Home A blog A भारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय?

भारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पोहोचवलाय काय?

मदरसों, मस्जिदों, मुहल्लों से निकलकर आओ
राह-ए-दावत बडी मुश्किल है संभलकर आओ
कब तक रहोगे महेसूर अपनी ही ख़ौल में
अहले वतन से भी जरा मिलकर आओ

उर्दू साहित्य एक समृद्ध साहित्य आहे. अलिकडेच त्यातील एक कथा वाचण्यात आली. ती अशी की, लंडन शहरातील एका अरबी रेस्टॉरंटमध्ये 2007 मध्ये काही मित्र जेवणासाठी जमा झालेले होते आणि त्यांच्यात झालेला संवाद हा या कथेचा मूळ गाभा आहे. त्यांच्यापैकी एक डॉक्टर मगरीबच्या (संध्याकाळ) नमाजला जावून आल्यामुळे इतर मित्र जेवणासाठी त्याची वाट पाहत असतात. तो डॉक्टर परत येताच त्याला एक मित्र विचारतो, ”कुठे गेला होतात?” त्यावर डॉक्टर उत्तर देतात, ”नमाजला गेलो होतो.” तेव्हा प्रश्‍नकर्ता परत विचारतो. ”किती वर्षापासून नमाज अदा करता?” त्यावर डॉक्टर म्हणतात, ”समजत असल्यापासून.” तेव्हा प्रश्‍नकर्ता पुन्हा प्रश्‍न करतो, ”क्षमा करा डॉक्टरसाहेब तुम्ही पुरानमतवादी आहात. जग एवढे पुढे गेले आहे तरी तुम्ही अजूनही नमाज अदा करण्यामध्येच वेळ घालवता. मला या संबंधित तुमच्याशी वाद-विवाद करावयाचा आहे अर्थात तुम्ही तयार असाल तर.” त्यावर डॉक्टरनी उत्तर दिले की, ”जरूर मला आनंद होईल.”
तेव्हा प्रश्‍नकर्त्या मित्राने प्रश्‍न केला की,
    प्रश्‍न – समजा मरणोपरांत तुम्हाला समजले की, न स्वर्ग आहे ना नर्क. या दोन्ही संकल्पना खोट्या आहेत. कुठलाही हिशोब घेतला जाणार नाही. कुठलेही बक्षीस किंवा शिक्षा दिली जाणार नाही. तेव्हा तुम्ही काय कराल?
    उत्तर (डॉक्टर) – मरणोपरांत जर अशी स्थिती आली तर मी स्वतःच्या मनाचे हजरत अली रजि. यांच्या म्हणण्याप्रमाणे सांत्वन करून घेईन की, ”मी स्वर्गाच्या लालसेने किंवा नर्काच्या भितीने ऐ अल्लाह ! तुझी इबादत करत नसून, यासाठी उपासना करतो की तू एकमेव उपासना करण्याच्या लायकीचा आहेस. ” त्यावर प्रश्‍नकर्त्याने पुन्हा प्रश्‍न केला की,
प्रश्‍न – आणि त्या तुमच्या नमाजचे काय?
    जे आयुष्यभर तुम्ही बिनचुकपणे कष्ट उपसून वेळेवर अदा करता? जेव्हा तुम्हाला कळेल की नमाजी आणि बेनमाजी दोघेही समान आहेत तर या उपसलेल्या कष्टाचे काय?
उत्तर (डॉक्टर)- यावरही मला काही वाईट वाटणार नाही. कारण नमाज अदा करण्यासाठी फक्त काही    – (उर्वरित पान 2 वर)
मिनिटांचा अवधी लागतो. मी त्या नमाज अदा करण्याच्या प्रक्रियेला व्यायाम समजून समाधान मानेन.
    प्रश्‍नकर्त्याने पुन्हा प्रश्‍न विचारला.
प्रश्‍न – आणि त्या रोजांचे (रमजानचे उपवास) काय, विशेषत लंडनमध्ये जे की 18 तासाचे असतात?
उत्तर (डॉक्टर) – ”त्या रोजांना मी माझ्या आत्म्याच्या शुद्धीसाठी केलेल्या व्यायाम समजेन. नाहीतरी आजकाल आधुनिक विज्ञानाने उपाशी राहण्याचे अनेक फायदे असल्याचे स्पष्ट केलेले आहे. मला ते फायदे प्राप्त झाले, यातच मी समाधान मानून घेईन”.
    प्रश्‍न – दारू हराम असल्यामुळे तुम्ही ती सेवन करत नाही. वास्तविक पाहता दारू आणि तिच्यापासून येणारी नशा याची लज्जत ब्रिटनच नव्हे तर जगातील अब्जावधी लोक घेतात. तुम्ही मात्र त्या लज्जतीपासून वंचित आहात. यावर काय म्हणाल?
    उत्तर – (त्यावर डॉक्टर उत्तरले) मी स्वतः डॉक्टर आहे. मला माहित आहे की, दारूमुळे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत. अनेक लोक दारू सेवनामुळे लिव्हर सडून मरण पावलेले आहेत. दारूच्या नशेमुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. मी दारू सेवन न केल्यामुळे थोड्याश्या लज्जतीपासून वंचित जरूर राहीन परंतु, त्या बदल्यात मला शारीरिक तंदुरूस्ती आणि कुटुंबाचे सौख्य मोठ्या प्रमाणात मिळेल, त्यात मी आनंद मानेन.
    प्रश्‍नकर्त्याने पुन्हा प्रश्‍न केला की,
प्रश्‍न –    त्या हज आणि उमराहचे काय? जे करण्यासाठी तुम्ही प्रवास आणि लाखो लोकांच्यामध्ये राहून यातना सहन केलेल्या आहेत.
उत्तर –    (त्यावर डॉक्टर उत्तरले) हज आणि उमराहचा प्रवास एक नित्तांत सुंदर अनुभव असतो, जेथे जगातल्या कानाकोपर्‍यातून आलेल्या लोकांशी भेटण्याची, त्यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळते आणि आपण किती मोठ्या समुहाशी निगडीत आहोत., याचा अभिमान वाटतो. त्या प्रवासाच्या थकव्यापेक्षा लोकांना भेटण्यामध्ये आणि हज आणि उमराहच्या दरम्यान केलेल्या उपासनेमुळे माझ्या मनाला जी शांती मिळाली त्यात मी समाधान मानून घेईन.
    प्रश्‍नकर्त्याने शेवटी सांगितले की, माझे प्रश्‍न संपले तुम्ही माझ्या प्रश्‍नाला शांतपणे उत्तरे दिली, त्यामुळे मी तुमचा आभारी आहे. मी तुमच्या उत्तरांनी समाधानी आहे आणि वादविवादात स्वतःचा पराजय स्विकार करतो. तुम्हाला मला वाद विवादामध्ये पराजित केल्याचा आनंद होत असेल?
    त्यावर डॉक्टरनी उत्तर दिले. मुळीच नाही. मी तर तुमच्या प्रश्‍नांची तर्कसंगत उत्तरे दिली. त्याबद्दल मला समाधान आहे. परंतु तुमच्या बौद्धिकतेची मला कीव करावीशी वाटते. तुमचे प्रश्‍न संपलेत. तुम्ही अनेक प्रश्‍न केलेत. पण तुमची परवानगी असेल तर मी फक्त एक प्रती प्रश्‍न करू इच्छितो. तुम्ही उत्तर द्यायला तयार आहात का? डॉक्टरच्या या म्हणण्यावर प्रश्‍नकर्ता चकीत झाला. आणि उत्तरला. हो…हो…जरूर विचारा ! तुम्हाला काय विचारायचे आहे ते.
    त्यावर डॉक्टरनी प्रश्‍न केला की, ”समजा मरणोपरांत तुमच्या या सगळ्या शंका खोट्या ठरल्या आणि तुमच्या लक्षात आले की, अल्लाह अस्तित्वात आहे, प्रलयाचा दिवसही झालेला आहे, स्वर्गही आहे, नर्कही आहे, प्रत्येकाचा हिशोबही घेतला जात आहे. तेव्हा तुम्ही काय कराल?
    तेव्हा प्रश्‍नकर्ता अवाक् होऊन काहीच न बोलता डॉक्टरांकडे पाहत राहिला व स्वतःला सावरत म्हणाला, ”मला थोडा काळ विचार करू द्या त्यानंतर मी उत्तर देईन. ”
    त्यावर डॉक्टरनी त्याला पाहिजे तेवढा अवधी घ्या असे सांगितले व जेवण संपल्यावर दोघेही आपापल्या मार्गी निघून गेले. बरोबर एक महिन्यानंतर प्रश्‍नकर्त्याने डॉक्टरांना फोन करून त्याच रेस्टॉरंटमध्ये भेटण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टर जेव्हा पोहोचले तेव्हा प्रश्‍नकर्ता पहिल्यापासून तेथे उपस्थित होता. डॉक्टरांना पाहताच तो चटकन् आपल्या आसनावरून उठला आणि डॉक्टरांच्या गळ्याला पडून रडू लागला. थोडा शांत झाल्यावर उत्तरला, ”तुम्ही माझ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे शांतपणे दिली पण एकच असा प्रतीप्रश्‍न केला की माझे भावविश्‍व उध्वस्त झाले. गेल्या अनेक वर्षांपासून मी नमाज सोडलेली होती. तुमच्या प्रश्‍नानंतर खोलवर विचार केल्यानंतर मी गेल्या काही दिवसांपासून नमाज परत सुरू केलेली आहे. तुमचे धन्यवाद ! आखिरतबद्दल जुगार खेळण्याचे जोखीम मीच काय कोणीच पत्करू शकत नाही. मी तुम्हाला आश्‍वासन देतो यापुढे भविष्यात मी इस्लामच्या प्रत्येक आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करीन.”
    वरील कथेमधील बोध वाचकांच्या लक्षात आलेलाच असेल. यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मात्र एवढे नक्की वाटते की, देशबांधवांसमोर वर नमूद कथे प्रमाणे इस्लामची तर्कसंगत मांडणी करण्यामध्ये भारतीय मुस्लिम कमी पडलेले आहेत.
    भारतीय मुस्लिमांची साधारपणे चार गटात वर्गवारी करता येते. पहिला गट अशा लोकांचा जे सुफी पद्धतीच्या इस्लामी विचारधारेमध्ये विश्‍वास ठेवतात, दर्ग्याला मानतात, त्या ठिकाणी ऊर्स, कव्वाली, मुशायरे भरवतात. त्यांच्या ताब्यात असलेल्या दर्ग्यामध्ये अनेक देशबांधव नियमितपणे येतात. परंतु इस्लामचा खरा संदेश पोहोचविण्याची कुठलीच व्यवस्था दर्ग्याच्या या खादीम लोकांनी केेलेली नसते.
    दूसर्‍या प्रकारचे लोक ते आहेत जे देशातील अनेक मदरश्यांमधून धार्मिक शिक्षण घेऊन बाहेर पडतात. याच लोकांच्या ताब्यात बहुतेक मशिदी असतात. या लोकांनी उच्चकोटीचे इस्लामी ज्ञान प्राप्त केलेले असते. मुस्लिम समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात यांचेच म्हणणे ऐकतो. बोली भाषेमध्ये यांना उलेमा असे म्हणतात. समाजात यांची खूप प्रतिष्ठा आहे. हे प्रत्येक शुक्रवारच्या विशेष प्रार्थनेपूर्वी खुत्बा (विशेष संबोधन) मधून समाजाला मार्गदर्शन करत असतात. हे समाजामध्ये असलेल्या अनिष्ठ रूढींवर बोलतात. त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतात. लोकांना इबादतीकडे बोलवतात, मात्र देशबंधूंपर्यंत इस्लामचा संदेश पोहोचविण्याची कुठलीही व्यवस्था या उलेमांनी केलेली नाही.
    तिसरा गट अशा लोकांचा आहे जे मोठमोठ्या शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातून भौतिक शिक्षण घेतात. मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब करतात. यांच्यातील काही लोक शासनामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करतात. काही उच्च पदावर सुद्धा असतात. यांच्यावर पाश्‍चीमात्य जीवनशैलीचा प्रचंड पगडा असतो. ते स्वतःचे जीवनमान उंचावण्यसाठी सतत प्रयत्नशील असतात. स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबापुरता विचार करतात. सामान्य मुस्लिमांपासून फटकून वागतात. इस्लामचा यांच्याशी फार कमी संबंध असतो. फार तर शुक्रवारची व ईदच्या नमाजला जातात. इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचविणे तर दूर हे स्वतःच इस्लामपासून शक्य तेवढे अंतर ठेऊन असतात. 
    चौथा गट अशा लोकांचा आहे की जे जमाअते इस्लामी हिंद नावाच्या संघटनेशी संलग्न आहेत. यांनी मात्र देशबांधवांपर्यंत त्यांच्या भाषेत इस्लामचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न गेल्या 77 वर्षांपासून चालू ठेवलेला आहे. या संघटनेच्या अनेक प्रकाशन संस्था आहेत. प्रत्येक प्रमुख भारतीय भाषेमध्ये यांनी कुरआनचे भाषांतर केलेले असून, हदीससह इस्लामची शिकवण देणारे साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित केलेले आहे. हे आपल्या विविध उपक्रमांमधून देशबांधवांपर्यंत स्वतः पोहोचतात व त्यांच्यापर्यंत इस्लामचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करतात.
    कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ”आम्ही तुम्हाला उत्तम समाज बनविले आहे. जेणेकरून जगातील लोकांवर तुम्ही साक्ष व्हा आणि प्रेषित तुमच्यावर साक्ष असतील.” (संदर्भ ः सुरे बकरा आयत नं.143) या आयातीप्रमाणे मुस्लिमांचे हे धार्मिक कर्तव्य आहे की, त्यांनी स्वतः उत्तम समाज बनणे आणि देशबांधवांसमोर त्याचे उदाहरण ठेवणे व त्यांना उत्तम समाज घडविण्याचा संदेश देणे.
    आज भारतामध्ये कुठलेही क्षेत्र असे राहिलेले नाही ज्यात भ्रष्टाचार नाही. व्याजाधारित अर्थव्यवस्थेने गरीबांचे कंबरडे मोडलेले आहे. टीव्ही उद्योगापासून पॉर्न उद्योगापर्यंत महिलांची प्रचंड पिळवणूक होत आहे. दोन वर्षाच्या चिमुकलीपासून 70 वर्षाच्या वृद्धेपर्यंत सर्व महिला या काही लिंगपिसाटांच्या हल्ल्याला बळी पडत आहेत. एक लिंग पिसाट पुरूष प्रधान समाज निर्माण झालेला आहे. खोटे बोलणे, विश्‍वासघात करणे सामान्य बाब झालेली आहे. आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यानंतर सुद्धा श्रीमंतांच्या मनाला पाझर फुटत नाही. दारू आणि ड्रग्जची पोहच विद्यार्थ्यापर्यंत झालेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये वाईट प्रवृत्तींचा शिरकाव झालेला आहे. या वाईट गोष्टी करण्यामध्ये जरी मुस्लिमांचा रास्त सहभाग फार कमी असला तरी या वाईट प्रवृत्तींना रोखण्याची जी धार्मिक जबाबदारी मुस्लिमांनी स्विकारायला हवी होती ती स्विकारलेली दिसत नाही. त्यामुळे वाईट प्रवृत्तींना मोकळे रान मिळालेले आहे. एवढेच नव्हे स्वतः मुस्लिमांनासुद्धा या वाईट प्रवृत्तींचा फटका बसत आहे. त्यांची स्वतःची तरूण पिढी या वाईट गोष्टींच्या प्रभावातून सुटलेली नाही.
    मानवतेच्या सर्व प्रश्‍नांचे उत्तर ज्या व्यवस्थेमध्ये आहे त्या व्यवस्थेचे वारस असतांनासुद्धा त्या व्यवस्थेबद्दल देशबांधवांना अवगत न करण्याचे पाप बहुतेक मुस्लिमांनी केलेले आहे. इस्लामचा संदेश दोन प्रकारे पोहोचवता येतो. एक मीडियाद्वारे दूसरा स्वतःच्या वर्तनाद्वारे. या दोन्ही बाबतीत मुठभर लोक वगळता बाकीचा समाज नामानिराळा राहिलेला आहे. उलट त्यांनी आपल्या वर्तनातून इस्लामच्याविरूद्ध असल्याचे सिद्ध केलेले आहे.
    शेवटी एकच गोष्ट सांगून हा लेखन प्रपंच थांबवितो की, जोपर्यंत इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी मुस्लिम समाज गंभीरपणे स्विकारणार नाही  तोपर्यंत देशामध्ये वाईट प्रवृत्तींची वाढ होतच राहणार व त्याचे नुकसान इतरांसोबत मुस्लिमांनाही भोगावे लागणार. जेव्हा माणसाच्या जीवनाच्या सर्व समस्यांचे समाधान इस्लाममध्ये आहे असा मुस्लिमांचा दावा आहे तेव्हा तो दावा खरा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. केवळ जमाअते इस्लामी हिंद व मौलाना कलीमुद्दीन सिद्दीकी, संदेश लायब्ररी पुणे, सलाम सेंटर बेंगलुरू इत्यादींची ही जबाबदारी नसून समग्र मुस्लिम समाजाची ही जबाबदारी आहे. जोपर्यंत या जबाबदारीचे भान आपल्याला येणार नाही आपण सुखाने राहू शकणार नाही. लक्षात ठेवा मित्रानों ! ही आपली धार्मिक आणि राष्ट्रीय अशी दुहेरी जबाबदारी आहे. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की या जबाबदारी जाणीव आणि ती पूर्ण करण्याची शक्ती आम्हाला मिळो. (आमीन.)

– एम.आय.शेख
9764000737

संबंधित पोस्ट
January 2025 Rajab 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6
6 7
7 8
8 9
9 10
10 11
11 12
12 13
13 14
14 15
15 16
16 17
17 18
18 19
19 20
20 21
21 22
22 23
23 24
24 25
25 26
26 27
27 28
28 29
29 30
30 Sha'ban 1
31 2
1 3
2 4

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *