Home A blog A अमीरूल मोमीनीन हजरत उमर रजि.

अमीरूल मोमीनीन हजरत उमर रजि.

एक ऐतिहासिक व्यक्तीमत्व : कणखर, शिस्तप्रिय, न्यायप्रिय, उग्र, राकट, धाडसी आणि शूर

Oasis
हजरत अबुबकर यांचे निधन 23 ऑगस्ट 634 रोजी झाले. निधनापूर्वी ते आजारी होते व आपण या जीवघेण्या आजारातून  उठू शकणार नाही, याची खात्री झाल्याने त्यांनी हजरत उमर रजि. यांना आपला उत्तराधिकारी निवडण्याचा विचार केला. याचे कारण असे होते की, प्रेषित सल्ल. यांच्या निधनानंतर सत्तेसाठी जी काही साठमारी झाली होती, त्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. आपल्यानंतर पुन्हा सत्तेसाठी मुस्लिमांमध्ये मतभेद होऊन रक्तपात होऊ नये, या प्रामाणिक इच्छेतून त्यांनी आपला उत्तराधिकारी निवडण्याचा निर्णय घेतला. मात्र याची घोषणा अचानकपणे न करता त्यांनी या संबंधीची पूर्वतयारी अतिशय योजनाबद्ध  पद्धतीने केली.
सर्वप्रथम त्यांनी आशरा-ए-मुब्बशरामधील प्रसिद्ध सहाबी अब्दुरहेमान बिन औफ रजि., हजरत उस्मान रजि. आणि हजरत अली रजि. यांच्याशी याबाबतीत सल्लामस्सलत केली. या तिघांनीही हजरत उमर रजि. यांना खलीफा करण्याबद्दल सकारात्मक मत दिल्यानंतर त्यांनी हजरत उमर यांना बोलावून घेतले आणि त्यांना आपला निर्णय कळवला. त्यावर ह. उमर रजि. यांनी स्पष्टपणे सांगितले की, ’’एवढी मोठी जबाबदारी घेण्याची माझी अजीबात इच्छा नाही.’’ त्यावर हजरत अबुबकर यांनी सांगितले की, ’’तुमची इच्छा असण्या किंवा नसण्याचा इथे प्रश्न नाही. मला तुमच्यापेक्षा दूसरी योग्य व्यक्ती या पदासाठी दिसत नाही. म्हणून अपात्र व्यक्तीची निवड  करून मी अल्लाहला तोंड कसे दाखविणार? तुम्हाला या पदाची गरज नाही मात्र या पदाला तुमची गरज आहे. मी याबाबतीत सर्व महत्त्वाच्या व्यक्तींशी सल्लामसल्लत करून हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे सर्व लोक तुम्हाला खलीफा म्हणून स्वीकारण्यास अनुकूल आहेत, म्हणून तुम्हाला हे पद घ्यावेच लागेल.’’ तेव्हा नाईलाजाने हजरत उमर रजि. खलीफा होण्यास होकार दिला.
यानंतर हजरत अबुबकर रजि. यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लोकांसमोर केली. त्यात त्यांनी सांगितले की, ’’मी माझ्या कुठल्याही नातेवाईकाला खलीफा म्हणून निवडलेले नाही. जो तुमच्यापैकी सर्वोत्कृष्ट आहे त्याचीच निवड मी केलेली आहे. कारण माझ्या दृष्टीने जनतेचे हित हेच सर्वोतोपरी आहे. मी हजरत उमर बिन खत्ताब रजि. यांना खलीफा म्हणून निवडलेले आहे. माझी ही निवड तुम्हाला मान्य आहे का?’’ त्यावर उत्स्फूर्तपणे उपस्थित लोकांनी त्यांच्या निवडीचे समर्थन केले. म्हणून अगदी सहज पद्धतीने सत्तांतर घडून आले. 23 ऑगस्ट 634 रोजी खलीफा अबुबकर रजि.यांचे निधन होताच 24 ऑगस्ट 634 रोजी त्यांनी खलीफा म्हणून शपथ घेतली व लगेच लोकांनी त्यांच्या हातावर हात ठेऊन एकनिष्ठतेची बैत (शपथ) घेतली.
हजरत उमर बिन खत्ताब रजि. हे एक अतिशय कणखर, शिस्तप्रिय, न्यायप्रिय, उग्र, राकट, धाडसी आणि शूर होते. दुरून पाहणाऱ्यांना त्यांची भीती वाटे परंतु ज्यांचा त्यांच्याशी संपर्क होई, ते त्यांच्यातील उमदेपणा पाहून भारावून जात.
 हजरत उमर रजि. यांचा खिलाफतीचा कालावधी अतिशय गाजलेला कालावधी आहे. त्यांच्या कालावधीत इस्लाम बळकट झाला आणि इस्लामच्या सीमांचा विस्तार झाला.  हजरत उमर रजि. यांचा जन्म इ.स. 580 मध्ये ’अदि ’ या कुळात झाला. हे कूळ मक्का शहरातील प्रतिष्ठित जरूर होते पण सामार्थ्यवान   नव्हते. धार्मिक दृष्ट्याही या कुळाला बनू हाशीम आणि बनू उम्मैय्या सारखे महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त नव्हते. मात्र हजरत उमर रजि. यांनी आपल्या अंगभूत कौशल्य आणि धाडसी स्वभावामुळे मक्का शहरामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. अन्याय सहन करण्याची त्यांची तयारी नव्हती. ते लढाऊ प्रवृत्तीचे होते. न्यायासाठी लढण्यासाठी ते सदैव तत्पर असत. त्यांची एक कन्या हजरत हफ्सा रजि. ह्या प्रेषित सल्ल. यांच्या सुविद्य पत्नी होत. मक्कामध्ये जे मुठभर लोक साक्षर होते त्यात हजरत उमर रजि. यांचा समावेश होता. त्यांना हिब्रु भाषा येत होती म्हणून ज्यू लोकांशी त्यांची चांगली मैत्री होती.
ते प्रेषित सल्ल. यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होते व कट्टर मूर्तीपूजक होते. प्रेषित सल्ल. यांनी जेव्हा इस्लामची घोषणा केली होती तेव्हा त्यांचा विरोध करणाऱ्या लोकांपैकी ते एक होते. ते इस्लामचा आणि प्रेषितांचा दुस्वास करीत, परंतु त्यांचे शौर्य आणि धाडसी स्वभाव पाहून प्रेषित सल्ल. सातत्याने अल्लाहकडे दुआ करीत की, ऐ अल्लाह! उमरच्या मनामध्ये इस्लामबद्दल प्रेम उत्पन्न कर. शेवटी ही दुआ स्विकारली गेली. वयाच्या तिसाव्या वर्षी हजरत उमर रजि. यांनी इस्लामचा स्वीकार केला. इस्लामचा स्वीकार करण्याचा त्यांचा किस्साही रोमहर्षक असा आहे.
ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा मक्का शहरामध्ये मुर्तीपूजक कुरैश हे इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा सर्व शक्तीनिशी विरोध करीत होते. तरीही हळूहळू लोक इस्लामचा स्वीकार करीतच होते. ह्या गोष्टीची हजरत उमर रजि. यांना चीड येत होती. त्यामुळे त्यांनी प्रेषित सल्ल. यांची हत्या करून हा विषय कायमचा संपविण्याचा निर्णय घेतला व एका दिवशी तलवार हातात घेऊन प्रेषित सल्ल. यांचा शोध घेत निघाले. रस्त्यात त्यांचा एक मित्र नईम बिन अब्दुल्लाह त्यांना भेटला. त्याने हजरत उमर रजि. यांचा अवतार पाहून विचारले, ’’ हे उमर एवढ्या त्वेषामध्ये कुठे निघालात?’’ त्यावर हजरत उमर रजि. उत्तरले, ’’ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा खून करण्यासाठी निघालो आहे.’’ आज त्यांचा आणि इस्लामचा नायनाट करूनच थांबेन. त्यावर त्यांचा मित्र हसून म्हणाला, ’’अगोदर आपल्या घराची काळजी घ्या’’ तुमची सख्खी बहीण ह.फातेमा रजि. आणि मेव्हणा ह.सईद रजि. दोघेही मुस्लिम झालेले आहेत.’’ हे ऐकताच हजरत उमर रजि. यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी थेट मोर्चा बहिणीच्या घराकडे वळविला. घराजवळ पोहोचताच त्यांच्या कानावर कुरआन पठणाचा ध्वनी आला. ह.उमर रजि. वादळासारखे बहिणीच्या घरात घुसले. त्यांचा उग्र अवतार पाहून कुरआन पठण करणाऱ्या खब्बाब रजि. कुरआनच्या आयाती लपवून ठेवल्या व लपून बसले. उमर यांनी मेव्हण्याला दरडावून विचारले ’’तुम्ही काय वाचत होते?’’ तेव्हा मेव्हण्यांनी काही उत्तर दिले नाही. म्हणून चिडून ह. उमर रजि. यांनी मेव्हण्याला मारहाण करायला सुरूवात केली. त्यांना सोडविण्यासाठी ह.फातेमा रजि. मध्ये पडल्या तर त्यांनाही जबर मारहाण केली. इतकी की त्यांचे डोके फुटून चेहरा रक्तबंबाळ झाला. त्यांच्या बहिणीने त्वेषाने हजरत उमर रजि. यांना उत्तर दिले की, ’’ हो! माझ्या शरीरातही खत्ताब यांचे रक्त आहे. मी आणि माझ्या पतीने इस्लामचा स्वीकार केलेला आहे. तुला काय करायचे ते कर, आम्हा दोघांना ठार मार. पण लक्षात ठेव इस्लामची घौडदौड तू मूळीच रोखू शकणार नाहीस.’’ बहिणीचा रक्तबंबाळ चेहरा आणि तिचे कणखर व आत्मविश्वासाने भरलेले बोलणे ऐकताच ह.उमर यांचा राग खर्रकण उतरला. ते शांत झाले व त्यांनी मेव्हण्याला तुम्ही काय वाचत होतात ते माझ्यासमोर वाचून दाखवा, अशी विनंती केली. तेव्हा बहिणीने सांगितले, तू अगोदर गुस्ल (स्वच्छ होणे) कर, पवित्र हो आणि नंतर कुरआन ऐक. त्यावर ह.उमर यांनी अंघोळ केली व कुरआन ऐकण्यासाठी निमुटपणे येवून बसले. तेव्हा लपून बसलेले हजरत खब्बाब रजि. बाहेर आले  त्यांनी त्यांच्या समोर कुरआनच्या आयातींचे खालीलप्रमाणे पठण केले. ’’ताहा ! आम्ही तुम्हांस कष्ट देण्यासाठी हे कुरआन अवतरलं नाही. पण जे भितात त्यांच्यासाठी मात्र हे बोध घडविण्यासाठी आहे. ज्यानं ही धरती आणि उंच-उंच आकाशं निर्माण केलीत त्याच्याकडून अवतरलेला. (जो) महान कृपावंत राजसिंहासनावर आरूढ आहे. आकाश आणि पृथ्वीत आणि त्यांच्या उभयंतात आणि जमिनीखाली सर्वकाही त्याच्याच मालकीचं आहे. तुम्ही मोठ्यानं बोलला तरी आणि जे काही गुप्त अथवा लपलंय ते सर्व त्यास ठाऊक आहे. अल्लाहशिवाय कुणी ईश्वर नाही. सारी सुंदर नावं त्याचीच आहेत.’’ (कुरआन – सुरे ताहा :आयत नं.1-8)
उमर यांनी सुरवातीच्या या आयाती ऐकल्या आणि ऐकतच राहिले. ह. खब्बाब रजि. यांनी दुसऱ्या आयातीचे पठण केले, ’’निश्तिच मीच अल्लाह आहे, माझ्याव्यतिरिक्त कुणी ईश्वर नाही. तेव्हा माझी आराधना करा आणि माझ्या आठवणीसाठी नमाज कायम करा.’’(कुरआन-सुरे ताहा : आयत नं.14)
या आयातींचा जादूसारखा परिणाम ह.उमर रजि. यांच्यावर झाला. ते म्हणाले, ’’निःसंशय हा ईश्वरीय कलाम (साहित्य) आहे’’ त्यांनी बहिण आणि मेव्हण्याची माफी मागितली आणि सरळ घराबाहेर पडले आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. ज्या ठिकाणी आपल्या अनुयायांना दर्स (मार्गदर्शन) देत बसले होते त्या घरासमोर गेले. दारावर तैनात सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली. त्यावर ह.उमर रजि. यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना आपण भेटीला आल्याची बातमी देण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना तशी बातमी दिली. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांना आत बोलावून घेतले. प्रेषित सल्ल. म्हणाले, ’’ बोला उमर कसे काय आलात ? चांगल्यासाठी आलात का वाईट करण्यासाठी आलात?’’ त्यावर हजरत उमर रजि. नम्रपणे उत्तरले, ’’ हे प्रेषित सल्ल. मी आपला सच्चा अनुयायी बणून इस्लामचा स्विकार करण्यासाठी आलोय.’’ तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिमांनी , ’’अल्लाहु अकबर!’’ (अल्लाह श्रेष्ठ आहे) च्या घोषणा दिल्या आणि हजरत उमर रजि. यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या हातावर हात ठेऊन बैत घेतली आणि इस्लाम व प्रेषित सल्ल. यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निश्चय व्यक्त केला.
हजरत उमर रजि. यांनी ज्या दिवशी इस्लामचा स्विकार केला त्याच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी हजरत हम्जा रजि. यांनी इस्लाम स्वीकारला होता. ते ही मक्केतील एक मोठे प्रस्थ होते. या दोन धाडसी लोकांनी इस्लाम स्वीकारल्याने इस्लाम मानणाऱ्यांच्या गटात चैतन्य पसरले तर कुरैशच्या गटामध्ये नैराश्य पसरले.
हजरत उमर रजि. यांच्या द्वारे इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे इस्लामी इतिहासाला कलाटणी मिळाली. इस्लाम स्वीकारताच त्यांनी त्याची जाहीर घोषणा केली. त्यांनी व हजरत हम्जा रजि. यांनी मुस्लिमांच्या एका गटाला घेऊन काबागृहामध्ये जावून तवाफ (काबागृहाला 7 प्रदक्षिणा घालणे)  केला आणि आपण मुस्लिम झाल्याची सार्वजनिकरित्या घोषणा करून टाकली. या दोन योद्धयांच्या इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे मूर्तीपूजक कुरैशच्या गटामध्ये खळबळ माजली. हजरत उमर रजि. यांच्या या धाडसी कृतीचा सन्मान म्हणून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ह. उमर रजि. यांना ’अल-फारूक’ (सत्य आणि असत्यामध्ये फरक करणारा) ही पदवी बहाल केली. त्यानंतर हजरत उमर रजि. हे हजरत उमर फारूख रजि. या नावाने ओळखले गेले आणि आजही ओळखले जातात.
जेव्हा मुस्लिमांनी मदिनामध्ये हिजरत केली तेव्हा ती गुप्तपणे केली होती. पण ह. उमर रजि.यांना अशी गुपचूप हिजरत मान्य नव्हती. प्रेषित सल्ल. यांनी जेव्हा त्यांना मदिना येथे जाण्याचा आदेश दिला. तेव्हा ते सर्वप्रथम काबागृहामध्ये गेले. तलवार उपसून काबागृहाचा तवाफ केला आणि उपस्थित कुरैश लोकांच्या दिशेने तलवार फिरवून म्हणाले की, ’’तुमचा सर्वनाश होओ! मी मदिनेला जात आहे. कोणाला आपल्या पत्नीला विधवा करायचे असेल तर त्याने समोर येऊन मला थांबवावे.’’ त्यांना अडविण्याची कोणीच हिम्मत केली नाही आणि ते छाती पुढे करून ऐटित काबागृहातून निघाले ते थेट मदिनेला पोहोचले.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडे त्यांच्या शब्दाला फार मान होता. ह. अबुबकर रजि. यांच्यानंतर प्रेषितांकडे त्यांचे स्थान होते. त्यांनी प्रेषित सल्ल. यांना जे-जे सल्ले दिले होते त्यापैकी 21 सल्ले असे होते, ज्यांचे समर्थन दस्तुरखुद्द कुरआनच्या आयातींच्या मार्फत झाले. ते प्रेषितांवर जीवापाड प्रेम करीत होते. एकदा अशी घटना घडली की, त्यांच्या घरी एक ज्यू आणि एक मुस्लिम व्यक्ती आले व त्यांनी आपली गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. त्यांच्यापैकी ज्यू व्यक्तीने गयावया करत ह. उमर रजि. यांना सांगितले की, ’’प्रेषित सल्ल. यांनी आमची गाऱ्हाणी ऐकूण माझ्यातर्फे निर्णय दिलेला आहे.’’ त्यावर हजरत उमर यांनी त्या मुस्लिम व्यक्तीला विचारले की, ’’हा सांगतोय ते बरोबर आहे का? ’’ त्याने सांगितले की हो बरोबर आहे पण मला तुमच्याकडून न्याय हवा. तेव्हा हजरत उमर रजि. रागाने बेभान झाले आणि म्हणाले, ’’ठीक आहे. दोन मिनिटे थांब. मी न्याय देतो.’’ ते आत गेले, तलवार आणली आणि एका झटक्यात त्या मुस्लिम व्यक्तीचे डोके धडावेगळे केले. या घटनेवरून त्यांच्याकडे प्रेषित सल्ल. यांच्या शब्दाला किती मान होता, याचा अंदाज येतो.
त्यांनी इस्लामपूर्व काळात तीन विवाह केले होते. इस्लाम स्विकारल्यानंतर त्यांच्यापैकी एकाच पत्नीने इस्लाम स्विकारला होता. तेव्हा त्यांनी इस्लाम न स्विकारणाऱ्या दोन पत्नींना घटस्फोट देऊन टाकला. त्यांना एकदा कळाले की, प्रेषित सल्ल. यांच्या पत्नींमध्ये काही कारणांमुळे इर्ष्या निर्माण झाली असून, त्यात त्यांची मुलगी हफ्सा सुद्धा सामील आहे. तेव्हा त्यांनी तिचे मुंडके छाटण्याचा इरादा प्रेषित सल्ल. यांच्यासमोर व्यक्त केला होता. तसेच त्यांनी हफ्सा मार्फत प्रेषितांच्या अन्य पत्नींकडेसुद्धा तीव्र शब्दात त्यांच्या इर्ष्यात्मक वर्तनाबद्दल नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे प्रेषित सल्ल. यांच्या अन्य पत्नीसुद्धा त्यांना वचकून असत.
दि. 24 ऑगस्ट 634 रोजी द्वितीय खलीफा म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी ह. अबुबकर रजि. यांचा सन्मान म्हणून स्वतः खलीफा हे बिरूद लावण्याचा इन्कार केला. तेव्हापासून लोकांनी त्यांना ’अमीरूल मोमीनीन’ म्हणजे मुस्लिमांचा नेता म्हणून हाक मारण्यास सुरूवात केली. शपथ गृहण केल्यानंतर त्यांनी जे भाषण केले ते खालीलप्रमाणे, ’’ हे श्रद्धावानहो अबू बकर रजि. आता आपल्यात नाहीत. दोन वर्ष नेतृत्व देऊन ते अल्लाहकडे परत गेले आहेत. ते अत्यंत समाधानी असतील की, त्यांनी अथांग सागरात तुफान वादळात सापडलेली मुस्लिम राज्याची नौका सुरक्षितपणे वल्हवीत किनाऱ्याला नेली. धर्मत्यागाविरूद्धचे युद्ध त्यांनी यशस्वी करून दाखविले. त्यांना धन्यवाद असोत. आता अरबभूमीत इस्लाम सर्वोच्च झालेला आहे. तो आता पुढच्या मार्गावर आहे. आता बायझॅन्टाईन व पर्शिया या बलाढ्य साम्राज्यविरूद्ध अल्लाहच्या नावाने आपला जिहाद चालू आहे…’’
’’ह.अबू बकर रजि. नंतर खलीफापदाचे दायित्व माझ्यावर येऊन पडलेले आहे. मी या पदाची आकांक्षा कधीही धरलेली नव्हती. मी आश्वासन देतो की, या पदामुळे माझ्यावर पडलेल्या अनिवार्य जवाबदाऱ्या व कर्तव्य इस्लामच्या आज्ञेनुसार व माझ्या कुवतीनुसार पार पाडण्याचा मी प्रामाणिक व अहर्निश प्रयत्न करीत राहीन.’’
’’ या माझ्या कार्यात मी पवित्र ग्रंथाचे मार्गदर्शन घेईन व प्रेषितांनी व पहिल्या खलीफांनी घालून दिलेल्या परंपरांचे अनुसरण करीन… जर मी या मार्गापासून विचलित झालो, तर मला दुरूस्त करा.’’ (28-116).
कठोर बनव, मृदू बनव !
यानंतर त्यांनी पुढील प्रार्थना म्हटली व प्रत्येक वेळी ’आमीन’ (तथास्तु) असे म्हणण्यास लोकांना सांगितले :
’’हे अल्लाह! मी कठोर आहे. सत्याच्या प्रस्थापनेसाठी,
तुझ्या आज्ञा अमलात त्यांच्याविरूद्ध मला कठोर बनव…
’’ हे अल्लाह ! मला दांभिकतेपासून मुक्त ठेव. माझा दृढनिश्चय वाढव, जेणेकरून मी जे काही करीन ते केवळ तुझ्या प्रसन्नतेसाठीच असेल…
’’हे अल्लाह ! माझे हृदय श्रद्धावानांसाठी दयाळू बनव, जेणेकरून त्यांच्या गरजांकडे मी समर्पणबुद्धीने लक्ष देऊ शकेन…
’’ हे अल्लाह ! तुझ्या आज्ञापालनात मी कमी पडल्यास मला कार्यप्रवण कर व माझी श्रद्धा वृद्धिंगत कर.. आत्मपरीक्षण करण्याची मला शक्ती दे…’’
हे अल्लाह ! मला कुराणाचा अर्थ समजण्याची बुद्धी व त्यानुसार वागण्याचे सामर्थ्य प्रदान कर..’’ सदरच्या भाषणाचा संदर्भ : चार आदर्श खलीफा, लेखक : डॉ. शेषराव मोरे, पान क्र. 155).

– एम.आय.शेख

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *