पवित्र कुरआनात अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना उद्देशून असे म्हटले आहे की “दिवसाच्या तेजाची आणि शांत अंधार पसरत असलेल्या रात्रीची शपथ, तुझ्या विधात्याने तुला अधांतरी सोडलेले नाही. तुमच्यासाठी पहिल्या परिस्थितीपेक्षा नंतरची स्थिती चांगलीच असणार आहे.” याचा अर्थ असा की रात्र आणि दिवस एकामागोमाग परतत असतात. त्याचप्रमाणे माणसाची स्थितीदेखील बदलत असते. बदल हा सृष्टीचा नियम आहे. एकच परिस्थिती कधीच राहात नसते. जर हे नियम निसर्गाला लावून दिले नसते आणि फक्त दिवसच दिवस किंवा नेहमीच रात्र असती तर कालचक्रदेखील स्थिरावले असते. स्थिरता म्हणजे ज्यात जीवन नसते. बदल होत राहाणे हे जीवन आहे. या जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग येत असतात. ते येत राहाणार, कारण हाच जीवंत असल्याचा पुरावा आहे.
माणसाने या बदलांना घाबरून जाण्याचे कारण नाही. उलट एकच परिस्थिती असती तर विचलित अवस्था निर्माण होते. रात्रंदिवसाचे हे कालचक्र सबंध मानवजातीमध्ये फिरत असते. आज जे लोक श्रीमंत आहेत, ते काल गरीब होते. आज जे गरीब आहेत, जर सृष्टीच्या नियमात बदल झाला नसता तर हे सदैव गरीबच राहातील. हा अल्लाहचा न्याय नाही. श्रीमंती आणि वंचितावस्था माणसामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये बदलत असते. कठीण प्रसंग जसे येतात तसे ते निघूनही जातात, कारण त्यांनासुद्धा बदलांचा नियम लागू आहे. पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो की “तुमच्यावर कोसळणारी अनिष्ठ आपदा हे पूर्वीपासूनच नोंदवून ठेवलेली घटना आहे. त्यानुसारच मानवजातीला आपत्तींना सामोरे जावे लागते.”
प्रेषितांना संबोधून याच अध्यायात अल्लाहने पुढे सांगिलते आहे की “तुम्ही अनाथ असताना तुम्हाला आश्रय दिला. तुम्हाला स्वावलंबी केले. एकाच परिस्थितीशी तोंड द्यावे लागत नाही, जसे तुम्ही गरीब होता तेव्हा तुम्हाला त्याने श्रीमंत केले. तसेच तुम्हीदेखील गरजूंची काळजी घ्या. कुणी मागिलत्यास झिडकारू नका. तुमच्या विधात्याने जी तुम्हाला देणगी दिली ती जाहीर करा.”
0 Comments