प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर जमात-ए-इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (SIO) यांच्या पुढाकाराने अहमदनगर येथील कासिम खानी मस्जिद येथे UPSC , MPSC , NEET , JEE , LAW सारख्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी स्टडी सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. या स्टडी सेंटर मध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी शांत वातावरण , स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेली पुस्तके ,ऑनलाइन प्रशिक्षणासाठी प्रोजेक्टर , अभ्यास करण्यासाठी स्टडी चेयर आणि विविध तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मस्जिद चा वापर फक्त प्रार्थना करण्यापूर्ता मर्यादित न ठेवता ज्ञानोपासनेसाठी त्याचा वापर करणे हा आजच्या काळातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात देखील याच प्रकारे मस्जिद चा वापर हा ज्ञानदानासाठी केला जात असे. मस्जिद ही संस्था सुरुवातीपासूनच शिक्षणाच्या दृष्टीने विविध आणि व्यापक कार्ये करत आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी इस्लामिक शिक्षणाची केंद्रे म्हणून काम करण्यासाठी कुबा मस्जिद, अल-मीरबाद मस्जिद आणि नबवी मस्जिद ची निर्मिती मदिना येथे केली. मस्जिद मध्ये मुस्लिम, जगाच्या आणि परलोकाच्या चिंतेसाठी ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल शिकत आणि चिंतन करत. तेथूनच विचारवंत आणि दूरदर्शी विद्वान निर्माण होत असत.
कुरआनमध्ये 28 वेळा ’मस्जिद’ या शब्दाचा उल्लेख आला आहे तसेच सफ , बैत , बुयुत सारख्या संबंधित शब्दांचा संदर्भ घेतला तर कुरआनने नंतर 46 वेळा मस्जिद या विषयाला स्पर्श केला आहे. मस्जिद किंवा मस्जद या अरबी शब्दावरून मशीद हा शब्द आला आहे. शब्दशः याचा अर्थ सुजुद (सजदा) करण्याची जागा असा होतो. म्हणजेच अल्लाहच्या भक्तीचे प्रतीक म्हणून कपाळ जमिनीवर लावणे.या संदर्भानुसार ’मस्जिद’ म्हणजे नमाज पठण करण्यासाठी जागा म्हणून परिभाषित केले जाते.
इस्लामच्या सुरुवातीच्या काळात मस्जिद विशेषत: लेक्चर हॉल म्हणून तयार केल्या गेल्या होत्या, नंतर हजरत उमर रजि. यांच्या कालखंडात शिक्षणाच्या हेतूसाठी स्वतंत्र इमारत तयार करण्यापूर्वी मस्जिद च्या इमारतीचे अनेक कोपरे शैक्षणिक क्रियाकलापांसाठी काटेकोरपणे राखीव ठेवण्यात आले होते. केवळ धार्मिक ज्ञानाच्या प्रसारासाठीच नव्हे, तर मशिदींना इस्लामी सीमारेषेतील ज्ञानाच्या विविध शाखांच्या विकासासाठीचे स्थान मानले जाते. मशिदींना शिक्षणाची ठिकाणे मानण्याची परंपरा आजही कायम आहे. उदाहरणार्थ, इजिप्तमधील प्रसिद्ध अल-अझहर युनिव्हर्सिटी जे अल-अझहर मस्जिद मध्ये स्थापन करण्यात आली आहे. काही इस्लामिक देशांमध्ये अशा इतरही अनेक मस्जिद आहेत ज्या मस्जिद म्हणून ओळखल्या जात नाहीत परंतु विद्यापीठे म्हणून ओळखल्या जातात. त्यापैकी ट्युनिशियामधील अल-झायतुना मस्जिद, मोरोक्कोमधील अल-कारावीयिन मस्जिद आणि इजिप्तमधील अल अझहर मस्जिद इ.
भारतातही चेन्नई शहरातील मक्का मस्जिद ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (उर्वरित आतील पान 7 वर)
निवासी प्रशिक्षण आणि स्टडी सेंटर चालवते तसेच मुंबई आणि बिहार येथील हज हाऊस च्या इमारतीत देखील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे.पण ही काही मोजकीच उदाहरणे आहेत. मस्जिद या संस्थेचा व्यापक लोक कल्याणकारी कार्यासाठी आणि ज्ञानोपासानेसाठी उपयोग होणे आवश्यक आहे. म्हणूनच कासिम खानी मस्जिद , अहमनगर च्या व्यवस्थापक समितीने मस्जिद मध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी स्टडी सेंटर सुरू करण्याचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.
मस्जिद हे मानवी संसाधन निर्मितीचे आणि समुदाय परिवर्तनाच्या विकासाचे केंद्र म्हणून कार्यरत राहणे ही आजच्या काळातील आवश्यकता आहे. मस्जिद ही संस्था केवळ धार्मिक प्रार्थना करण्याचे स्थान एवढ्या एकाच कार्यासाठी मर्यादित न ठेवता त्यांचा व्यापक वापर समाज कल्याण आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र म्हणून असला पाहिजे. ऐतिहासिकदृष्ट्या, मस्जिद जकात, जकात-अल-फितर, जिझिया, खराज, घनिमा आणि फाय मिळविण्यासाठी केंद्रे म्हणून कार्यरत आहे. इतकेच नाही तर मस्जिद मुस्लिमांच्या आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून देखील मानल्या जातात ज्यामध्ये व्यावसायिक व्यवहार, कर्ज आणि कृतींचा समावेश असत. यासोबतच संघर्ष निवारण, न्यायदान, लोकशाही पद्धतीने आपला अमीर निवडणे त्यांच्याशी संबंधित इतर सामाजिक मेळावे किंवा बैठका देखील मस्जिद मध्ये आयोजित केल्या जात असत. मस्जिद चा व्यापक आणि विधायक कार्यासाठी वापर करण्याची ही परंपरा कासिम खानी मस्जिद मध्ये पुन्हा सुरू करून भारतातील इतरही मस्जिद व्यवस्थापकांसमोर एक आदर्श निर्माण केल्याबद्दल मस्जिदच्या व्यवस्थापक समितीचे अभिनंदन.निश्चितच याचा उपयोग परिसरातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना होईल आणि ते विविध क्षेत्रात यश संपादन करून समाजाची आणि देशाची सेवा करतील.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र चे नायब अमीर जमीर कादरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठातील रिसर्च स्कॉलर शहेबाज मनियार,अहमदनगर येथील जिल्हा गौण खनिज अधिकारी वसीम शेख, हिंदुस्थानी समाज, जमाते इस्लामी हिंदचे सचिव डॉ. सय्यद रफीक पारनेरकर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जमीर कादरी म्हणाले,’जमाते इस्लामी हिंद ही संस्था देशसेवेसाठी नेहमीच तत्पर असून भारताला जगातील पहिल्या तीन क्रमांकाची महासत्ता बनवणे हे त्यांचे लक्ष आहे. या कार्यासाठी नैतिक आणि चारित्र्यसंपन्न अधिकारी घडावेत यासाठी कासिम खानी मस्जिद स्टडी सेंटर सारखे आणखी स्टडी सेंटरची स्थापना येत्या काळात करण्यात येईल.’ ’शहेबाज मनियार यांनी मार्गदर्शन करताना इस्लाम मध्ये असलेल्या शिक्षणाच्या महत्त्वाला अधोरेखित केले तसेच काळाची पावले ओळखून विविध कौशल्य आत्मसात करणे, तंत्रज्ञानावर प्रभुत्व प्राप्त करणे , स्थानिक भाषेवर पकड निर्माण करणे, स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवणे, वेळेचे नियोजन करणे इ. गोष्टी या विद्यार्थ्यांच्या प्राथमिकता असाव्यात यावर भर दिला. याप्रसंगी जमाते इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन चे सदस्य आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. जमात-ए-इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन यांच्या या पुढाकाराचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
– शहेबाज म. फारुख मनियार
0 Comments