सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच ५७१ साली अरबच्या मरुभूमीवर मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला. या वेळी समस्त अरबसमाज अज्ञानतेच्या अंधकारात खितपत पडलेला होता. या समाजात समग्र अनिष्ट परंपरा आणि अमानवी रीती प्रचलित होत्या. तो श्वापदांपेक्षाही भयानक झाला होता, मानवतेचे क्रूरपणे लचके तोडत होता, हे अंधार युग होते. मानवता पशुच्या स्तराहून खालावली होती.
सामाजिक निरीक्षण
सुप्रसिद्ध समाजतज्ञ सी.राइट मिल्स यांनी एखाद्या समाजाचे अचूक निरीक्षण करण्यासाठी तीन पद्धती सांगितल्या आहेत.
- त्या समाजाचा ढाचा कशा स्वरुपाचा आहे आणि त्याच्या विभिन्न भागांचा परस्पर संबंध कसा आहे, याचे निरीक्षण करणे.
- मानव-इतिहासात त्या समाजाचे कोणते स्थान आहे आणि मानवतेच्या सर्वांगीण विकासाची त्या समाजात कोणती व्याख्या आहे, याचा मागोवा घेणे.
- त्या समाजावर कोणत्या प्रकारच्या लोकांचे वर्चस्व आहे, याचे निरीक्षण करणे.
सी. राइट मिल्स यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार अरब समाजाचे निरीक्षण केल्यास आपल्याला त्याची निम्नलिखित तथ्ये प्राप्त होतात.
- हा समाज विभिन्न कबिल्यांमध्ये दुभंगलेला होता. कबिल्यांतर्गत प्रचंड भेदभाव होता. समाजातील विविध घटक एक-दुसर्यांचे शोषण करीत होते. ‘बळी तो कान पिळी‘ अशी या समाजाची स्थिती होती. आपसांत हेवे-दावे, इर्ष्या, द्वेश, मत्सर आणि वैरभावासारख्या अमानवी भावनांच्या ज्वालांनी पेटलेला होता, अक्षरशः धगधगत होता. वंश-वर्ण आणि श्रेष्ठत्व व कनिष्ठत्वाच्या अहंकारी भावनांच्या आहारी होता हा समाजाचा विशिष्ट गुणधर्म होता.
- मानव-इतिहासात या समाजाचे स्थान अत्यंत खालच्या पातळीवर होते. मानवतेचा वैरी असलेला हा समाज पूर्णतः भौतिकवादी आणि संपत्तीचा भक्त होता. थोड्या लोभापायी कोणाचाही गळा कापण्यासाठी किंचितही मागेपुढे पाहत नव्हता. दीन-दुबळ्यांना पायाखाली तुडवून त्यांची संपत्ती हस्तगत करून आपलेच वर्चस्व गाजविण्यापेक्षा जीवनाचा कोणताही हेतू शिल्लक नव्हता. अशा या दयनीय आणि शोचनीय परिस्थितीत मानवतेची अन्याय व अत्याचारांच्या धगधगत्या भट्टीतून सुटका होण्याची मुळीच संभावना दिसत नव्हती.
- समाजात दीन-पददलितांचे रक्त शोषून जे लोक गब्बर झाले होते आणि स्वतः सर्वांचे स्वामी व प्रभू झाले होते, ते संपत्तीची भक्ती, पूजा आणि भोगविलासात बरबटलेले होते. स्वतःस वरिष्ठ, श्रेष्ठ, स्वामी व प्रभू समजून इतरांना गुलाम समजत होते. गर्व, व्यर्थ अभिमान आणि अहंकारी भावनेने पिसाळून जाऊन सर्वांना आपले गुलाम व दास समजत होते. इतरांचे शोषण आणि पिळवणूक करून त्यांच्या रक्तने दात लाल करणेच जणू त्यांचा परमधर्म होता. सत्य, समता, न्याय आणि बंधुत्वाच्या शाश्वत मूल्यांची साधी कल्पनाच तेवढी बाकी होती. एकूणरित्या असत्य, अन्याय व अनैतिकतेची एक परिपूर्ण व्याख्या नीट समजून घ्यायची असेल तर या समाजास पाहावे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सामाजिक शास्त्राच्याच दृष्टीने जर निरीक्षण करावयाचे झाल्यास या समाजाचे उपरोक्ती चित्र समोर आलेले आहेच. ही बाब स्पष्ट करण्याचे कारण एवढेच आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) जेव्हा या भूतलावर जन्मले, तेव्हा त्यांच्यासमोर किती प्रचंड मोठे आव्हान होते. अर्थातच एका अत्यंत बिघडलेल्या आणि शाश्वत मानवी मूल्यांचा आधार हरवून बसलेल्या या समाजात सुधारणा घडवून आणणे किती अवघड कार्य होते!
0 Comments