पवित्र कुरआनच्या आदेशानुसार, वारसाचे अधिकार केवळ पुरुषांनाच प्राप्त नाहीत तर यात स्त्रियांचेही अधिकार आहेत. वारसा कमी प्रमाणात असो की जास्त प्रमाणात, त्याची मयताच्या सर्व नातेवाईकामध्ये वाटणी करून द्यावी. शेतजमीन असो की घरदार, एवढेच नव्हे तर मयताने मागे सोडलेल्या उद्योगधंद्याचीही सर्व वारसदारांमध्ये वाटणी व्हावी.
अल्लाह आदेश देतो की पुरुषांसाठी दोन स्त्रियांइतका वाटा आहे. जर फक्त मुलीच वारसा असतील आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतील तर त्यांच्यासाठी मयताने मागे सोडलेल्या वारसामध्ये २/३ वाटा मिळेल. पण जर एकच मुलगी असेल तर तिला निम्मा वाटा मिळेल, बाकीची मालमत्ता इतर नातलगांमध्ये वाटली जाईल.
महत्त्वाची गोष्ट अशी की वारसा हक्काची विभागणी मयताने करून ठेवलेल्या मृत्रुपत्राची पूर्तता करून आणि त्याने कोणते कर्ज मागे सोडलेले असेल तर त्या कर्जाची परतफेड करूनच केली जाऊ शकेल. मयताची संतती असेल तर त्याच्या मातापित्यांना देखील प्रत्येकास सहावा हिस्सा दिला जाईल. जर मयताची संतती नसेल आणि फक्त मातापिताच वारस असतील तर मातेला एकतृतियांश हिस्सा मिळेल आणि जर मयताचे भाऊ-बहिणी असतील तर मातेस सहावा हिस्सा मिळेल. (मयत) पत्नीला संतती नसेल तर तिने मागे सोडलेल्या संपत्तीत पतीचा अर्धा वाटा असेल, पण जर तिला संतती असेल तर पतीला तिच्या संपत्तीत एकचतुर्थांश वाटा आहे. (मयत) पतीला जर संतती नसेल तर त्याने मागे सोडलेल्या संपत्तीत पत्नीला एकचतुर्थांश वाटा मिळेल, पण जर पतीला संतती असेल तर पत्नीला १/८ वाटा मिळेल.
एखाद्या पुरुष अथवा स्त्रीला स्वतःची मुलंबाळं आणि वडीलही नाहीत पण भाऊबहीण असेल तर त्या दोघांना प्रत्येकास सहावा हिस्सा मिळेल. जर एकापेक्षा जास्त भाऊबहिणी असतील तर त्यांना संपत्तीचा एकतृतियांश वाटा मिळेल.
तुमचे वाडवडील अथवा तुमच्या मुलांपैकी कोणी तुम्हांस लाभदायी ठरतील हे तुम्हास माहीत नाही. अल्लाहने ठरवून दिलेल्या या मर्यादा आहेत. म्हणून त्यालाच सर्व बाबींची जाणीव आहे. (पवित्र कुरआन, अध्याय-४)
– सय्यद इफ्तिखार अहमद
0 Comments