मक्कामधील कुरैशजणांच्या सामरिक शक्तीची पाळे-मुळे सभोवतालच्या परिसरात ‘हकाजन’ आणि ‘सकीफ’ परिवारांपर्यंत पसरलेली होती. हे दोन्ही परिवार ‘ताइफ’ शहरात होते. या ताइफवासीयांचे मक्कातील कुरैशजणांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. आर्थिक बाबतीतही त्यांचे घनिष्ट संबंध होते. अर्थातच या कुरैशजणांच्या सहकारी शक्तींचा नायनाट केल्याशिवाय ‘मक्का’ शहरावरील विजय अपुरा समजण्यात येईल.
त्याचे असे झाले की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी उच्च रणनीतीचा अवलंब अशा प्रकारे केला की, मक्कातील कुरैशजणांवर एवढ्या अचानकपणे ताबा मिळविला की, त्यांना सहकार्यांना मदतीस बोलावण्याची संधीच मिळू दिली नाही.
‘हुदैबिया समझोता’ भंग होण्याची जी कारणे होती, त्याचा जो परिणाम समोर येईल. त्याची चांगलीच जाणीव तिकडे ‘हवाजन’ कबिल्याच्या म्होरक्यांना होती. म्हणून या म्होरक्यांनी संभावित परिणामा निपटून काढण्यासाठी सामरिक शक्ती जमा करण्यास सुरुवात केली होती आणि कबिल्यात दौरा करून मुस्लिम शक्तीविरुद्ध उत्तेजना निर्माण करीत होते. मक्केवर मुस्लिमांच्या विजयाची खबर मिळताच त्यांनी तर आपली संपूर्ण शक्ती एकवटून ‘हुनैन’ आणि ‘औतास’ या ठिकाणी मुस्लिम शक्तीस प्रत्युत्तर देण्यासाठी जमा केली. या प्रसंगी मात्र या सामरिक कारवाईतून ‘काब’ कबिला आणि ‘किलाब’ कबिला विभक्त राहिले. ही खूप मोठी कमतरता होती.
इकडे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना या कारवाईची सूचना मिळताच ‘अब्दुल्लाह बिन हदरद अस्लमी(र)’ यांना परिस्थितीची शहानिशा करण्यासाठी पाठविले. त्यांनी गुप्त शहानिशा करून पूर्ण वृत्तान्त प्रेषितांना कळविला.
इस्लामी सेनेचे सर्वोच्च सेनापती आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी कुरैशजणांच्या छोट्या शक्तीचा पाडाव करण्यासाठी कमी प्रमाणातच मदीनात रसद आणि हत्यारे जमा केली होती आणि त्याची गरजही पडली नव्हती. मात्र ‘हवाजन’ आणि ‘सकीफ’ कबिल्यांचे प्रकरण तसे मोठे असल्याने प्रेषितांनी तत्काळ व्यवस्था करण्यासाठी ‘अब्दुल्लाह बिन रबिया’कडून ३०,००० दिरहम आणि मक्कावासी सरदार ‘सफवान बिन उमैया’कडून १०० सामरिक कवच आणि हत्यार कर्ज स्वरुपात घेतली.
हिजरी सन आठमध्ये शव्वाल महिन्यात मक्केतून १२ हजारांचे इस्लामी लष्कर रवाना झाले. तिकडे मात्र शत्रू सैन्यानेसुद्धा जोरदार तयारी केलेली होती. परंतु या युद्धात ‘ताइफ’ शहरात रक्तपात होऊ न देता प्रेषितांनी ते शहर तसेत ठेवून त्यांना या गोष्टीची संधी दिली की, तेथील लोकांनी नवीन परिस्थितीवर विचार करून स्वयं भावनेने इस्लामचा स्वीकार करावा. या युद्धानंतर शत्रूपक्षाची मोठी संपत्ती हाती लागली. त्यात २४,००० उंट, ४०,००० शेळ्या आणि कित्येक मन चांदी होती. या संपत्तीचा २० टक्के भाग ‘बैतुलमाल’ (जणकल्याणास्तव सरकारी खजीना) मध्ये जमा करून बाकीची संपत्ती लष्करात वाटण्यात आली.
दिव्य कुरआनने विरोधकांची मने वळविण्याकरिता संपत्ती देण्याचा जो आदेश दिला आहे त्या आदेशानुसार, मक्का शहरातील लोकांना आणि पामरांना संपत्ती वाटप करण्यात आली. कारण मक्का शहरातील पूर्वीचे प्रेषितविरोधी आणि शक्तिशाली सरदारसुद्धा याचकांच्या मागील रांगेत उभे होते. त्यांमध्ये काहीजण प्रेषितांचे जवळचे नातलगसुद्धा होते. एवढेच नव्हे तर ६००० कैदी आपल्या नशिबाच्या निर्णयाची वाट पाहत होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे त्या कैद्यांतर्फे कोणीतरी प्रतिनिधी येण्याची दोन आठवड्यापासून वाट पाहत होते. अद्यापही त्यांना घेण्यासाठी कोणीच न आल्याचे पाहून शेवटी प्रेषितांनी या कैद्यांना सैनिकांच्या स्वाधीन केले की त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी. प्रत्येक सैनिकाने कैद्यांच्या उदरनिर्वाहाची जवाबदारी स्वीकारून त्यांना आपापल्या घरी नेले. तेवढ्यात ‘हलीमा सादिया’च्या कबिल्यातील काही प्रतिष्ठित जणांचे एक प्रतिनिधी मंडळ प्रेषितदरबारी हजर झाले आणि त्यातील ‘जुहैर बिन अबी सुर्द’ याने प्रेषितांना कळकळीची विनंती करताना म्हटले की,
‘‘हे मुहम्मद(स)! ज्या महिला आपल्याकडे कैद आहेत, त्यांत तुझ्या मावश्या आणि आत्या आहेत. अरबच्या एखाद्या बादशाहने आमच्या परिवारात दूध पिले असते तर आमच्या त्यांकडून खूप अपेक्षा असत्या. परंतु तुमच्याकडून तर आम्हास खूप जास्त अपेक्षा आहेत.’’ (अरब समाजात त्या काळी आईशिवाय इतर स्त्रियांसुद्धा पैसे घेऊन बाळांना दूध पाजण्याची प्रथा होती. ज्या स्त्रीने ज्या बाळास दूध पाजले, तिलादेखील मातेचा दर्जा देण्यात येत असे आणि तिचा सन्मान करण्यात येत असे. त्यांच्या मुलांना भावंडांचा आणि इतर नातलगांनासुद्धा नातलगांचा दर्जा देण्यात येत असे. ‘हलीमा सादिया’ यांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना लहानपणी दूध पाजले होते. म्हणून त्या त्यांच्या माता, बहिणी आणि मावश्या होत्या. म्हणून याच सन्मानाचे संदर्भ देऊन त्यांनी प्रेषितांना विनंती केली होती.)
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांचा सन्मान करून अत्यंत नम्रपणे त्यांना सांगितले की, ‘‘मी स्वतःच वाट पाहत होतो की, कोणीतरी येऊन त्यांना घेऊन जाईल.’’ मग प्रेषितांनी सर्व कैदी प्रतिनिधी मंडळाच्या स्वाधीन केले. बर्याच कैद्यांना प्रेषितांनी वस्त्रदानसुद्धा दिले. हे कार्य आटोपल्यानंतर प्रेषित मुहम्मद(स) यांनी मक्का शहरात माननीय अत्ताब बिन उतैब(र) यांना राज्यपालपदी नियुक्त करून मदीना रवाना होण्याची तयारी केली.
‘मक्का’ आणि ‘हुनैन’च्या विजयानंतर
वास्तविक पाहता मक्का आणि हुनैनच्या युद्धानंतर इस्लामी क्रांतीच्या विरोधकांचा नायनाट होत होता. त्यांना पळता भुई थोडी झाली होती. काही ठिकाणी उरलेसुरले उपद्रव नष्ट करण्याच्या छोट्याछोट्या कायवाया करण्यात आल्या.
‘तमीम’, ‘खसअम’, ‘किलाब’ आणि जिद्दामधील ‘हब्शी’ कबिल्याच्या दरोडेखोरांना जेर करण्यासाठी मोहीम आखण्यात आली. हिजरी सन नऊच्या ‘रबिउल आखिर’च्या महिन्यात ‘माननीय अली(र)’ यांच्या नेतृत्वात ‘तै’ कबिल्यावर १५० स्वार चढाई करण्यासाठी पाठविण्यात आले. या लष्करास आदेश देण्यात आले होते की, तेथील मोठेमोठ्या मूर्तीगृहांना जमीनदोस्त करण्यात यावे. मदीनाचे आस्थापूर्ण व हेतूपूर्ण राज्य हे आस्था आणि धर्मस्वातंत्र्य बिगरमुस्लिमांना तर देऊ शकत होते. परंतु मूळ तत्त्वांशी अगदीच विरुद्ध असलेल्या प्रतीक आणि संस्थांचे अस्तित्व मुळीच सहन करू शकत नव्हते. कारण याच विभूतींच्या श्रद्धांना बळी पडून लोक उत्तेजित होऊन इस्लामी शक्तींशी लढाया लढत आणि आतंक माजवीत असत. असे कोणतेही कारण नव्हते की, अज्ञानीजण मूर्तीगृह आणि अनेकेश्वरवादाने आणि अंधविश्वासाने भरलेल्या व्यवस्थांना समानांतर स्वरुपात चालू दिले जावे. या विभूती आणि देवतांच्या मूर्ती मुळात एका असत्य जीवनव्यवस्थेचे प्रतीक बनले होते आणि या प्रतिकांना नष्ट करणे खूप आवश्यक होते. ‘तय’ हा कबिला मूर्तीपूजेच्या भावनांच्या आहारी जाऊन मदीना शहरावर हल्ला करण्याची तयारी करीत होता. ‘आदी बिन हातिम’ याने या उद्दिष्टपूर्तीसाठी स्वार्या आणि सामरिक हत्यारांची व्यवस्था केली होती.
माननीय अली(र) यांनी ‘कुल्स’ या ठिकाणी पोहोचून सकाळीसकाळीच हल्ला चढविला आदि बिन हातिम याने जीव मुठीत धरून पळ काढला. प्रतिवादी पक्षाने आत्मसमर्पण केले. कैदी, पशु आणि हत्यार इस्लामी लष्कराच्या ताब्यात आली. कैद्यांमध्ये ‘आदी बिन हातिम’ ची वृद्ध बहीणसुद्धा होती. त्यांनी प्रेषितांना मुक्त करण्याची विनंती केली. आदरणीय प्रेषितांनी त्या वृद्ध स्त्रीचा पूर्ण सन्मान करून परत पाठवून दिले. त्यांनी आपले बंधु ‘अदी बिन हातिम’ यास सांगितले की, ‘मी मदीना शहरात आपल्या पित्याप्रमाणे अर्थात ‘हातिमताई’ प्रमाणेच दया, कृपा आणि दानशीलतेचे दृष्य पाहिले आहे. तू मुहम्मद(स) यांच्याशी लढण्याचा विचार सोडून दे आणि तेथे जाऊन त्यांचा आशीर्वाद घे. बहिणीच्या सांगण्यावरून ‘आदि बिन हातिम’ तत्काळ प्रेषितदरबारी हजर झाला आणि इस्लाम धर्म स्वीकारला.
‘हुनैन’ आणि ‘औतास’चे युद्ध
संबंधित पोस्ट
0 Comments