फेरोजा तस्बीह- 9764210789
(मिरजोळी चिपळून, रत्नागिरी)
बहुतेक आधुनिक मुस्लिम महिलांमध्ये आपल्या पतीचे कुफ्र (अवज्ञा) करण्याची प्रवृत्ती वाढीस लागत आहे. छोट्या-छोट्या सांसारिक गोष्टीसाठी पती बरोबर वाद-विवाद करण्यात व तो कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यात अशा महिलांना आपला विजय झाला, असे वाटत असावे. दिवसभर काम करून थकून भागून घरी आलेल्या पती बरोबर पत्नी जर असा वाद घालत असेल तर अशा पुरूषांचे जीवन यातनामय होवून जाईल, यात वाद नाही. वास्तविक पाहता पती जेव्हा थकून भागून घरी येतो तर त्याची अपेक्षा केवळ हीच असते की पत्नीने हसतमुखाने त्याचे स्वागत करावे. मुलांनी पळत येवून त्याची गळाभेट घ्यावी. घर त्याला एका संरक्षित किल्यासमान भासत असते. जेथे थकून भागून आल्यानंतर त्याला सुरक्षा व समाधान मिळण्याची अपेक्षा असते. हेच मिळत नसेल व घरी आल्याबरोबर पत्नीकडून उशीर का केला? आता पावेतो कुठे होते? अशा सारखे प्रश्न विचारले जातील व आल्या-आल्या पतीसमोर आपल्याच अडचणींची यादी मांडली जात असेल तर त्या पुरूषाची काय अवस्था होत असेल हे अल्लाहच जाणो. अशा पुरूषांना घरात संतोष मिळणार नाही, हे ही तेवढेच खरे. छोट्या-छोट्या गोष्टींना मोठ्या करून ज्या महिला पतीबरोबर वाद घालतात आणि प्रत्येक वेळी आपण खरे असल्याचे सिद्ध करण्याचा आटापिटा करतात, अशा महिला आपल्या पतीच्या नजरेतून उतरून जातात. अनेक महिला वाद घालताना टोकाची भूमिका घेतात. तुम्हाला जर पत्नी नाही सेवक पाहिजे असेल तर, मी चालली माहेरी तुम्ही तुमच्यासाठी अशी पत्नी घेऊन या जी उठता बसता तुमच्या आज्ञांचे पालन करेल.
अशा वर्तनापेक्षा प्रत्येक पत्नीने जर का हा विचार केला की, अल्लाहने आपल्याला पैसा कमावण्याच्या अपरिमित कष्टापासून सुरक्षित ठेवलेले आहे. आपल्यासाठी हे कष्ट आपला पती उपसतो आहे. तो कोण-कोणत्या परिस्थितीला तोंड देवून येत असेल त्यालाच माहित. पैसा कमाविणे सोपी गोष्ट नाही. गळेकापू स्पर्धेच्या आजच्या युगामध्ये हलाल मार्गाने पैसा कमावण्याएवढे दिव्य कोणतेच नाही. याची कल्पना जर महिलांनी ठेवली तर त्यांना त्यांच्या पतीच्या कष्टाचा अंदाज येईल व आपल्या अडचणी त्याच्या कष्टासमोर कसपटासमान वाटू लागतील. यातून त्यांच्या मनात पतीच्या हसतमुख स्वागताची इच्छा निर्माण होईल व त्या लहान सहान गोष्टीतून पतीला कसे समाधान मिळेल, यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, अशी मला खात्री आहे.
इस्लामने महिलेला कुटुंब व्यवस्थेमध्ये केंद्रस्थानी ठेवलेले आहे. मात्र टीव्ही व सोशल माध्यमावर येणार्या सततच्या उलट-सुलट मालिकांमुळे अनेक महिलांची सारासार विवेक बुद्धी बाधित होत आहे. त्यातून अनेक महिलांना लाज, लज्जेचा विसर पडलेला आहे.
भारताच्या राज्यघटनेने स्त्री-लाही तेवढेच अधिकार दिलेले आहेत, जेवढे पुरूषांना दिलेले आहेत. अनेक महिला या अधिकारांचा खर्या अर्थाने लाभही घेत आहेत. मात्र काही महिलांमध्ये या सवलतींमुळे उर्मटपणा आलेला आहे. त्यांनी त्या उरमटपणामधून सातत्याने पतीच्या विरूद्ध भूमिका घ्यावयास सुरूवात केलेली आहे. त्यांना वाटते की आपण आर्थिकरित्या स्वतंत्र असल्यामुळे घराच्या प्रत्येक सदस्याला आपल्या बोटावर नाचवू शकतो. मात्र महिलांनी हे विसरता कामा नये की, महिलांची सर्वात मोठी संपत्ती त्यांची पवित्र वागणूक असते. ज्यामुळेच त्या कुटुंबामध्ये सन्माननीय ठरत असतात. महिलांनी आपल्या हट्टी स्वभावाला मुरड घालून पतीला साथ देण्याची भूमिका जर का घेतली आणि अडचणीच्या वेळेस पतीच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला तर त्या महिलेचा सन्मान पतीच नाही तर घरातील सर्व सदस्य करतील, यात शंका नाही. मात्र आजच्या आधुनिक महिलांच्या वर्तणुुकीमुळे अनेक कुटुंबात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. वैवाहिक कलाहांना सीमा राहिलेली नाही. फॅमिली कोर्टांची व त्यात येणार्या दाव्यांची, दोहोंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आश्चर्य म्हणजे जेव्हा महिलांवर कौटुंबिक अत्याचार होतात तर त्याचे रक्षण करण्यासाठी कायदे आहेत. परंतु, महिलांच्या अशा उर्मट वागण्याने कुटुंबाला होत असलेल्या नुकसानापासून वाचविण्यासाठी कुठलाच कायदा नाही.
इस्लामने महिलांना लाज आणि लज्जेसह नेक वर्तन करण्याचा आदेश दिलेला आहे. मात्र आज अनेक महिला प्रत्येक क्षेत्रात पुरूषांची नक्कल करत त्यांच्या सारखे दिसण्या आणि वागण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखे वागणे, त्यांच्याचसारखे बोलणे, जाणून बुजून आपल्या वर्तनात आणत आहेत. अशा वर्तनातून पुरूषांसमोर आपले महत्व सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा महिलांचा कल मग बेपर्दा राहण्याकडे वाढत आहे. अनेकवेळा अशा महिला आपल्या या वर्तनामुळे संकटात सापडतात. स्त्री-पुरूषांमध्ये यातून विनाकारण स्पर्धेचा भाव निर्माण होत आहे. ज्या महिला आपले स्त्रीत्व विसरून पुरूषांची कृत्रिम बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात त्या नेहमीच तोंडघशी पडतात.
अल्लाहच्या नजरेतही त्यांची ही कृती निंदणीय ठरते. महिलांनी आपल्या ह्या वर्तणुुकीसंबंधी आत्मपरिक्षण करावयास हवे. आपले अधिकार क्षेत्र म्हणजेच घर हे सुंदर, सुरक्षित आणि सुसज्ज राहील याकडे जर त्यांनी अधिक लक्ष दिले तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी पुरूषांसारखा पोशाख व त्यांच्यासारखीच वर्तणूक तात्काळ सोडावयास हवी.
महिलांना जो शरई पोशाख घालण्याची परवानगी आहे त्यात महिला ह्या नितांत सुंदर व सुरक्षित भासतात. याची आठवण प्रत्येक महिलेने ठेवावयास हवी. शिवाय, महिला म्हणून जे अधिकार आम्हाला इस्लामने दिलेले आहेत, ते पुरेसे आहेत. नवीन पिढीचे संवर्धन करून देशासाठी जबाबदार नागरिक घडविणे ह्यापेक्षा दूसरे मोठे काम असूच शकत नाही. हे काम ज्या महिला मन लावून करतील त्याच आपल्या पतीच्याच नव्हे तर कुटुंबाच्या व समाजाच्या आदरास पात्र राहतील, यात शंका नाही.
आधुनिक महिलांची वर्तणूक
संबंधित पोस्ट
0 Comments