Home A blog A इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री

इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री

पूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या प्राचीन संस्कृतीमध्ये ग्रीक, रोमन, सिंधू, इजिप्त यांचा समावेश होतो आणि या संस्कृतीनुसार जीवनपद्धतीने जीवन जगणारे आणि चालणाऱ्या  देशांमध्ये ग्रीक, रशिया, इजिप्त, भारत, इराण, इराक या देशांचा अंतर्भाव होतो. या देशांच्या इतिहासापूर्वी पृथ्वीतलावर एका आदीमानवांचं जोडपं म्हणजे नर-मादी (आदम व हव्वा)  यांचे प्रगटन झाले आणि त्यापासून मानव जातीचा विकास व निर्मिती झाली. स्वतःच्या जीवीताच्या रक्षणासाठी मानव समूह करून राहू लागला व जसजशी मानवांच्या संख्येत वाढ  झाली तसतसा तो नदीच्या बाजूच्या सुपीक प्रदेशात वास्तव्य करू लागला. त्यातून विविध संस्कृतींची निर्मिती झाली. उदा. सिंदू नदीच्या खोऱ्यातील सिंधू संस्कृती तसेच नाईल नदीच्या  खोऱ्यातील इजिप्तची संस्कृती होय.
अशा अनेक संस्कृतीमध्ये जीवन जगत असताना मानवाने आपल्या बुद्धीकौशल्यावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा यथायोग्य प्रयत्न केला.  परिणामी धर्मव्यवस्था प्रचलित झाली. ’’धर्म म्हणजे जीवन जगण्याची नियमावली.’’ निसर्गाद्वारे धर्माची आचारसंहिता अवतरली. एका मूळ धर्माचे अनेक धर्म झाले. नंतर यापैकी अनेक  धर्मांमध्ये काही कालावधीपर्यंत स्त्रीचे स्थान अत्यंत दीन किंवा निकृष्ठ दर्जाचे होते त्यामुळे तिच्याकडे उपभोग्य वस्तू अथवा निर्जीव वस्तू म्हणून तिला हीन लेखले जात होते.
ग्रीक, रशिया, इजिप्त, इराक, भारत, चीन या प्रत्येक ठिकाणी स्त्रीयांवर अत्याचारच होत होता. बाजार, उत्सव, उरूस यामध्ये स्त्रीयांची कवडीमोल किंमतीत विक्री खरेदी आणि तस्करी होत होती. पैगंबर मुहम्मद (सल्ल.)  यांच्या पूर्वीच्या काळात तर ग्रीकमध्ये स्त्रीला आत्मा आहे की नाही, यावर हजारो वर्ष वादविवाद झाले. पाप-पुण्याच्या कल्पना मांडत असतानाच  पापाचे प्रतिरूप म्हणून स्त्रीकडे पाहिले जाऊ लागले. पापाची सुरूवात स्त्रीच्या जन्मापासून सुरू झाली अशाही अख्याईका रचल्या गेल्या आणि त्याला पौरोहीत्याच्या आधार दिला गेला. त्यामुळे स्त्री जन्माला आल्यापासून ते तिच्या अंतापर्यंतचे संपूर्ण जीवन दुसऱ्याच्या अधिन करण्यात आले. त्याचबरोबर तिला दुसऱ्यावर विसंबुनच जगण्याची व्यवस्था बहुतांशी देशांमध्ये  निर्माण केली गेली. जन्मापासून विवाहापर्यंत तिला वडिलांच्या अधिन ठेवले तर विवाहानंतर वृद्धापकाळापर्यंत पतीच्या तर वृद्धापकाळापासून मृत्यूपर्यंत मुलाच्या अधिन अशाप्रकारची जीवनपद्धती तीच्या नशिबी मारली. एवढेच नाही तर ’’नारी नरक का द्वार है’’ असेही समजले गेले. तर तिचे संपूर्ण जीवन हे हक्काशिवाय होते. त्यामुळे मुलगी जन्माला येणे म्हणजे  पाप समजले जायचे, मुलीच्या जन्माच्या बातमीने पिता अपमानीत व्हायचा आणि तो अपमान रक्ताचा घोट गिळल्यासारखा त्याला गिळंकृत करावा लागायचा. अपमानाने व शरमेने तो  आपले तोंड लपवून फिरायचा तर मान खाली घालून जीवन कंठायचा. अशा प्रकारची स्त्रीविषयी अनास्था अनेक धर्मात थोड्या-अधिक प्रमाणात होती.
पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्या पूर्वीच्या काळातही अरबी टोळ्यामध्ये वरील परिस्थितीपेक्षा खूप काही वेगळी गत नव्हती. कारण अरबवासी मुलांना संपत्ती व गर्वाचे साधन समजायचे  तर मुलगी अपमानाचे,क्लेशदायक व लज्जास्पद समजत. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पूर्वीच्या काळामध्ये मुलींच्या बाबतीत काही अरबी टोळ्यामध्ये काही अमानवी प्रथा होत्या.
मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या गळ्यावरून सुरी फिरवली जात असे, डोंगर कड्यावरून खाली फेकून दिले जात असे, पाण्यामध्ये बुडविले जात असे. मुलीच्या जन्मानंतर लगेचच  मारून टाकून कुत्र्याला खायला त्याच्यासमोर टाकले जाई, प्रसुतीसमयी एक खड्डा खोदला जात असे आणि जर मुलगी जन्मली तर जन्मानंतर त्वरीत तिला गाडून टाकण्यात येई,  मुलगी थोडी मोठी झाल्यावर शृंगारसाजासहीत वाळवंटामध्ये नेऊन एका खोल खड्डयामध्ये ढकलून देऊन वरून माती ढकलली जात असे. (संदर्भ : स्त्री भ्रूणहत्या- कारणे व उपाय)

वरील विवरण जरी सत्य असले तरी जेवढया मुली जन्मास येत होत्या त्या सर्वांशीच वरिलप्रमाणे कठोर वर्तन होत होते असे नाही.
जगात जवळपास एक लाख 24 हजार पैगंबरानंतर  पृथ्वीतलावर सर्वांत शेवटी पैगंबर मुहम्मद (स.) हे अंतिम पैगंबर म्हणून आले. त्यानंतर पुन्हा पृथ्वीतलावर दुसरा कोणताही पैगंबर येणार नाही हे निश्चित झाले आणि त्यानुसार  एकमेव ईश्वराने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक क्रांती समाजामध्ये यथायोग्य घडवून आणली. त्यामध्ये स्त्री जातीविषयी अमुलाग्र बदल  घडवून आणले. संपूर्ण जगात स्त्रियांची अवस्था अत्यंत दयनीय असताना सर्वांत प्रथम इस्लाम धर्मामध्ये आपुलकीची व तिच्या अधिकारांची जाणीव करवून दिली जाऊ लागली. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचा संदेश असा की, ’’ मुलीच्या जन्माचे स्वागत करा.’’ आणि या सुधारणेचे सर्वाना पालन करणे अनिवार्य  झाले, कारण इस्लाममध्ये न्यायनिवाड्याच्या दिवसाचा अंतर्भाव झालेला असल्यामुळे प्रत्येकाला ईशभय वाटायला लागले आणि आजच्या स्त्रीभ्रूणहत्या विरोधातील मोहिमेची सुरूवात  चौदाशे वर्षापूर्वी पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी इस्लाम धर्मात केली. इस्लाममध्ये स्त्रीभ्रूणहत्या पाप तर आहेच पण ते कृत्य म्हणजे एक सैतानी कृत्य समजले गेले. तसेच अल्लाहच्या  न्यायालयात स्त्रीहत्या करणाऱ्याला कठोर शासनाची तरतूद न्यायनिवाड्याच्या दिवशीच निश्चित केली. मुलीची हत्या झाली तर शेवटच्या महाप्रलयाच्या दिवशी तीचा न्यायनिवाडा होईल  आणि तो न्यायनिवाडा चालू असताना अल्लाह त्या मुलीला विचारेल तुझी हत्या कोणत्या कारणाने केली? किंवा कोणत्या अपराधासाठी तुझी हत्या झाली?
जगातील प्रत्येक मानवाची निर्मिती एक पुरूष आणि एका स्त्रीपासूनच झाली आहे. विज्ञान कितीही प्रगत झाले तरी कोणतीही एक व्यक्ती दुसऱ्या नवीन मानवाची निर्मिती करूच शकत  नाही. याचाच अर्थ स्त्री-पुरूष या जोडीपासून मानव जन्मतो. म्हणजे सर्वांना समान अधिकार आहे. स्त्री-पुरूष समानता आहे. ईश्वराचे पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या अनुयायाकडून काही  गोष्टींबाबत वचने घेतात. त्यामध्ये संततीची हत्या करणार नाही हे देखील आहे. मग स्त्री अर्भकाचा संतती या शब्दात अंतर्भाव होतो की नाही? हा प्रश्न आज पुन्हा उभा राहिला.
’’ हे नबी (स.)! जेव्हा श्रद्धावंत स्त्रिया तुम्हाजवळ बैअत (प्रतिज्ञा) करण्याकरिता येतील आणि या गोष्टींची प्रतिज्ञा करतील की, अल्लाहबरोबर कोणालाही सामील करणार नाही, चोरी  करणार नाही, व्याभिचार करणार नाही, आपल्या संततीची हत्या करणार नाही, आपल्या हातापायासमोर कोणतेही कुभांड रचनार नाही आणि कोणत्याही चांगल्या कामामध्ये तुमची  अवज्ञा करणार नाही, तर त्यांच्याकडून बैअत (प्रतिज्ञा) घ्या, आणि त्यांच्या बाबतीत अल्लाहजवळ क्षमेची प्रार्थना करा निःसंशय अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे’’.  (दिव्य कुरआन, 60ः12).
वरील विवेचन हुदैबिया येथील तहानंतर ते मक्का विजयापूर्वीपर्यंत अनेक महिला मक्केहून स्थलांतर करून मदिनेत आल्या तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्या महिलेकडून वरील  वचने घेतली. अशा प्रकारचे वचन फक्त स्त्रीयांकडूनच घेतले असे नाही तर ती वचने पुरूषांकडूनही घेतली आहेत.
स्त्री अत्याचारपीडित असताना तसेच चोहोबाजूंनी तिच्याविषयी निषेध होत असताना तिची बाजू घेऊन तिला न्याय मिळवून देण्याचे काम सर्वप्रथम इस्लामने केले आहे. ज्या स्त्रीला जन्माला येण्याचा किंवा जन्मल्यावर जगण्याचा अजिबात अधिकार नसताना त्यांना तो इस्लामने मिळवून दिला. मानवाची मग ती स्त्री असो वा पुरूष उपजीविका अल्लाह चालवितो. तो  दोघांमध्ये कधीच भेदभाव करत नाही. त्याचीं उपजीविका सांभाळण्याची जबाबदारी अल्लाहची आहे. त्याला त्यांच्या भाकरीची काळजी आहे. आपण विनाकारण तसा गैरसमज बाळगण्याचे  कारण नाही की दारिद्रयात खितपत पडले असताना मुलगी जन्मास आल्याने ती आर्थिक संकट ठरते. कारण तिची काळजी तुमच्यापेक्षा अधिक नक्कीच अल्लाहला आहे आणि तोच तर  आपल्या सर्वांची उपजीविका चालवितो. मग आपल्या मुलींची उपजीविका चालवणार नाही असा स्त्रीभ्रुणहत्या करणाऱ्या दांम्पत्यास अविश्वास वाटतो की काय? इस्लाममध्ये मुलगी  जन्मास येणे म्हणजे स्वर्गाचे (जन्नतचे) दार खुले करणे आहे. इतर साधनांपैकी ते एक स्वर्गप्राप्तीचे साधन आहे. म्हणजेच ज्याला एक मुलगी असेल तो नरकापासून दूर, ज्याला दोन मुली त्यास स्वर्गप्राप्ती अनिवार्य, ज्याला तीन मुली त्यासुद्धा स्वर्गप्राप्ती. या परिवर्तनाने क्रांती झाली जे अरब मुलींची हत्या करायचे ते मुलींच्या जन्माची वाट बघायचे. एवढेच नाही तर  तिच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करू लागले.
जेवढे स्थान परिवारात मुलाला होते त्यापेक्षा अधिक श्रेष्ठत्व मुलीला देऊ लागले. इस्लामने स्त्रीला जगण्याच्या अधिकाराबरोबर तिला संरक्षणाचाही अधिकार दिला. त्या संरक्षणाची  जबाबदारी पिता, पती व पुत्र यांच्यावर सोपविली.
’’जी व्यक्ती दोन मुलींचे सज्ञान होईपर्यंत पालनपोषन करेल, शिक्षण, प्रशिक्षण, रितीरिवाज, शिष्टाचार, शिकवेल सहानुभूतीने वागवून त्यांचा विवाह करेल, ती व्यक्ती अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी हाताच्या दोन बोटातील अंतराएवढ्यावर माझ्या (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या) इतका जवळ असेल.’’
अशी शिकवण अनुयायांना त्यांनी दिली. त्यांनी म्हटले आहे ’’ जसा तुम्ही मुलाशी व्यवहार करता तसाच व्यवहार (वर्तन) मुलीशी करा.’’
जसे शरीराला पोशाख अत्यावश्यक आहे, अन्न पाणी आवश्यक आहे, निवारा आवश्यक आहे तसेच किंवा त्यापेक्षा अधिक स्त्रीला पुरूष आणि पुरूषाला स्त्री अत्यावश्यक आहे. त्यामुळे  प्रत्येक स्त्री-पुरूषाला अगदी आपापल्या आवडीनिवडीचे समान अधिकार आहेत.
इस्लामची शिकवण आहे की, प्रत्येक मुलाला त्याच्या जन्माने नैतिक व कायदेशीर अधिकार क्रमप्राप्त आहेत. त्याच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी त्याच्या पालकांची आहे. जेवढ्या  काळजीने मुलाचे संगोपन केले जाते त्यापेक्षा अधिक काळजीने मुलीचे करावे. मुलगी आपल्या उदरी जन्मास घालून अल्लाह आपल्याला आजमावण्याबरोबरच स्वर्गप्राप्तीची संधी देतो. हे  जग फक्त आणि फक्त अल्लाहच्या देणगीनेच चालते आणि ती देणगी म्हणजे स्त्री. म्हणून जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तिला खायला द्या, तुम्ही जेव्हा कपडे घ्याल, तेव्हा तिलाही घ्या.  मुलीला बरेवाईट बोलू नका, मारू नका वा घरातून हाकलू नका. मुलीशी घृणा करू नका कारण ती सहानुभूतीची प्रतिमा आहे. तसेच ती अनमोलदेखील आहे. मुलीच्या सर्व गरजा  भागविण्याबरोबरच तीला मुलाप्रमाणे शिक्षण-प्रशिक्षण देणे हेदेखील अनिवार्य आहे. तिला नुसतेच शिक्षण देणे असे नाही तर तिच्या शिक्षणावर विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. महात्मा जोतीबा फुले म्हणतात, ’’ विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतिविना वित्त गेले एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले.’’ शिक्षणाशिवाय प्रगती नाही म्हणून इस्लामने जेवढा शिक्षणाचा अधिकार मुलाला दिला तेवढाच मुलीलाही दिलेला आहे. इस्लाममध्ये स्त्रियांना शिक्षणाची दारे चौदाशे वर्षांपूर्वी खुली करण्यात आली आहेत. मुलीचे  शिक्षण-प्रशिक्षण ही बाब पुण्यकार्य वर्तिली आहे. इस्लाममध्ये प्रत्येक स्त्री पुरूषास भक्ती, नैतिकता, शरियतचे सर्व नियम पाळावेच लागतात आणि हे नियम ज्ञानाशिवाय अंमलात येणे  शक्य नाही. याचाच मतितार्थ स्त्री-पुरूष दोघांनी शिक्षण घेऊन ज्ञानी होणे जरूरीचे समजले जाते. इस्लामच्या प्रत्येक अनुयायाला धर्माचे मुलभूत ज्ञान असायलाच पाहिजे.  धर्मज्ञानासाठीही शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाने शहाणा झालेला समूह हा अंधश्रद्धांना बळी पडत नाही. म्हणूनच इस्लाममध्ये अंधश्रद्धा बाळगणे गैर समजले आहे. उदा. गृह-ताऱ्यावरून  भविष्य पाहणे हे अज्ञान काळाचे लक्षण समजले जाते.
स्त्रीला शिक्षणाच्या आधारे उद्योगधंदा, व्यापार, कृषी, देवाणघेवाण, कारागिरी, नौकरी, अध्ययन-अध्यापन, पत्रकारिता, लेखन या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी इस्लामची अनुमती आहे.  पण या क्षेत्रामध्ये कार्य करताना इस्लामने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडता कामा नयेत. स्त्रीने-सन्मानाने व आपल्या अब्रूचे संरक्षण करीत जीवन जगत-जगत विविध क्षेत्रांमध्ये नाव कमवावे. वाड्.मय, साहित्य क्षेत्रात कार्य करताना सामाजिक, सांस्कृतिक, अधिकारदेखील प्रदान केल आहेत. अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना तिने मिळविलेल्या  मिळकतीवर मालकी दाखविण्याचा पूर्णपणे अधिकार त्या स्त्रीला आहे.

(सदर लेख इस्लामिक मराठी पब्लिकेशनच्या ’इस्लामी सुरक्षित सावलीतील स्त्री’ या पुस्तकातून घेतलेला आहे.)

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *