एकमेव ईश्वर- अल्लाहने इतर प्रेषितांद्वारे तोच धर्म इस्लाम अवतरित केला जो त्याने प्रेषित मुहम्मद (स) यांच्यावर अवतरित केला आहे, मग ही मतभिन्नता का? त्या इतर सर्व प्रेषितांचे अनुयायीसुध्दा तितकेच आज्ञाधारक होते जितके प्रेषित मुहम्मद (स) यांचे अनुयायी आज्ञाधारक आहेत. मग फक्त प्रेषित मुहम्मद (स) यांच्या अनुयायींना मुस्लिम का म्हटले जाते? सर्व धर्म (पूर्वीचे) इस्लाम होते आणि त्या सर्वांचे अनुयायी मुस्लिम होते, मग त्या धर्मांना इस्लाम आणि त्यांच्या अनुयायींना ‘मुस्लिम’ म्हणून का ओळखले जात नाही? हे काही कारणांशिवाय घडलेले नाही. हे नामकरण हे सर्वमान्य आणि अत्यावश्यक अशा वैश्विक लोकप्रिय नियमाद्वारे घडले. ते असे की ज्यांच्यामध्ये एकसारखी गुणवैशिष्ट्ये आढळली तर त्यांना विशिष्ट नावाने संबोधले जाते आणि त्यांचे नाव त्यांच्या गुणानुसार ठेवले जाते. दुसरा कुणी त्या नावाने ओळखला जाऊ लागला तर त्याच्यामध्ये ती गुणवैशिष्ट्ये पूर्णरूपात आढळू लागतात. इतर कुणात ती कमी प्रमाणात असतील तरी तो त्याच एका नावाने ओळखला जातो. ज्याचा गुणदर्जा वैशिष्टपूर्ण होतो त्याप्रमाणे त्यास ओळखले जाते. अशा गुणवैशिष्ट्यांमुळे ते नावारूपाला येतात. अशा स्थितीत तो सूर्यासमान असतो आणि इतर त्याच्यापुढे फिक्या ताऱ्यासारखे असतात. उदाहरणार्थ, खरेपणा, सत्यता हे माणसाची गुणवैशिष्ट्ये आहेत. परंतु ‘‘सत्यवचनी’’ हे नाव आदरणीय अबू बकर (र) यांना बहाल करण्यात आले आहे. याचा अर्थ असा मुळीच होत नाही की ते एकटेच सत्यवचनी खरे होते आणि प्रेषित मुहम्मद (स) यांचे इतर सहकारी सत्यवचनी नव्हते, असा अर्थ मुळीच नाही. त्यांच्या पैकी तर काहीजण अशे होते ज्यांच्याविषयी प्रेषित मुहम्मद (स) यांनी असे उद्गार काढले होते की जर प्रेषित्व माझ्यावर संपले नसते तर हे प्रेषित झाले असते. म्हणजेच मुहम्मद (स) यांच्या सहकाऱ्यांपैकी एखाद दुसरा नव्हे तर सर्व सहकारी सत्यवचनी होते. अशा स्थितीत हा एक खास सन्मान म्हणून ‘‘सत्यवचनी’’ हा किताब माननीय अबुबकर (र) यांना बहाल करण्यात आला होता. ते या गुणवैशिष्ट्यात आदर्श होते. हे आपणास इतिहासात आणि प्रेषिताच्या पवित्र जीवनी आणि हदीस वचनातून कळून येते.
आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) यांच्याद्वारे अवतरित धर्म आणि इतर प्रेषितांद्वारे अवतरित धर्म यांचा विचार वरील तत्त्वानुसार होणे आवश्यक आहे. खऱ्या अर्थाने मुहम्मद (स) आणि इतर प्रेषितांचा धर्म एकच म्हणजे इस्लाम होता. पूर्वीचे सर्व धर्म इस्लामसारखेच होते. परंतु प्रेषित मुहम्मद (स) जे अंतिम प्रेषित आहेत त्यांच्याद्वारे कुरआनच्या रूपात अवतरित झालेला धर्मच फक्त ‘इस्लाम’चे नाव धारण करण्यास पात्र आहे. कारण इस्लामच्या गुणवैशिष्ट्यांत फक्त हाच धर्म पूर्णतः उतरतो आणि तोच एकमेव अप्रतिम असा इस्लामी गुणवैष्ट्यपूर्ण इतर धर्मांपेक्षा गुणश्रेष्ठ आहे. इतर धर्मांपेक्षा तो या गुणात वरचढ आहे. इस्लामव्यतिरिक्त इतर सर्व धर्मांची आदेश नियमावली संक्षिप्त आणि मर्यादित स्वरुपाची आहे, त्यामुळे हे धर्म एखाद्या छोट्या लोकसमूहासाठीच मर्यादित काळासाठी होते. परंतु इस्लामबद्दल असे नाही. इस्लाम धर्माची आदेश नियमावली ही सर्वसमावेशक अशी वैश्विक स्वरुपाची आहे. इस्लाम समस्त मानवतेला आवाहन करतो आणि कार्यकाल हा अमर्याद आहे. हा धर्म संपूर्ण विश्वाचा धर्म आहे. याचा मूलभूत स्वभाव हा निसर्गनियमांशी आणि मानवी स्वभावाशी सुसंगत आहे. त्या धर्माची शिकवण ही एक परिपूर्ण जीवनप्रणाली घडवून आणते. ईशदेणगीला या धर्माच्या (इस्लाम) रूपाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. आणि परिपूर्ण मार्गदर्शन जे आदम (अ) यांच्या काळापासून सुरू होते त्यास इस्लामच्या रूपानेच पूर्णत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच हे अति उचित आहे की ‘इस्लाम’ हे नाव त्याच धर्माचे असावे जो परिपूर्ण, वैश्विक असा शेवटचा धर्म आहे.
याच कारणामुळे आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) यांच्या अनुयायींना ‘मुस्लिम’ हे नाव आणि किताब देण्यात आला होता. मुस्लिम चारित्र्यांत ते इतरांपेक्षा अतिश्रेष्ठ होते. ते त्या धर्माचे ध्वजवाहक होते जो सर्व समावेशकता, उदारता आणि वैश्विकता या गुणात अद्वितीय आहे. त्यांना पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत अल्लाहचा हा संदेश (इस्लाम) प्रत्येक लोकसमूहापर्यंत आणि राष्ट्राराष्ट्रांत प्रसारित, प्रचारित करण्याची जबाबदारी सुपूर्द केली गेली. त्यांना इस्लामचे साक्षीदार म्हणून जगात नियुक्त करण्यात आले. त्यांना एका क्षणाचीसुध्दा सवड दिली गेली नाही की जोपर्यंत हा सत्यधर्म जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसारित होत नाही.
इतर कोणत्याच लोकसमूहाला (राष्ट्राला) ही कठीणतम जबाबदारी देण्यात आलेली नाही. म्हणूनच हा लोकसमूह ‘‘सर्वश्रेष्ठ लोकसमूह’’ म्हणून संबोधला जातो आणि मुस्लिम नावसुध्दा त्यांच्यासाठीच आरक्षित केले आहे.
हा तपशील स्पष्ट करीत आहे की जरी समस्त सृष्टी मूलतः मुस्लिम, असली तरी आणि असे सर्व लोक जे ईशधर्माचे पालन करतात ते ‘मुस्लिम’ आहेत आणि प्रत्येक धर्म जो अल्लाहने अवतरित केला तो इस्लाम होता, जोपर्यंत इस्लाम आणि मुस्लिम शब्द वापरात होता. आता इस्लाम म्हणजे प्रेषित मुहम्मद (स) यांच्यावर अवतरित झालेला धर्म आणि मुस्लिम त्या धर्माच्या अनुयायींना म्हटले जाते.
इस्लाम धर्माची आदर्श नियमावली ही सर्वसमावेशक वैश्विक स्वरुपाची आहे.
संबंधित पोस्ट
0 Comments