वस्तूतः भ्रूणहत्या या मानव हत्या आहेत. या किळसणीय अपराधामधील वाढीमुळे समाज निव्वळ कलंकीतच होत नाही तर नैतिकतेची पातळी देखील खालावत चालली आहे. या निर्घृण अपराधामुळे केवळ जगण्याच्या अधिकारावरच अतिक्रमण केले नाही तर असंख्य जीवनाना जन्मापूर्वीच गिळंकृत केले आहे. या दुष्कृत्यामध्ये लीप्त जीवरक्षक समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांची संख्या मोठी आहे, ज्यांच्या हस्ते दररोज अबोध, अविकसित मानवी जीवन संपविले जात आहे. सर्वांत कष्टप्राय गोष्ट ही आहे की ममतेचे प्रतिरुप असणाऱ्या महिला देखील यामध्ये लीप्त आहेत.
या निर्घृण अपराधाच्या मुळाशी काही विशिष्ट सामाजिक अपप्रवृत्ती आहेत ज्यांच्यामुळे यांना चालना भेटत आहे. याच सामाजिक अपप्रवृत्तीमुळे बहुदा स्त्री विवशतेने भ्रूणहत्येकरिता तयार होते कारण चांगल्या वा वाईट कृत्यांकरिता काही अंशी समाज कारणीभूत असतो. ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे की, जोवर समाजामध्ये मुलामुलींमध्ये भेदभाव, हुंडाप्रथा, लोकसंख्या नियंत्रण, धार्मिक कर्मठपणा, धनाची आसक्ती इ. गोष्ट अस्तित्वात राहतील, भ्रूणहत्येवर अंकुश ठेवणे कठीण आहे. ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की नरभ्रूणाच्या तुलनेने स्त्रीभ्रूणाची हत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करू या.
जेव्हांपासुन लोकसंख्या नियंत्रणाच्या कार्यक्रमाचा अर्थ ‘छोटापरिवार सुखी परिवार’ असा लावला गेला आणि छोटे कुटुंब ही फॅशन बनली, तेव्हापासून भ्रूणहत्येच्या दरामध्ये वाढ झाली. लोकसंख्या नियंत्रणाच्या साधनामध्ये गर्भपात/भ्रूणहत्येचा समावेश केला गेला. लोकसंख्या नियंत्रणाच्या लावलेल्या सुरामुळे तसेच छोट्या कुटूंबाच्या फॅशनने जनसामान्यांना भ्रूणहत्येकरीता प्रवृत्त केले.
भारतीय समाजामध्ये अशा हत्यांची परंपरा पूर्वीपासून आहे. गर्भलिग चिकित्सेच्या अत्याधुनिक तंत्रापूर्वी देखील मुलीच्या जन्मानंतर प्राचीन रूढी परंपरांमुळे तिला मारून टाकण्यात येत असे. आज देखील स्त्रीपुरुष लिगभेदामुळेच हत्या होत आहेत. फक्त कारणे व पद्धती बदलल्या आहे. आजदेखील मुलांच्या तुलनेने मुलींची गर्भामधे हत्या जास्त प्रमाणात होत आहे. स्त्रीभ्रूणहत्येमध्ये समाजामधील हुंडारुपी राक्षसाचा फार मोठा वाटा आहे. स्त्रीभ्रूणहत्ये व्यतिरिक्त हुंडाबळी, अत्याचारामुळे प्रेरित झालेल्या आत्महत्या वगैरेंमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
स्त्री भ्रूणाच्या हत्येमुळे लिगसंतुलन बिघडून गेले असून पुरुष स्त्री सरासरी ढासळत आहे. काही राज्यांमध्ये तर खूपच चिताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुलामुलींमधील केले जाणारे व वाढत चाललेले भेदभाव देखील याला कारणीभूत आहेत. मुलाच्या बाबत ही धारण आहे की, तो कुटूंबाची आर्थिक सहाय्यता करेल, आईबापांचा आधार बनेल, त्यांची सेवा करेल तर मुलीच्या बाबतीत ती दुसऱ्याची अनामत आहे, ती आईबापाची सेवा करण्याकरिता नाही, ती आधार नव्हे तर उलट ओझे आहे ही धारणा सर्वत्र आढळते. या धारणेंमुळे जनसामान्यांमध्ये पुत्रमोह व पुत्रीची उपेक्षा रूजत आहे. या विचारांचा प्रभाव त्यावेळेस जाणवतो जेव्हा पुत्रप्राप्तीकरीता एखाद्या बालकाचा बळी दिला जातो! हे नित्यच घडत असते!!
महागाईच्या भस्मासूराने देखील भ्रूणहत्येला प्रोत्साहन दिले आहे. गरीब कुटूंबामधून मुलांच्या पालनपोषणाच्या खर्चाच्या भीतीपायी भ्रूणहत्या केली जाते. जास्त मुले विकासामध्ये अडथळा आहेत ही गोष्ट त्यांच्या मनावर बिबविली गेली आहे. वास्तविक अशा प्रकारचे तर्क, विचारप्रणाली व धारणा पूर्णपणे अनैसर्गिक व असामाजिक आहेत. जर मोठे कुटूंब असणे हे दारिद्रयाचे कारण असते तर देशातील प्रमुख उद्योगपती व व्यापारी आज दरिद्री दिसले असते.
समाजातील भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण ढासळणाऱ्या नैतिकतेची निशाणी आहे. सध्याच्या चंगळवादी संस्कृतीने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. समाजामध्ये रुजत चाललेल्या अती खुलेपणाने लज्जाहीनतेबरोबरच लोकांना संवेदनहीन बनविले आहे. या मुक्तपणाने व चंगळवादी संस्कृतीने अवैध संबंधांना पशुपातळी पर्यंत नेऊन ठेवले आहे. याच मार्गाने अवैध संबंध व भ्रूणहत्या वाढत आहेत. याची आकडेवारी खूप मोठी आहे आणि सगळा मामलाच गुपचूप असल्यामुळे खरी आकडेवारी कधीच समोर येत नाही.
भ्रूणहत्येमध्ये डॉक्टरांची भूमिका सर्वांत जास्त किळसवाणी राहीली आहे. खूप जणांचा तर हा धंदाच बनला आहे. छोट्या वस्त्यांमधील कमी चालणाऱ्या दवाखान्यांनी तर गर्भपात व भ्रूणहत्येच्या दुकानी थाटल्या आहेत. नव्वदीच्या दशकाच्या आरंभी जयपूर मधील एका खासगी दवाखान्यामध्ये ‘अॅमनियोसेंटेसीस’ तंत्रज्ञाद्वारे गर्भलिग चिकित्सेला सुरुवात झाली होती. तेथील स्थानिक डॉक्टरांच्या विधानानुसार तेथे प्रतिदिन १० भ्रूणहत्या होतात. १९९० मध्ये तेथे गर्भलिग परिक्षणाचे १४०० + गर्भपाताचे १२०० असे २६०० रुपये घेतले जात होते. आपली राजधानी दिल्ली तसेच उत्तर प्रदेशातील कानपूर, लखनौ सारख्या महानगरांमधून हा व्यवसाय जोमात चालू आहे. एका आकडेवारीनुसार १९७८ ते १९८३ दरम्यान देशभरात अंदाजे ७८,००० भ्रूणहत्या घडल्या होत्या. आज देखील प्रतिवर्षी १८५६० स्त्री भ्रूणहत्या घडत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी क्रांतीनंतर तर या कृत्यामध्ये जास्तच वाढ झाली. कित्येकवेळा निव्वळ पैशांच्या हव्यासापोटी पुरुषगर्भाला स्त्रीगर्भ ठरवून गर्भपात केला जातो. ‘‘लिग परिक्षण प्रतीरोध कायदा’’ बनून देखील गर्भलिग चिकित्सा चालूच आहे.
वैद्यकीय ज्ञानाचा दुरुपयोग या कामाकरिता वारंवार होतो. आता तर गर्भाला चिरडण्याऐवजी ‘‘एमक्रेडिल’’ नावाचे औषध गर्भाशयात सोडले जाते. त्यामुळे गर्भ बाहेर पडतो. गर्भ तीन किवा चार महिन्याचा झाल्यानंतरच गर्भलिग निदान होऊ शकते. यानंतरच गर्भपात संभव असतो. गर्भलिग निदान बहुतांशी वेळा चुकीचे देखील असू शकते. डॉक्टरांनुसार एकही गर्भलिग निदान पद्धती शंभर टक्के अचूक नाही.
शासनकृत पर्याप्त कायदे व नियम असून देखील भ्रूणहत्यांची संख्या लक्षणीय आहे. या बाबत पूर्वी फक्त भारतीय दंडविधान संहिता (आय.पी.सी.) व्यतिरिक्त कायदा नव्हता परंतु आता तर ‘‘मेडीकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी अॅक्ट’’ (ए.टी.पी.) व्यतिरिक्त राज्यशासनांचे वेगवेगळे कायदे व नियम अस्तित्वात आहेत.
या प्रकरणातील शासनाची उदासीनता संदेहात्मक आहे. अशी शंका घ्यावयाला जागा आहे की, या उदासीनते मागे येणकेण प्रकारे लोकसंख्या नियंत्रणाचा उद्देश तर नाही ना? सरकारचा हेतु हा तर नाही ना, की या निमित्ताने लोकसंख्या वाढीचा दर कमी रहावा?
समाजामध्ये प्रचलित भ्रूणहत्येने उघड केले आहे की, व्यवस्थेमध्ये काही तरी कमतरता आहे. जाणतेपणे असो वा अजाणतेपणे ही कमतरता खूपच घातक आहे. हे तर उघड सत्य आहे की, भ्रूणहत्या स्त्री बिजांचीच होते. याबरोबरच प्रतिवर्षी २५००० स्त्रिया अन्य कारणांनी मृत्यू पावतात. हे स्पष्ट आहे की भ्रूणहत्येच्या अपराधामध्ये देखील पक्षपात आहे. त्याच प्रमाणे भ्रूणहत्या करविणाऱ्यांमध्ये बहुसंख्य लोक हुंड्याच्या भीतीपायी स्त्री भ्रूणाची हत्या करतात अथवा अवैध गर्भाची लोक लाजेस्तव हत्या होते.
या एकतर्फी स्त्रीभ्रूणहत्येला जर थोपविले गेले नाही तर समाजामध्ये एक कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण होईल.
निव्वळ भ्रूणहत्या विरोधी कायदा बनवून चालणार नाही तर शासनाने त्या असामाजिक प्रवृत्तींवर अंकुश लावला पाहिजे, ज्यामुळे भ्रूणहत्या घडतात.
निव्वळ भ्रूणहत्या विरोधी कायदा बनवून चालणार नाही तर शासनाने त्या असामाजिक प्रवृत्तींवर अंकुश लावला पाहिजे, ज्यामुळे भ्रूणहत्या घडतात.
सामाजिकदृष्टया जागरुक वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे, जेणे करून समाजाला ग्रासणाऱ्या अशा रूढीवादी परंपरांमधील दोष व कमतरता संपविल्या जाव्यात. भ्रूण हत्या समाजातून हद्दपार व्हावी अथवा नाही हे पूर्णपणे महिलांच्या विचारप्रणालीवर, आचारविचारांवर अवलंबून असल्यामुळे महिलांनी विशेषतः पुढाकार घेतला पाहिजे.
0 Comments