आदर्श इस्लामी निकाहची पहिल्यांदाच प्रचिती : प्रा.डॉ.रणजित जाधव
लातूर (बशीर शेख)
लग्न हा कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. तो सहज सुंदर आणि टिकाऊ असेल तर समाज सुद्धा सहज सुंदर आणि टिकाऊ होतो. तो जर क्लिष्ट आणि कठीन असेल, वायफळ खर्च करून झालेला असेल तर ते कुटुंब, समाज दुभंगल्याशिवाय राहू शकत नाही. इस्लाममध्ये लग्न फक्त एक इबादत (उपासना) आहे. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांची सुन्नत (अनुकरण) आहे. आणि एक सामाजिक करार आहे. याचीच प्रचिती लातूर येथे मुहम्मद युनूस पटेल यांच्या मुलीच्या निकाह दरम्यान उपस्थितांना आली. दोन मुस्लिम गवाह, दोन हिंदू निरीक्षक आणि दोन खजुरांच्या अल्पोपहारात साधा, सोपा आणि अध्यात्मिक वातावरणात निकाह संपन्न झाला
लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या महेबुबीया मस्जिद येथे जमाअते इस्लामी हिंदचे सदस्य युनूस पटेल यांची सुकन्या अनम जोहरा आणि बीदरचे रहिवाशी मुहम्मद जहीर यांचे चिरंजीव मुहम्मद सुलेमान यांचा निकाह 22 नोव्हेंबर रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या विवाहाचे वैशिष्ट्ये असे की, अतिशय पवित्र वातावरणात मस्जिदीत निकाह झाला. यात कुठल्याही प्रकारचा आवाजवी खर्च झाला नाही. मुलीच्या वडिलांनी मुलाला हुंडा दिला नाही. दहेजच्या नावाखाली कुठल्याही वस्तू दिल्या नाहीत उलट वर सुलेमान यांनी 50000 रुपये रोख वधू अनम जोहरा हिला महेर (भेट) म्हणून दिले. याप्रसंगी इस्लामी लग्न हा एक सामाजिक करार आहे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सर्वधर्मीय 50-55 बांधवांच्या उपस्थितीत, अल्पोपहार म्हणून फक्त दोन खजूर आणि पाणी देण्यात आले. निकाह-ए-खुत्बा (विवाह विधी) वधूचे पिता मुहम्मद युनूस पटेल यांनी पठण केला.
विवाहात प्रारंभी वधू अनम जोहरा हिची सम्मती वकील आणि साक्षीदार यांनी घेतल्याची घोषणा वकील अश्फाक अहमद (अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद लातूर) यांनी केली. त्या नंतर करार पत्रावर वर मोहम्मद सुलेमान मोहम्मद जहीर अहमद यांनी सही केली. यावेळी साक्षीदार म्हणून सय्यद अब्दुल रऊफ लातूर आणि शहरीयाज पटेल बिदर हे उपस्थित होते. या निकाहचे विशेष निरीक्षक म्हणून शाहू महाविद्यालयातील प्रा.डॉ. रणजीत जाधव (अध्यक्ष कबीर प्रतिष्ठान लातूर) आणि प्रा.डॉ. अनिल जायभाये (समाजशास्त्र विभाग प्रमुख, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र लातूर) उपस्थित होते.
या प्रसंगी औरंगाबादहुन आलेले जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र संदेश विभागाचे सचिव प्रा. वाजिद अली खान, यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले. त्यात इस्लामी निकाह म्हणजे काय असतो? तो कसा असतो? या प्रसंगी काय वाचले जाते? कुरानच्या आयतींचा अर्थ वगैरे समजून सांगितला.
यावेळी जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय सदस्य तौफिक असलम खान म्हणाले, ’’विवाह एक सोहळा नसून ती एक प्रार्थना आहे. विवाहाला इस्लामने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करण्याचे आवाहन करत तो कसा असावा याची नियमावली सांगितली आहे. विवाह त्याच पुरूषाला करण्याचे आवाहन केले आहे जो त्याला निभावण्याची ऐपत राखतो. ज्याला वाटते की आपण विवाह व त्यानंतर येणारी जबाबदारी पार पाडू शकत नाही त्याने विवाह न केलेलाच बरा. कारण विवाहानंतर सगळी जबाबदारी पुरूषावरच असते. आज आपण पाहिलात की विवाहाप्रसंगी मुलीच्या पित्याकडून मुलाला काहीही देणेघेणे झाले नाही. उलट वराने मुलीला 50 हजार रूपये नगदी मेहरची रक्कम दिली आणि मुलीला विचारले गेले की तुम्हाला ही रक्कम मंजूर (कुबुल) आहे का, वर कबुल आहे का? ज्यावेळी मुलीने ’कबुल है’ असे साक्षीदार आणि वकीलासमोर म्हटल्यानंतर पुढील विवाहाची कार्यवाही करण्यात आली. मुलीने निकाहनाम्यावर हस्ताक्षर केले. म्हणजेच मुलीच्या मर्जीनुसार विवाह करावा. कारण या विवाहातून पुढील समाजाची, आपआपसातील नात्यांची विण घट्ट बसत असते. या जोडप्यांमध्ये प्रेम, आपुलकीची भावना अधिक निर्माण होते. या दोघांत सामंजस्य असेल तर हे दोघे घराला, समाजाला, देशाला अधिक फायदा पोहोचवू शकतात. त्यांच्या होणाऱ्या अपत्यांना ते चांगले संस्कार, शिक्षण देऊन ते देशाला चांगले नागरिकही देवू शकतात.’’
निकाहाचे विशेष निरीक्षक प्रा. रणजीत जाधव याप्रसंगी म्हणाले की, ’’एवढ्या सोप्या पद्धतीने असा विवाह मी पहिल्यांदाच पाहिला आहे. त्यामुळे मी युनूस पटेल आणि त्यांच्या परिवाराचे अभिनंदन करतो. आपल्या समाजात जी वाईट पद्धती आहे ती म्हणजे हुंडा पद्धत. आणि जो विवाहात अकारण खर्च होतो ती एक चुकीची पद्धत आहे. मोठ्या व्यक्तींच्या लग्नात होणारा खर्च पाहून गरीब मुलीचा पिता आपल्या मुलीसाठी आपण काहीच करू शकत नसल्याची खंत मनात बाळगून असतो. तो तिच्या लग्नासाठी सर्वस्व पणाला लावून पैसे जमा करत असतो. त्यालाही वाटते की आपण खर्च करावा, तो व्याजाने पैसे काढतो. मुलीचे लग्न करतो. पटेल साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या मुलीचा निकाह केला त्या पद्धतीने जर समाजातील इतर बांधवांनी आपल्या मुलीचे विवाह केले तर अनेक समस्या मिटू शकतील. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्येत एक कारण मुलीच्या लग्नासाठी पैसे नसणे हे ही आहे.’’ आदर्श इस्लामी निकाहाची आज मला पहिल्यांदाच प्रचिती आल्याचेही प्रा.डॉ. रणजित जाधव म्हणाले.
उर्दूचे प्रसिद्ध शायर अजय पांडे ’बेवक्त’ याप्रसंगी म्हणाले की, ’’आमचे मित्र मो. युनूसभाई पटेल यांच्या मुलीचे इस्लामी परंपरेनुसार लग्न झाले. अत्यंत साधेपणाने हा विवाह पार पडला. या विवाहाला उपस्थित राहून आम्हाला सुद्धा लग्नामधील नवीन प्रकार पहायला मिळालेला आहे. पटेल परिवाराचे याप्रसंगी अभिनंद करतो. शुभेच्छा देतो.’’
याप्रसंगी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अभिजित देशमुख म्हणाले की, ’’आमचे मित्र युनूस पटेल यांच्या मुलीचा विवाह मस्जिद मध्ये आमच्या उपस्थितीत झाला. त्यांना व नववधू-वरांना शुभेच्छा. ज्या साध्या पद्धतीने हा विवाह संपन्न झाला ते पाहून फार आनंद झाला. मालमत्ता अल्लाहने दिलेली देणगी आहे. समाजात असे होत आहे की ज्याच्याकडे संपत्ती आहे त्यानेच मोठे विवाह करावे आणि ज्याच्याकडे नाही तो करण्यास असमर्थ ठरतो. यासाठी ईश्वराने आम्हाला साध्या पद्धतीने विवाह करण्याची जी शिकवण दिली त्यावर पूर्णरूपाने अमल झाला पाहिजे. या मस्जिदीतील विवाहाप्रसंगी आमचे काही हिंदू बांधवही उपस्थित होते. वधूपिता युनूस पटेल यांच्या स्वभावानुसार ते सर्वधर्मीय बांधवांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहातही सर्वांना बोलावून मस्जिदीत साध्या पद्धतीने विवाह केला. विशेष बाब तर ही आहे की त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहात दोन निरीक्षकही हिंदू बांधव होते. ही एकोप्याची दृष्टी पाहूनही फार आनंद झाला. खरे तर लातूर कौमी एकतेसाठी प्रसिद्ध आहे आणि आज आम्ही ते प्रत्यक्षात पाहत आहोत. या एकतेचा संदेश दूरवर पोहचेल. जो आमच्या मनाला फार आनंद देऊन गेला आहे.’’
या निकाहसाठी लातूर शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मोईज शेख, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे माधव बावगे, कवी योगिराज माने, प्राध्यापक हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रयोगशील शिक्षक नजिउल्लाह शेख यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिलांची उपस्थिती होती. तौफिक असलम खान (सदस्य केंद्रीय प्रतिनिधी मंडळ जमाते इस्लामी हिंद) यांनी शेवटी दुआ मागितली. युनूस पटेल यांनी आभार मानले.
0 Comments