ईश्वर, प्रेषित आणि साक्षात्कार यावरील चिंतन
इस्लामने परमेश्वराच्या एकत्वाचा मांडलेला सिध्दांत हा केवळ आधिभौतीक स्वरुपाचा नसून, सामाजिक स्वरुपाचा देखील आहे. कारण हे सर्व विेईश्व आणि सृष्टी यांना एकत्रित ठेवणारे सुत्र आहे आणि ते म्हणजे अल्लाह होय. हे जसे खरे आहे. तसेच सर्वसृष्टीचा निर्माता एकच आहे. तेंव्हा हा मानवी समाज देखील एकत्वाच्या आणि समानतेच्या धाग्याने जोडला गेला आहे. हे इस्लामचे तत्व आहे. म्हणून सर्व मानवी समाज हा एकच असून कालांतराने माणसांमाणसात भेद निर्माण झाले. असा इस्लामचा सिध्दांत आहे. म्हणूनच कुरआनात म्हटले आहे की, ’’प्रारंभी सर्व मानव एकच धर्मसमुदायी होते. नंतर त्यांनी विविध श्रद्धा व पंथ बनविले. (सुरह युनूस आयत क्र. 19)’’ म्हणजे परमेश्वराच्या एकत्वाच्या आधारे इस्लाम मानवी एकतेचाही विचार मांडतो आणि म्हणूनच इस्लामच्या परमेश्वरविषयक चिंतनात ज्ञात आणि अज्ञात अशा सर्वच प्रेषितांचा आणि सर्व जमातींना परमेश्वरांकडून केल्या गेलेल्या मार्गदर्शनाचा विचार केला गेला आहे. म्हणूनच इस्लामचे प्रतिपादन आहे की, अल्लाह आणि त्याचे कुरआन यांचे स्वरुप प्रादेशिक नसून सर्वसमावेशक आहे म्हणून त्या अर्थाने माणसाला परमेश्वरासंबंधीची होणारी जाणीव ही परमेश्वराच्या आणि या विेशाच्या एकत्वाची आणि अखंडत्वाची जाणीव आहे व ती जाणीव आद्य व सनातन आहे. इस्लामच्या मते परमेश्वराची ही सारी किमया माणसाच्या लक्षात आल्यानंतर त्याला परमेश्वराचे गुणविशेष स्पष्ट होत जातात. म्हणून माणसाच्या मनात परमेश्वरासंबधी जागृत होणारी भावना केवळ भीतीयुक्त आदराची नसून त्याच्या परमदयाळुपणाची सुद्धा असते. म्हणून दयाळू व परमकृपाळू हे परमेश्वराचे गुणविशेष दिलेले आहेत. इस्लामच्या प्रतिपादनानुसार या विेशामध्ये जे-जे सत्, सुंदर व चिरंतन आहे. ते अल्लाहच्या रहमतचे व्यक्त रुप आहे. म्हणूनच कुरआनात ठिकठिकाणी परमेश्वराच्या कृपाप्रसादाचे वर्णन येते.
त्याचबरोबर या कृपाळू ईेशराचे संदेश ग्रहण करण्याची क्षमता माणसाकडेच असल्याने विवेकी माणसाला ते कळू शकतात. म्हणूनच कुरआनात जागोजागी मनुष्याच्या बुध्दीला आवाहन करण्यात आले आहे. किंबहुना देवदुत जिब्राईलकडून प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना दिला गेलेला संदेश ज्ञानप्राप्तीचा होता. विचार करण्याचाच होता. म्हणजे इस्लाममध्ये केवळ परमेश्वरविषयक श्रध्देचे तत्व नाही तर परमेश्वराचे स्वरुप ज्ञानाच्या प्रकाशातून माणसाला कळते, हा इस्लामचा सिध्दांत आहे. ‘मी सांगतो त्यासाठी विेश्वास ठेव’ असे कुरआनात म्हटलेले नाही. उलट असे म्हटले गेले आहे की, ‘ज्यांना स्वर्ग व पृथ्वी दिवस व रात्र यांच्यामधील खुणा ओळखता येतात. त्यांना ईश्वराची जाणीव होउ शकते.’ पुढे असेही म्हटले आहे की, ‘ परमात्मा ज्याला इच्छिल त्याला या प्रकाशाचा मार्ग दाखवितो. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना परमेश्वर प्राप्तीचा झालेला दिव्य प्रवास हा प्रकाशाचा प्रवास होता, असे म्हटले आहे. अशाप्रकारे कुरआनातून मांडलेला इस्लाम पोथीनिष्ठ आणि अंधश्रध्दावादी नव्हता आणि नाही. कुरआनातून दैवी चमत्कार किंवा नियतीचे अटळ चक्र यांची मांडणी केलेली नाही. उलट ज्ञान, श्रध्दा आणि व्यवहार यांची सांगड घालीत असताना प्रेषित (सल्ल.) यांनी बुध्दीवादी आणि वैज्ञानिक पध्दती स्विकारलेली दिसून येते. विज्ञानाचा इतिहास लिहित असताना प्राध्यापक जॉर्ज सार्टोन व रॉबर्ट ब्रिफॉल्ट यांनी म्हटले आहे की, प्रेषित मुहम्मद (सल्ल) यांनीच प्रथम अनुभवसिध्द ज्ञान, बुध्दीवाद आणि मानवी प्रज्ञेचा स्विकार या वैज्ञानिक कसोट्या वापरात आणल्या. प्रेषित (सल्ल.) यांनी प्राप्त झालेल्या सुरुवातीच्या संदेशातून उदा. सुरतुल-अलक (96) मध्ये लेखणीद्वारे लिहिलेल्या पुस्तकातुन आणि विेश्वनिर्मात्याने जग कसे निर्माण केले आहे. या प्रक्रियेचा विचार करुन ज्ञान प्राप्त करुन घ्या. असे म्हटले आहे. म्हणून कुरआनात जवळजवळ 300 आयातींमधून अल्लाहच्या कृपेची उदाहणे देत असताना प्रत्येक ठिकाणी अल्लाहने केलेले निसर्गनियम समजून घेण्याचा सिध्दांत मांडला आहे.
माणसाने आपली बुध्दी आणि श्रध्दा यांच्या माध्यमातून निसर्गाचे अवलोकन करुन विेशाचे रहस्य समजून घ्यावे असे म्हटले आहे. म्हणूनच प्रेषित (सल्ल.) हे नेहमी अशी प्रार्थना करीत असत की, ‘हे अल्लाह मला ज्ञानी कर.’’ म्हणून कुरआन शरीफमध्ये अल्लाहचा उल्लेख करीत असताना 750 वेळा ‘ज्ञान’ या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. या प्रक्रियेतून इस्लामच्या तत्वज्ञानातील चौथे महत्त्वाचे सुत्र स्पष्ट होते. ते म्हणजे ज्ञानाचे सुत्र होय. इस्लामच्या तत्वमिमांसेत परमेश्वराचे एकत्व, अखंडत्व आणि अलौकीकत्व हे पहिले सुत्र आहे. दुसरे सुत्र माणसाच्या सर्व श्रेष्ठत्वाचे व समतेचे आहे. तिसरे तत्व हे माणूस रुपातील प्रेषिताचे आहे. प्रेषित, मानव आणि परमेश्वर यांना जोडणे हे माध्यम आहे. परंतु इस्लाममधील साक्षात्काराची तत्व केवळ श्रध्देवर आणि व्यक्तीगत अनुभुतीवर आधारीत नाही, तर त्यामध्ये मानवी प्रज्ञेचा विकास व ज्ञानातून सत्य व परमेश्वरासंबंधी होणारी जाणीव अभिप्रेत आहे. आणि यासर्व तात्विक आणि वैचारिक मांडणीचा मुख्य आधार ज्ञान हाच आहे. इस्लाममधून येणारा हा ज्ञानविषयक सिध्दांत गुढ प्रमेयाच्या स्वरुपात येत नाही तर अनुभवसिध्द आणि व्यवहारिक चिंतनाच्या स्वरुपात तो व्यक्त होतो.
या सर्व गोष्टींचा विचार केल्यास असे दिसून येते की, कुरआनमधून इस्लामने केलेली मांडणी अत्यंत आधुनिक स्वरुपाची आहे. त्यात कुठेही पोथीनिष्ठता किंवा शब्दप्रामाण्य नाही. परंतु ‘क्रुसेड’ नंतरच्या काळात खिस्ती आणि मुस्लीम देशात टोकाचे राजकीय संघर्ष निर्माण झाले. तसेच औद्योगिक क्रांतीनंतर प्रबळ झालेल्या युरोपीयन राष्ट्रांच्या साम्राज्यवादी प्रवृत्तीमधून इस्लामसंबंधी केले गेलेले लिखाण हेतुपुर्वक विपर्यास करणारे होते. त्यामूळे बहुसंख्य पाश्चात्य अभ्यासकांनी इस्लाम आणि त्याच्या कुरआनच्या तत्वज्ञानाचे विकृत स्वरूप सादर केल्याचे दिसते. एडवर्ड सैद यांनी ‘ओरिएंटॅलिझम’ या पुस्तकातून पाश्चात्यांच्या अशा मनोभुमिकेचे विश्लेषण केले आहे. भारतात इस्लामसंबंधी केले जाणारे लिखाण हे पाश्चात्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर किंवा पोथिनिष्ठ धर्मगुरुंनी लिहिलेल्या ग्रंथावर आधारीत असते. त्यामुळे इस्लाममधील मुळची तत्तमिमांसाच वाचकांसमोर येत नाही.
– मरहूम प्रा. फकरूद्दीन बेन्नूर
(संक्षिप्त : सरफराज अहमद)
संदर्भग्रंथ –
1) तर्जुमानुल कुरआन – भाग पहिला – मौलाना आझाद
2) रिलिजन ऑफ इस्लाम – मौलाना मोहम्मद अली.
3) मुस्लीम वर्ल्ड – प्रा. ताराचंद रस्तोगी
4) ए हिस्ट्री ऑफ मुस्लीम फिलॉसॉफी – प्रा. एम.एम. शरीफ
0 Comments