हजरत उमर (र.) यांनी सर्वप्रथम प्रतिनिधी सभा आणि मार्गदर्शक मंडळाची संकल्पना प्रस्थापित केली. त्यांनी अनेकदा हे स्पष्ट केले होते की सल्लामसलतीविना खिलाफत अवैध आहे. विशेष प्रसंगी मजलिसे शूरा (मार्गदर्शक मंडळ) भरविल्या जात होत्या. या व्यतिरिक्त दैनंदिन कामकाजासाठी मस्जिदे नबवीमध्ये सभांचे आयोजन होत होते. विविध प्रांत आणि जिल्ह्यांचे जे अहवाल प्राप्त होत असत ह. उमर या सभेत सर्वांना त्याची माहिती देत असत. एखाद्या समस्येविषयी ह. उमर या सभेतील सभासदांशी विचारविनिमय करून त्यांचे म्हणणे ऐकून घेत आणि त्यानुसार त्यांचे निवारण केले जात असे.
मजलिसे शुराच्या सभासदांव्यतिरिक्त सामान्य नागरिकांनाही शासकीय कामकाजाच्या नियोजनात सहभागी करून घेतले जात असे. जिल्ह्यावर प्रभारींची नियुक्ती जनतेच्या सहभागानने केली जाई. काही प्रसंगी तर निवडणुकीच्या प्रक्रियेतून जिल्ह्यांचे प्रभारी निवडला जात असे. कुफा, बसरा आणि शाम (सीरिया) या जिल्ह्यांतील नागरिकांना असा आदेश दिला होता की त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील अशा व्यक्तींची निवड करावी जो सदाचारी, प्रामाणिक आणि सक्षम असावेत.
लोकतांत्रिक शास्त्र पद्धतीचे सौंदर्य असे की राज्यकर्ता – सत्ताधारी आणि सामान्य नागरिकांना एकसारखे अधिकार प्राप्त असावेत. या उलट कोणते कायदे – नियम केले जाऊ नयेत.
सत्ताधारीला आपल्या दैनंदिन गरजांची पूर्तता होईल यापेक्षा जास्त त्याने राज्याच्या खजिन्यातून घेऊ नये. सामाजिक क्षेत्रात शासनकर्त्याला कोणते विशेष अधिकार, मानमरातब दिले जाऊ नयेत. त्याचे अधिकार मर्यादित असावेत. सामान्य नागरिकांना आपल्या राज्यक्त्यावर टीका-टिप्पणी करण्याची मुभा असावी. यापेक्षा अधिक अधिकार ह. उमर यांच्या पूर्वीच्या कोणत्याही काळात, कोणत्याही राष्ट्रात, कुण्या शासक-राज्यकर्त्याने दिलेले नव्हते. ह. उमर यांनी आपल्या एका प्रवचनात म्हटले होते की,
“मला राष्ट्राच्या तिजोरीतून इतकाच खर्च दिला जावा, जो एका अनाथाच्या दैनंदिन गरजांची सोय करणअयासाठी आवश्यक असेल. जर मला श्रीमंती लाभली असती तर मला काहीही घेण्याचा अधिकार नसता. माझ्यावर तुमचे अनेकविध हक्काधिकार आहेत, ज्यांचा तुम्ही मला हिशोब मागितला पाहिजे. दुसरे असे की वाममार्गांनी राज्याच्या तिजोरीत भर घालू नये. माझ्या हाती कर आकारणी आणि युद्धापासून मिळालेल्या मालमत्तेच्या संपत्तीचा कोणत्याही परिस्थितीत गैरवापर होता कामा नये. देशाची सुरक्षा आणि तुम्हाला खर्चासाठी सोय करणे माझ्यावर बंधनकारक आहे. त्याचबरोबर कोणत्याही हानीकारक परिस्थितीपासून तुमची सुरक्षा करणं माझे कर्तव्य आहे.”
(संदर्भ – अल-फारुक, मौलाना शिवली नुअमानी)
संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद
0 Comments