Home A blog A इस्लामचे तत्वज्ञान – भाग-2

इस्लामचे तत्वज्ञान – भाग-2

ईश्वर, प्रेषित आणि साक्षात्कार यावरील चिंतन

उत्क्रांतीच्या प्रक्रियेत इस्लामचा उदय, मानवी प्रज्ञेच्या श्रेष्ठत्वापर्यंत येउन पोहचतो. आणि म्हणूनच कुरआन शरीफ़च्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन हे शेवटचे मार्गदर्शन मानले गेले  आहे. कारण पैगंबर सल्ल. यांच्या प्रेषित्वाच्या 23 वर्षांच्या काळात प्रत्यक्ष घडणाऱ्या दैनंदिन घटनांच्या अनुषंगाने साक्षात्कार रुपाने मार्गदर्शन करण्यापर्यंत परमेश्वरी संदेश येउन पोहचल्यानंतर ईश्वरी ज्ञान व्यवहारात आणले गेले आणि म्हणूनच अशा प्रकारच्या नवनव्या मार्गदर्शनाची पुन्हा गरज राहत नाही. आणि त्या अर्थाने कुरआन शरीफ़ हा शेवटचा ईश्वरी  ग्रंथ मानला गेला आहे.
या मांडणीमध्ये कुरआनात नसलेले स्वतःचे अर्थ घुसवून धर्मगुरुंनी म्हणजे उलेमांनी इस्लामच्या या मुलभूत तात्विक अधिष्ठानाचे विकृतीकरण केले आहे. हि सर्व उत्क्रांतीची प्रक्रीया  लक्षात न घेता, धर्मगुरुंनी त्याचा अर्थ असा लावला की, इस्लाम हा शेवटचा आणि सुधारीत धर्म असल्याने त्याच्या पुर्वी असलेले सर्व धर्म आपोआपच रद्द होतात. कुरआनात 25 प्रेषितांची नावे दिलेली असून त्यातील अनेक नावे बायबलमधील आणि जुन्या करारातील तसेच त्याबाहेरील देखील आहेत. कुरआनच्या अनुसार सर्व प्रदेशांत परमेश्वराकडून प्रेषित  पाठविले गेले. एवढेच सांगून कुरआन थांबत नाही तर मुस्लिम माणसाने या सर्वच प्रेषितांवर श्रध्दा ठेवणे आवश्यक असल्याचे बजावून सांगते. कुरआनात स्पष्टपणे म्हटले आहे की,  ‘मुस्लीमाने (साक्षात्कार रुपाने) तुला (मुहम्मद पैगंबरांना ) जे सांगितले त्याच्यावर विेशास ठेवला पाहिजे. तसेच तुझ्यापुर्वी जे साक्षात्कार झाले त्यावरही विेशास ठेवला पाहिजे. ’’ (2/4)  आणखीन पुढे म्हटले आहे की, अल्लाहकडून जे सांगितले गेले त्यावर मुहम्मद पैगंबरांनी विेशास ठेवला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या अनुयायांनी देखील विेशास ठेवला आहे. ते सर्वजण  अल्लाह , त्यांचे देवदूत, त्यांचे ग्रंथ, त्यांचे प्रेषित यांच्यावर श्रध्दा ठेवतात, आम्ही प्रेषितांमध्ये भेदाभेद करीत नाहीत. (2/285) आणि जे ईश्वरांवर आणि त्यांच्या प्रेषातांवर श्रध्दा ठेवित  नाहीत. किंवा काहींवर श्रध्दा ठेवतात आणि काहींवर अविेशास दर्शवितात ते पाखंडी आहेत. (4/150,151)
कुरआनातील हे आदेश अतिशय स्पष्ट असून कुरआनच्या अवतरणापुर्वी जे प्रेषित (सल्ल.)आणि धर्मग्रंथ झाले. त्या सर्वांचे कुरआन हे केवळ ऋणच मान्य करीत नाही तर त्यांच्या  अप्रक्षिप्त मूळ तत्वज्ञानाचे पालन करण्याचा आग्रह धरतो. कुरआनाची हि सहिष्णूता पराकोटीची व्यापक, सर्वसमावेशक आणि उत्क्रांतीवादी आहे. एवढी प्रत्ययकारी सहिष्णूता, ‘सेमीटीक’  म्हणून हिणकस ठरवल्या गेलेल्या कुरआनात जेवढ्या स्पष्टपणे मांडली गेली आहे. तेवढी स्पष्टता अन्य धर्मग्रंथात कुरआनाप्रमाणे आदेशांच्या स्वरुपात आढळत नाही. म्हणून त्या  अर्थाने इस्लाम कुरआनला शेवटचा धर्मग्रंथ मानतो. कारण मानवी समाजाच्या उदयानंतर वेळोवेळी दिल्या गेलेल्या सर्व ईश्वरी ज्ञानाचे ऋण मान्य करुन त्या सर्व अप्रक्षिप्त स्वरूपातील  तत्वज्ञानाचे पालन करण्याचा दिला गेलेला आदेश आणि प्रत्यक्ष व्यवहारिक समस्यांचे निराकरण करण्याच्या निमित्ताने कुरआनरुपाने केले गेलेले मार्गदर्शन हे दोन्ही एकत्रित केले की,  सांगायचे काहीच शिल्लक राहत नाही. अमूर्त आधीभौतीक प्रमेयांपासून सुरु झालेला हा ज्ञानाचा प्रवास कुरआनात अनुभववादी आणि वर्तनवादी होतो. कुरआनातील हा अनुभववाद  विलक्षण आधुनिक आहे. अशा प्रकारची मांडणी करणारा कुरआन हा इतर धर्मग्रंथाच्या तुलनेने आधुनिक आणि शेवटचा धर्मग्रंथ आहे.
पैगंबर सल्ल. यांच्या माणूसपणाचा किंवा सर्वसामान्यत्त्वाचा ठासून मांडलेला सिध्दांत का? कारण , कुरआननुसार माणूस हि ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे . तसेच या  विेशनिर्मात्यासंबधीची आधीभौतीक जाणीव व त्या संबधीचे ज्ञान हे माणसालाच होऊ शकते. कारण कुरआनने माणसाला विवेकनिष्ठ मानलेले आहे. त्यानुसार चांगले किंवा वाईट यांचे  भान किंवा विवेक असणारा मनुष्यप्राणिच आहे. ईश्वराची अवज्ञा करण्याचीही त्याची क्षमता आहे. कुरआनातील प्रतिपादन माणसाची प्रज्ञा आणि अस्तित्वाच्या स्वायतत्तेचा सिध्दांत  मांडते. माणूस हा अल्लाह आणि ललाटाच्या हातातील कळसुत्री बाहुले नाही. आपल्या आदेशाची अवज्ञा करण्याची देखील क्षमता परमेश्वरानेच त्याल प्रदान केली असल्याने त्याचे  अस्तित्व स्वायत्त आणि विवेकनिष्ठ आहे. कारण परमेश्वरानेच त्याला चांगले काय आणि वाईट काय यांचे ज्ञान दिले आहे. म्हणून अवज्ञेला कडक शिक्षाही सांगितलेली आहे. म्हणून  मानवी जाणिवांच्या उत्क्रांतीच्या या विकसित टप्प्यात परमेश्वराने अवतार रुपाने किंवा देवदूत रुपाने ज्ञान प्रदान करणे हे माणसाच्या स्वायत्त अस्तित्वाचा किंवा मानवी प्रज्ञेच्या  प्रतिष्ठेचा अवमान करणारे ठरते. म्हणून प्रेषितत्वाचा सिध्दांत आणि प्रेषिताच्या माणूसपणाचा सिध्दांत इस्लाम आग्रहाने मांडतो.
या सर्व प्रक्रीयेतून इस्लामची ईश्वरविषयक धारणा व्यक्त होते. यासंदर्भात इस्लाममधील ईश्वरविषयक सिध्दांत प्रेषितत्व आणि साक्षात्कार विषयक सुत्रे यासंबंधाने मौलाना आझाद  आणि मौलाना मोहम्मदअली यांनी मर्मग्राही विश्लेषण केले आहे. मौलाना आझाद यांच्या मते आदीम व्यवस्थेतील माणसाला ईेशरासंबधी झालेली जाणीव केवळ माणसाची भयचकित  प्रतिक्रीया नव्हती. ती विेश, हि सृष्टी, निसर्ग आणि मानव यांच्या एकात्म स्वरुपातून त्याला उमगलेली सत्य स्वरुपाची जाणीव होती. ईश्वरासंबधीचे ज्ञान उत्क्रांती प्रक्रियेतून व्यक्त  होणारे नसून ते माणसाच्या चेतनामय जाणीवेच्या आत्मप्रकाशाच्या माध्यमातून उमगलेले सत्य असते. म्हणून इस्लाममध्ये प्रेषित आदम (अलै.) यांची निर्मिती विशेषत्वाने करण्यात  आली. जुन्या करारात म्हटल्याप्रमाणे आदम अलै. यांचे अस्तीत्व स्वर्गीय होते. त्यांनी अल्लाहने आखून दिलेल्या आचरणाच्या कक्षा ओलांडल्या. सेमिटीझमनुसार प्रथम प्रकाश म्हणजे  ज्ञान होय. अज्ञान आणि अंधकारानंतर त्याचा पाठलाग करतात. म्हणून मौलाना आझादांनी म्हटल्याप्रमाणे परमेश्वरावरील श्रध्दा हि मानवी मनाची निर्मिती कधीच नव्हती. तर  परमेश्वरासंबधीचे ज्ञान किंवा श्रध्दा माणसाच्या माणूसपणाचा एक नैसर्गिक आणि अविभाज्य भाग आहे. त्याच्या बुध्दी आकलन शक्ती किंवा परिस्थितीवर होणाऱ्या परिणामांनी त्यात 
बदल होत नसतो. म्हणून ईश्वरविषयक संकल्पना माणसाच्या  वैचारीक उत्क्रांती प्रक्रियेचा परिपाक नसते. फ़ार तर ईश्वराच्या गुणविशेषासंबंधी त्याला होणारे आकलन हे टप्प्याटप्प्याने  वृध्दींगत होत जाणाऱ्या त्याच्या ज्ञानाचा परिणाम असते. कारण माणसाची बुध्दीमत्ता विकारांनी घेरलेली असते. म्हणून माणूस हा अमुर्त किंवा अव्यक्ताचा विचार करताना त्याला ज्ञात  असलेले गुणधर्म किंवा भावना यांचे आरोपण त्यावर करीत असतो. म्हणून ईश्वराचे संदेश किंवा मार्गदर्शनाचे त्याने आपल्या कुवतीनुसार अर्थ लावले. त्याचप्रमाणे ईश्वराच्या गुणधर्माचे  विवेचन यथामती केले. त्यामुळे ईेशरविषयक वैचारिक मांडणीत फ़रक पडलेला आहे.
या कारणामुळेच ईश्वराचे मानवीकरण करणाऱ्या सगुणवादापासून निसर्गपुजेपर्यंत किंवा नकारवादापर्यंत, अनेकेश्वरवादापासून ते एकेश्वरवादापर्यंत, भयचकितभावापासून ते  प्रेमवादापर्यंतचे विचार यासंदर्भात मांडलेले दिसून येतात. कुरआनाच्या पुर्वी ईेशरी चिंतनासंबधीची मांडणी प्रज्ञा, मूर्तीपुजेपासून ते अव्यक्ताच्या उपासनेपर्यंत आलेली होती. परंतू मानवी  प्रज्ञेतील ईश्वराचे मानवीकरण विषयक (अँथ्रॉपॉमॉफ़िक) अवशेष पुर्णपणे नाहिसे झालेले नव्हते. कुरआन शरीफ़ ने हे अवशेष काढून टाकून ईेशरी चिंतनाला पुर्ण अलौकीक वादाकडे नेले.  कुरआनातील अलौकीकवाद परमेश्वराच्या गुणविशेषाला चिकटविलेले सर्व प्रकारचे मानवी अवशेष काढून टाकतो. परंतू त्याचबरोबर पुर्ण नकारवादाकडेही (निहीनीझम) जात नाही.  कुरआणाचे उद्दीष्ट हे परमेश्वराचे अलौकीकत्व स्पष्ट करण्याचे आहे. आणि म्हणून नकारवादाकडे जाण्याचे नाही. उपनिषदांमधील ‘नेतिनेति’ चा विचार हा अत्यंत प्रगल्भ स्वरुपाचा  अलौकीकवाद आहे. यात काही शंका नाही. पंरतु प्रत्यक्ष वैदीक धर्मचिंतनात नकारवाद टाळण्यासाठी अमुर्त ब्रम्हाला देखील देवाचे रुप घ्यावे लागले होते. कुरआन या दोन्हीतुन  सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करते. कारण एका बाजुला परमेश्वराचे गुणविशेष प्रतिपादन करण्याच्या प्रक्रियेतून सगुणवाद किंवा ईश्वर मानवीकरणवाद उदयास येतो. तर दुसऱ्या  बाजुला गुणविशेष नाकारण्याची प्रक्रीया माणसास सर्वंकष नकारवादाकडे नेते. कुरआन दोन्हीतील सुवर्णमध्ये साधण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी परमेश्वराच्या गुणविशेषांचाच खास विचार  करते. परमेश्वराचे अस्तीत्व जर वैशिष्ट्यपुर्ण आणि आगळे असेल तर त्याचे गुणविशेष देखील वैशिष्ट्यपुर्ण असणार त्यात मानवीकरणाचे कसलेही गुणधर्म असणार नाहीत.  त्यासंबधीची मांडणी इस्लामने कुरआनातून केल्याचे दिसते. प्रत्येक धर्माने परमेश्वराची सकारात्मक (पॉझिटिव्ह) बाजू दर्शविण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु परमेश्वराची नकारात्मक  बाजू इस्लाम दाखवण्याचा प्रयत्न करतो. ती म्हणजे परमेश्वरासारखा म्हणजेच अल्लाहसारखा अन्य कुणीही नाही. जेंव्हा परमेश्वराला अन्य कोणीही नाही. त्याचा अर्थ असा की,  परमेश्वराचे गुणविशेष दुसऱ्या कोणालाही लागू होणारे नाहीत. आणि म्हणून परमेश्वराची कोणाशी तुलनाही करता येणार नाही. आणि बरोबरीही करता येणार नाही. कुरआनातील पहिल्या भागात सुरह फ़ातेहामधून या अनुषंगाने परमेश्वराचे तीन गुणविशेष दिलेले आहेत. रबुबीयत ( सृजन-पालन,विकासकर्ता) रहमत (कृपा) आणि अद्ल (न्याय) या तीनही गुणविशेषांच्या  माध्यमातून परमेश्वराचे आकलन सर्वांनाच होउ शकते. त्यात बुध्दीवान माणसाला होणारे आकलन आणि सर्वसाधारण माणसाचे आकलन अशी वर्गवारी होउ शकत नाही. असा  इस्लामचा सिध्दांत आहे. अशाप्रकारे इस्लाम सर्वांसाठी परमेश्वरचिंतनाची आणि उपासनेची एक आणि समान दृष्टी देतो. परमेश्वराचे एकत्व, त्याच्या ज्ञानाच्या त्याच्या आकलनाच्या  देखील एकत्वाची मांडणी करते म्हणून त्या अर्थाने ‘अल्लाह’चे एकत्व वैशिष्ट्यपुर्ण ठरते.
(क्रमशः)
– मरहूम प्रा. फ़करूद्दीन बेन्नूर
(संक्षिप्त : सरफ़राज अहमद)
संबंधित पोस्ट
Febuary 2024 Rajab 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
29 18
30 19
31 20
1 21
2 22
3 23
4 24
5 25
6 26
7 27
8 28
9 29
10 30
11 Sha'ban 1
12 2
13 3
14 4
15 5
16 6
17 7
18 8
19 9
20 10
21 11
22 12
23 13
24 14
25 15
26 16
27 17
28 18
29 19
1 20
2 21
3 22

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *