Home A प्रेषित A प्रेषित मुहम्मद(स) यांचा जन्म, तारुण्य व विवाह

प्रेषित मुहम्मद(स) यांचा जन्म, तारुण्य व विवाह

आदरणीय प्रेषितांच्या जन्माविषयी माहिती मिळविण्यापूर्वी हे पाहणे आवश्यक आहे की त्यावेळी जगाची अवस्था काय होती? जगाच्या पाठीवर किती शासक आणि विजेते, दार्शनिक व मर्मज्ञ, उपदेशक व वक्ते कित्येक धर्मसंस्थापक आणि चरित्र व नैतिकतेच्या शिकवणी देणारे समाजसुधारक आणि कायदेतज्ज्ञ निर्माण झाले. नेते उठले त्यांनी संघटन उभे केले, वादळी व्यक्तिमत्त्व आले व त्यांनी तर्हेतर्हेच्या क्रांत्या आणल्या. प्रत्येकाने जीवनातील सर्व समस्या उलगडण्याचा व त्यांचे निराकरण करण्याचा दावा केला. प्रत्येकाला वाटत होते की, तो मानवतेस सुख-समाधानाच्या संपत्तीने मालमाल करील. परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला. काहीअंशी भरभराट दिसली तरी अन्याय व अमानुषतेने त्यांचा पिच्छा सोडलाच नाही. या बाबतीत एवढे मात्र निश्चितच सांगता येईल की, ईश्वराने पाठविलेल्या प्रत्येक प्रेषिताने केवळ सत्य आणि चांगुलपणाच्या बळावरच क्रांती घडवून आणली. हे वैशिष्ट्य केवळ प्रेषितांमध्येच आढळते. त्यांच्या सत्यमार्गास लोकांनी स्वीकारल्याने त्यांच्यात विलक्षण परिवर्तन घडले. त्याच्या वैयक्तिक जीवनासह त्याच्या परिवार व त्याच्या संपूर्ण समाजातच विलक्षण परिवर्तन घडले. संपूर्ण समाजाचा व्यवहार, नीतिमत्ता आणि पूर्ण वातावरणच प्रेषितप्रणालीने ढवळून निघाले.
अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांनी ज्या काळात या धरतीवर पहिला श्वास घेतला, त्या वेळी संपूर्ण विश्वातील मानवता अज्ञानाच्या तिमिर काळोखात बुडालेली होती. काही ठिकाणी असभ्यतेचे भयानक वादळ उठले होते, काही ठिकाणी एकमेव ईश्वराची उपासना सोडून कितीतरी कृत्रिम उपास्यांची उपासना करण्याची कुप्रथा चालू होती, तर काही ठिकाणी मानवजातीत रक्ताची होळी खेळण्यात येत होती. इजिप्त, भारत, बाबिल व नेनवा (वर्तमान इराक देशाचा काही भाग) चीन व ग्रीसमधील संपूर्ण संस्कृती व सभ्यता काळवंडून गेली होती. ‘कन्फ्यूशस’ आणि ‘मानी’ या थोर तत्त्वज्ञांचे सिद्धान्त तसेच वेदांत आणि बौद्ध मतांचे विचार अनाकलनीय झाले होते. ‘जस्टेनन’सारख्या कायदेतज्ञाची संहिता आणि ‘सोलन’सारख्या विद्वानांचे नियम धाब्यावर बसवून मानवी जीवन कायदाहीन बनले होते. रोमन आणि इराणी संस्कृतीच्या वरपांगी चकाकणार्या प्रतिभा असूनही तेथील सम्राट ईश्वरी प्रभुत्वाचा आणि स्वामित्वाचा आव आणित होते. मानवजातीवर जागीरदारवर्ग आणि धार्मिक तत्त्वांच्या संगनमताने अन्याय व अत्याचाराची न संपणारी शृंखला चालू होती. जनतेकडून त्यांच्या ऐपतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त कर वसूल करून तिचे कंबरडे मोडण्यात आले होते. मानवांकडून अक्षरशः प्राण्यापेक्षाही जास्त अमानुषपणे कष्टाची कामे करून घेतली जात होती. दोन्ही साम्राज्यांच्या दरम्यान होणार्या नेहमीच्या संघर्षात बिचारी पामर जनताच रगडली जात होती. त्यांना ‘ब्र’ काढण्याचा देखील अधिकार नसे. लोक कधीच अन्याय व अत्याचाराविरुद्ध उठाव करण्याची साधी कल्पनाही करू शकत नव्हते. त्यांच्या समस्या व दारिद्रयास सीमाच नव्हती. त्यांचा आत्मा अवार्त टाहो फोडत असे, परंतु ऐकणारा मात्र कोणीही नसे.
खुद्द अरब प्रदेशात ‘आद’ व ‘समूद’ यांच्या काळात आणि ‘सबा’, ‘अदन’ आणि ‘येमेन’च्या शासनाच्या छत्रछायेत सभ्यतेने जन्म तर घेतला होता, परंतु आता मात्र या नष्ट झालेल्या राष्ट्रांच्या पुरातन वास्तुंचे केवळ अवशेषच पाहायला तेवढे मिळत होते. नेहमीच्या लढाया, तंटे, लूटमार आणि रक्तपाताचे साम्राज्य होते. मद्यपान, व्यभिचार आणि जुगाराने ठासून भरलेल्या अज्ञानतापूर्ण संस्कृतीचे या विश्वास भयानक ग्रहण लागले होते. अरबच्या ‘कुरैश’ कबिल्याने मूर्तीपूजेवर आधारित असलेल्या धार्मिकतेच्या मुळावर पवित्र काबागृहाच्या पौरोहित्याचा धंदा सुरु केला होता. ‘ज्यू’ समाजाने ईश्वरीय ग्रंथात हेराफेरी करून संशोधनाच्या नावावर धर्माचा धंदा सुरु केला होता. ‘मक्का’ आणि ‘ताईफ’ येथील महाजनांनी मानवांना व्याजाच्या भयानक विळख्यात जखडले होते.
अशी ही अत्यंत भयानक व विदारक संकटमय परिस्थिती होती व याच विदारक व उग्र स्वरुपाच्या अगदी प्रतिकूल परिस्थितीच्या समोरासमोर क्रांतिदूत अंतिम प्रेषित मुहम्मद(स) हे एका मोठ्या परिवर्तनाचा ईश्वरी संदेश घेऊन उठले. प्रेषित मुहम्मद(स) यांचा जन्म ‘मक्का’ शहरात झाला. हे ‘मक्का’ शहर म्हणजे मागे होऊन गेलेल्या प्रेषित इब्राहीम(अ) यांनी वसवलेले शहर आणि एकेश्वरवादाचे केंद्र होय. या ठिकाणी प्रेषित इब्राहीम(अ) यांनी ईश्वरासमोर केलेल्या प्रार्थनेनुसार परत एकदा इब्राहीमी जीवन शैलीच्या प्रकटीकरणाचे महान कार्य अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या परिश्रमातून पूर्ण होणार होते.
मानवजातीचे उद्धारक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचा जन्म हिजरी हि सन पूर्व ५२ च्या ‘रबिऊल अब्बल’ महिन्या (अर्थात २२ एप्रिल ५७१ इ.स.) मध्ये झाला. प्रेषित मुहम्मद(स) यांच्या पितावर्यांचे नाव ‘अब्दुल्लाह’ आणि मातावर्यांचे नाव ‘आमिना’ असे होते. त्यांच्या जन्मामुळे संपूर्ण घर प्रकाशमान झाले. त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब’ त्यांना उचलून पवित्र ‘काबा’मध्ये घेऊन गेले आणि ईश्वरासमोर प्रार्थना केली. आजोबांना पडलेल्या एका शुभ स्वप्नानुसार त्यांनी आपल्या या नातवाचे नाव ‘मुहम्मद(स)’ म्हणजेच ‘प्रशंसनीय’ असे ठेवले.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे पितावर्य मात्र त्यांच्या जन्माच्या काही काळापूर्वीच वारले होते. प्रेषित मुहम्मद(स) यांनी अनाथ बालकाच्या स्वरुपातच जन्म घेतला. त्याचप्रमाणे त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातेनेदेखील जगाचा निरोप घेतला. आता या बालकाच्या पालनपोषणाची जवाबदारी त्यांचे आजोबा ‘अब्दुल मुत्तलिब’ यांच्यावर आली. परंतु दोनच वर्षे लोटली की तेदेखील वारले. ईश्वराची योजना प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर ऐहिक संकटे टाकून आणि ऐहिक आश्रयांनी वंचित ठेवून एका महान व कठीण कार्यपूर्तीसाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची होती. ही संकटे व अरिष्टे आणण्याचा ईश्वरी हेतूच मुळात असा होता की, प्रेषित मुहम्मद(स) यांच्यात प्रचंड सहनशक्ती व प्रचंड संयम निर्माण व्हावा. त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब यांनी मृत्युसमयी आपल्या या लाडक्या नातवाच्या पालकत्वाची जवाबदारी त्यांचे काका अबू तालिब यांच्यावर सोपविली होती. काका अबू तालिब यांनी ही जवाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.
तारुण्यात पाऊल ठेवण्यापर्यंत हा अनोखा मुलगा सामान्य मुलांसारखा नव्हताच मुळी. तो एका गंभीर आणि विवेकशील वृत्तीच्या स्वभावाच्या एखाद्या अनुभवी माणसासारखा वाटायचा. त्याने तारुण्यात पाऊल ठेवले. नैतिक बिघाड असलेल्या वातावरणातसुद्धा या तरुणाचे तारुण्य निष्कलंक आणि नजरा पवित्र होत्या. त्याचे विचार पवित्र होते. ज्या ठिकाणी गल्लोगल्ली आणि घरोघरी मद्य निर्मितीचे कारखाने होते, दारु पिणे व पाजणे अभिमान व गर्वाचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात असे; परंतु हा तरुण मात्र या दारुच्या आहारी जाण्याची कल्पनादेखील करीत नसे. ज्या ठिकाणी जुगार आणि सट्टा हा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा खेळ समजला जात असे, तसेच नृत्य, शृंगार व संगीत देशाच्या संस्कृतीचा भाग बनला होता, त्या ठिकाणी हा पावन वृत्तीचा तरूण या सर्व बाबींपासून खूप दूर असायचा. ज्या ठिकाणी कित्येक देवीदेवतांची पूजा होत होती, त्या ठिकाणी एकेश्वरवादाचे प्रतीक असलेला हा तरूण केवळ एकमेव निर्मात्याचीच अर्थात ईश्वराचीच उपासना करीत असे. अरब समाजात होणार्या नेहमीच्या रक्तपातापासून हा तरूण नेहमीच दूर असायचा. या तरुणाने आपल्या समविचारी सवंगड्यांना घेऊन अत्याचारी जणांच्या अत्याचारास बळी पडलेल्या निर्धन आणि दुर्बलांना दुष्ट वृत्तींच्या विळख्यातून सोडविले.
प्रेषितत्व मिळाल्यावरसुद्धा त्यांनी ही घटना स्मरण करून एकदा म्हटले की, ‘‘जर मला अरब देशाची बहुमूल्य संपत्ती म्हणजेच लाल रंगांचे उंट देऊन सांगितले असते की, दुर्बलांचे समर्थन करू नये तरीसुद्धा मी ही बहुमूल्य संपत्ती झुगारून अत्याचारपीडितांचे सर्वशक्तीनिशी समर्थन करून त्यांना जोखडातून मुक्त केले असते आणि आजही जर मला एखाद्या अत्याचारपीडिताचा टाहो ऐकू आला तरी मी सर्व शक्तीनिशी हजर आहे.’’
‘पवित्र काबा’च्या पुरोहित आणि पुजारी परिवारात जन्म घेतलेल्या या तरुणाने पौरोहित्य स्वीकारुन काबागृहास मिळणार्या भेटवस्तू आणि नजराने मुळीच न स्वीकारता आपली उपजीविका भागविण्यासाठी व्यापाराचा पवित्र व प्रतिष्ठित मार्ग स्वीकारला. व्यापारासाठी भांडवल नसताना त्याने इतरांकडून व्याजमुक्त बटाई तत्त्वावर भांडवल घेऊन व्यापार उभारला. ‘सीरिया’ देशाचा दोन वेळा व्यापारी दौरा केला. त्याच्या अतिशय स्वच्छ आणि प्रामाणिक व्यवहाराच्या चर्चा दूर दूर पसरल्या. खरेदीदार आणि व्यवहार करणारे त्याच्या स्वच्छ व प्रामाणिक व्यवहार पद्धतीने अत्यंत प्रभावित झाले. ‘साईब’, ‘कैस’, ‘खदीजा(र)’ आणि इतर सर्वच व्यापारी भागीदारांना त्यांच्या प्रामाणिकतेचा आणि व्यवहारातील पवित्र नीतिमत्तेचा जेव्हा अनुभव आला, तेव्हा ते हुरळून गेले. त्या सर्वांनीच मुहम्मद(स) यांना ‘अनामतदार व्यापारी’ अशी उपमा दिली.
ज्या वेळी या अत्यंत सुशील आणि प्रामाणिक तरुणाने जीवनसाथी निवडण्याचा विचार मनात आणला, त्या वेळी ‘मक्का’ या शहरात कित्येक तरूण व सुंदर मुलींवर दृष्टी न टाकता त्यांनी आपल्यापेक्षाही पंधरा वर्षे वयाने मोठी असलेली विधवा महिला ‘माननीय खदीजा(र)’ यांना विवाहास्तव पसंत केले. ही महिला सुशील, प्रामाणिक, चारित्र्यवान व उत्तम आचरणाची असल्याने मुहम्मद(स) यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावरून असेच सिद्ध होते की, हा तरुण किती महान चारित्र्यवान होता.
शिवाय हा तरूण परिवाराच्या आणि व्यापार व धंद्याच्या अनेकानेक व्यस्ततेतून सवड काढून या सवडीचा वेळ मनोविहार आणि विलासात न घालवता ‘हिरा’ नामक एका गुहेत जाऊन एकांतात ईशस्मरण करण्यात व्यतीत करीत असे. सृष्टीची वास्तविकता आणि मानवी जीवनाच्या रचना व बिघाडावर सखोल आणि गंभीर शोधपूर्ण विचारमग्न होत. संपूर्ण मानवतेस अज्ञानाच्या तिमिरातून सत्यप्रकाशात आणण्याच्या बाबतीत विचार करीत. मुहम्मद(स) यांनी कित्येक दिवस त्या गुहेत चितन केले. ही गुहा मक्का शहरापासून तीन मैलाच्या अंतरावर आजही आहे.

संबंधित पोस्ट
December 2024 Jamadi'al Ula 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30
2 Jamadi'al Thani 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *