वग्रहदूषित मांडणी केलेली आहे, हे करताना त्यांनी इतर धर्म समुदायांमध्ये झाली धर्मयुद्धे यांना सपेशल  दुर्लक्षित केली आहेत. ख्रिश्चन, ज्यू धर्मांमध्ये झालेल्या धर्मयुद्धाने (क्रुसेड) लाखो निष्पाप माणसे मारली गेली. शिवाय हिंदूधर्म पद्धतीत झालेल्या धर्मयुद्धामुळेदेखील अशाच प्रकारची  निष्पाप लोक मारली गेली आहे; यासंदर्भातले विवेचन मराठी लेखकांनी कुठेही केलेले आढळत नाही. पण इस्लामचा युद्धाशी व दहशतवादाची संबंध जोडून त्याला बदनाम करण्याचे  कारस्थान याच लेखक मंडळींनी केले आहे, याची अनेक उदाहरणे अब्दुल कादर मुकादम यांनी संबंधित पुस्तकात दिलेली आहेत.
शिवाय इस्लामचे आधुनिक भाष्यकार असगरअली इंजिनिअर यांचे अनेक उद्धरणे संबंधित पुस्तकात अनेक ठिकाणी आलेली आहेत. पुस्तकाच्या शेवटी वहाबीझमची तर्कसंगत चिकित्सा  लेखकाने केलेली आहे. कुटंबनियोजन, बुरखा, तिहेरी तलाक, विवाह विधी इत्यादी विषय अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने हाताळले आहेत. उपरोक्त पुस्तकांत जागतिक स्वरूप पातलrवर  इस्लामचे होणारे शत्रूकरण व त्याची कारणमीमांसा केलेली आहे. पेट्रो डॉलरमुळे जागतिक पातळीवर इस्लामचा अपप्रचार व दुष्प्रचार करण्याची प्रथा गेल्या ३०-४० वर्षापासून रुजत आहे.  परंपरावादाचे आरोप ठेवून, दहशतवादी कारवायांचा ठपका ठेवून, दृष्कृत्याला अर्थसहाय्य पुरवल्याचे निराधार आरोप ठेवून, इस्लामिक राष्ट्रांना असुरक्षित करून भांडवलशाहीप्रणित वर्चस्ववादाचा बडका उगारायचा व स्थानिक नैसर्गिक साधनांवर साधने बळकावायची असे धोरण गेल्या काही दशकांपासून जगभरात पाहायला मिळत आहे. यासंदर्भात गेल्या तीस-चाळीस  वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लिहिले गेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पाश्चात्य विद्वानांनी इस्लामच्या शत्रूकरणाचे केलेले कट मुकादम यांनी या पुस्तकातून उघडकीस आणले
आहेत.

पुस्तकाचे नाव- इस्लाम ज्ञात आणि अज्ञात
लेखक- अब्दुल कादर मुकादम, मुंबई
अक्षर प्रकाशन, मुंबई. मो.३२२३९१७२०
किंमत- ३०० पाने- २१५

-कलीम अजीम, अंबाजोगाई
(सौजन्य : लेखकाचा ब्लॉग)

संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *