पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ज्ञानाविषयी आयती अवतरीत झाल्या. त्या अशा, ”आपल्या विधात्याच्या नावाने वाचा, ज्याने माणसाची निर्मिती गोठलेल्या रक्तापासून केली. तुमचा विधाता उपकार करणारा आहे. त्याने लेखणीद्वारे ज्ञान दिले आणि आजवर माणसाला जे माहीत नव्हते ते ज्ञान दिले.”
याचा अर्थ, अल्लाहने प्रेषितांकरवी सुरुवातीपासूनच ज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे. माणसाची निर्मिती कशापासून झाली हा विज्ञानाचा विषय आहे. म्हणजेच अल्लाहने प्रेषितांना पाठवून त्या माहिती नसलेल्या विज्ञानाची सुरुवात केली.
प्रेषितांनी मुस्लिमांना सांगितले आहे की, ज्ञान संपादन करणे हे प्रत्येक मुस्लिम पुरुष स्त्रीला बंधनकारक आहे. ते अनिवार्य कर्तव्य आहे. जगातील आजवर उदयास आलेल्या कोणत्याही संस्कृती, सभ्यता किंवा अगदी जवळच्या काळातील विचारधारा विकसित झालेल्या फ्रेंच रेनेसांपर्यंत शिक्षणाला इतके महत्त्व प्राप्त झालेले नव्हते विशेष म्हणजे ज्ञान संपादन करण्यासाठी पुरुषांबरोबरच स्त्रियांचाही स्वतंत्र व आवर्जुन उल्लेख इतर कुठेही आढळत नाही. उलट स्त्री जातीला शिरण घेण्यास बंदीच असल्याची उदाहरणे सर्वत्र आहेत.
दुसरीकडे प्रेषितांनी सांगितले आहे की, शिक्षण प्राप्त करण्यासाठी जरी तुम्हाला चीनपर्यंत जावे लागले तर जरूर जा. ते ज्ञान संपादनासाठी आवश्यक आहे. त्यांचा म्हणण्याचा उद्देश एकच की, ज्ञान मिळवण्यासाठी किती लांबचा प्रवास करावा लागला, कितीही कष्ट सहन करावे लागले, आपले घरदार सोडून द्यावे लागले तरी हरकत नाही. ज्ञानासाठी सर्व सुखसोयी सोडून कष्ट घ्या. प्रसंगी घरातून बाहेर निघा.
कुरआनात एके ठिकाणी उल्लेख आहे की, अल्लाह ज्यास बौद्धिक ज्ञान देतो, त्याला जणू सर्वगुणसंपन्न करतो. माणसांनी आपली बुद्धी आणि वाचारशक्तीचा वापर करून कुरआनातील आयतींचा अर्थ लावावा आणि अल्लाहने विश्वात जे जे निर्माण केले आहे त्याचा अभ्यास करावा. अशा आयती कुरआनात सगळीकडे आढळतात. अल्लाह म्हणतो, मी केलेल्या निर्मितीच्या खुणा सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास करा.
पवित्र कुरआनच्या पहिल्या आयती अवतरीत झाल्या तेव्हापासून ज्ञान-विज्ञानाच्या युगास सुरुवात झाली. ज्या वेळी प्रेषितांच्या शकवणुकीचा प्रसार झाला, त्या वेळी धार्मिक व ऐहिक ज्ञान वेगवेगळे नव्हते. मशिदी शिक्षणाची केंद्रे होती. प्रेषितांनी ज्ञान-विज्ञानाला तेवढेच महत्त्व दिले जेवढे धार्मिक विधी-धार्मिक ज्ञानाला दिले होते.
पवित्र कुरआनात म्हटले आहे की, अल्लाहने प्रेषित इब्राहीम (अ.) यांच्या संततीला बौद्धिक ज्ञान, ग्रंथ व त्याचबरोबर राज्य गाजवण्यासाठी भला मोठा भूप्रदेश दिला आहे. तर आणखी एक उल्लेख आला आहे, त्यात अल्लाहने एका साधारण व्यक्तीला बनी इसराइल समुदायाचा बादशहा बनवले, तेव्हा लोकांनी आक्षेप घेत सांगतले की, आमच्यापेक्षा फाटकातुटका माणूस आमच्यावर कसे राज्य करणार? अल्लाहने उत्तर दिले, मी त्याला ज्ञान व ऐहिक शक्ती देईन. याचा अर्थ असा की, या जगात आपला दरारा, आपले राज्य गाजवण्याची गुरुकिल्ली म्हणजे नुसते ज्ञान किंवा ऐहिक, शारीरिक शक्तीच नव्हे तर दोन्ही अनिवार्य आहेत.
प्रेषित म्हणायचे, अज्ञान आणि इस्लाम एकत्र येऊच शकत नाहीत. प्रेषितांचे एक विधान आहे की, अल्लाहची निर्मिती असलेल्यांचा अभ्यास करण्यासाठी क्षणभरही खर्च केला तरी तो ऱर्षभराच्या उपासनेपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. प्रेषितांच्या या शिकवणुकीचा प्रभाव इतका झाला की त्यांच्यानंतर जेव्हा अरब लोकांनी जगभर इस्लामचा प्रसार केला तेव्हा त्यांनी फक्त धार्मिक विधी, परंपरा यांचाच प्रसार केला नाही तर त्यांनी ज्ञान-तंत्रज्ञानाकडे अभूतपूर्व लक्ष दिले. आधुनिक ज्ञानाचे कोणतेही क्षेत्र असे नाही, ज्याचा पाया अरबांनी घातला नसेल. रसायनशास्त्र, असो, भौतिकशास्त्र असो किंवा बीजगणित (अलजेब्रा), अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, वैद्यकीयशास्त्र, भूगोल याच्यासह कला, साहित्य याचाही पाया रचला. म्हणजे मानवी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्राला त्यांनी सोडले नाही. आज संगणक ज्या तंत्रावर निर्माण केले गेले आहे, त्याचे मूळ लॉगॅरिथम हे गणिताच्या शाखेत आहे. ते अरब विद्वानांनी विकसित केले. त्याचबरोबर इतिहास लेखन, काव्यलेखन, तत्त्वज्ञान आदी सर्व क्षेत्रांत मोठे योगदान दिले. मुस्लिम बादशाहांनी जगभर ज्या इमारती वांधल्या त्यामागची अभियांत्रिकी, कला, त्यांचे सौंदर्य आजही आश्चर्यात टाकणारे आहे.
0 Comments