अरब समाज ज्या अनैतिक गोष्टीने ग्रस्त होता त्यांचा येथे थोडक्यात आपण उहापोह करू या.
युद्धप्रियता आणि भांडखोर वृत्ती
अरब समाजात असलेल्या अहंकारी वृत्तीमुळे ते आपसांत खूप लढाया करीत असत, सूडबुद्धीने पेटलेल्या या लोकांची आपसांतील युद्धे पिढ्यान्पिढ्या चालत आणि अगदी क्षुल्लक कारणावरून रक्तपात होत असे. म्यानातून तलवारी बाहेर निघण्यासाठी साधे निमित्तच पुरेसे असे.
समाजातील भेदभाव
हा समाज संघटित नव्हता. छोट्या-छोट्या कबिल्यांत दुभंगलेला होता. प्रत्येक परिवार एकदुसर्यांविरुद्ध सुडाने पेटलेला, डोळ्यांत प्रचंड द्वेश आणि मत्सराच्या धगधगत्या ज्वाला आणि सर्वत्र आपसांत रक्तपात सुरुच. शांती आणि सद्भावनेचा मागमूसही कोठे दिसत नव्हता. त्यांच्या सामरिक वृत्तीचे चित्र एका इतिहासकाराने ‘अय्यामुल अरब‘ (अर्थात – अरब समाजाच्या संकटमय काळाचे स्मरण) या ग्रंथात शेकडो पृष्ठांवर रेखाटलेले आहे. ‘मीदानी नेशापुरी‘ (मृत्यू ११२४) या इतिहासकाराने ‘किताबुल अमसाल‘ या ग्रंथात १३२ युद्धांचे वर्णन करताना लिहिले की,
‘‘या युद्धांची गणना करणे हे कोणत्याही गणनाशास्त्रानुसार शक्यच नाही. म्हणून मी या ठिकाणी या युद्धांचे शक्यतोपरी वर्णन करण्याचा प्रयत्न केला.‘‘
मुळात ही युद्धे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आगमनापूर्वी लढण्यात आली होती. अर्थातच हिंसा, निर्दयीपणा, हत्या, लूटमार आणि यासारख्या अत्यंत क्रूर घटनांची एक कधीही न संपणारी शृंखला सुरुच होती.
दारुचे व्यसन
जगामध्ये प्रत्येक अनैतिकता, अन्याय, अत्याचार, दुष्कर्म, व्यभिचार आणि वैरभावाची जननी असलेली ही दारू! ही दारू समस्त अरब समाजाच्या कंठात रिचलेली होती. अरब समाजाचे साहित्य म्हणजे दारू, प्रतिष्ठा म्हणजे दारू, पाहुणाचार म्हणजे दारू, अभिमान म्हणजे दारू, मान-सन्मान म्हणजे दारू, त्यांचे सर्वकाही दारूच असे समीकरणच झालेले होते. मद्यपनाच्या मैफली सजन असत. सहकुटुंब सहपरिवार मिळून दारूचा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा. दारुच्या प्रत्येक घोटावर आपल्या वंश-प्रतिष्ठेचे काव्यात्मक गुणगान होत आणि अश्लील कवन होत. दारूचे २५० प्रकार या समाजात अस्तित्वात होते. पूर्ण समाजास दारूने आपल्या कंठात रिचविले होते.
जुगार
पायापासून डोक्यापर्यंत दारूत चिंब झालेल्या या समाजास जुगाराची भंयकर कीड लागलेली होती. आपली धन-संपत्ती डावावर लावण्याची आणि ती संपली की बायका-मुलेसुद्धा डावावर लावायची, विजय-पराजयाच्या या खेळीमुळे आधीच सुडाने पेटलेल्या समाजात रक्तपात सुरु व्हायचा. धन-संपत्ती आणि अहंकाराच्या आहारी जाऊन पिढ्यान्-पिढ्या नष्ट व्हायच्या.
व्याज आणि सावकारी धंदा
अरबांच्या या विविध कबिल्यांत दुभंगलेल्या समाजामध्ये समस्त वाईट प्रथांप्रमाणेच मानवी शोषण आणि उत्पीडनाचे आणखीन एक भयानक स्वरूप होते आणि ते म्हणजे ‘व्याजखोरी‘. एका निश्चित व्याजदरावर कर्ज देऊन वेळेवर कर्ज परत न मिळाल्यास परतफेडीची संधी वाढवून देताना मुद्दल आणि व्याज एकत्र करून त्यावर वाढीव व्याज आकारण्यात येत असे. हे वाढीव व्याज इतके वाढीव होते की याची परतफेड करण्यासाठी पूर्ण संपत्तीच सावकाराच्या तिजोरीत जात असे. हा प्रकार शेतकरी आणि मजुरांच्या नशिबी येत असे. यामुळे शेतकरी आणि मजूर सावकारी करणार्यांच्या गुलामीत जखडलेले असत. मूठभर सावकार आणि श्रीमंतवर्ग मूठभर पैसा देऊन शेतकर्यांच्या सर्व जमिनी बळकावून घेत आणि यातूनही कर्जाची फेड न झाल्यास त्याला आजीवन गुलाम करून घेत आणि केवळ त्यालाच नव्हे तर त्याच्या बायकोला आणि मुलांना गुलामीच्या दावणीस बांधत असे. (संदर्भ: बुखारी)
म्हणजेच ‘सोने सत्य-मानव मिथ्या‘ असा प्रकार होता. संपत्तीसमोर माणसाची कवडीकिंमत नव्हती. प्रतिष्ठा, स्वाभिमान, अहंकार व प्रसिद्धीचा हव्यास, भोगविलास, कठोरता आणि क्रूरतेच्या या रखरखत्या वाळवंटात प्रेम आणि बंधुत्वाचा एक दवबिंदूसुद्धा नव्हता. भांडवलशाहीचा या काळात उदय झाला नसला तरी समस्त अरब समाज क्रूर आणि जुलमी भांडवलशाहीच्या अभिशापाने शापित झालेला होता.
लूटमार
दररोजची लुटालूट सुरुच होती. वाटमारी आणि दरोड्यांचे वातावरण होते. सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण होते. दरोडेखोरांचे विशिष्ट जत्थे होते. दरोडे आणि लूटमारीवर या जत्थ्यांचे अर्थार्जन, पोटपाणी व भोगविलास अवलंबून होते. दरोडे टाकण्याची पद्धतसुद्धा विलक्षण होती. दरोडे फक्त द्रव्य आणि संपत्तीवरच नव्हे तर बायकापोरांवरसुद्धा टाकण्यात येत असत. व्यापारीवर्ग मालवाहतूक करताना खंडणी दिल्याखेरीज पुढे सरकू शकत नव्हता. सफल आणि विजयी कामगिरी करणारे डाकू आपली कामगिरी आणि कर्तृत्व कविताबद्ध करीत असत आणि मोठ्या गर्वाने आपली ‘अहंकार गाथा‘ वाचून दाखवत असे.
चोरी
दरोडे टाकण्याव्यतिरिक्त गरिबी आणि दारिद्र्यास बळी पडून ग्रामीण भागातील लोक लहानसहान चोर्या आणि वाटमारी करायचे. काहीजणांनी तर पूर्णपणे हाच धंदा वा उपजीविका पत्करली होती. शिवाय हा धंदासुद्धा एक प्रकारे प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून ते मिरवित असत.
बलात्कार, व्यभिचार आणि अश्लीलता
हा समाज व्यभिचार आणि लैंगिक मार्गभ्रष्टतेत खितपत पडलेला होता. स्त्रियासुद्धा यात कमी नव्हत्या. व्यभिचारीणी बाया आपापल्या घरांवर लैंगिक आमंत्रणाची खूण असलेले झेंडे लावून व्यभिचारी पुरुषांना आमंत्रित करीत असत. मोठमोठे प्रतिष्ठित व श्रीमंत लोक आपल्या दास्यांकडून पाहुण्यांचा पाहुणचार करीत, आपल्या दास्यांकडून देहविक्रीचा व्यवसाय करीत आणि यातून संपत्ती मिळवीत असत. या प्रकारच्या व्यभिचारांवर प्रशंसापूर्ण काव्य करण्यात येत असे.
निर्लज्जता आणि नग्नता
निर्लंज्जतेने सर्व सीमा ओलांडलेल्या होत्या. अगदी धर्माच्या आधारावरसुद्धा मानवतेच्या छातीवर या नग्नतेने तांडव माजविले होते. काबागृहात हजच्या प्रसंगी हजारो लोक हज करण्यासाठी येत असत. मात्र कुरैश कबिल्याव्यतिरिक्त सर्वजन बिनधास्त कपडे काढून काबागृहाची प्रदक्षिणा करीत.
महिलांवरील अत्याचार
जग अस्तित्वात आल्यापासून अत्याचारांमध्ये सुसंस्कृत देश काय आणि असंस्कृत देश काय, धार्मिक काय आणि निधर्मी काय, सर्वांच्याच अन्याय, अत्याचार, शौर्य आणि इतर सर्व बाबींचे जुलमी भोग महिलांनाच भोगावे लागतात. भूत असो, भविष्य असो की वर्तमान असो, प्रत्येक काळात तिचाच बळी जात आहे. हीच अवस्था नारीची होय. त्यातल्या त्यात अगदी असंस्कृत आणि असभ्य समजल्या जाणार्या अरब प्रदेशात तर विचारता सोय नाही. महिलांना वारसासंपत्तीत कोणताही अधिकार नसायचा, असंख्य महिलांशी लग्न करायची पुरुषांना पूर्ण मुभा असे आणि कधीही घटस्फोट देऊन घराबाहेर काढून देण्यात पुरुषार्थावर कोणतीही बाधा येत नसे. यामुळे कुटुंबव्यवस्था पूर्णतः कोलमडून गेलेली आणि महिला अन्याय व अत्याचारांच्या अÎalÉपरीक्षेतून कधीही बाहेर निघण्याची संभावना दिसत नव्हती. (संदर्भ: सीरतुन्नबी – लेखक सय्यद सुलैमान नदवी)
मुलींची हत्या
क्रूर सावकारी बाहूपाशात आवळलेली मानवता, सर्वत्र दारिद्र्य, अज्ञान आणि उपासमारी, अहंकार आणि वंश-श्रेष्ठत्वाच्या विखारी झिंगेमुळे पेटलेला वैरभाव, द्वेष आणि मत्सर, गरीब व सर्वसामान्यांच्या मानगुटीवर भांडवलदारांचा जुलमी पाय, सर्वत्र चालू असलेली लूटमार आणि अशा परिस्थितीत पोटात उठलेली भुकेची आग, मान-सन्मानाच्या असुरक्षिततेची भावना आणि याच अवस्थेतून नको वाटत असलेला मुलीचा जन्म, काळजाचा तुकडा असलेल्या मुलींचा निर्घृण वध करून मानवता भरडून निघाली होती. मुलगी जन्मली की तिच्या रक्षणाचा, तिच्या पोटापाण्याचा प्रश्न बापाला भेडसावत असे. कोणीतरी आपला जावई होईल आणि आपली प्रतिष्ठा धुळीस मिळेल, या कल्पनेने त्याच्या आत्म्याचा थरकाप उडत असे. म्हणून तो आपल्या प्रेम, ममत्वाची मुस्कटदाबी करून तिला जीवंत पुरुन टाकायचा आणि संपूर्ण अरब समाजात ही प्रथा बर्याच अंशी रुढ होती.
गुलामी
आपसात भेदभाव आणि वैरभावाने पेटलेल्या या समाजाचा आणखीन एक भयानक अभिशाप म्हणजे गुलामीची प्रथा होय. माणसांचा बाजार भरायचा, गुलाम पुरुष आणि स्त्रियांची जनावरांप्रमाणे खरेदी-विक्री व्हायची. गुलाम आणि दासींबरोबर पशुपेक्षाही जास्त जुलमी व्यवहार करण्यात येत असे.
0 Comments