Home A आधारस्तंभ A हजयात्रेचे धार्मिक विधी

हजयात्रेचे धार्मिक विधी

एखादी मुस्लिम व्यक्ती जेव्हा हजयात्रेसाठी निघते तेव्हा ती जाहीररित्या सर्वांना त्याची सूचना देते. ‘एहराम’ विशिष्ट प्रकारचा साधा पोषाख (सोवळं) असतो तो परिधान करण्यापूर्वी ती व्यक्ती शुचिर्भूत होते. स्नान केल्यानंतर ते वस्त्र ‘एहराम’ परिधान केले जाते. साधे दोन पांढरे शुभ्र कापड विना शिवलेले असते. एक कमरेभोवती गुंडाळले जाते आणि दुसरे खांद्यावर सोडले जाते. नंतर ती व्यक्ती दोन रकात नमाज अदा करते आणि औपचारिकरित्या हजयात्रेसाठी इरादा खालीलप्रमाणे मोठ्याने जाहीर केला जातो.
‘‘लब्बैक! अल्लाहुम्मा! लब्बैक! लब्बैक! ला शरीक लक! लब्बैक! इन्नीलहम्द वन नियमत लक, वल मुल्क ला शरीक लक!’’
(हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! मी हजर आहे! मी हजर आहे! तुझा कोणीही भागीदार नाही! मी हजर आहे! मी हजर आहे! सर्व प्रशंसा तुझ्यासाठीच आहे! प्रशंसा आणि समृध्दी तुझ्यासाठीच आहे! तुझा कोणीही भागीदार नाही!)
व्यक्ती जेव्हा ‘लब्बैक’ (मी हजर आहे) ‘लब्बैक’ ( मी हजर आहे) अशी ग्वाही देतो, तर त्याच क्षणी तो ‘एहराम’च्या स्थितीत असतो. हे शब्द तो हजच्या काळात सतत उच्चारत असतो. प्रत्येक नमाजनंतर, चढताना, उतरताना, चालताना, बसताना अशा प्रत्येक क्षणी तो हे शब्द उच्चारत राहतो. एहरामच्या स्थितीत सुख-चैनीच्या वस्तू त्याच्यासाठी ताज्य असतात. तो आपला नेहमीचा पोषाख सोडून देतो आणि या साध्या पोषाखात हजच्या काळात वावरतो. जी दोन वस्त्रे त्याच्या अंगावर असतात तीसुध्दा शिवलेली नसतात. रंगीत कापड त्याला अंगावर घालण्याची मनाई आहे. तो आपला चेहरासुध्दा झाकू शकत नाही किवा डोक्यावर काही सावलीसाठी आच्छादन घेऊ शकत नाही. आपले अंगावरचे केस अथवा नखेसुध्दा कापू शकत नाही. सुंगधसुध्दा वापरू शकत नाही की स्नान करताना साबणसुध्दा वापरू शकत नाही. पत्नीशी त्या काळात शरीरसंबंध ठेवणे निषिध्द केले आहे. त्या कृत्याची इच्छा करणे अथवा चर्चा करणेसुध्दा अवैध ठरविले आहे. हजयात्रेच्या काळात ती व्यक्ती शिकार करू शकत नाही. अशा प्रकारे तो मक्का शहराकडे रवाना होतो. जेव्हा त्याला काबागृह प्रथमतः दिसते तेव्हा तो आनंदाने आणि मोठमोठ्याने उद्गारतो ‘‘अल्लाहु अकबर! अल्लाहु अकबर!’’ (अल्लाह महान आहे! अल्लाह महान आहे!) ‘‘लाईलाहा इल्लल्लाह.’’ (अल्लाहव्यतिरिक्त दुसरा कोणीही ईश्वर नाही.) मक्का शहरात प्रवेश केल्यानंतर तो प्रथमतः काबागृहाकडे जातो. काबागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या काळ्या दगडावर (संगेअस्वद) आपले दोन्ही हाथ ठेवून तो चुंबन घेतो. नंतर तो काबागृहाला सात फेऱ्या मारतो. त्यानंतर इब्राहीमच्या स्थानावर तो दोन रकात नमाज अदा करतो. जेव्हा तो काबागृहाच्या बाहेर येतो तेव्हा तो ‘सफा’ नामक टेकडीवर चढतो. ही टेकडी काबागृहालगतच आहे. टेकडीवरून तो काबागृहाकडे पाहतो आणि म्हणू लागतो, ‘‘अल्लाह महान आहे – अल्लाह महान आहे. अल्लाहव्यतिरिक्त कोणीही ईश्वर नाही.’’ नंतर ती व्यक्ती मुहम्मद (स.) यांच्यासाठी अल्लाहचा आशीर्वाद मागते व सफा टेकडीवरून उतरून दुसऱ्या समोरच्या टेकडीवर जिचे नाव ‘मरवा’ आहे चढते. मरवा टेकडीवरूनसुध्दा तीच प्रार्थना म्हटली जाते जी ‘सफा’ टेकडीवर म्हटली होती. दोघांमध्ये सात फेऱ्या मारल्या जातात. त्यानंतर ती व्यक्ती मक्का शहरात राहू लागते आणि ज्या ज्या वेळी संधी मिळाली काबागृहाकडे धाव घेते. यात्रेच्या सातव्या दिवशी सर्व हाजी लोक काबागृहात एकत्र येतात आणि इमाम (नेता) चे व्याख्यान ऐकतात. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी इब्राहीम (अ.) आणि त्यांचे सुपुत्र इस्माईल (अ.) या पितापुत्रांच्या शुभहस्ते काबागृहाचे बांधकाम पार पडले. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आणि स्मरण करा की जेव्हा इब्राहीम आणि इस्माईल या गृहाच्या भिती उभारीत होते व प्रार्थना करीत होते की हे आमच्या पालनकर्त्या, आमच्याकडून या सेवेचा स्वीकार कर.’’
काबागृहाची स्थाननिश्चिती आणि काबागृहाचे बांधकाम या दोन्ही गोष्टी अल्लाहकडून निवडल्या गेल्या आहेत. कुरआनोक्ती आहे,
‘‘स्मरण करा ती वेळ जेव्हा आम्ही इब्राहीम (अ.) साठी या पवित्र काबागृहाची जागा योजिली होती.’’ (कुरआन २२: २६)
जेव्हा त्या पवित्र काबागृहाचे बांधकाम पूर्ण झाले लोकांना हजयात्रा करण्याचा आदेश देण्यात आला. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आणि लोकांमध्ये हजयात्रेची आम घोषणा करा’’ (कुरआन २२: २७)
या पवित्र काबागृहाचे महत्त्व आणि उद्देश स्षष्ट करताना अल्लाहने कुरआनमध्ये स्पष्ट नमूद केले आहे,
‘‘आणि या काबागृहाला आम्ही साऱ्या लोकांसाठी ‘मध्यवर्ती शांतीस्थान’ निश्चित केले आणि लोकांना आदेश दिला की इब्राहीम ज्या ठिकाणी प्रार्थनेसाठी उभा राहतो त्या स्थानाला कायमस्वरूपी नमाजचे स्थान बनवा आणि इब्राहीम व इस्माईलला आदेश दिला की माझ्या या घराला परिक्रमा आणि एकांतवास तसेच रुकूअ व सजदा करणाऱ्यांसाठी (नमाजसाठी) स्वच्छ (पवित्र) ठेवा.’’ (कुरआन २: १२५)
‘‘निःसंशय सर्वप्रथम उपासनास्थळ जे मानवांकरिता बांधण्यात आले ते तेच आहे जे मक्का शहरी विद्यमान आहे. त्याला मांगल्य व समृध्दी दिली गेली आणि सर्व जगवासियांकरिता मार्गदर्शनाचे केंद्र बनविले गेले.’’ (कुरआन ३: ९६)
‘‘आठवा ती वेळ जेव्हा आम्ही इब्राहीम (अ.) साठी या काबागृहाची जागा योजिली होती (या आदेशासह) की माझ्यासमवेत कोणासही भागीदार करू नका आणि माझ्या घराची पवित्र प्रदक्षिणा करणाऱ्या, उभे राहणाऱ्या आणि झुकणाऱ्या व नतमस्तक होणाऱ्यांसाठी पवित्र ठेवा, आणि लोकांत हजयात्रेची आम घोषणा करा. की त्यांनी तुमच्यासाठी प्रत्येक लांबवरच्या ठिकाणाहून पायी व उंटावर स्वार होऊन यावे.’’ (कुरआन २२: २६-२७)
अशा प्रकारे मक्का शहरी विद्यमान काबागृहाला अल्लाहने मांगल्य आणि समृध्दी प्रदान केली आहे. त्याला सर्व जगवासियांकरिता मार्गदर्शनाचे केंद्र बनविले आहे. तसेच नमाजसाठीचे आणि एकेश्वरत्वाचे केंद्र बनविले आहे. आपण या सर्व बाबींचा विचारपूर्वक अभ्यास केला तर उमजून येईल की ही वैशिष्ट्ये एकमेकांत गुंफलेली आहेत. मार्गदर्शनाचे केंद्र हे प्रार्थना केंद्र असणारच, अशा स्थानाला मांगल्य आणि समृध्दी राहणारच कारण ते एकेश्वरत्वाचे केंद्र आहे.
आपण यापूर्वीच एकेश्वरत्वावर आणि श्रध्दाशीलतेवर सविस्तर चर्चा केली आहे. उपासनापध्दती व्यावहारिकतेत धर्माचे मूलतत्त्व आहे. काबागृह हे केंद्र आहे जिथे प्रार्थना आणि एकेश्वरत्वाची एककेंद्राभिमुखता आहे. म्हणून हे म्हणणे योग्य आहे की काबागृह हे धर्माचे केंद्रिय स्थान आहे आणि याच कारणामुळे अल्लाहने काबागृहाला ‘अल्लाहचे घर’ म्हणून कुरआनमध्ये संबोधिले आहे. म्हणून काबा हे गृह अथवा केंद्र आहे ईशधर्माचे! हे पवित्र घर इब्राहीम (अ.) यांनी बांधले ते ईशधर्माचे आणि इस्लामचे केंद्र कसे बनले? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी आपणास काबागृहाच्या बांधकामाची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. हे बांधकाम कधी पूर्ण झाले हे जाणून घेणेसुध्दा महत्त्वाचे आहे. काबागृहाचा हेतु साध्य करण्यासाठी कोणती व्यावहारिक पावले उचलली गेली याबद्दलची माहिती करून घेणे गरजेचे आहे. पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे,
इब्राहीम (अ.) यांना त्यांच्या लोकांनी जेव्हा जबरदस्तीने स्थलांतर करण्यास भाग पाडले. त्यांनी त्यांचे घरदार सोडले आणि धर्माची शिकवण देण्यासाठी व सत्याचे आवाहन करण्यासाठी भटकंती सुरू केली. त्या ठिकाणी इब्राहीमच्या स्वप्नाची प्रसिध्द घटना घडली. त्यांना स्वप्न पडले की ते स्वहस्ते आपल्या पुत्राला बळी देत आहे. जेव्हा त्यांनी आपले हे स्वप्न आपल्या सुपुत्राला इस्माईलला सांगितले तेव्हा क्षणाचाही विलंबन न लावता इस्माईल (अ.) म्हटले, ‘‘की पिताश्री आपण अल्लाहच्या आदेशाचे पालन करा, तुम्ही मला ईशपरायणशील पाहाल.’’ इब्राहीम (अ.) यांनी आपल्या पुत्राला जमिनीवर ओणवे केले आणि पुत्राच्या गळ्यावर सुरी ठेवली आणि पुत्राला बळी देणार तोच ईशवाणी झाली,
‘‘इब्राहीम तुझे हात रोखून धर तू परीक्षेत पूर्ण उतरला, आम्ही इस्माईलच्या जागी एक मेंढरु देऊन इस्माईलची मुक्तता केली.’’
इब्राहीम (अ.) यांचे संपूर्ण आयुष्य अशा प्रकारच्या परीक्षांनी भरलेले होते. ही घटना त्यांच्या आयुष्यातील शेवटची परीक्षा होती. या अंतिम परीक्षेत ते उत्तीर्ण झाल्याने त्यांना ईशपारितोषिक बहाल करण्यात आले. अल्लाहने त्यांना शुभवार्ता दिली,
‘‘मी तुला सर्व लोकांचा नेता म्हणून नियुक्त करीत आहे.’’ (कुरआन २: १२४)
इब्राहीम (अ.) यांना हे ईशपारितोषिक बहाल करण्याचा सोहळा काबागृहाच्या भिती पितापुत्र बांधत असतांना ईशआदेशाने (दिव्यप्रकटन) सुरू झाला. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आणि आठवण करा जेव्हा अल्लाहने इब्राहीमकडून काही गोष्टींमध्ये परीक्षा घेतली आणि जेव्हा तो परीक्षेमध्ये पूर्ण उतरला तेव्हा अल्लाहने त्याला म्हटले ‘‘मी तुला सर्व लोकांचा नेता म्हणून नियुक्त करीत आहे.’’ (कुरआन २: १२४)
या ऐतिहासिक घटनेची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत,
१) ईस्माइलला बळी देण्याची घटना मीना या ठिकाणी घडली जे मक्का शहराच्या अगदी जवळ आहे.
२) इब्राहीम आणि इस्माईल (अ.) या पितापुत्रांनी स्वप्न साकार करताना जे धैर्य आणि ईशपरायणतेचे दर्शन घडविले ते मानवी इतिहासात अद्वितीय आहे. अल्लाहने यास इस्लाम (आज्ञाधारकता) म्हणून संबोधले आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘सरतेशेवटी जेव्हा या दोघांनी आज्ञापालनात (इस्लाम) मान तुकविली आणि इब्राहीम (अ.) ने पुत्राला ओणवे केले.’’ (कुरआन ३७: १०३)
काबागृह बांधण्याचा हेतु साध्य करण्यासाठी खालीलप्रमाणे मानवी इतिहासात त्या ऐतिहासिक घटना घडत गेल्या ज्यांची नोंद कुरआनने कायमस्वरूपी घेतली आहे. त्या व्याख्यानात अल्लाहचे आदेश तसेच हजच्या विधीविधानांबद्दल माहिती दिली जाते. आठव्या दिवशी सर्व हाजी (यात्रेकरू) मीना या स्थळी रवाना होतात. मीना मक्का शहारापासून तीन मैलांच्या अंतरावर आहे. हाजी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तेथे राहतात. नंतर आराफात स्थळी रवाना होतात. ‘आराफात’ हे एक विस्तृत मैदान आहे. ते मक्कापासून बारा मैलाच्या अंतरावर आहे. दुपारच्या प्रार्थनेपूर्वी सर्व हाजीलोक आराफात येथे एकत्र येतात. जेव्हा मध्यान्हानंतर सूर्य ढळायला लागतो तेव्हा पुन्हा एकदा इमाम (नेता) सर्वांना उद्देशून व्याख्यान देतो. त्यानंतर इमामच्या पाठीमागे सामुदायिकरित्या नमाज अदा केली जाते. इमामच्या पाठीमाग सर्वजण मध्यान्हीची (जुहर) आणि संध्याकाळ (असर) ची नमाज एकत्र अदा करतात. नमाज झाल्यानंतर सर्व हाजी लोक अशा प्रकारे स्थानापन्न होतात की त्यांचा इमाम ‘जब्लेरहमत’ नामक टेकडीजवळ असेल. इमाम उंटावर स्थानापन्न असतो आणि खाली उतरत नाही. काबागृहाकडे त्याचे (इमामचे) तोंड असते आणि तो सतत प्रार्थना करीत राहतो.
‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे, हे अल्लाह! मी हजर आहे!’’
एक मोठा हाजी लोकांचा समुदाय इमामच्या मागे उभा राहतो आणि त्याच्यासोबत प्रार्थना करीत राहतो. या वेळी इमाम आणखी एक छोटेखानी औपचारिक व्याख्यान देतो आणि हाजी लोक ऐकतात. सूर्यास्तापूर्वी हाजी लोक ‘‘अल मुजदल्फा’’ या ठिकाणी जातात आणि आपापल्या जागेवर विसावतात. त्यांचा इमाम ‘कझा’ नामक टेकडीजवळ थांबतो. सूर्यास्तानंतर इमामच्या मागे सर्वजण नमाज अदा करतात. येथे मगरीबची (सूर्यास्तानंतरची) आणि ईशाची (रात्रीची) प्रार्थना (नमाज) एकत्र अदा केली जाते. येथे सर्व हाजी लोक रात्रीचा मुक्काम करतात. दहाव्या दिवशी तिथे प्रातःकाळची नमाज (फर्ज) अदा केली जाते. या नमाजनंतर प्रत्येक हाजी अल्लाहजवळ क्षमायाचना करतो. अल्लाहचे स्मरण करतो आणि म्हणत जातो,
‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह! मी हजर आहे!’’
सूर्य उगवल्यानंतर हाजी लोक मीनाकडे रवाना होतात. तिथे ते तीन सैतानाच्या खांबांना लहान दगड मारण्याचा विधी पार पाडतात. प्रत्येक खांबाला सात सात दगड मारले जातात आणि प्रत्येक वेळी म्हटले जाते की ‘‘अल्लाह महान आहे.’’
सैतानी खांबांना दगड मारून झाल्यानंतर हाजी लोक त्यांच्या ओठांवर असलेली उद्घोषणा (हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे!…) करण्याचे बंद करतात. ह्यानंतर मीना येथे पशुबळी (कुर्बानी) दिले जातात. हा अनिवार्य विधी आहे. बळी (कुर्बानी) दिल्यानंतर हाजी डोक्याचे मुंडन करतात आणि एहेरामच्या स्थितीतून बाहेर येतात. पुन्हा एकदा ते काबागृहाचे सात फेरे मक्का येथे जाऊन पूर्ण करतात. आणखी एकदा हाजी सैतानी खांबांना दगड (सात/सात) मारण्याचा विधी ‘‘अल्लाह महान आहे’’ ही उद्घोषणा करताना पार पाडतात. आणि नंतर हाजी लोक मक्का येथे परत येतात आणि काबागृहाची परिक्रमा करतात. हा विधी (परिक्रमा) संपल्यानंतर हाजी लोक काबागृहाच्या प्रवेशद्वाराचे चुंबन घेतात आणि त्यांची छाती आणि चेहरा ‘मुएतजम’ या ठिकाणी लावतात. मुएतजम हे ठिकाण काबागृहाचे प्रवेशव्दार आणि हजरे अस्वदच्या मध्यस्थानी आहे. काबागृहाच्या आच्छादनाला धरून हाजी भावनाविभोर होऊन काकुळतीने अल्लाहजवळ प्रार्थना करतात आणि क्षमायाचना करतात. त्यानंतर हाजी लोक मिश्र मनःस्थितीत (सुख-दुःखाच्या) आपापल्या घरी परतु लागतात. अल्लाहच्या घराचे प्रेम हृदयात साठवून आणि त्या काबागृहापासून दूर जाण्याचे दुःख उरी बाळगून परतीचा प्रवास सुरू होतो.
हा अत्यंत संक्षिप्त असा ‘हज’ या उपासना विधीचा आढावा आपण येथे घेतला आहे. काही विधी असे आहेत की त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतरच त्या विधीचे महत्त्व स्पष्ट होते. यासाठी आपण थोडक्यात त्या उपासना विधींचा मागोवा घेऊ या.
१) काबागृह:- याबाबत वरील विवेचनात अनेक दाखले आणि घटना आपल्यासमोर आलेल्या आहेत त्यातून वाचकाला स्पष्ट खुलासा होतो.
२) सफा आणि मरवा टेकड्या :- या दोन्ही टेकड्यांबद्दल कुरआनमध्ये स्पष्ट दिव्य प्रकटन आलेले आहे,
‘‘निःसंशय सफा आणि मरवा अल्लाहच्या संकेतांपैकी आहेत.’’ (कुरआन २: १५८)
‘‘अल्लाहच्या संकेतांपैकी’’ हे शब्द स्पष्टपणे अल्लाहची आज्ञाधारकता दर्शवितात. अल्लाहचे ते संकेतचिन्ह का आहेत? तर त्यासाठी आपणास इतिहासात डोकावून पाहावे लागेल. इतिहास साक्ष आहे की सफा आणि मरवा या त्या दोन टेकड्या आहेत ज्यांच्या दरम्यान माता हाजरा यांनी पाण्याच्या शोधात चकरा मारल्या होत्या. जमजम पाण्याचा झरा त्या दोन टेकड्याजवळच उदयाला आला.
३) जमरात :- मीना शहराच्या लगतच तीन खांब आहेत. प्रत्येक खांबाला जमरा म्हणतात. त्याचे अनेकवचन जमरात आहे. हे ते स्थळ आहे जिथे सैतानाने इब्राहीम (अ.) यांच्या मनात दुष्प्रवृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा ते आपल्या प्रिय पुत्राला बळी देण्यास निघाले होते.
हजयात्री आणि उपासना: आपण हजच्या प्रत्येक उपासनाविधीच्या खोलात जाऊन विचार केला तर कळून येईल की त्या प्रत्येकामागे अल्लाहला समर्पण होण्याची तीव्र भावना कार्यरत आहे.
१) हाजी जे पवित्र वस्त्र हजकाळात अंगावर घेतात त्याला एहेराम म्हणतात, तो काही पोषाख मुळीच नाही. मनुष्याच्या दासत्वाचे व गुलामगिरीचे ते द्योतक आहे आणि त्यागाचे प्रतीक आहे. जेव्हा भिकारी आपला कटोरा घेऊन कृपाळू धनाढ्य मनुष्यापुढे उभा राहतो तर त्याचे प्रत्यक्ष कपडे, हेतु आणि भावना वर्णन करण्यापलीकडचे असतात. त्याचे बाह्यरूप सर्व सांगून जाते. त्याचप्रमाणे हजयात्रीचे बाह्यरुप स्पष्ट दर्शविते की तो काहीएक नसून अल्लाहचा भिकारी आहे. तो सर्व भौतिक सुखे त्यागून ईशसमाधानाकडे आपले मन वळवितो. अल्लाहच्या विचाराने तो भारावून जातो आणि त्याच्यासाठी आपला त्याग करण्यासाठी तयारीत राहातो. हजच्या काळात तो अल्लाहचा भिकारी आणि अल्लाहचा शिपाई या दोन्ही भूमिकेत राहातो.
एहेरामचा दुसरा महत्त्वाचा फायदा जगाला दिसून येतो तो म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक हाजी हेच साधे एहेरामचे वस्त्र अंगावर घालून असतो आणि उद्घोषणा करीत राहतो, ‘‘अल्लाह मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह, मी हजर आहे!’’ त्या वेळी जग इस्लामी राष्ट्रीयत्व पाहून दंग राहते. आंधळासुध्दा पाहू लागतो की इस्लामी नाते हे जगातील इतर कोणत्याही नात्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. माणसाला दुसऱ्या माणसाशी एकत्र करणारे एकमेव बंधन इस्लामचे नाते आहे. जेव्हा सर्व आसमंत दुमदुमू लागतो,
‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह, मी हजर आहे!’’
ही उद्घोषणा हज काळात सर्व हाजी लोकांच्या ओठावर असते. काबागृह बांधताना अल्लाहने आदेश दिला, ‘‘लोकांत हजयात्रेची आम घोषणा करा.’’ या आदेशाचे पालन करताना त्यास प्रतिसाद ‘‘हे अल्लाह मी हजर आहे!’’ ही उद्घोषणा करून सर्व हजयात्री देत असतात.
२) इब्राहीम (अ.) यांनी केलेली घोषणा काही औपचारिक नव्हती किवा ती कर्मकांडाचा भाग नाही. इस्लामच्या तत्त्वाला आणि श्रध्दाशीलतेला बळकटी देण्यासाठीची ती संजीवनी आहे. म्हणूनच त्याला दिलेला प्रतिसाद ‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह! मी हजर आहे!’’ ही काही पोकळ घोषणा नाही. हे ते अभिवचन आहे जो दास आपल्या निर्माणकर्त्या प्रभु, अल्लाहला देतो आणि स्वतःला अल्लाहसमोर समर्पित करतो.
३) हजयात्री जेव्हा काबागृहाला प्रथम पाहतो तेव्हा त्याच्या नजरेसमोर त्याच्या बांधकामाचे पूर्ण दृष्य उभे राहाते. त्याला स्मरण होते की मी त्या राष्ट्राचा (जनसमुदायाचा) सदस्य आहे ज्याच्यासाठी इब्राहीम (अ.) यांनी प्रार्थना केली होती. त्या राष्ट्राला इब्राहीमने अल्लाहशी प्रार्थना करताना आज्ञाधारक (मुस्लिम) राष्ट्र म्हणून संबोधले होते. इब्राहीम (अ.) यांनी अशा राष्ट्रासाठी प्रार्थना केली होती की जो अल्लाहला आणि त्याच्या धर्माला पूर्णतः समर्पित होऊन आज्ञाधारक (मुस्लिम) बनून राहील.
४) जेव्हा हजयात्री आपले हात त्या काळ्या दगडावर ठेवतो तेव्हा त्याला वाटू लागते की तो आपले हात अल्लाहच्या हातात देऊन त्या प्रतिज्ञेला उजाळा देत आहे. अल्लाहला समर्पण, त्याची गुलामी आणि अल्लाहच्या आदेशांचे पालन करण्यासाठी प्रतिज्ञा! दोन्ही हात ठेवल्यानंतर त्या काळ्या दगडाचे चुंबन घेतले जाते. त्या वेळी हजयात्रीच्या मनात विचार येतात की अल्लाहला दिलेल्या अभिवचनाचा पुनरुच्चार करताना आपण आपल्या स्वामीजवळ आणि आपल्या निर्माणकर्त्या प्रभुसमोर, जो सर्व सृष्टीचा मालक, पालक आणि शासक आहे, तोच आपल्या उपासनेचा एकमेव हकदार आहे, याची प्रचिती येते. आपल्या प्रेमाचा आणि उपासनेला तोच एकमेव पात्र आहे. म्हणून तो हजयात्री जेव्हा काबागृहात प्रवेश करतो तेव्हा अल्लाहप्रती आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून उंबरठ्याचे चुंबन घेतो. म्हणजेच काळ्या दगडाचे चुंबन घेतो, जो प्रवेशद्वाराजवळ आहे.
५) तवाफ (परिक्रमा) म्हणजे काय? ते काहीएक नसून भावनेचे प्रकटीकरण आहे. त्या उत्कट भावनेचे आणि इच्छेचे की अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी स्वतःचा त्याग करणे, स्वतःचा बळी देणे. जेव्हा मुस्लिम काबागृहाची परिक्रमा करतो तेव्हा त्याला स्फुर्ती मिळते आणि उत्साह द्विगुणित होतो. हजयात्री आज्ञाधारकतेचा आणि ईशप्रेमाचा दृश्य रूप बनतो. तो स्वतःला विसरून जातो. तो अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या जिवावरसुध्दा उदार होतो.
काबागृहाला परिक्रमा (तवाफ) करणे हे आणखी एका सत्याचे द्योतक आहे की अल्लाह एक आहे आणि अल्लाहचा धर्म एक आहे, त्याचप्रमाणे त्याचे श्रध्दावंत दास सर्व एक आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या कुळाचे लोक येथे एकत्र येऊन काबागृहाची परिक्रमा करताना एकरूप होतात.
६) सफा आणि मरवा या दोन टेकड्यांमध्ये धावत जाण्याचा जो विधी आहे तो या हजयात्रेचा सर्वसंमत ठरावाचे प्रदर्शनच आहे की आम्हाला आदरणीय माता हाजरा यांचे ते कठीणतम परिश्रम आठवतात, जे त्यांनी अल्लाहचे आदेशपालन करण्यासाठी झेलले होते. तशाच प्रकारचे परिश्रम झेलण्यास आम्हीसुध्दा तयार आहोत.
७) हजयात्रेच्या सातव्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत हजयात्री आपल्या इमाम (नेता) च्या अधिपत्याखाली असतो. ते एकत्र चालतात व एकत्र थांबतात. पहिल्या दिवशी ते सर्वजण इमामसह काबागृहात असतात. दुसऱ्या दिवशी मीनामध्ये एकत्र येतात तर तिसऱ्या दिवशी सकाळीच ‘आराफात’च्या विस्तृत मैदानात येतात. रात्री ते ‘मुज्दलफा’ येथे मुक्कामी असतात आणि पुढच्या दिवशी मीनामध्ये पुन्हा येतात. कधी ते आपल्या नेत्याचे व्याख्यान लक्षपूर्वक ऐकतात तर दुसऱ्याच क्षणी ‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह मी हजर आहे!’’ अशी उद्घोषणा करीत राहतात. सर्व हजयात्री आपापले हजविधीविधान व्यवस्थित आणि गांभिर्यपूर्व पार पाडण्यात मग्न असतात. ते कधी कधी दोन नमाज एकत्र करून अदा करतात. या सर्व घडामोडी एका शिस्तबध्द रीतीने चालत राहतात. हजयात्रेचे हे सर्व विधी शिस्तबध्द मिलीटरी जीवनाचे (शिस्तबध्द सैनिकी जीवनाचे) जगाला दर्शन घडवितात. हजच्या काळात प्रत्येक हजयात्री अल्लाहचा सैनिकच असतो, हे आपण वर पाहिले आहे. हा अलोट सैन्यसमुदाय जो एका पवित्र आणि साध्या वस्त्रात वावरत असतो त्यांना पाहून असे वाटते की एक महान सैन्यदल अल्लाहसाठी जीवदान देण्यास तत्पर आहे.
हज उपासनेचा हा दृष्टिकोन आणि उपासनेचे हे स्वरूप सिध्द करते की शिस्तबध्द सामुदायिक जीवन आणि सामुदायिक लष्करी आचरण व आज्ञाधारक (मुस्लिम) राष्ट्र या संकल्पना एकमेकास पूरक आहेत. अशा राष्ट्राची (आज्ञाधारक) सर्व शक्ती अल्लाहच्या सेवेत अल्लाहचा उद्देश साध्य करण्यासाठी आणि त्याच्या धर्माचे वर्चस्व स्थापित करण्यासाठी खर्च केली जाते.
८) तीन स्तंभांना दगड मारणे हा विधीसुध्दा त्या अद्वितीय ऐतिहासिक घटनेची आठवण करून देतो. अब्राहा नामक राजाच्या बलाढ्य सैन्यदलाची पक्ष्यांनी आपल्या चोंचीतून त्यांच्यावर आकाशातून वर्षाव केल्याने दाणादाण उडाली होती. काबागृहाला तोडण्यासाठी हा राजा आपल्या बलाढ्य सैन्यदलास घेऊन आगेकूच करीत असताना आकाशातून पक्ष्यांनी त्यावर गारगोटींचा वर्षाव केला होता. हा विधी पार पाडताना हजयात्री ‘‘अल्लाह महान आहे’’ अशी जी घोषणा करीत जातो ते म्हणजे जगाला त्यांनी दिलेले आव्हान आहे, या दृढनिश्चय आणि सर्वसंमत ठरावाचे की जर कोणी या ईशधर्मावर वाकडी नजर टाकली तर त्यांचा विनाश निश्चित आहे. ही हजयात्रेकरूंची जाहीर घोषणा आहे की जो कोणी या पवित्र काबागृहावर चाल करून आला तर त्याला चिरडले जाईल.
९) ईदुल अजहा हा सण दरवर्षी मानवी इतिहासातील त्या श्रेष्ठतम आणि अद्वितीय अशा बलिदानाची आठवण करून देत आहे. अल्लाहने एक मोठे बलिदान इस्माईल (अ.) यांच्यासाठी दिले आणि त्यांची सुटका केली. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आम्ही एक मोठे बलिदान देऊन त्या मुलाची सुटका केली.’’ (कुरआन ३७: १०७)
पशुचे अल्लाहच्या मार्गात बलिदान देणे म्हणजे स्वतःचे बलिदान देण्यासारखे आहे. अल्लाहने जेव्हा कधी त्यांना आपल्या जिवाचे बलिदान देण्यास सांगितले तर ते त्वरित तयार होतील कारण त्याचे संपूर्ण जीवन हे अल्लाहला समर्पित असते. पशुंना बळी देताना त्यांचे रक्त बाहेर पडते ती निशाणी आहे की आपणसुध्दा स्वेच्छेने रक्त सांडवू जेव्हा अल्लाहने तसा आदेश दिला. या बलिदानाचा दुसरा तिसरा काहीएक हेतु नाही. अन्यथा पशुची निव्वळ कत्तल धार्मिक अथवा चांगले कृत्य होऊच शकत नाही.
‘‘त्यांचे मांसही अल्लाहला पोहचत नाही आणि त्यांचे रक्तदेखील नाही, परंतु त्याला तुमची निष्ठा पोहचते.’’ (कुरआन २२:३७)
अशा प्रकारे हजविधींचा अभ्यास केल्यावर हे स्पष्ट होते की त्या प्रत्येक विधीमध्ये अल्लाहची आज्ञाधारकता आणि अल्लाहला समर्पण (शरण) जाण्याची वृत्ती स्पष्ट दिसून येते. विशेषतः अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची (जिहाद) जिद्द जाणवते जे सर्वश्रेष्ठ असे समर्पण आहे. शरणागती आहे. व्यावहारिक आणि बौध्दिकदृष्ट्या संपूर्ण हजविधी हे सामूहिकरित्या अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करण्याचे एक उत्तम असे दृष्य स्वरूप आहे.
आदरणीय माता आयशा यांनी एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘जिहाद ’ (धर्मयुध्द) एक सर्वश्रेष्ठ कृती आहे. आम्हा स्त्रियांना त्यात भाग घेण्यापासून का रोखले गेले आहे? प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘स्त्रियांसाठी जिहाद (सर्वश्रेष्ठ कृती) हा आहे की त्यांनी पूर्णपणे निर्दोष हजयात्रा करावी.’’ (बुखारी)
संबंधित पोस्ट
October 2024 Rabi'al Awwal 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 27
1 28
2 29
3 30
4 Rabi'al Thani 1
5 2
6 3
7 4
8 5
9 6
10 7
11 8
12 9
13 10
14 11
15 12
16 13
17 14
18 15
19 16
20 17
21 18
22 19
23 20
24 21
25 22
26 23
27 24
28 25
29 26
30 27
31 28
1 29
2 Jamadi'al Ula 1
3 2

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *