Home A स्त्री आणि इस्लाम A स्त्री भ्रूणहत्येला थोपवितांना

स्त्री भ्रूणहत्येला थोपवितांना

वर्तमान जगतातील एक गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिताग्रस्त आहे. यामुळे लिग संतुलन बिघडले आहे. मुले जास्त व मुली कमी होत चालल्या आहेत. परिणामतः समाजावर अत्यंत वाईट दुःष्परिणाम होत आहेत. समाजातील विचारवंत चिताग्रस्त असून या दुर्गुणापासून वाचण्याचा उपाय शोधत आहेत. स्वयंसेवी संघटना देखील प्रयत्न करीत असून आपल्या कुवतीनुसार उपाययोजना करीत आहेत. शासकीय स्तरावर याला थोपविण्याकरीता कायदे बनविले गेले आहेत. यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद असून देखील या समस्येचा अंत दृष्टीक्षेपात नाही. ईश निर्मित निसर्ग व्यवस्थेमधील मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या गडबडीचे व असंतुलनाचे दुःष्परिणाम मानवाला भोगावेच लागत आहेत.
सर्वप्रथम वाढत्या लोकसंख्येला मुख्य समस्या म्हणून पुढे केले गेले व याच्या निवारणाकरीता ‘‘कुटुंब नियोजन’’ व इतर योजना मांडल्या गेल्या, जन्म नियंत्रणाचे कायदे बनविले गेले. पुढे मागे मग गर्भलिग निर्धारणाचे प्रयत्न व्हायला लागले. विभिन्न उपकरणांद्वारे मातेच्या उदरामधील भ्रूणाचे लिग माहिती करून घेण्याचे प्रयत्न होत असून स्त्री गर्भ असल्यास गर्भपात करविले जात आहेत.
फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हीच परिस्थिती आहे. याचमुळे जागतिक स्तरावर या समस्येविषयी चिता व्यक्त केली जात असून उपाय सुचविले जात आहेत.
जगभरात एकूण लोकसंख्येमध्ये मुलींची व मुलांची सरासरी १००:१०७ आहे. फ्रांसमधील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज तर्फे आयोजित ऑक्टोबर २००५ मधील सर्वेक्षणानुसार चीनमध्ये सरासरी १०० मुली व १३४ मुले आहेत. हे असेच चालू राहिले तर २०१५ ते २०३० च्या दरम्यान अडीच कोटी नवयुवकांना पत्नी मिळणे अशक्य होईल अशी आशंकाही यामध्ये व्यक्त केली गेली आहे. संन्हुआ संवाद समितीच्या माहितीनुसार सन २००३ मध्ये (चीन) देशातील २४ परगण्यांमध्ये ‘‘राष्ट्रीय लोकसंख्या व कुटुंब नियोजन आयोगा’’ द्वारे ही स्थिती सुधारण्यासाठी एक महत्वाचा प्रकल्प राबविला गेला. या योजने अंतर्गत निव्वळ मुली असलेल्या कुटुंबाला रोख रकमेव्यतिरिक्त इतर सामाजिक फायदे पुरविण्याची तरतूद आहे. मागील तीन वर्षापासून या प्रकल्पाअंतर्गत मुली व मुले यांच्यातील तफावत १००:१३३.८ पासून १००:११९.६ पर्यंत घटविण्याचे लक्ष्य ठरविले गेले आहे. हा प्रकल्प आता सर्व राज्यांमध्ये व विभागांमध्ये राबवायची योजना आहे. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ उर्दु १८ ऑगस्ट २००६)
भारतामध्ये दर १० वर्षानी लोकसंख्या मोजली जाते. इ. सन २००१ मध्ये लोकसंख्येने एकशे दोन कोटी सत्तर लाख पंधरा हजार (१,०२,७०,१५,०००) ची संख्या पार केली. यामध्ये एकूण ५३,१२,७७,००० पुरुष व ४९,५७,३९,००० महिला होत्या अशी माहिती दिली गेली. अर्थात १०० पुरुषांच्या तुलनेने ९३ स्त्रीया आहे. इ. सन १९९१ मधील लोकसंख्या सर्वेक्षणाच्या तुलनेने हे अंतर जास्त आहे. (‘‘राष्ट्रीय सहारा’’, ७ सप्टेंबर २००६)
देशामधील कित्येक राज्यांमध्ये मुलामुलींमधील ही तफावत खूपच जास्त आहे. विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली व हिमाचल प्रदेश उल्लेखणीय आहेत. या राज्यांमध्ये १००० मुलांमागे ८०० ते ९०० मुली आहेत. १९९१ च्या जनगणनेनुसार पंजाबमध्ये १००० मुलांमागे ८७५ मुली होत्या आणि २००१ मध्ये ती तफावत ७९३ वर पोहोचली. याच प्रमाणे महाराष्ट्रामध्ये १९९१ च्या जनगणनेनुसार १००० मुलांमागे ९४८ मुली होत्या तर २००१ मध्ये ९१७. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ २९ मे २००६)
मुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री जन्म नाकारला जात आहे. मुलांच्या तुलनेने मुलींना कनिष्ठ समजले जाते. त्यांच्या अस्तित्वाला माता पिता स्वतःवरील ओझे समजतात. त्यांचे पालन पोषण, त्यांची सुरक्षा, विवाहाबाबतीच्या अडीअडचणी इ. त्यांच्या (पालकां) करिता एक ओझे बनून जाते. या व्यतिरिक्त मुलींच्या बाबतीत अशा नाजुक आणि गंभीर समस्या उभ्या रहात आहेत की, मुलीला जन्माला न घालणेच बरे असे आईवडलांना वाटते.
अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांचे या जगात जेव्हा आगमन झाले तेव्हा देखील मुलींना ओझेच समजले जात होते. त्या लोकांना नेहमीच ही आशंका रहात असे की, योग्य स्थळ न मिळाल्यास त्यांना आपल्या मुली इतर टोळी मध्ये द्याव्या लागतील. ही देखील एक आशंका सदैव असे की, लुटारु त्यांना पकडून नेऊन दासी बनवून ठेवतील. या सर्व कारणांमुळे ज्या घरी मुलगी जन्माला येत असे, त्याचा चेहराच उतरून जात असे.
‘‘आणि त्यांपैकी एखाद्याला मुलीच्या जन्माची खूषखबर देण्यात येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळिमा पसरतो आणि तो रक्ताचा घोट गिळून बसतो. लोकांपासून लपतछपत फिरतो की या वाईट बातमीनंतर काय तोंड दाखवायचे, विचार करतो की, अपमानित होऊन मुलीला घेऊन रहावे अथवा मातीमध्ये गाडावे? पहा कसे वाईट निर्णय घेत आहेत.’’ (कुरआन १६ : ५८, ५९)
मुलीपासून सुटका होण्याकरिता इस्लाम पूर्व अरबी टोळ्यांमध्ये काही अमानवी प्रथा खालील प्रमाणे होत्या.
  1. ‘‘प्रसुती समयीच एक खड्डा खोदला जात असे. जर मुलगी जन्मली तर जन्मानंतर त्वरीतच तिला गाडून टाकण्यात येत असे.’’ (इब्ने अब्बास)
  2. ‘‘मुलीला जन्मानंतर लगेचच मारून टाकुन कुत्र्यासमोर टाकले जाई.’’ (कतादा)
  3. डोंगरकड्यावरुन खाली फेकुन दिले जाई.
  4. पाण्यामध्ये बुडविले जात असे.
  5. गळ्यावरुन सुरी फिरवली जात असे.
  6. थोडी मोठी झाल्यानंतर साज शृंगारासहित वाळवंटामध्ये नेऊन एका खोल खड्ड्यामध्ये ढकलूनदेऊन वरुन माती ढकलली जात असे. (तफसी कबीर)
आजही वेगळी परिस्थिती नाही. जैसलमेर (राजस्थान) मधील ‘‘देवडा’’ या गांवाबद्दल प्रकाशित झालेल्या एका अहवालामध्ये हे नमुद केले गेले आहे की, तेथे मागील १०० वर्षामध्ये एकाही मुलीचे लग्न झालेले नाही. जन्मतःच त्यांना मारुन टाकले जात आहे. कधी कधी तर हे काम जन्मदाती आईच करीत असे. मातेच्या दूधाबरोबरच नवजात मुलीला अफू चारली जाते. अथवा नाकावर वाळू भरलेली पिशवी ठेवली जाते किवा नाका तोंडामध्ये वाळू भरली जाते. गोधडी अथवा उशी चेहऱ्यावर टाकून ठेवली जाते जेणेकरून श्वास बंद पडावा नाहीतर तोंडामध्ये मिठाचा तोबारा भरला जातो. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ ९ सप्टेंबर २००६)
स्वतःला प्रगत समजणारा वर्ग तर इतका निर्दयी आहे की, शिशुच्या जन्माची देखील वाट पहात नाही. गर्भावस्थेतच स्कॅनिग करुन मुलगा की मुलगी हे पाहिले जाते. मुलगी असेल तर गर्भपातच होतो. याच साठी १९९४ मध्ये एक कायदा बनविला गेला होता. Natal Diagnostic Technique Regulation & Prevention of Misuse Act. या कायद्यान्वये गर्भलिग निदान गुन्हा ठरविला गेला असून देखील दरवर्षी ५ ते ७ लाख मुलींची गर्भामध्येच हत्या केली जाते. (‘‘राष्ट्रीय सहारा’’, ६ जून २००६)
अशा Fertility Centres वर वेळोवेळी छापे घातले जात आहे. हे कार्य करणाऱ्या डॉक्टरांना अटक केली जाते, त्यांच्या विरुद्ध खटले चालतात आणि त्यांना शिक्षा देखील दिली जाते. तरी देखील या सामाजिक कुकर्माला थोपविणे तर दूरच उलट त्याचा प्रसार व फैलाव देखील थांबविता आला नाही.
इस्लामी उपाय
इस्लाम भ्रूणहत्येला घोर अपराध ठरवितो, व याला थोपविण्यासाठी विविध मार्ग चोखाळतो. ज्या ज्या कारणांमुळे अथवा आशंकांमुळे भ्रूणहत्या केली जाते, त्यांनाच इस्लाम दूर करतो. इस्लामनुसार मुलगी ही अहोभाग्य, शालिनता व कल्याणपद आहे. तिच्या पालन पोषणाची व उत्तम प्रशिक्षणाची शिकवण तो देतो. सामाजिक पातळीवर हे खूपच उत्तमप्रद सिद्ध झाले आहे.
सर्व प्रथम जनसामान्यांची मानसिकता तयार करण्याचे काम इस्लामने केले. कारण कुठलाही कायदा तोपर्यंत प्रभावशाली होत नाही जोवर जनसामान्य त्याला जुमानित नाही किवा जोवर त्याच्या गुणधर्मांचे आकलन होत नाही. तसेच न जुमानल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची जाणीव त्यांना होत नाही.
इस्लामने प्रतिपादन केले की हे एक शैतानी कृत्य आहे. ‘‘आणि अशाच प्रकारे कित्येक बहूदेववादीसाठी त्यांच्या भागिदारांनी (कल्पित देवांनी) त्यांच्या संतानाच्या हत्येला आकर्षक बनविले आहे, जेणे करून त्यांना विनाशात टाकावे व त्याकरीता त्यांचा धर्म धूसर बनवून टाकावा.’’ (कुरआन ६ : १३७)
‘‘खचित नुकसानीमध्ये आहेत ते लोक ज्यांनी अज्ञान व मुर्खपणाखातीर आपल्या मुलांना ठार केले.’’ (कुरआन ६ : १४०)
काही अरबी टोळ्या मुलींना आर्थिक लचांड समजून त्यांना मारुन टाकत असत. कारण मुले मोठी झाल्यानंतर कामामध्ये मदत करतील परंतु मुली काहीच कामाच्या नसतात.
कुरआनने स्पष्ट केले की उपजीविकेच्या किल्ल्या अल्लाहच्या हाती आहेत. या धरतीवरील सर्व सजीवांच्या उपजीविकेची जबाबदारी ईश्वराने घेतली आहे. सशक्त असो वा अशक्त, धष्टपुष्ट असो वा अपंग, स्वतः उपजीविकेकरिता धावपळ करीत असो वा दुसऱ्यावर निर्भर असो, सर्वांना भाकरी मिळते ती अल्लाह (ईश्वरा) च्या आज्ञा व मर्जीनेच.
‘‘आणि आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार मारु नका, आम्ही तुम्हाला देखील उपजीविका देतो व त्यांना देखील (देतो).’’ (कुरआन ६ : १५१)
‘‘आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार करु नका. आम्ही त्यांनादेखील उपजीविका देऊ आणि तुम्हाला सुद्धा. वस्तुतः त्यांची हत्या करणे एक मोठा अपराध आहे.’’ (कुरआन १७ : ३१)
इस्लाम मध्ये मुलींची हत्या त्या अपराधांमध्ये गणली जाते ज्यांना अल्लाह व त्याच्या प्रेषितांनी अवैध ठरविले आहे.
‘‘अल्लाहने तुम्हांकरिता अवैध ठरविले आहे, मातापित्यांची अवज्ञा, मुलींना जिवंत गाडून टाकणे व वायफळ खर्च करणे.’’ (मुस्लिम)
मुलींच्या हत्येला त्या घृणित कार्यांमध्ये समाविष्ट केले आहे ज्याबाबत परलोकामध्ये प्रश्नोत्तरे होतील.
‘‘आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुलीला विचारले जाईल ती कुठल्या अपराधापायी ठार केली गेली?’’ (कुरआन ८१ : ८,९)
संततीची हत्या न करण्याची प्रतिज्ञा
ईश्वराचे दूत आदरणीय मुहम्मद साहेब आपल्या अनुयायाकडून ज्या ज्या गोष्टींचे वचन घेत असत त्यामध्ये संततीची हत्या न करण्याचे देखील कलम होते. हुदैबिया येथील तहानंतर ते मक्का विजयापूर्वीपर्यंत अनेक महिला मक्केहून स्थलांतर करुन मदिना पोहोचल्या. ईश्वराने आपल्या प्रेषितांना त्यांकडून वचन घेण्याचा आदेश दिला.
‘‘हे नबी (स.) जेव्हा श्रद्धावंत स्त्रिया तुम्हाजवळ बैअत (प्रतिज्ञा) करण्याकरिता येतील आणि या गोष्टीची प्रतिज्ञा करतील की अल्लाहबरोबर कुठल्याही वस्तूला सामील करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, आपल्या संततीची हत्या करणार नाही, आपल्या हातापायासमोर कोणतेही कुभांड रचणार नाही आणि कुठल्याही चांगल्या कामामध्ये तुमची अवज्ञा करणार नाही, तर त्यांच्याकडून बैअत (प्रतिज्ञा) घ्या, आणि त्यांच्या बाबतीत अल्लाहजवळ क्षमेची प्रार्थना करा. निःसंशय अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे.’’ (कुरआन ६० : १२)
असेच वचन व प्रतिज्ञा प्रेषितांनी पुरुषांकडूनही घेतल्या, मदिनेला स्थलांतरापूर्वी ज्या ज्या नशीबवान लोकांनी ईशदूताच्या हातावर प्रतिज्ञा केली होती त्यामध्ये आदरणीय उबादा बिन सामित (रजि.) होते. ते कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स.) साहेबांनी सांगितले,
‘‘माझ्या जवळ या गोष्टींची प्रतिज्ञा करा की, अल्लाहच्या बरोबरीने इतर कोणालाही सम्मिलीत करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही आणि आपल्या संततीची हत्या करणार नाही.’’ (बुखारी)
मुलीचे अस्तित्व पुरुषाकरिता संकट अथवा झंझट आहे हे इस्लामला मान्य तर नाहीच उलट त्याने मुलीला स्वर्गप्राप्तीचे साधन ठरविले आहे.
आदरणीय अनस बिन मालिक (रजि.) उल्लेख करतात की, ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) साहेबांनी सांगितले की, ‘‘ज्या व्यक्तीने दोन मुलीचे पालन पोषण सज्ञान होई पर्यंत केले तो अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी माझ्या इतका जवळ राहील (हे शब्द उच्चारतांना प्रेषित (स.) नी आपली दोन बोटे जुळवून दाखवली.)’’ (मुस्लिम)
दुसऱ्या प्रेषित कथनामध्ये असे शब्द आहेत –
‘‘ज्या व्यक्तीने दोन मुलींचे पालन पोषण केले, ती व्यक्ती आणि मी स्वर्गामध्ये अशा प्रकारे प्रवेश करु (यावेळी प्रेषित (स.) नी आपल्या दोन बोटांना दर्शविले.)’’ (तिरमिजी)
आदरणीय इब्ने अब्बास (रजि.) कथन करतात की, ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले –
‘‘ज्याच्या दोन मुली असून त्या जवळ आहेत तोपर्यंत तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल, तर त्या त्याच्याकरीता स्वर्गप्राप्तीचे साधन बनतील.’’ (सुनन इब्ने-माजा)
आदरणीय उकबा बिन आमिर (रजि.) उल्लेख करतात की, प्रेषित (स.) यांचे कथन आहे की,
‘‘ज्याला कुणाला तीन मुली असून त्याने संयम बाळगला तसेच आपल्या कुवतीनुसार त्यांना खाऊ पिऊ व लेवू घातले तर ते कर्म प्रलयाच्या दिवशी नरकापासून त्याच्याकरिता ढाल बनेल.’’ (सुनन इब्ने – माजा)
प्रेषितांच्या कथनामध्ये मुलीच्या शिक्षण व प्रशिक्षणाबाबत सक्त ताकीद केली गेली आहे. आदरणीय अबूसईद अल-खुदरी (रजि.) कथन करतात की, प्रेषित (स.) नी सांगितले की,
‘‘ज्या व्यक्तीने तीन मुलींचे पालन पोषण केले, त्यांना समाज-रीत व शिष्टाचार शिकविला, त्यांचे विवाह करून दिले आणि त्यांच्याशी सद्व्यवहार करित राहीला, त्याच्याकरिता स्वर्ग आहे.’’ (अबू दाऊद)
आदरणीय इब्ने अब्बास (रजि.) उल्लेख करतात की, ईश्वराच्या प्रेषितांनी सांगितले की,
‘‘ज्याने तीन मुलींचे अथवा भगिनींचे पालन पोषण केले, त्यांना शिष्टाचार शिकविला, त्याबरोबर सहानुभूतीने वागला येथपावेतो की ईश्वराने त्यांना (मुलींना) तृप्त केले, त्याच्या करीता ईश्वराने स्वर्ग अनिवार्य केला आहे.’’
कथन करणाऱ्यांनी नमूद केले आहे की, हे सर्व ऐकून एकाने विचारले ‘‘हे प्रेषित (स.) जर एखाद्याला दोनच मुली अथवा भगिनी असतील आणि तो असाच त्यांच्याशी वागला तर…?’’ प्रेषित (स.) नी सांगितले ‘‘त्याच्यासाठी देखील हेच प्रतिफल आहे.’’
कथनकर्ता खाली हे देखील नमूद करतो की, जर उपस्थितांपैकी एखाद्याने एका मुलीबरोबर अथवा एका बहिणीबरोबर सद्व्यवहाराबद्दल विचारले असले तर प्रेषित (स.) नी हेच उत्तर दिले असते. (शरह-अल-सुन्ना)
इस्लामच्या या शिकवणी नी मुलींना समाजामध्ये इतकी प्रतिष्ठा व सन्मान दिला आहे. यापेक्षा वेगळी कल्पना केलीच जाऊ शकत नाही. ज्या समाजामध्ये मुलींचे अधिकार नाकारले जातात अथवा त्यांना कनिष्ठ समजले जाते त्याठिकाणी मुलींची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांना वर उचलण्याकरिता या शिकवणीची मदत होऊ शकते.
संबंधित पोस्ट
December 2024 Jamadi'al Ula 1446
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
1 30
2 Jamadi'al Thani 1
3 2
4 3
5 4
6 5
7 6
8 7
9 8
10 9
11 10
12 11
13 12
14 13
15 14
16 15
17 16
18 17
19 18
20 19
21 20
22 21
23 22
24 23
25 24
26 25
27 26
28 27
29 28
30 29
31 Rajab 1
1 2
2 3
3 4
4 5
5 6

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *