कुरआनचे अध्ययन केल्यास लक्षात येते की, अल्लाह जो विश्वाचा निर्माता, मार्गदर्शक व सर्वांचा पालनकर्ता आहे, केवळ तोच ईश्वर आहे, या तत्त्वाची पुन्हा पुन्हा जाणीव करून देण्यात आली आहे. हीच बाब मानवी मनावर बिंबविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले आहेत. कुरआनने अल्लाहचे अस्तित्व पटवून देण्यापेक्षा तोच सर्वांचा पालनकर्ता असून केवळ तोच ईश्वर आहे या तत्त्वाची पुष्टी केली आहे. नास्तिकतेबाबत कुरआनात विशेष चर्चा नाही, मात्र अनेकेश्वरत्वाचे अनेक आयतींद्वारा खंडन करण्यात आले आहे. अल्लाहसह इतरांनाही ईश्वर मानण्यासंदर्भात लोक चार प्रकारच्या चुका करतात. (१) अल्लाहसोबत इतरांची आराधना करणे. (२) ईशगुण इतरांना प्राप्त असल्याबाबत श्रद्धा बाळगणे. (३) । अल्लाहसमान इतरांनाही शक्ती वा सामर्थ्य प्राप्त असते, अशी श्रद्धा बाळगणे. (४) । अल्लाहचे हक्क इतरांना बहाल करणे. १) अल्लाहसोबत इतरांना आराध्य मानण्याचे ठळक उदाहरण द्यायचे झाल्यास ख्रिस्ती धर्मीयांचा उल्लेख करता येईल. ते येशु ख्रिस्तांना अल्लाह-पुत्र मानतात. अल्लाह कोणत्याही सजीव प्राण्याचे रुप घेऊन अवतार धारण करतो, ही कल्पनाच मुळी फोल आहे. अल्लाह जो संपूर्ण विश्वाचा सृजनकर्ता आहे, तो एका माणसाचे रूप धारण करील, ही बुद्धीस न पटणारी बाब आहे. अल्लाहचा पुत्र मानणे म्हणजे माणसाला अल्लाहचा दर्जा देण्याचा अनेकेश्वरत्वी दृष्टीकोन आहे. अशाच प्रकारे अनेकेश्वरत्वी देवदूतांना अल्लाहच्या मुली मानतात. राम हा अल्लाहचा अवतार होता असे, मानणेही अनेकेश्वरत्वी श्रध्देचे उदाहरण आहे. २) ईशगुण इतरांनाही प्राप्त असतात असे मानणे हाही अनेकेश्वरत्वाचा प्रकार आहे. अल्लाह संपूर्ण विश्वातील प्रत्येकाचे म्हणणे ऐकत असतो. अल्लाहला संपूर्ण विश्वातल्या सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त आहे. जगाच्या पाठीवरून कोणत्याही कानाकोपऱ्यातून दिलेली आरोळी त्यास ऐकू येते. तो एकाच समयी सर्वकाही बघू शकतो. अल्लाह सर्वकाही एकाच वेळी पाहू शकतो, ऐकू शकतो, समजू शकतो, अशा प्रकारे दुसऱ्या शक्ती वा व्यक्तींनाही पाहता येते, ऐकता येते, सर्वकाही समजते असे मानणे म्हणजे एकेश्वरत्वास नाकारणे होय. एखादी व्यक्ती बिछाण्यावर पडल्या पडल्या एखाद्या महापुरुषाला (संत-साधूला) मदतीकरिता हाक देत असेल, तर ईशगुण त्या महात्म्यासही प्राप्त आहे असे तो समजत आहे, असा अर्थ निघतो. ३) अशाच त-हेने जे अधिकार अल्लाहस प्राप्त आहेत ते मानवासही प्राप्त आहेत, असे मानणे म्हणजे मानवाची अल्लाहशी बरोबरी करणे मानले जाईल. अल्लाह सर्व प्राण्यांचा भाग्यविधाता आहे. अल्लाहने मनुष्याला जे काही दिले आहे त्यात कोणीही कमी-जास्त फरक करू शकत नाही. अल्लाहच्या इच्छेविरुद्ध कोणीही कोणास ठार करू शकत नाही व अल्लाह एखाद्याला ठार करू इच्छित असेल तर त्याला जगातल्या सर्व शक्ती एकत्र येऊनही वाचवू शकत नाहीत. माणसाने अल्लाहचे अधिकार इतर शक्तींनासुद्धा प्राप्त आहेत, असा विश्वास बाळगणे फार मोठी चूक आहे. ईशगुण इतरांनाही प्राप्त असतात, अल्लाह इतर सजीवांचे रूप धारण करतो, अल्लाहचे अधिकार इतर शक्तींनाही प्राप्त असतात या धारणे वा श्रध्देमुळेच माणसे अनेकेश्वरत्वी होऊन ईश्वरेतरांची पूजा-अर्चा वा उपासना करण्याची चूक करतात. मनुष्य त्याच शक्ती वा व्यक्तीची उपासना करतो जिच्यापासून त्याचे भाग्य निश्चित होण्याची त्याला शक्यता वाटते. जर त्याच्या मनात दृढ विश्वास असेल की, अल्लाहव्यतिरिक्त इतर कोणत्याच शक्तीला अल्लाहसारखे सामर्थ्य व अधिकार प्राप्त नाही तर तो अनेकेश्वरत्वाकडे वळणार नाही. ४) उपरोक्त तिन्ही कारणांमुळे मनुष्य अनेकेश्वरत्वाकडे वळतो. माणसांनी अल्लाहची उपासना करायला हवी, त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला हवे, पण चुकीच्या धारणांमुळे तो इतरांची उपासना करू लागतो. कुरआनच्या शिकवणीनुसार, अल्लाहव्यतिरिक्त दुसरा कोणीच ईश्वर वा उपास्य होऊ शकत नाही. अल्लाह सर्वकाही ऐकतो, सर्वकाही पाहतो, तो सर्वज्ञ आहे व तोच सर्वशक्तिमान आहे, तोच प्रार्थना ऐकू शकतो, प्रार्थना मान्य करू शकतो. म्हणून त्याचे दासत्व स्वीकार करायला हवे. त्याचीच उपासना करायला हवी. कुरआनात बऱ्याच वेळा याच बाबींचा उल्लेख केला गेला आहे. उद्देश्य हाच की, मनुष्याने अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणासही पूज्य (आराध्य) मानू नये.
ज्याप्रमाणे आराध्याच्या बाबतीत माणूस चूक करतो, तसाच तो पालनकर्त्याच्या बाबतीतही चूक करतो. ‘रब’ म्हणजे पालनकर्ता. ‘इलाहा’ व ‘रब’ (आराध्य व पालनकर्ता) या दोन्ही संज्ञाच्या बाबतीत मानवाने चुकीच्या धारणा निर्माण करून अल्लाहनिर्मित व अल्लाहद्वारेच अस्तित्वात असलेल्या सजीव व निर्जीवांना उपास्य मानले आहे.
ज्याप्रमाणे आराध्याच्या बाबतीत माणूस चूक करतो, तसाच तो पालनकर्त्याच्या बाबतीतही चूक करतो. ‘रब’ म्हणजे पालनकर्ता. ‘इलाहा’ व ‘रब’ (आराध्य व पालनकर्ता) या दोन्ही संज्ञाच्या बाबतीत मानवाने चुकीच्या धारणा निर्माण करून अल्लाहनिर्मित व अल्लाहद्वारेच अस्तित्वात असलेल्या सजीव व निर्जीवांना उपास्य मानले आहे.
0 Comments