Home A blog A रमजान : चरित्र निर्माणाची सुवर्णसंधी

रमजान : चरित्र निर्माणाची सुवर्णसंधी

मुल्यविहीन भौतिक शिक्षणाच्या प्रसारामुळे आज देशात प्रत्येक क्षेत्रात चरित्रहीन लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. चरित्रहीन हा शब्द ज्या विशिष्ट अर्थाने वापरला जातो तो अर्थ इथे अपेक्षित नाही. चरित्रहीन म्हणजे मानवतेला नुकसान पोहोचवणार्‍या सर्व अवगुणांचा समुच्चय असलेली माणसे असा घेण्यात यावा. आज कोणत्याही क्षेत्रात, कोणालाही विश्‍वासाने एखादे काम सांगून, निवांत बसता येण्यासारखी परिस्थिती नाही. सातत्याने ज्याला काम सांगितलेले आहे, तो ते काम नीट करत आहे किंवा नाही? याकडे लक्ष ठेवावे लागते. यात प्रत्येकाची ऊर्जा आणि वेळ विनाकारण वाया जातो. उदा. आपण एखादे घर बांधायला घेतले असेल तर बांधकामाचे सर्व साहित्य घर बांधणार्‍याला देऊन, आपण निवांतपणे आपल्या कामावर जावू शकत नाही. कारण आपल्या माघारी बांधकाम करणारा व्यवस्थित बांधकाम करेल, याची आपल्याला शाश्‍वती नसते. म्हणून त्याच्या बोकांडीवर उभे रहावे लागते. तो सिमेंटमध्ये माती तर मिसळत नाही ना, याची काळजी घ्यावी लागते. यात वेळ आणि ऊर्जा वाया जाते. आदर्श स्थिती तर अशी हवी होती की, बांधकामासाठी लागणार्‍या आवश्यक वस्तू पुरवून, त्याच्यावर विश्‍वास ठेवून आपण आपल्या कामाला लागायला हवे होते. पण बांधकाम करणार्‍याच्या चारित्र्यावर विश्‍वास नसल्यामुळे आपल्याला आपला कामधंदा सोडून त्याच्यावर देखरेख करीत बसावी लागते. हे झाले एक उदाहरण.
आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या अनेक गोष्टी अशा असतात की, त्यांच्यावर लक्ष ठेवल्याशिवाय त्या अपेक्षेप्रमाणे केल्या जात नाहीत. कारण त्या क्षेत्राशी संबंधित लोकांमध्ये चरित्रहीन लोकांची संख्या जास्त असते. सारांश तक्वाविहीन (चरित्रहीन) लोकांची वाढती संख्या हे आजचे वास्तव आहे. आणि वास्तव नाकारल्याने प्रश्‍न संपत नाहीत. समाजाला अनैतिकतेची लागण झाली की, सामाजिक वातावरण विषक्त होऊन जाते. वेळीच काळजी घेतली नाही तर सगळा समाज नासून जातो. आज समाजातून स्वार्थी, कपटी, लिंगपिसाट लोकांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. पोलीस, कायदे व न्यायालये त्यांना रोखण्यास असमर्थ आहेत, हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. अशा लोकांच्या उपद्रवाचा त्रास समाजातील संसाधनविहीन लोकांना जास्त होतो. हे भ्रष्ट आणि चारित्र्यहीन लोक हेच समाजाचे खरे शत्रू आहेत. अशा लोकांची संख्या कमी करून चारित्र्यवान लोकांची संख्या वाढविण्यासाठी वार्षिक प्रशिक्षणाची व्यवस्था अल्लाहने रमजानच्या माध्यमातून केलेली आहे. ज्याप्रमाणे पोलीस खलप्रवृत्तीच्या विरूद्ध असतात, त्याचप्रमाणे मुस्लिम सुद्धा खलप्रवृत्तीच्या विरूद्ध असतात. एका दृष्टीने मुस्लिमांची समाजात पोजीशन (स्थिती) पोलिसांसारखीच असते. वाईट गोष्टीं (मुनकरात) चे उच्चाटन व चांगल्या गोष्टीं (मारूफात) ची प्रतिष्ठापणा हेच इस्लामचे उद्देश्य आहे. समाजामधून वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्यापूर्वी आपल्या व्यक्तिमत्वातून त्यांचे उच्चाटन करणे आवश्यक असते. ज्याप्रमाणे आपण स्वत: दारू पीत असतांना दुसर्‍याला पीऊ  नको म्हणून सांगण्याचा कुठलाच नैतिक अधिकार आपल्याला नसतो. त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वात वाईट प्रवृत्ती ठेवायच्या व समाजातून त्याचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करायचा, यापेक्षा मोठा विरोधाभास असूच शकत नाही.
समाजातून वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी ज्याप्रमाणे पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले जाते त्याचप्रमाणे मुस्लिमांनासुद्धा विशेष प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण दैनंदिन आणि वार्षिक अशा दोन स्तरावर असते. रोज पाच वेळेच्या नमाजच्या माध्यमाने माणसांच्या व्यक्तिमत्त्वातून वाईट गोष्टींचा नाश केला जातो व चांगल्या सवयी रूजविल्या जातात. काही लोक नमाजमध्ये अनियमितता बाळगतात म्हणून त्यातही काही त्रुटी राहून गेल्या असतील तर वार्षिक प्रशिक्षणात ३० दिवसांचे उपवास (रोजे) ठेवण्यास भाग पाडून लोकांच्या व्यक्तिमत्त्वातून उरल्या-सुरल्या त्रुटीही संपविण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आदर्श समाजाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो. 
तक्वा म्हणजे काय?
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ज्याप्रमाणे आपण जंगलातून जातांना स्वत:ला इजा होवू नये म्हणून काट्या-कुपाट्यापासून वाचत काळजीपूर्वक चालतो. त्याचप्रमाणे ज्या सवयींपासून माणसाला व पर्यायाने समाजाला नुकसान होईल, अशा गोष्टींपासून स्वत:ला वाचवून आयुष्याची वाटचाल करणे म्हणजे तक्वा.
सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यस तक्वा म्हणजे, अल्लाहची भीती बाळगून चांगले वागणे. चांगले चारित्र्य, चांगल्या सवयींमधून निर्माण होते व चांगल्या सवयी अंगी बाणवण्यासाठी, ’चांगल्या सवयी जपा’ असा सुभाषितवजा सल्ला देवून भागत नाही. म्हणून इस्लामने लोकांमध्ये चांगल्या सवयी रूजविण्यासाठी द्विस्तरीय अशी ठोस योजना, नमाज आणि रोजांच्या माध्यमातून दिलेली आहे. डोळ्यासमोर योजना असेल तर कोणालाही त्या योजने बरहुकूम चालणे सोयीचे असते. योजनेविना कोणतेही महान कार्य पूर्ण होऊ शकत नाही. ऐन वेळेसच्या जुळवा-जुळवितून फारसे काही साध्य होत नाही. तक्वा ऽ चारित्र्य भौतिक शिक्षणातून निर्माण होत नाही. म्हणून इस्लामने त्याच्या निर्मितीसाठी नैतिक शिक्षणाची खास व्यवस्था निर्माण केलेली आहे. ती व्यवस्था कशी आहे? हे पाहण्यापूर्वी प्रत्येक मुस्लिमाने एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला एकाच वेळी दोन युद्धांचा सामना करावयाचा आहे. एक अंतर्गत युद्ध तर दुसरे बर्हिगत युद्ध. अंतर्गत युद्धात राग, लोभ, द्वेष, मत्सर, भेदभाव इत्यादी मनोविकारांशी युद्ध करावे लागते. तर बर्हिगत युद्धात दुषित वातावरण, वाईट मित्र, अश्‍लिलता, नशा, इत्यादी वाईट गोष्टींशी युद्ध करावे लागते. सकृतदर्शनी हे युद्ध जरी सोपे नसले तरी त्या लोकांसाठी हे युद्ध सहज जिंकता येण्यासारखे आहे जे कुरआनच्या खालील निर्देशांवर ईमान (श्रद्धा) ठेवतात.
१. ” जे अल्लाहचे भय बाळगतात, परोक्षवर श्रद्धा ठेवतात, नमाज कायम करतात आणि जी उपजिविका आम्ही त्यांना दिली आहे, तिच्यातून खर्च करतात. जो ग्रंथ प्रेषित मुहम्मद सल्ल.वर अवतरित करण्यात आलेला आहे, अर्थात कुरआन आणि जे ग्रंथ प्रेषितांपूर्वी अवतरीत करण्यात आलेले आहेत त्या सर्वांवर देखील श्रद्धा ठेवतात आणि मरणोत्तर जीवनावर दृढ विश्‍वास ठेवतात. असेच लोक आपल्या पालनकर्त्यांकडून सन्मार्गावर आहेत आणि तेच सफल होणार आहेत. ” (सुरे बकरा आयत नं. २,३,४,५). सुरे बकराच्या वर नमूद आयातींमध्ये चारित्र्य निर्मितीसाठी सात आवश्यक गुणांची अत्यंत प्रभावशाली पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे. हे गुण ज्यांच्या अंगी रूजले ते खरे तक्वावान अर्थात चारित्र्यवान लोक असतील याची हमी स्वत: अल्लाहने दिलेली आहे आणि हेच लोक सन्मार्गावर आहेत आणि हेच सफल होणार याची शुभवार्ताही दिलेली आहे. ते सात गुण म्हणजे १. अल्लाहचे भय बाळगणे २. परोक्ष (गायब) वर श्रद्धा ठेवणे ३. नमाज कायम करणे ४. जे काही उपजिविकेचे साधन अल्लाहने दिलेले आहे त्यातून अल्लाहच्या मार्गामध्ये खर्च करणे. ५. कुरआनवर श्रद्धा ठेवणे ६. कुरआनच्या पूर्वी जे ईश्‍वरीय ग्रंथ अवतरले आहेत त्यांच्यावरही श्रद्धा ठेवणे ७. मरणोत्तर जीवनावर दृढ विश्‍वास ठेवणे. वरील सद्गुण अंगात बाणवल्याशिवाय माणसात तक्व्याची निर्मिती होऊच शकत नाही.
२. दुराचारांच्या नेतृत्वाखाली कधीच सदाचारी समाज आकार घेवू शकत नाही. आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी, समाजात सदाचारी लोक, बहुसंख्येने असण्याची आवश्यकता असते. सदाचाराच्या बाबतीत कुरआन खालीलप्रमाणे निर्देश देतो, ”सदाचार हा नव्हे की तुम्ही आपले तोंड पुर्वेकडे किंवा पश्‍चिमेकडे करावे, तर सदाचार हा आहे की, जे अल्लाहवर आणि अंतिम दिवसावर इमान ठेवतात. तसेच सर्व दूतांवर, सर्व ग्रंथांवर, सर्व प्रेषितांवर श्रद्धा ठेवतात. अल्लाहच्या प्रेमापोटी आपल्याला प्रिय असलेली संपत्ती आपल्या नातेवाईकांवर, अनाथांवर, गरजवंतांवर, वाटसरूंवर तसेच गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करतात आणि नमाज कायम करतात व जकात अदा करतात. तसेच दिलेल्या वचनाची पूर्तता करतात आणि अडचणी, संकटे तथा युद्धप्रसंगी देखील सयंम राखतात, हेच लोक सत्यशिल (सदाचारी) आणि अल्लाहचे भय (तक्वा) बाळगणारे आहेत.” (संदर्भ : सुरे बकरा आयत नं.१७७).
या आयातींमध्ये आयत क्रं. २,३,४ आणि ५ मध्ये नमूद केलेल्या सद्गुणांपैकी काही सद्गुणांचा पुनरूच्चार करून चार अतिरिक्त सद्गुणांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यात गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करणे, जकात अदा करणे, एकमेकांना दिलेल्या वचनांची पूर्तता करणे आणि अडी-अडचणी, संकटाच्या काळात एवढेच नव्हे तर युद्ध प्रसंगी देखील संयम राखणे. या सद्गुणांचा समावेश करण्यात आलेला आहे.
३. रोजांच्या बाबतीत कुरआनमध्ये एक संपूर्ण आयातच अवतरित झालेली आहे ती खालीलप्रमाणे.
”हे ईमानधारकांनो! तुमच्यावर रोजे अनिवार्य केलेले आहेत. जसे की, तुमच्या पूर्वीच्या लोकांवरही अनिवार्य केले होते. जेणेकरून तुम्ही तक्वावान (धर्मपारायण) व्हाल.” (कुरआन : सुरे बकरा आयत नं. १८३).
कुरआन पुन्हा-पुन्हा चारित्र्यनिर्मितीच्या आवश्यकतेवर भर देत आहे. यावरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, चारित्र्यवान व्यक्तीशिवाय कुठलाही समाज संतुलित प्रगती करू शकत नाही. या आयातींमध्ये रोजांचा सरळ संबंध चारित्र्यनिर्मितीशी जोडलेला आहे व म्हटलेले आहे की, रोजे हे फक्त धर्मपारायणतेसाठी अर्थात चारित्र्यनिर्मितीसाठी अनिवार्य करण्यात आलेले आहेत.
ते कसे हे आता आपण पाहू. उदा. एक रोजदार आहे. त्याला दिवसातून चोरून खाण्या-पिण्याच्या शेकडो संधी मिळत असतात. सर्वांची नजर चुकवून सहज तो काहीतरी खाऊ-पिऊ शकतो. परंतु, तो असे करत नाही. भूक लागल्याने व्याकूळ होतो, तहान लागल्याने जीव कासावीस होतो पण सर्वकाही सहन करून सूर्यास्तापर्यंत तो संयम ठेवतो. असे करण्यास त्याला अल्लाहचे भयच भाग पाडते. स्पष्ट आहे रोजांमुळे अल्लाहचे भय अंगी बानवते. ३० दिवसाच्या कठिण प्रशिक्षणातून तो मग पुढील ११ महिने वाईट गोष्टींपासून लांब राहण्याची शक्ती प्राप्त करतो. म्हणजेच तो चरित्रवान बनतो. दैनंदिन नमाज आणि वर ३० दिवसांचे रोजे यापेक्षा सुलभरित्या चारित्र्यनिर्मितीची व्यवस्था जगात दूसरी नाही. रोजे म्हणजे फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपाशी राहणे एवढेच नाही. रोजाच्या कालावधीमध्ये नुसते उपाशी रहायचे नसते तर डोळ्यांनी वाईट पहायचे नाही, कानांनी वाईट ऐकायचे नाही, तोंडाने वाईट बोलायचे नाही, दिवसभर सत्कृत्य करायचे, वाईट कृत्यांपासून दूर रहायचे. संधी मिळूनही जसे खायचे-प्यायचे नाही तसे संधी मिळूनही वाईट कृत्य करायचे नाही. शिवाय, जवळजवळ १४ तासांचा रोजा, त्यातून निर्माण होणारी भुकेची तीव्रता, या सगळ्यांची जाणीव प्रत्येक माणसाला सतत ३० दिवस होत राहते. त्यातून गरीबांना उपाशी राहिल्यामुळे होणारा त्रास प्रत्येक श्रीमंताला सुद्धा अनुभवता येतो. म्हणून रोजा ठेवणारी श्रीमंत मंडळी सुद्धा कुठलाही माणूस गरीबीमुळे उपाशी झोपणार नाही, यासाठी खर्च करण्यासाठी प्रेरित होतात.
४. ”लोकहो उपासना करा आपल्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पुर्वीच्यांनाही निर्माण केलेले आहे. जेणेकरून तुम्ही (दुष्कृत्यांपासून) परावृत्त राहू शकाल.” (सुरे बकरा, आयत नं. २१).
या ठिकाणी सुद्धा अल्लाहने उपासना अर्थात इबादत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. उपासनेची सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे नमाज. दिवसातून पाच वेळेसची नमाज माणसामध्ये चांगल्या सवयी निर्माण करण्याची हमी देते आणि ज्यांच्या सवयी चांगल्या असतात त्याचे चारित्र्य चांगले असते हे ओघाने आलेच. 
५.”हे श्रद्धावंतांनो! अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्त्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की, तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा हे ईशपारायणतेशी (तक्वाशी) अधिक निकट आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत रहा, जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची पूरेपूर खबर ठेवणारा आहे.” (सुरे अलमायदा आयत नं.८).
माणूस असेल किंवा जनसमूह त्यांच्यामध्ये न्यायबुद्धी असणे, चांगल्या चारित्र्याच्या प्रमुख लक्षणांपैकी एक महत्त्वाचे लक्षण आहे. न्याय हे फक्त आपल्या समुहाशीच नव्हे तर समाजातील सर्वच समुहाशी करणे हे नैतिकदृष्ट्या बंधनकारक आहे. एखाद्या व्यक्ती किंवा गटाशी काही कारणाने असलेले वैर आपल्याला त्यांच्याबरोबर न्याय करण्यापासून रोखत असेल तर ते आपल्या चारित्र्याचे सर्वात मोठे वैगुण्य ठरेल, या आयातींमध्ये याच महत्त्वाच्या गुणाकडे लक्ष वेधण्यात आलेले आहे.
आदर्श समाज रचना
आदर्श समाजाची रचना, भौतिक शिक्षण घेतलेल्या, चंगळवादी शैलीत रंगलेल्या, अनैतिक जीवनशैली अंगिकारलेल्या, लोकांकडून होवूच शकत नाही. याचा अनुभव आपल्या सगळ्यांना एव्हाना आलेला आहे. पश्‍चिमी जीवनशैली मुळे निर्माण होणार्‍या वाईट चारित्र्यांच्या लोकांचा कारखाना बंद पाडायचा असेल व आपल्य प्रिय भारत देशात चांगल्या चारित्र्याच्या लोकांची निर्मिती करावयाची असेल तर पश्‍चिमेकडून आलेल्या वाईट जीवनशैलीचे हे आव्हान मुस्लिमांनी स्विकारायलाच हवे. दुर्भाग्याने मुस्लिम समुदायातील एका मोठ्या वर्गाला हे आव्हान स्वीकारण्याची गरज वाटत नाही. उलट ते जन्माने जरी मुस्लिम असले तरी मनाने पूर्णतया पाश्‍चिमाळलेले आहेत. अशा लोकांनाही त्यांच्या मार्गापासून परावृत्त करून सद्मार्गाकडे आणण्याचे दुहेरी आव्हान चारित्र्यवान मुस्लिमांसमोर आहे. आज देशामध्ये वाईट चारित्र्यांच्या लोकांची गर्दी झालेली आहे. चांगल्या चारित्र्यांच्या लोकांची वाणवा आहे. ही जागा भरून काढण्याची सुवर्णसंधी, रमजाननिमित्त मुस्लिमांनी साधायला हवी. चांगल्या, सद्गुणी व जबाबदार नागरिक घडविणे यापेक्षा मोठी देशसेवा असूच शकत नाही.
सारांश – दुभंगलेली मने, वाईट चारित्र्य या आदर्श समाजाच्या रचनेमधील प्रमुख अडचणी आहेत. आपसातील असलेले वैरभावनेतून शत्रुत्व वाढते आणि त्यातून अनेक गुन्हे घडतात. एकमेकांविषयी प्रेम, दया, करूणा, बंधुभाव, सद्भावना या गोष्टी अल्लाहच्या उपासनेमुळेच आपल्या मनामध्ये निर्माण होतात. अल्लाहच्या उपासनेपासून आपण जेवढे दूर जाऊ तेवढेच हे सद्गुण आपल्यापासून दूर जातात. म्हणून मुस्लिमांनी रमजानची संधी साधून आपल्यामध्ये चारित्र्याची निर्मिती करण्याचे नियोजनपूर्वक प्रयत्न करायला हवेत. नुकताच सुरू झालेला रमजानचा महिना हा खडतर प्रशिक्षण काळ आहे. या प्रशिक्षणात जो जीव ओतून स्वत:ला जेवढा प्रशिक्षित करील तेवढाच तो समाजोपयोगी होईल, याची खुनगाठ प्रत्येकाने बांधावी.
प्रत्यक्षात आपण पाहतो रमजान म्हणजे काही लोकांसाठी डायटींगचा महिना असतो. अशा लोकांची गरज अल्लाहला नाही, असे अनेक हदीसमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. अनेक लोक या महिन्यात रात्रभर जागतात, मेजवाण्या उडवितात, दिवसभर झोपतात ही दिनचर्या सुद्धा अल्लाहला अपेक्षित नाही. आपले दैनंदिन काम करत, रमजानचे हे खडतर प्रशिक्षण घेणे यातच तर खरा आनंद आहे. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना रमजानचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्याची, सुंदर असे चारित्र्य निर्माण करण्याची व त्यातून देशसेवा करण्याची शक्ती दे. आमीन.

– एम आय. शेख
www.naiummid.com

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *