प्रेषितांनी अत्याचार करणाऱ्यांची निर्भत्सना केली आहे. मॅन, मनी, मसलच्या वापराने सध्या लोक बेधूंद झाले आहेत. आपल्याला कोणी जाब विचारणारा नाही! अशी त्यांची (भ्रामक) समज झाली आहे. परंतु उपरोक्त हदीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की जूलूम करणाऱ्याला मोकाट सोडण्यात आले नसून अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी, त्याचा जाब अल्लाहकडून घेतला जाणार आहे. त्याने रत्तीभर जरी अत्याचार केले असेल तर त्या दिवशी अत्याचारपिडीताला न्याय दिले जाईल. त्यादिवशी अत्याचाराला त्याची संपत्ती, शक्ती, आणि सत्ता, कसल्याही प्रकारे कामाला येणार नाही.
औस बिन शुर्जील (रजि.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी ताकीद देताना ऐकले की, ‘‘जो मनुष्य एखाद्या अत्याचारीला साथ देऊन, त्याला सामथ्र्य पोहोचविल, वस्तुत: तो जाणतो की ती व्यक्ती अत्याचारी आहे तर तो इस्लामबाह्य झाला. अर्थात हे की जाणून बुजून एखाद्या अत्याचारीचे समर्थन करणे व त्याला साथ देणे इमान व इस्लामच्या विरूद्ध आहे.’’ (हदीस : मिश्कात)
भावार्थ
इस्लामने अत्याचार करण्यास सक्त मनाईच केली नाही तर अशा अत्याचारी व्यक्तीला परोक्ष वा अपरोक्ष पद्धतीने साथ देण्यास, सहकार्य करण्यास ही मनाई केली आहे. अशी व्यक्ती इमान व इस्लामबाह्य होणे अतिशय चिंताजनक बाब आहे. कारण माणूस जर इमान (श्रद्धेच्या) संकुलातून बाहेर झाला तर मग त्याचे अस्तित्व अल्लाह, व त्याच्या प्रेषितांच्या दृष्टीने, ‘काफीर’ आहे. श्रद्धावंतास मरणोत्तर जीवनांमध्ये, अल्लाहकडून ज्या देणग्या, कृपेचा वर्षाव होणार, त्यापासून अशी व्यक्ती वंचित राहील.
प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘अत्याचार पिडीताच्या दु:खावेगाने टाकलेल्या उसासापासून (हुंदका, आक्रोश) आपला बचाव करा. पीडित अल्लाहच्या दरबारात तुमच्या अत्याचाराचे गाऱ्हाणे मांडेल आणि अल्लाह मोठा न्याय करणारा आहे. तो कोणत्याही पिडीताला त्याच्या हक्कापासून वंचीत ठेवित नाही.’’ आणि या कारणास्तव तो अत्याचारी माणसाला (जुलूम करणाऱ्याला) विविध प्रकारच्या संकटात व दु:ख यातनेत टाकतो. (हदीस – मिश्कात)
0 Comments